करुणालय : ३

चॉकलेटी जादूचे क्षण

पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी आमच्या साऱ्या टीममेंबर्सना नव्या वर्षासाठीच्या डायऱ्या त्यावर शुभेच्छा-स्वाक्षरी लिहून देतो. ‘आनंद काकांनी काय लिहिलेय् ह्या वर्षी’ अशा उत्सुकतेने सारे जण एकमेकांच्या डायऱ्या चाळतात. आमचा एक सहकारी आहे ‘बंधु.’ त्याची माझी मैत्री किमान पस्तीस वर्षांची. त्या काळी तो माझा पेशंट होता. आज सहकारी आहे. व्यसनामध्ये वारंवार आपल्या आपट्या खातखात अगदी कातर होऊन तो दादरच्या माझ्या दवाखान्यात आला होता. रस्त्यावर राहत होता. त्याच्या नजरेत मला सच्चेपणा जाणवला होता. आजवर मी त्याला जमेल ती मदत आणि उपचार दिले होतेच. पण यश मिळाले नव्हते.

ह्या वेळी, मी सावध होतो. अंमली पदार्थ सोडल्यावर येणाऱ्या शारीरिक-मानसिक वियोगाची लक्षणे (withdrawal symptoms) ताब्यात आणण्यासाठीची औषधे मी त्याला पुडीत बांधून द्यायचो. ती सुद्धा फक्त दोन दिवसांची. संपूर्ण स्ट्रीप दिली गोळ्यांची आणि ह्याने ओव्हर डोस घेतला तर . . . ही भीती होती. दवाखान्याशेजारी असलेल्या खानावळीमध्ये त्याची दोन वेळच्या जेवणाची सोय लावली होती. दादरच्या दवाखान्याचे माझे वार असायचे सोम, बुध, शुक्र. त्या दिवशी रात्री तो मला नेमाने भेटायचा. असे एकूण सहा ‘फॉलो अप’ झाले. त्यानंतरच्या वेळी मला ओपीडी संपवायला उशीर झाला. बंधु माझी वाट पाहत थांबला. मी मोकळा झालो तेव्हा शेजारची खानावळ बंद झालेली . . . आम्ही दोघे गप्पा मारत निघालो. त्या काळी दहा-साडेदहाला दादर भागातही चहलपहल नसायची. मला ठाण्याला जायला दादर स्टेशन गाठायचे होते. वाटेत एक दुकान उघडे दिसले. मी कॅडबरीचा मोठ्ठा भाग विकत घेतला. बंधुला दिला. “खायला सुरुवात कर” असे सांगितले. स्टेशनपाशी काही फळे घेऊन दिली. त्याच्या हातात पैसे द्यायचे नाहीत हे पथ्य मी आणि त्याने दोन आठवडे पाळले. त्यानंतर तो मुक्तांगणमध्ये आला. अग्निपरीक्षा झाली होती.

त्यानंतर त्याच्या व्यसनमुक्तीला दहा वर्षे झाली तेव्हा मी तिथे होतो. “मी आजवर प्रिस्क्रीप्शन् देणारे डॉक्टर खूप पाहिले होते. पण चॉकलेट खाऊ घालणारे तुम्ही पहिलेच होतात.” त्याच्या व्यसनमुक्ती वाढदिवसाच्या मीटिंगमध्ये बंधु म्हणाला होता. ह्या घटनेलाही आज पुढची दहा वर्षे झाली आणि बंधूंच्या प्रगतीचा आलेख सुरेख राहिला. म्हणून ह्या वर्षीची डायरी त्याला देताना मी लिहिले, “स्वामी तिन्ही जगाचा बंधुविना भिकारी . . . भ्रातृभावाचे साक्षात उदाहरण असलेल्या बंधुला नववर्षाच्या शुभेच्छा.”

अशा प्रकारे चॉकलेटला, माझ्या थेरपीमध्ये मानाचे स्थान मिळाले. ठाण्याच्या आय.पी.एच्. संस्थेच्या ओपीडी मध्ये माझ्या हाताशी चॉकलेट्स असतातच. ‘इंजक्शने देणारे डॉक्टर म्हणून आधीच आमच्या व्यवसायाची बदनामी झालेली. आणि विविध शैक्षणिक, भावनिक, वर्तनविषयक कारणांनी लहान मुले भेटीला आणली जातात (पालकांद्वारे) तेव्हा त्यांच्या डोळ्यात अविश्वासाची सावट स्पष्ट दिसत असते. अशावेळी चॉकलेटचा वापर . . . Ice breaker म्हणून होतो.

कोणत्याही वयातला पेशंट जेव्हा काही चांगली बातमी घेऊन येतो तेव्हा चॉकलेटचा वापर होतो गोड प्रोत्साहन म्हणून. वय वर्षे पाचपासून आज वीस वर्षे नियमितपणे येणारा एक मुलगा आहे.  त्याला फिट्सचा आजार होता, शैक्षणिक अक्षमता (Learning Disability) होती आणि  वृत्तीची चंचलता देखील. आज तो ग्रॅज्युएट झाला, एमबीए झाला, नोकरीला लागला आणि आता CFA म्हणजे फायनान्शियल ऍनालिस्ट सुद्धा बनतोय्. आमच्या प्रत्येक भेटीची सुरुवात किंवा सांगता नेहमी चॉकलेटने होते.

माझी काही मुले-मुली (जी कधी काळी पेशंट्स असतात) भेटायला येताना हक्काने चॉकलेट वसूल करतात. स्वमग्नता असलेली, बौद्धिक दृष्टीने मागे पडलेली, अशांचे डोळेसुद्धा चॉकलेट म्हटले की चमकतात. विभक्त होण्याच्या टोकाला येऊन नंतर प्रयत्नांती परत एकत्र आलेल्या जोडप्यालाही माझी हीच भेट असते. डिमेन्शिया म्हणजेच स्मृती पुसल्या जाण्याच्या प्रवासात असलेल्या आजीसुद्धा माझ्यासमोर आपली मूठ उघडून मागणी करतात.

पुण्याच्या आय.पी.एच्. संस्थेमध्ये मदतीसाठी येणारे एक काका-मावशी प्रत्येक भेटीच्या वेळी बारा-पंधरा, चॉकलेट बार घेऊन येतात. आमच्या रिसेप्शनवर काम करणाऱ्या सहकाऱ्यांपासून त्यांचे वाटप सुरू होते. त्या दिवशी जेवढे कन्सल्टंट्स हजर असतील त्या सर्वांना चॉकलेट मिळते. 

“तुम्ही सगळे आमच्या भेटीची वाट पाहता . . . तुमची चेहरे खुश होतात. आम्हाला छान वाटते . . . तुम्ही सारे लोकांना अहोरात्र मदत करता. त्याची दाद नको का द्यायला?” ते काका म्हणतात. मावशी त्यांना दुजोरा देतात. भावनिक आरोग्याच्या वाटेवरचे आम्ही सारेच वाटसरू आहोत हे दर्शवणारे क्षण असतात हे सारे.

चॉकलेट हे मैत्रीचे, प्रेमाचे प्रतिकात्मक एक्सप्रेशन असते. डॉक्टर-पेशंट नात्याला चौकटीच्या बाहेर काढणारी वाट असते ती. पण काही जण असे असतातच ज्यांना चॉकलेट आवडत नाही. सहसा माझ्या टेबलच्या खणामध्ये, लाडू, चिक्की असे घरगुती पदार्थही असतात. नवी कोरी पेन्स असतात. आणि मी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही अगदी हाताशी ठेवलेली असतात. खास क्षणांची आठवणभेट राहावी म्हणून. काऊंसेलिंगचा अभ्यास करताना एक वाक्य वाचले होते, Relationships not therapies cure people. मी त्या not च्या जागी and असा शब्द घालतो. कारण मानसशास्त्रातील समुपदेशक म्हणजे फक्त ‘गप्पा’ नव्हेत. त्या गप्पा भासायला हव्यात पण समोरच्या व्यक्तीला नवीन दृष्टीकोन मिळायला हवा, भावनिक सक्षमता वाढायला हवी आणि बुद्धीलाही खाद्य मिळायला हवे.

प्रेमाच्या नात्यामध्ये अपयश मिळालेली एक मुलगी परवाच माझ्यासमोर बसली होती. “मी त्याला विसरूच शकत नाही . . . खूप सॅड वाटते . . . पण त्याचा रागपण येतो.” ती म्हणाली.

“आपल्याला ह्या नात्याचे मध्याचे भावनिक अंतर ठरवायचे आहे. असे समज की त्या व्यक्तीच्या उत्तम फोटोची फ्रेंम तुझ्या बेडरूम मध्ये, उशीजवळ आहे . . . पाहायला लाग ते दृश्य . . . आता तू त्याला मिस् करते आहेस . . . काय करशील?” 

“ती फ्रे कवटाळून रडेन मी . . .” 

“आता इमॅजिन कर त्याचा राग आलाय् . . .” 

“फेकली मी जमिनीवर . . . फुटली ती . . . आता त्याचा फोटो फाडते आहे . . .”

“उपयोग होतोय् का पा . . .  शांत वाटते आहे?” 

“तात्पुरते . . . तेवढ्यापुरते.” 

“आपल्याला ती फ्रेम दृष्टी बाहेर ठेवायची आहे. एवढेच . . . अशा अनेक गोष्टी असतात आयुष्यात ज्या येतात आणि दखल न देता राहतात.” मी म्हणालो.

“गॅरेजमध्ये ठेवायची आहे मला ती फ्रेम”

“हातांनी कवटाळलेली फ्रेम गॅरेजपर्यंत जायची तर पहिला टप्पा काय असेल?”

“समोरच्या भिंतीवर टांगणे तिला.” ती म्हणाली. 

“उशाशी असलेली फ्रेम पटकन् फेकता येईल . . . इथे अंतर वाढले . . . त्यानंतरचा टप्पा कोणता असेल?”  मी विचारले.

अशा प्रकारे तिच्या घराचा ‘दृश्य’ नकाशा चितारून आम्ही तिचा भावनिक प्रवास ‘स्पष्ट’ आणि ‘रेखीव’ करत गेलो. प्रत्येक टप्प्यावर तिच्या मनातले विचार काय असतील ह्याचा मागवा घेतला. त्यावरचे कोणते पर्याय ती ‘स्वतः’ आखू शकते ह्यावर चर्चा केली. 

“समजा आपण फोटोफ्रेम गॅरेजमध्ये ठेवली आहे . . . पण सहवासाची तीव्र आठवण आली, दुसऱ्या कोणी तुमच्या नात्याचा संदर्भ दिला तर . . .” मी म्हणालो. 

“तो फोटो अचानक बेडरूममध्ये भिंतीवर येईल” ती म्हणाली. आणि स्वतःशीच किंचित् हसली. 

“आणि तरीही आपल्याकडे कोणते चॉईस असतील?” 

“उशीकडे ठेवायचे की त्याला मिठी मारायची की बाहेरच्या पॅसेजमध्ये टांगायचे सध्यापुरते!” ती विचार करत म्हणाली. 

“शाब्बास . . .” असे म्हणत मी तिच्या हातावर चॉकलेट ठेवत, त्या क्षणाच्या ‘बोधा’वर गोड शिक्कामोर्तब केले.

डॉ. आनंद नाडकर्णी

anandnadkarni@gmail.com

लपलेल्या उद्योजकाचा संततशोध

ॲग्रोवन साप्ताहिकासाठीचा ‘कर्ता शेतकरी’ या साप्ताहिक मालिकेतील हा अखेरचा लेखांक..

रामकृष्णहरी वाचकहो! म्हणता म्हणता दहा-अकरा महिन्यांचा काळ सरला आणि ‘ॲग्रोवन’च्या अंकातील आपली ‘कर्ता शेतकरी’ ही लेखमालिका आता संपन्न होत आहे. सह्याद्री फार्मस् आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ह्या दोन्ही सहभागी संस्थांना ह्या प्रकल्पाच्या रूपाने एकत्र  येता आले आणि त्यातून तयार झाला एक दृकश्राव्य अभ्यासक्रम. उण्यापुऱ्या बेचाळीस भागांचा. आपल्या ‘आवाहन आयपीएच्’ ह्या युट्यूब वाहिनीवर तसेच एबीपी माझा ऑनलाईन आणि सह्याद्री फार्मच्या चॅनेलवर ही मालिका आपल्यासाठी निरंतर उपलब्ध आहेच. 

तरीही लेखरूपाने हा सारा दस्तावेज ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आम्हाला मांडावासा वाटला त्याची काही कारणे आहेत. कोणताही अभ्यासक्रम म्हटला की त्याचे एक पाठ्यपुस्तक असते. समजा, एका प्रेक्षकाने प्रथम ‘कर्ता शेतकरी’चे एपिसोड पाहिले आणि नंतर उजळणीसाठी लेखांचा वापरतो करेल. काही जण लेखमालिका वाचतील. आणि नंतर स्क्रीनवरचे भाग पाहतील. म्हणूनच ह्या लेखमालिकेवर काही संस्कार करून त्याचे पुस्तक बनवावे असे मनात आहे. प्रकाशकबंधुनी रस दाखवला तर हे पाऊल उचलता येईल. अशाप्रकारे प्रेक्षकश्रोते आणि वाचक अशा दोन गटांपर्यंत तर आपण पोहोचलो. पण अजून एक दस्तावेज ह्या उपक्रमादरम्यान तयार झाला आहे. हे आहे प्रशिक्षण देण्याची पुस्तिका. शेतकरी मित्र-मैत्रिणींच्या गटाला हा ‘स्वाध्यायक्रम’ शिकवावा ह्यासाठी नेमके काय करावे हे उलगडून सांगणारी प्रशिक्षणपुस्तिका सुद्धा तयार झाली आहे. स्वेच्छेने वाचण्या-पाहण्याचा (किंवा पाहण्या-वाचण्याचा) एक फायदा असतोच पण ‘जाणीवपूर्वक’ अभ्यास करण्याची एक पद्धत ह्या ‘ट्रेनिंग मॅन्युअल’ मध्ये आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे कृषीगट, बचत गटातील महिला, कृषीक्षेत्रातले विद्यार्थी-प्राध्यापक आणि कृषीउद्योजक कंपन्या ह्या सर्वांपर्यंत आपला अभ्यासक्रम सशक्तपणे पोहोचू शकेल.

म्हणजे प्रसाराला आवश्यक ती शिदोरी आता तयार आहे. आता प्रचाराची कांस धरणे अत्यावश्यक आहे. तुम्ही म्हणाल, अजूनही प्रसार करायचा तरी कशाला? कारण आपल्याला ‘उद्योजकताके  दो बूंद!’ प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे आहेत. पोलियोविरोधातले अभियान आरोग्यसेवेने सातत्याने चालवले तेव्हाच त्याचा अपेक्षित परिणाम निर्माण झाला. शेतीबद्दलचा आत्मविश्वास खास करून तरुणांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. डॉक्टरी व्यवसायामध्ये करीयर सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या एका तरुणाला कुटुंबातील एकाने घरातल्या पिढीजात शेतीव्यवसायात वळण्याचा सल्ला दिला. “माझ्या लाईफस्टाईल साठी असा तोट्याचा व्यवसाय नको” असा सूर त्याने लावला. ह्यातले दोन शब्द महत्वाचे . . . लाईफस्टाईल आणि तोटा.

व्यक्तीच्या जगण्यामध्ये ह्या दोन शब्दांच्या व्याख्या काय असतात त्यावर ‘उद्योजकता’ ठरते. एक तपाहून जास्त काळ लोटला. इंजिनीयर होऊन ‘उत्तम’ नोकरी करणारा आकाश बडवे हा तरुण छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पोहोचला. शहरी नोकरी मध्ये मन न लागल्यामुळे, केंद्र सरकारच्या एका विकासवृत्तीच्या अंतर्गत दोन वर्षांसाठी तो दंतेवाडा मध्ये पोहोचला. आजही तिथेच कार्यरत आहे. पहिल्याच भेटीमध्ये त्याने भूसूरंग शोधणारी लष्करी  वाहने दंतेवाडाच्या रस्त्यावर पाहिली तेव्हा त्याला ‘अवतार’ चित्रपटातील वाहने आठवली तसेच नक्षलग्रस्त भागातील अडचणींची कल्पनाही आली. ग्रामीण विकासाच्या विविध अंगावर काम करताना हा तरुण रुळला आणि रुजला तो कृषिव्यवसायात. 

आदिवासी, शेतीकडे पाहतात ते फक्त व्यवसाय म्हणून नव्हे तर एक ‘सजीव’ नाते म्हणून. जंगल आणि शेती हे त्यांच्यासाठी एकाच सृष्टीचे अभिन्न भाग. दंतेवाडा हा जिल्हा, ७१% टक्के आदिवासीबहुल पण कुपोषणाचे प्रमाण ५७%. जमीन भरपूर, जंगल दाट पण भूक, कुपोषण, गरिबी आणि बाजारव्यवस्थेचे शोषण ह्या चार समस्या. नेमक्या ह्याच प्रश्नांना उत्तर म्हणून अतिरेकी चळवळी जन्म घेतात. त्यामुळे ह्या प्रश्नांचे योग्य असे उत्तर मिळते का हा पुढचा प्रश्न. पण आठवड्याच्या बाजारामध्ये एक किलो चारोळीच्या बदल्यात एक किलो मीठ घेऊन जाणारी महिला आकाशने पाहिली. 

सहकारी सेंद्रियशेतीचा प्रयोग आकाश आणि सहकाऱ्यांनी सुरू केला. आज या शेतकरी सहकारी कंपनीचे नाव आहे ‘भूमगादी.’ भूमगादी हा स्थानिकांचा बैसाखी किंवा पोंगलसारखा उत्सव. त्याचेच नाव कंपनीसाठी निवडले गेले. आज जिल्ह्यातील १२० गावातील साडेतीन हजार शेतकरी (पुरुष-महिला) ह्या कंपनीचे भागधारक आहेत. ‘आदीम’ हा त्यांचा ब्रँड असून परंपरागत तांदूळ जातींची तीसहून अधिक उत्पादने ते विकतात. त्यांचे एक तांदूळवाण तर काळ्या रंगाचे रोप आहे. अशा अनेक जाती त्यांनी विकसित केल्या. सोबत भात, ज्वारी, बाजरी ह्यांचे प्रोसेसिंग युनिट तयार केले. जंगली पदार्थ उत्तम चवीचे असतात हे सिद्ध करणाऱ्या ‘आदीम कॅफे’ची निर्मिती केली. ह्या कॅफेचे मेनूकार्ड अतिशय प्रेक्षणीय आहे. लाल रंगाचा डोसा त्यात पाहायला मिळतो. (आकाशची मुलाखत संगतवार भागश: उपलब्ध आहे. आवाहन आयपीएच् ह्या  आपल्या यूट्यूब चॅनेलवर)

महत्त्वाचे म्हणजे शेतकरी एकत्र येऊन शेतमालाचा भाव ठरवतात. ह्या जिल्ह्यामधील रासायनिक खतांची खाजगी दुकानेही बंद आहेत. सेंद्रिय शेतीला उत्तेजन द्यायचे तर केमिकल शेतीला बांध घातले पाहिजेत हे तत्त्व शेतकऱ्यांनी २०१५ साली केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर तर २०१८ साली नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडले. ह्या कंपनीने स्वतःची नैसर्गिक खतप्रणाली तयार केली आहे. ‘3G’ हे त्यांचे एक लाडके उत्पादन. जिंजर, गार्लिक, ग्रीन चिली ह्यांची ही प्रमाणित कृमीविरोधक ‘पेस्ट’ आहे. ह्या साऱ्या प्रवासात आकाशला स्वतः मधला उद्योजक मिळाला आहे. उद्योजकता विस्तार पावते आहे. ‘लाईफस्टाईल’ची सही व्याख्या अनेकांना गवसते आहे आणि ‘नफा-तोट्याची’ गणिते आता वैयक्तिक परिघातून सुटून देशव्यापी बनू पाहत आहेत. 

अशीच कहाणी आहे परभणी जवळच्या झरी नावाच्या गावातल्या कृषीभूषण मेघाताई देशमुखांची. माझी ओळख झाली ती परभणीमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘वेध’ ह्या आमच्या जीवन शिक्षण परिषदेमुळे. हळूहळू मी सुद्धा तिला ‘आक्का’ म्हणायला लागलो. तिला गवसलेली स्वतः मधली शेतकरी उद्योजक कशी आहे?

आक्काचे माहेर म्हणजे कृषीभूषण कांताभाऊ देशमुखांचे घर. लाडाकोडात वाढलेली, बारावीपर्यंत शिकलेली थोरली लेक गावातल्या गावातच सासरी गेली. शेतकरी कुटुंबातली असूनही ती कधी प्रत्यक्ष शेतीत उतरलेली नव्हती. ऐन विशीमध्ये प्रथम पतीचे निधन, त्यानंतर सासऱ्यांचा मृत्यू असे घाव सोसताना आक्काच्या मनाचा निर्धार होत होता. बहिणाबाई चौधरींची ‘गोंदण’ कविता तिच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा येतो. पण आक्का ही कविता जगली. प्रथम पारंपारीक शेतीमध्ये उतरली. नंतर वडिलांच्या ‘विद्यापीठा’च्या प्रशिक्षणाखाली पेरू, सीताफळे, लिंबू अशी पिके घेऊ लागली. 

“आमच्यात ‘वर्क फ्रॉम होम’ नसते. सारे जग कोरोनाकाळात घरी बंद होते तरी आम्ही शेतावर होतो.” आक्का सांगत होती. शेतीतले प्रत्येक कौशल्य ती शिकली. “शेतकरी म्हटले की नेहमी ‘तोच’ का येतो तुमच्या नजरेपुढे?’’ आक्काने विचारले. मी तात्काळ आपल्या कर्ता शेतकरी मधल्या ‘अबोलीची बोली’ ह्या दोन भागांचे उदाहरण दिले. तर गेल्या दोन दशकांमध्ये आक्काने साऱ्या शेतीचा पायापालट केला. पाण्याचे नियोजन केले, जमिनीचा कस वाढवला. आज साडेआठ हजारावर झाडांचे फलोद्या  बहरले आहे आणि आक्का आता स्वतःचे, प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याच्या विचारात आहेत. अर्ध्या अर्ध्या किलोची ‘तगडी’ सीताफळे त्यांनी माझ्या हातात ठेवली. ह्या प्रवासात त्यांनी स्वतःचे बीए आणि एमए पूर्ण केले. मुलाचे शिक्षण करून त्याला पुढच्या प्रवासासाठी परदेशात पाठवले. महिलांना कृषीक्षेत्रात आणण्याची संघटना बांधली. शिवणयंत्रांचे संच आणून महिलांचे केंद्र सुरू केले. ग्रामपंचायतीमध्ये त्या पंच बनल्या. एचआयव्ही ग्रस्त बालकांना दत्तक घेतले आणि दिवसरात्र  काम करताना अक्षरशः घाम गाळून कमावलेली ‘स्मितरेषा’ ढळू दिली नाही. 

आज माझ्या सासरी आणि माहेरी प्रत्येक चांगल्या कामाचा मुहूर्त माझ्या हाताने होतो. पहिले औक्षण माझ्या हाताने होते. हा पाठिंबा नसता तर मी इथवर येऊ शकले नसते.” नम्रपणे आक्का सांगते. आपली दुःखे मनातच ठेवायची आणि तिथेच सोडवायची असतात असे सांगून आक्का म्हणाली, “सुखे मात्र मांडावी जगाच्या बाजारात. त्यांची तशीही किंमत  फारशी नसते घराच्या चौकोनात . . .”

आक्काशी गप्पा मारताना तिच्यातला बहिणाबाईचा वारसा उमगतो. ती सोज्वळ समज मनाला भिडते. (आमच्या तपशीलवार गप्पा लवकरच पहा आवाहन आयपीएच्. वर) आणि आकलन होऊ लागते की आकाश असू दे की आक्का . . .  ह्यांच्यामध्ये उद्योजकता मुळामध्ये होतीच अव्यक्त स्वरूपात. अद्वैत तत्त्वज्ञानात दोन शब्द आहेत. Potential आणि Manifest. बीजामध्ये अव्यक्त स्वरूपात झाड असते. झाड ‘व्यक्त’ होते तेव्हा त्यात फुले-फळे अव्यक्त स्वरूपात असतातच आणि फळ जेव्हा जन्म घेते तेव्हा त्यात लपलेले बीज असतेच.

उद्योजकता ही काही नव्याने तयार करायची ‘वस्तु’ नव्हे. ती गवसण्याची गोष्ट आहे. एकदा गवसली की तिचे मोल कळायला लागते. जगण्याची गणिते बदलायला लागतात. जीवनशैलीची आणि नफ्या तोट्याची सुद्धा.

आक्का म्हणते की, स्त्री स्वतःला भाजून घेते पण इतरांना मायेमध्ये भिजवते. आकाश म्हणतो की त्याला आता दंतेवाड्यात गेल्यावर ‘घरी’ आल्यासारखे वाटते. स्वतःबरोबरच इतर अनेकांच्या जगण्याच्या आकाराला नवे ऊकार देणाऱ्या अशा उद्योजकांच्या कहाण्या ह्या मातीमध्ये रोज घडत आहेत. ही प्रक्रिया देशव्यापी व्हावी म्हणूनचे, ‘सेंद्रिय खत’ म्हणजे ‘कर्ता शेतकरी’ हा अभ्यासक्रम. 

आता उद्योजकतेचा कस वाढवणारे हे साधन समाधानाने आणि विश्वासाने तुमच्या हातात दिलेले आहे. रामराम्!

(ह्या लेखमालेचे शब्दांकन करणाऱ्या माझ्या सहकारी शिल्पा जोशी आणि डॉ. सुवर्णा बोबडे, ॲग्रोवनची संपूर्ण संपादन टीम तसेच सह्याद्री फॉर्म्सचे सर्व सहकारी ह्यांचे आभार. ‘आवाहन आयपीएच्’ हा दृकश्राव्य विभाग आणि ज्याच्या मोलाच्या सहकार्याशिवाय ही मालिका रंगली नसती त्या राजकुमार तांगडेला सलाम. एबीपी माझा वाहिनीच्या टीममुळे ह्या प्रकल्पाला उठाव मिळाला म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता.)

डॉ. आनंद नाडकर्णी

anandnadkarni@gmail.com

करुणालय: २

धुक्यात गवसली वाट

(Reference: Article in sakal newspaper published on 28th January)

सिंहगडाच्या वाटेवर ती जिप्सी गाडी मध्यम वेगाने धावत होती. गाडीमध्ये अनिल-सुनंदा (अनिल अवचट आणि सुनंदा अवचट) त्यांच्या मुली मुक्ता-यशो आणि मी . . . आमच्या सोबत त्या सहलीवर होती कमळी. हे अर्थातच् तिचं खरं नाव नाही. पुण्यामध्ये आमचे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू होऊन जेमतेम दोन-अडीच वर्षे झाली असतील. स्त्रियांसाठीचा व्यसनमुक्ती विभाग, ‘निशिगंध’ पुढे अनेक वर्षांनी प्रत्यक्षात आला तेव्हा सुनंदा आपल्यात नव्हती. तर त्या काळात कमळीच्या व्यसनाधीनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी तिला अनिल-सुनंदाने त्यांच्या घरीच ‘ऍडमिट’ केले होते.

सिंहगडाच्या मुख्य किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्क करून आम्ही वर चढायला लागलो.  माथ्यावर पोचलो तेव्हा पावसाळी हवा होती. ढग उतरले होते जमिनीवर . . . वारा वाहायचा, थांबायचा. ढग जमायचे, विलग व्हायचे. अनिल-सुनंदा आणि मुली एकत्र होते. मी आणि कमळी वेगवेगळे फिरत होतो. ढगांमुळे अंदाज नव्हता येत अंतराचा . . . कोण व्यक्ती कोणाच्या जवळ आहे किंवा लांब !

अनिल-सुनंदाच्या घरी राहायला येताना मोठ्या मेहनतीने सामानात लपवलेली दारूची बाटली घेऊन कमळी आली होती. त्या वातावरणात तिची आसक्ती जागृत झाली होती. ढगांच्या त्या पडद्याआड लपून तिथे सफाईने त्या बाटलीतल्या पेयाचे घोट घ्यायला सुरुवात केली आणि . . . वाऱ्याने ढग विस्कटले. 

आम्ही सारे एकमेकांपासून दहा-बारा फुटांच्या अंतरावर होतो. कमळी ‘फ्रिज’ झाली होती. सुनंदा शांतपणे पुढे गेली. तिच्या हातातली बाटली, सहजपणे घेतली. आणि म्हणाली, “चल जेवायला.” सुनंदाने त्यातले रसायन फेकून दिले. स्वतःच्या खांदापिशवीत. बाटली टाकलीआणि ती शांतपणे पुढे चालू लागली. मी कमळीकडे गेलो. तिने माझा हात घट्ट पकडला. आम्ही दोघे सुनंदाच्या पाठीपाठी चालत होतो. ‘कमळी पळून गेली तर . . .’ माझ्या डोक्यात शंका आली. आणि मीही तिचा हात घट्ट पकडला.

पिठले-भाकरी आणि मडक्यातले घट्ट दही खाऊन आम्ही घरी परतेपर्यंत अनिल-सुनंदाने वातावरण अगदी खेळकर ठेवले. त्यानंतर तासभर सुनंदाकमळीबरोबर बोलत बसली. त्यानंतर खूप वर्षांनी मी आणि कमळी भेटलो. तेव्हा ती व्यसनमुक्त होती. ह्या क्षेत्रातच काम करत होती. तेव्हा सुनंदा मात्र नव्हती. “तो माझा एक ‘टर्निंग पॉईंट’ होता” कमळी मला सांगत होती. “सुनंदा मला ओरडू शकत होती. माझ्याशी न बोलता स्वतःची नाराजी दाखवू शकत होती. पण तिने ह्यापैकी काहीच केले नाही. त्या संध्याकाळी आम्ही चर्चा केली माझ्या ‘Craving’ अर्थात् आसक्तीवर. बाटली लपवून आणताना, संधी शोधताना, घोट घेताना माझ्या मनात आलेल्या विचारांवर . . . खरं सांगू, माझ्या मनाला ‘शुद्ध’ करणारा अनुभव होता तो’’. कमळी सांगत होती. 

व्यसनी व्यक्तींबद्दलचा विनाअट स्वीकार होता सुनंदाच्या मनात. त्याशिवाय ती असे ‘गृह’ उपचाराचे प्रयोग करायला धजली नसती.

सुनंदाच्या खांदा-पिशवीला खूप खण असायचे. त्यातल्या एका खणात तिची पाण्याची चपटी बाटली असायची. ती बाटली होती, एका उंची मद्याच्या ब्रँडची. मित्रपरिवारापैकी एका घरात ती रिकामी बाटली सुनंदाच्या नजरेत भरली होती. “ही माझ्या बॅगेच्या कप्प्यात छान फिट्ट बसेल” म्हणून तिने ती वापरायला घेतली.

पुढे एकदा, मी आणि सुनंदा मुक्तांगणमध्ये एकत्र पेशंट पाहत होतो. समोरच्या फाईलवर, पेनच्या विविध रंगांमध्ये ती सुबक नोट्स काढायची. समोरचा रुग्ण नुकताच ऍडमिट झाला होता. बोलता बोलता सुनंदाने पिशवीतून ‘ती’ पाण्याची बाटली काढली. दोन घोट घेतले. मी पेशंटचा चेहरा पाहत होतो. त्याने ती बाटली अगदी बरोब्बर ओळखली होती. सुनंदा त्याच्याकडे बघून मोकळेपणी हसली. बाटलीचे झाकण लावत म्हणाली, “तुझ्या जे मनात आहे ते आता ह्या बाटलीत नाही . . . आपल्या दोघांना एकच बाटली आवडली . . . तुला ती अल्कोहोलने भरलेली असताना भावली . . . मला रिकामी असताना आवडली.”

“सॉरी . . . मॅडम् . . .” तो पुटपुटला.

“कशाबद्दल सॉरी? . . . बाटली पाहता क्षणी तुझ्या मनातले जे नाते, जी जुळणी जागृत झाली ना त्यालाच आपण म्हणतो अनिवार इच्छा . . . आसक्ती.” सुनंदा बोलत गेली. रुग्णाबरोबरच्या प्रत्येक संवादाला, समुपदेशनाच्या कोणत्यातरी तत्त्वात कसे गुंफायचे हे सहजपणे जमायचे तिला. ती मला म्हणायची, “तू ह्या पेशंटच्या औषधाचे बघ . . . मी बोलते.” माझ्या प्रिस्क्रीप्शनमध्ये ती बदल नाही करायची. उलट कौतुक करायची. मी तिच्याकडून हरक्षणी शिकायचो. पुढे तिला कॅन्सरबरोबर सामना करायला लागला. त्या काळानंतर तिच्यातले सर्वदात्री ‘आईपण’ कसे बहरले ते आम्ही सारे अनुभवायचो. तिच्या ह्या स्टाईलच्या अगदी विरोधात भासणारी शैली होती, माझ्या एका सरांची. त्यांचे नाव डॉ. दिनशॉ डुंगाजी. पंचेचाळीस वर्षांपूर्वी मुंबईतले नामांकित तज्ज्ञ डॉक्टर, दर दिवसाचे चार-पाच तास महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी राखून ठेवायचे. डुंगाजी सर हे मनोविकारशास्त्राचे असे ऑनेररी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख.

सरांचे व्यक्तिमत्व भारदस्त. गोरापान रंग, भेदक डोळे, पांढराशुभ्र वेश आणि ‘पारशी’पणाची सारी गुणवैशिष्ट्ये ठासून भरलेली. ओपीडीमध्ये पेशंट्स पाहतानाच त्यांना धूम्रपानाची हुक्की यायची. त्यांची खाजगी प्रॅक्टिस भक्कम होती. उंची परदेशी सिगारेट ओढायचे. तर एकदा मी त्यांच्यासमोर, मद्यपाशात असलेल्या एका पेशंटची हिस्टरी सादर करत होतो. मनःपूर्वक ऐकताना त्यांचे डोळे किंचित् बारीक व्हायचे. मान हलायची. माझे बोलणे संपवून आता सर बोलणार तसा समोरचा पेशंट त्यांना म्हणाला, “आप खुद सिगारेट पी रहे हो तो मुझे कैसे कह सकते हो शराब छोडने के लिए?” 

माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवातले ठोके ठकाठक् चुकले. सरांनी हातातली सिगारेट ॲश-ट्रे मध्ये आवेशाने चुरगाळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत दोन-तीन भरभक्कम पारशी-इंग्रजी आणि पारशी भारतीय शिव्या घातल्या. “तू तिथे बसला आहेस आणि मी इथे . . . टेबलाच्या दोन विरुद्ध बाजूंना . . . का ते ठाऊक आहे x x x? कारण मी सिगारेट जशी पेटवू शकतो तसा विझवू शकतो . . . आणि तू एकदा प्यायला सुरुवात केली तर टाईट झाल्यावरही पीतच राहतोस . . . कळलं?” हा संवाद पारशी-इंग्रजी-हिंदीमध्ये रूपांतरीत करा तुम्ही. तो पेशंट अवाक् झाला होता. मी त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत आलो.

त्याला आम्ही ऍडमिट केले. सर त्याची नियमित विचारपूस करायचे. त्यानंतरच्या काळात तो बदलला. अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या बैठकी नियमितपणे करू लागला. काही महिन्यानंतर ‘फॉलो-अप्’ला आला तेव्हा मी त्याला सरांकडे घेऊन गेलो.

आता सरांचे रूप वेगळेच होते. त्यांच्या शिव्या कधीकधी शाबासकीचे रूप घेऊन यायच्या . . . “यू ब्लडी x x x . . . करून दाखवला तू!” ते म्हणाले. “तुझा रिस्पेक्ट म्हणून मी तुझ्यासमोर स्मोक नाही करणार आहे.” तेवढ्यात आमचा वॉर्डबॉय प्रल्हादसिंह आम्हा डॉक्टरांसाठी देण्यात येणाऱ्या लिंबू सरबताचे ग्लास घेऊन आला.

“नो टोबॅको . . . नो अल्कोहोल . . . नो टी” असे म्हणत सरांनी त्याला सरबत पाजले. मी अवाक् होऊन हा प्रसंग पहात होतो. तो पेशंट अगदी खूश होऊन गेला. त्याच्या त्या आकृतीकडे पहात सरांनी पुन्हा दोन-तीन शाबासकीच्या शिव्या प्रदान केल्या (हासडल्या नाहीत) आणि माझ्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाले, “मी दिसायला हत्तीसारखा आहे पण माझा मेंदुपण हत्तीसारखाच तीक्ष्ण आहे……. नेक्स्ट!”


– डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com