शिक्षक-वृत्तीचा अमृतमहोत्सव : आमचे बापट सर

… विश्वास बसत नाही पण चक्क एक्केचाळीस वर्षे होऊन गेली ह्या घटनेला. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेज आणि के.ई.एम. हॉस्पिटलच्या खानदानी इमारतींसमोरचा वहाता रस्ता​. त्या रस्त्यावर रांगेने उभी असलेली साळुंखे बंधुंची दुकाने. त्यातल्या एका दुकानांमध्ये बसून समस्त के.ई.एम वासीयांवर प्रेमाची नजर ठेवण्याचा प्रमुख व्यवसाय करणारे भाऊ साळुंखे म्हणजे विश्वबंधुच. त्यांच्या काऊंटरवर घुटमळणारा मी. एम.बी.बी.एस.च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी. आजूबाजूचे वातावरण पचवण्याच्या प्रयत्नातला. भांबावलेला.

माझ्या पायांना असलेल्या पोलियोच्या पूर्वापार अडचणीमुळे मला परिसरातल्या हॉस्टेलवर खोली मिळावी ह्यासाठी भाऊ साळुंखे मला घेऊन वॉर्डन डॉ. के. डी. देसाईंकडे गेले होते. ते काम यशस्वी करून आम्ही परत आलो होतो आणि एका व्यक्तीची वाट पहात होतो … “आता येईलच रवी … ” भाऊ पुटपुटले. माझी उत्सुकता शीगेला. आता कधी होणार हा सूर्योदय ?… त्या काळातल्या हिंदी चित्रपटातील दिशेला शोभेल अशा व्यक्तीमत्वाचे लालबुंद गोरे, सुदृढ शरीराचे, दमदार चालीचे डॉ. रवी बापट त्यांच्या पांढऱ्या अेप्रनच्या पंखांसकट हजर झाले.

​​श्री. किसन कुलकर्णी म्हणजे माझे एक काका. त्यांचे मित्र भाऊ आणि बापट सर. माझ्या काकांचे टोपण नावही होते ‘भाईकाका’. “हा भाईचा पुतण्या … ” अशी माझी ओळख भाऊ साळुंख्यांनी करून दिली. मला आपादमस्तक निरखण्यात आले … हा शिरस्ता आजही सुरू आहे. माझ्या शारीरिक आरोग्याच्या परिस्थितीवरूनच सहसा संभाषणाची सुरूवात असते. माझा लठ्ठपणा माझ्याहीपेक्षा जास्त मनावर घ्यायचे सर. “सगळी थेरं करा …. पण तब्येत जपून …” असं दामटून सांगायचे. स्वतःही तसेच वागायचे. पहाटे कधीही झोपले तरी वॉर्डात उशीर नाही. चेहऱ्यावरचा फ्रेशपणा कायम. माझे आडनाव नाडकर्णी पण हॉस्टेलवरचे टोपणनाव होते ‘जाडकर्णी’. सरांनी त्या पहिल्या भेटीपासून माझ्या शारीरिक आरोग्यासकटची माझी जबाबदारी जी घेतली ती पुढची दहा-बारा वर्षे नेटाने निभावली. मी त्यांचा ‘पोरगा’ ह्या गटात कधी घुसलो हे मला कळले नाही. पुढची सारी वर्षे सरांचे ‘शेपूट’ बनून त्यांच्याबरोबर जग बघण्याचा दुर्मीळ योग आला.

मी आजवर ज्यांची फक्त नावे ऐकली होती अशा अनेकांच्याबरोबर तासनतास घालवायची संधी मला बापटसरांनी दिली. त्यात दादा कोंडके होते, सी. रामचंद्र होते… शरद पवारांपासून गोविंद तळवलकरांपर्यंत आणि कबड्डी खेळाडूंपासून ते युनियन नेत्यांपर्यंत. सरांचा जनसंपर्क प्रचंड. त्याकाळात ते नुकतेच इंग्लंडकडून सर्जरीतील खास प्रशिक्षण घेऊन आलेले. आणि तरीही त्यांनी ‘पूर्णवेळ प्राध्यापकी’ करण्याचा जाणता निर्णय घेतलेला. वैद्यकशास्त्रातील माझे पहिले ‘हिरो’ ठरले ते बापट सर. ते अमिताभसारखे बिनधास्त, राजेश खन्नासारखे स्वप्नाळू आणि संजीव कुमारसारखे भाबडे निरागस होते. देव आनंदसारखी ‘हर फिक्रको धुवेमें उडाता चला गया’ अशी वृत्ती होती. स्वतःच्या सेवाभावाचे, निष्ठेचे अवडंबर न करता जगण्यातील प्रत्येक रस समरसून आकंठ जगण्याची वृत्ती होती. शिवसेनाप्रमुखांपासून ते धारावीतल्या सामान्य हमालापर्यंत सर्वांशी अगदी जिव्हाळ्याची मैत्री होती. हातचे राखून न ठेवता विद्यार्थ्यांना स्वतःकडचे सर्व देण्याची कृती होती. सरांचे निदान तर उत्कृष्ठ होतेच पण सर्जरी करताना त्यांना पाहणे हा अनुभव ग्रेटच असायचा. त्यांची ऑपरेशन लिस्ट पूर्ण भरलेली असायची. संगीत ऐकत, हसतखेळत काम चालायचे. कधीमधी भडकले तर सर कॅप-मास्कच्या आतूनही लालबुंद झालेले दिसायचे. त्यांची सर्जरी असायची झाकीर हुसेनच्या तबल्यासारखी… विलक्षण सफाई, गती ….थिरकणारी बोटे… कधी अलगद तर कधी जोमदार. माझ्या वडलांची हर्नियाची शस्त्रक्रियापण सरांनीच केली. वरणभाताचा डबा यायचा भाऊ साळुंख्यांच्या घरून. माझा एक ज्येष्ठ मित्र विजय परुळेकर ह्याच्या पत्नीच्या म्हणजे सरोज वाहिनीच्या थायरॉईडचे ऑपरेशनही मी सरांच्या शेजारी उभे राहून पाहिले. ओटीच्या वेशातील सर अगदी वेगळेच भासायचे… त्यांना तंबाकूची सवय होती. तो जणू त्यांचा प्राणवायुच.

आम्ही जवळचे लोक त्यांच्या ह्या सवयीला पूर्ण ऍक्सेप्ट करून होतो. त्यांची चंची सतत त्यांच्याबरोबर असायची. सरांची दुपारच्या जेवणाची वेळ तीनच्या सुमारास… कधीकधी सरांबरोबर  घरी जाऊन जेवायचा प्रसंग यायचा. म्हणजे त्यावेळी घरी गेलो तर टेबलावर बसायला लागायचे. बापट मॅडम अगदी शांत आणि मितभाषी. सरांचा सततचा गडगडाट. त्यांच्या  मुलांपैकी उदय आमचा दोस्त. तो आमच्या रूमवरच पडलेला असायचा. संध्याकाळनंतर सरांचे प्रचंड विस्तारित सोशल लाईफ सुरु व्हायचे. ते थेट मध्यरात्रीपर्यंत…  सरांच्या हाताखालची टीम इतकी मस्त असायची की दुपारनंतर सरांना सहसा कुणी डिस्टर्ब करत नसे.

एमबीबीएसच्या शेवटच्या परीक्षेच्या आधी दोन महिने आमच्यासारख्या उनाड पोरांना घेऊन सरांनी, सर्जरी ह्या विषयात आम्ही पास झालो पाहिजे हा ‘पण लावून’ आमची क्लीनिक्स घेतली. ‘उनाड’ म्हणजे नाटक, वक्तृत्व, लोकांना मदत, सामाजिक चळवळी ह्या सगळ्यात भाग घेणारे! रात्री दहा ते पहाटे अडीच. सलग दहा दिवस. सरांसमोर हेतू स्पष्ट होता…पोटापाण्याइतपत गुण! … हा प्रश्न आणि हे उत्तर. संपूर्ण प्रॅक्टिकल परीक्षा त्यांनी आमच्यासमोर परीक्षकांच्या स्टाईल सकट उभी केली. अमुक एक प्रश्न आला की समजायचे की आपण पासाची पातळी पार केली … अमुक एक कठीण प्रश्न समोर आला की समजावे आता साठ टक्क्याकडे वाटचाल !… आमच्या गटासाठी हे असे शिकवले पण ज्यांना सर्जरीमध्ये करिअर करायची त्यांना शिकवण्याची शैली खूपच वेगळी. तपशिलात जाणारी. पहाटे क्लिनिक संपवून हॉस्टेलला आलो की अगदी घासू मंडळीदेखील   (घासू म्हणजे पराकोटीच्या गांभीर्याने अभ्यास करणारे ) जागत बसलेली असायची. जे शिकलो होतो ते आम्ही ओतायचो … तेवढीच रिव्हिजन.

आता जाणवते आहे की हा वृत्तीचा मोकळेपणाही सरांकडूनच शिकायला मिळाला. सरांनी त्यांच्या जगभर पसरलेल्या असंख्य सर्जन विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे ‘मेंटॉर’ केलेच. आज के.ई.एम.चे डीन  डॉ.  अविनाश सुपे, टाटा कॅन्सरचे डायरेक्टर डॉ. राजन बडवे असे सारे सरांच्याच तालमीत तयार झालेले. माझा ‘सर्जरी’ ह्या विषयाशी संबंध बापटसरांमुळे आला आणि पास होण्यापुरता मर्यादित होता. पण धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे उभे रहाणे आणि त्याच्या छोट्या छोट्या पावलांचे भरघोस कौतुक करणे हा सरांचा स्वभावच आहे. मी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेसाठी लिहिलेल्या पहिल्या एकांकिकेबद्दल चर्चा करण्यासाठी सरांनी एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. समोर विजय तेंडुलकर आणि डॉ. जब्बार पटेल. तेंडुलकर माझ्याशी खूप खोलात जाऊन बोलले. अनेक प्रश्न त्यांनी केले. मी आपला कुवतीनुसार तोंड देत होतो. पाऊण तासानंतर सरांच्या खोलीतून बाहेर पडलो. शेजारी होती मोलेक्युलर बायोलॉजी विभागाची लॅब. चंदू पाटणकर, राजू करमरकर (त्यावेळी सोबत संदेश नाईक, पै, गुजराथी, जयंत वगैरे ) असे मित्र तिथे असायचे. तो आमचा सुशीतल अड्डा होता. (त्या काळात महत्वाच्या प्रयोगशाळांनाच ए.सी.  बसवलेले असायचे.) मी तिथे जाऊन बसलो. पंधरा मिनिटात सर अवतरले. माझ्यात दिसणाऱ्या ‘शक्यता’ लक्षात घेऊन तेंडुलकरांनी जे काही स्तुतीपर शब्द वापरले असतील त्याने सरच जबरदस्त खूश झाले होते. पाठीत दणका देत म्हणाले, “लेको, तेंडुलकरांच्या परीक्षेत पास होणे एमबीबीएसच्या परीक्षेपेक्षा अवघड आहे…”

 सरांचा ‘वॉर्ड नंबर पाच’ जरी सर्जरीचा असला तरी विविध क्षेत्रातले मान्यवर त्यांच्या देखरेखीखाली अॅडमीट व्हायचे. माझ्यासारखे विद्यार्थी मदत करायचे. सोपानदेव चौधरींकडून मी बहिणाईच्या आठवणी ह्या वार्डातच ऐकल्या. सुरेश भटांची गझल तयार कशी होते आणि भीमराव पांचाळेंच्या  गळ्यावर कशी चढते ते प्रत्यक्ष अनुभवले. हे सगळे फक्त सरांमुळे… मी काही कुणा थोरामोठ्यांचा मुलगा नव्हतो की मेरीटमध्ये आलेला प्रस्थापित हुशार नव्हतो. पुढे  सुरेश भटांनी सरांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांचा सेवेचा वारसा पुढे चालू ठेवणारा विद्यार्थी मी असेन असे लिहिले होते. सरांनी मला फोनवर उत्साहाने हे पत्र वाचून दाखवलेच पण झेरॉक्स करून टपालानेही पाठवले. खरेतर दोन पानी पत्र त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचे होते. माझा त्यात दोन ओळखींचाच उल्लेख… पण सरांना आनंद माझ्या उल्लेखाचा.

वॉर्डात अॅडमीट असलेल्या कुटुंबीयामुळे सरांनी ​माझी ओळख म.टा.मधल्या अशोक जैनांशी करून दिली. त्यामुळे माझे लिखाण सुरू झाले. आमच्या नाटकांच्या सेटसाठी, तांत्रिक बाजूंसाठी सर व्यावसायिक रंगभूमीवरच्या प्रसिद्ध निर्मात्यांकडून मदत उभे करायचे.’अभिजात’चे अनंत काणे, ‘चंद्रलेखा’चे मोहन वाघ, ‘नाट्यसंपदा’चे प्रभाकर पणशीकर अशा जेष्ठांबरोबर ओळख झाली ती सरांमुळे.

‘वैद्यकसत्ता’ ह्या माझ्या पहिल्या पुस्तकाचे सरांना केवढे अप्रूप. वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय शिक्षण त्यांच्या चिंतनाचा विषय. पुढे त्यांनी ह्या विषयांवर पुस्तकेही लिहिली. माधव मनोहरांसारख्या समीक्षकांपासून ते अरुणभाई मेहतांसारख्या राजकारण्यांपर्यंत अनेकजणांसमोर सरांनी ह्या पुस्तकाचे वाचन घडवून आणले.

असा ‘बाप’ माणूस आपल्या पाठीशी आहे असे म्हटल्यावर जबाबदारी होती ती फुशारून न जाण्याची. त्याबाबतीतही सरच कडक होते. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता अॅक्टीव्हिटी करायच्या. काही वर्षे माझी हॉस्टेलमधली खोली तळमजल्यावर होती. सरांचे घर असेल तिथून जेमतेम दोनशे मीटर्सवर… रात्री हळूच खिडकीत येऊन उभे रहायचे. रात्री म्हणजे मध्यरात्री !… पुढे एमडी झाल्यावर परिसरातल्या एकाच इमारतीत मी आणि परममित्र महेश गोसावी तळमजल्यावर तर सर पहिल्या मजल्यावर असे राहायचो. त्या काळामध्ये महेशने त्याच्या एम.डी. रिझल्टप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या निकालासंदर्भात पंगा घेतला होता. गर्दच्या विरोधातले माझे काम जोम धरू लागले होते. अनेकवेळा तळमजल्यावरच्या खिडकीतून सर आम्ही नीट झोपलोत ना ते शांतपणे मायेच्या नजरेने बघून जायचे. आज ते आठवूनही भरून येते.

सरांच्या बरोबरीने आम्हा विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या होत्या डॉ. शरदिनी डहाणूकर मॅडम. सर आणि मॅडम ह्यांची अतिशय छान मैत्री. सरांच्या काही सवयींना ‘वळण’ लावण्याच्या प्रयत्नांत आम्ही ‘पोरगे’ आणि मॅडम एकत्र असायचो. डहाणूकर मॅडमचा सरांना थोडा प्रेमळ धाक होता. हे डायनॅमिक्स मोठे मजेदार होते. एखाद्या एकत्र कुटुंबातले असावे तसे. आम्ही विद्यार्थी, सर, मॅडम ह्या नात्यांच्या मुळाशी होते सद्गुणाबद्दलची, टॅलन्टबद्दलची आस्था.  मॅडमची बहुगुणी प्रतिभा फुलावी ही सरांची इच्छा असायची. सरांनी अधिकाधिक काळ, अधिकाधिक  जोमाने लोकांची सेवा करावी हा मॅडमचा आग्रह असायचा. मी जसा वयाने, अनुभवाने  थोडा  मोठा व्हायला लागलो तसा  मीही ह्या नात्यांना सांभाळून  घ्यायला मदत करायला  लागलो.

डहाणूकर मॅडम अकाली आणि अचानक गेल्या . अगदी त्याच सुमारास सरांची तब्येतही अगदीच बरी नव्हती. जेएमटी (मुख्य ऑपरेशन थिएटर ) जवळच्या (मला वाटते) तेवीस नंबर वार्डमधे सर अॅडमीट होते. मॅडमना शेवटचा निरोप देऊन आम्ही मुले सरांकडे आलो. त्यांच्यासोबत थांबलो. फक्त थांबलो, बसलो …. मॅडमशिवायचे जगणे सह्य करायला एकमेकांना मदत करत. . .

आता लक्षात येते आहे की ह्या चाळीस वर्षांमध्ये अनेक हळव्या क्षणी  मी आणि सर बरोबर होतो. आणि माझ्या मानसिक आरोग्याच्या कामातल्या प्रसंगांमध्येही … आमची वेध व्यवसाय  प्रबोधन  परिषद असो की शिक्षकांसाठी सुरु केलेला ‘ शिक्षकमित्र ‘ हा प्रशिक्षणउपक्रम असो . . . सरांना  बोलवण्याचा  अवकाश . . . ते  उत्साहाने हजर असायचे. दहा  वर्षांपूर्वी  आय.पी. एच.चा स्वतः च्या वास्तुमध्ये प्रवेश  झाला . तेव्हाही आशीर्वाद द्यायला सर होतेच !

मी मनोविकार क्षेत्रातच करीयर करावी ह्या कल्पनेला विद्यार्थीदशेपासूनच सरांचा आणि मॅडमचा पूर्ण पाठिंबा होता. ह्या दोघांचाही वैद्यकशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन सर्वसमावेशक म्हणजे ‘Holistic’ होता. रुग्ण  आणि  नातेवाईक  यांच्याशी संवाद  करावा ह्याबद्दल सर अत्यंत जागरूक असायचे . ‘Surgery is my domain but Recovery is patient’s and familie’s domain’ असे ते म्हणायचे . म्हणून अत्यंत  सोप्या  पद्धतीने उपचारपद्धती समजून सांगायचे. पुढे मी मनोविकारशास्त्रात एम.डी.  करायला लागल्यावर अनेक ‘ मनोद्धभव ‘ शारीरिक विकारांचे पेशंटस सर मला पाठवायचे. त्यांचे अक्षर अगदी ठळक आणि वळणदार. सर्जरीच्या ओपीडीमध्ये त्यावेळी जुन्या पद्धतीचे टाक आणि शाई असायची. सर त्याचा वापर सफाईने करायचे. रुग्णसेवेतील त्यांच्या अनुभवावर आधारीत असे त्यांचे पहिले पुस्तक ‘ वॉर्ड नंबर पाच ‘ प्रसिद्ध झाले तेव्हा एक वक्ता म्हणून बोलण्यासाठी सरांनी मला बोलावले. ह्या पुस्तकातही अनेकवार माझे उल्लेख आहेत. सरांबद्दल जाहीरपणे बोलण्याचा पहिलाच प्रसंग…. व्यवस्थित टिपणे केली. तयारी केली. बोलताबोलता भावनांचा सूर आपोआपच  लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण टिकेकरांचा फोन आला. “डॉक्टरांचे कर्तृत्व, तुम्हा दोघांचे नाते  आणि पुस्तकाचा आवाका हया तिन्ही घटकांचे इतके समतोल विवेचन तू केलेस… असे मराठी अलीकडे फार कमी ऐकायला मिळतं” मी सुखावलो. लगेच सरांना फोन लावला. ते माझ्या फोनची वाटच पाहत होते. “माझ्याकडूनच घेतला अरुणने तुझा नंबर …. ” मला म्हणाले. आणि पुढे काहीवेळ त्यांच्या पुस्तकापेक्षाही जास्त, टिकेकरांनी केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल  बोलले. टिकेकरांच्या दिलदार स्वभावाबद्दल बोलले

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरूपद, हाफकिन्स बायोफार्मा कंपनीचे अध्यक्षपद अशी अनेक अधिकृत सन्मानस्थाने सरांनी भूषविली पण त्यांना खरे पहावे ते ओपीडीमध्ये. फक्त केईएम मध्येच नाही तर ग्रामीण, आदिवासी भागातल्या ओपीडीमध्ये. आम्हा विद्यार्थ्यांनाबरोबर घेऊन त्याकाळामध्ये सर कर्जत-भीमाशंकर भागामध्ये नियमित आरोग्य शिबिरे घ्यायचे. भाऊसाहेब राऊत नावाचे शेका पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांच्यासाठी हे काम सर करायचे. माझ्यासारख्या अनेकांना आरोग्यव्यवस्थेच्या एका वेगळया वास्तवाची जाण त्यामुळे आली. आम्ही शनिवारी सायंकाळी जाऊन आश्रमशाळांमध्ये  राहायचो. रविवारी पाच-सहा तासाची ओपीडी करून संध्यांकाळी परतायचो. पेशंटससाठी औषधाची सॅम्पल्स गोळा करायचो.

सेलेब्रेटीज ते सामाजिक वास्तव ह्या सगळ्यामधे सर घेऊन जायचे. तसेच उत्तम पुस्तके वाचून घेण्यातही त्यांचा करडा  सहभाग असायचा. माझे वाचन बऱ्यापैकी चतुरस्त्र  असल्याने मी त्यांच्या अधिकच ‘Good Books’ मध्ये असायचो. कितीही व्यग्र  दिनक्रम  असला तरी वाचनाला त्यांनी कधी दूर सारले नाही. तशीच आवड प्रवासाची आणि फोटोग्राफीची. चाळीस वर्षांपूर्वीचा रशिया आणि कैलासमानससरोवर अशा रेंजमधले प्रवास आम्ही विद्यार्थ्यांनी सरांच्या छायाचित्रांमधून पाहिले. आमच्या काही  वार्षिक सहलींनाही  सर सोबत असायचे. सलग चार-पाच वर्षें माथेरानच्या पावसाळी सहलींमध्ये बापटसर, श्रीकांत लागू ( दाजी ) एयर इंडियातले साठे  काका असे  तीन ज्येष्ठ आम्हा पोरांसोबत असायचे. नेरळला  उतरून आम्ही माथेरान चढून जायचो. पत्ते कुटणारे पत्ते खेळायचे. गाणी- गप्पा आणि भर  पावसात भटकणे असा उद्योग असायचा … एक पावसाळी सकाळ आठवते आहे. मी, सर आणि महेश गोसावी जंगलवाटेवरुन भटकत होतो. पावसाची जोरदार झड सुरू होती. माझ्याकडे न भिजण्यासाठी  काय साधन होते ते आठवण नाही. महेश मात्र भिजत होता. काकडत होता. आणि सरांकडे एक खास पूलओव्हर होता; डोकेसुद्धा सुरक्षित ठेवणारा. वाटेवरुन चालता चालता सहजपणे सरांनी तो पूलओव्हर काढला आणि महेशच्या अंगावर चढवला. मला अजूनही ती कुंद सकाळ, भिजत चाललेले सर आणि त्यांच्या ऊबेत चालणारे आम्ही आठवतो आहोत… अजूनपर्यंत बरसत असलेल्या त्या पावसाचा आता अमृतमहोत्सव होणार आहे. . . येत्या दोन जूनला !