डोलणे ठेऊन . . . फांद्यांवर

“ॲज अ फॅमिली, तुम्हाला विचार करायचा आहे . . . त्यांना ॲक्टीव्ह लाईफ सपोर्टवर, आयसीयूमध्ये ठेवायचं की नॉनइनव्हॅजिव्ह सपोर्ट देऊन वॉर्डात ठेवायचं. . .” डॉ. अय्यर थांबले. . . “की घरी घेऊन जायचं” डॉ. प्रधान म्हणाले. समोर मी आणि यशो. चर्चा चालली होती ती आमच्या बाबाच्या (अनिल अवचट) भविष्याबद्दलची. स्थळ, पुण्याचे संचेती हॉस्पिटल. सोमवार सकाळ, दिनांक २४ जानेवारी २०२२ ! 

मी आणि यशो बाहेर कॉरीडॉरमध्ये आलो. यशो म्हणजे बाबाची धाकटी मुलगी. मोठ्या मुलीला म्हणजे मुक्ताला आदल्या दिवशीच ताप-सर्दी आणि तणावाने बेजार केलेले. म्हणून ती घरी. माझी पत्नी सविता, बाबाचा पुतण्या अक्षय. . . चर्चा सुरू झाली. 

“ते आपल्याला लोकेशन चुज करायला नाही सांगत आहेत . . . तर पुढच्या प्रवासाचा मार्ग कोणता ते विचारताहेत !” मी विषयाला हात घातला. बाबाने पूर्वीच स्पष्टपणे सांगितले होते की त्याच्या अंतिम प्रवासाच्या वेळी त्याला कृत्रिम श्वास (व्हेंटिलेटर) तर नकोच पण एकही नळी नको आहे . . . ना शिरेतली, ना नाकातली, ना पोटातली. 

“आपल्या बाबाला जे छान वाटतं ते आपण करायचं” यशो म्हणाली. थोड्या वेळातच डॉ. पराग संचेतींच्या रूममध्ये आम्ही बसलो. तिथून मुक्ताला व्हिडिओ कॉल लावला. 

“मुक्ते, आपल्याला एक निर्णय करायचा आहे… आपण पाहतो आहोत की दहा दिवसापूर्वी बाबा पडला. त्याच्या पायाच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले . . . तेव्हापासून तो तसा नॉर्मल शुद्धीत नाही आलेला . . .  डॉक्टरांनी कण्यामधून भूल दिली. हाडांची जोडाजोड केली. रक्तातली साखर, क्षार, थायरॉईड सारे सारे नीट नियंत्रित केलं . . . पण शुद्ध गवसत नाही आहे. नव्या स्कॅनमध्ये, मेंदूला नवा धक्का बसलेला दिसत नाही आहे . . . पण बाबाचा मेंदू थकत चालल्याच्या स्पष्ट खुणा पंधरवड्यापूर्वी केलेल्या एमआरआयमध्ये दिसताहेत . . . आता आपल्याला हे पाहायचे आहे की बाबाचे जगणे लांबवायचं की शेवटच्या क्षणापर्यंत अर्थपूर्ण करायचं. . . थांब, डॉ. पराग बोलताहेत . . .” मी परागकडे फोन दिला. 

“आय नो . . . इट्स टफ् फॉर यू . . . कृत्रिम पद्धतीने आपण अवयवांना कितीही काळ सुरू ठेवू शकतो… पण त्यातून पूर्वीचा बाबा परत मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्यच !” डॉ. पराग म्हणाला. त्याने जैन धर्मातले दाखले दिले की आयुष्याचा अंतिम आदर करण्याचे मार्ग कोणते. 

मुक्ताने धीर एकवटला (असणार). ती म्हणाली, “आपण घरीच नेऊया त्याला. त्याच्या स्वतःच्या, त्याच्या हक्काच्या वातावरणात.”

माझा आणि परागचाही ‘क्लिनिकल सेन्स’ सांगत होता की आपण जे करणार आहोत ते किती ‘काळ’ चालणार आहे ठाऊक नाही . . . पण अशा प्रसंगात बाबाने काय केलं असतं ? . . .

हमको तो राहें थी चलाती I

वो खुद अपनी राह बनाता I

गिरता संभलता, मस्ती में चलता था वो II

खूप वेळा, मी आणि बाबा ‘थ्री इडियट्स’ मधलं हे गाणं एकत्र गायचो. आज ते जगण्याचा प्रसंग होता … बाबाने जे केलं असतं तेच आम्ही साऱ्यांनी केले. अक्षयने डिस्चार्ज घेण्याची प्रोसेस सुरू केली. मुक्तांगणची आमची मुले (कार्यकर्ते) आणि तपस् ह्या ज्येष्ठ जन निवासातली प्राजक्ताने पाठवलेली टीम (प्राजक्ता वढावकर, बाबाची भाची) ह्यांच्या सहकार्याने कृष्णा, पत्रकार नगर मधल्या घरात दोन तासात, ‘वॉर्ड’ तयार झाला. फाऊलर्स बेडपासून ते साऱ्या नर्सिंग साहित्यासह ऑक्सिजनेटर ठेवायचा फक्त, सहाय्यासाठी असे ठरले…  तो बेडही, मोठ्या खोलीत. आजूबाजूला बाबाची काष्ठशिल्पे, स्केचेस, फोटो, ओरेगामी. 

दोन मजले चढवून आणताना बाबाला थोडा त्रास झाला पण तो बेडमध्ये स्थिरावल्यावर चक्क शांत झाला. चर्या बदलली. तो मधूनच आमच्या आवाजांना प्रतिसाद द्यायला लागला. तोवर बाबाच्या कुटुंबातले आम्ही बारा-पंधरा जण जमलो होतोच. बाबाचे भाऊ विक्रम आणि भरत तसेच बहीण फुलाआत्या . . . त्यांचे कुटुंबीय. पराग आणि आशिष म्हणजे जावई, अक्षयचा छोटा अर्णव! . . . शिवाय मुक्तांगणचा चोवीस  तास राहणारा सहचर रवी, बाबाचा आवडता चैतन्य, मी, सविता ! 

“आपण बाबाभोवती, तोंड लांब करून बसायचं नाही. त्याला ज्या लोकांना भेटायला आवडते त्या सगळ्यांना बोलावूया . . . कोविडकाळजी घेऊन यायला सांगूया . . . असे समजूया, की बाबा हे मोठ्ठे झाड आहे . . . ही खोली म्हणजे पार आहे त्या भोवती . . . आणि आपण गप्पा मारणार आहोत त्याच्या आवडत्या विषयांवर” माझ्या माध्यमातून अजेंडा बाहेर पडला. तो सगळ्यांनी उचलला . . . पुढच्या बहात्तर तासांमध्ये ते घर झाकोळ टाकून उभे राहायला लागले. यशो बाबाच्या कानात गाणी गुणगुणायला लागली. सविता बाबाला ‘मामंजी’ म्हणून भरवायला लागली. अगदी बाळासारखी बाबाची काळजी घेणारी ज्योती बाबाला सूप देत होती . . . तीन चमच्यानंतर त्याचे तोंड बंद.  “बाबा तुम्ही जेवला नाहीत तर मी नाही जेवणार” ती म्हणाली. “नको ग असं . . .” ग्लानीतून बाबाचा स्पष्ट स्वर! . . . अर्धा वाटी सूप पोटात. 

बापू महाजनसर आले तर बाबाने त्यांचं चक्क हसून स्वागत केलं . . . पुन्हा ग्लानी. अशी मित्रपरिवारातली माणसे येत होती. बाबाचे जवळचे सख्खे मित्र माधव आणि चित्रा काळे. ते नेमाने रोज यायचे. तसेच अशोक-अनुराधा गोखले, वंदना कुलकर्णी, दीपा मुजुमदार, राघव गायकैवारी . . . किती किती नावे घेऊ. माधव-चित्राची सून सोनाली आमची मुक्तांगण सहकारी. ती आमच्या टीमचा अविभाज्य भाग. शांतपणे पण दिवसातून तीन-चारदा येणारे सख्खे शेजारी सतीश आळेकर. असे कितीतरी ! आम्ही नियम केला की, “मी कोण आहे ?” असा प्रश्न नाही विचारायचा. आपण कोण ते जाहीर करायचे, मास्क खाली करायचा, त्याच्याकडे पाहून हसायचं . . . त्याच्यावर प्रतिसादाची सक्ती करायची नाही. 

बाबाच्या भोवती बसून आठवणींचे फड रंगत होते. बाबा आणि सुनंदा (पत्नी), बाबा आणि इंदुआजी (बाबाची आई) ह्यांच्यातल्या कहाण्या सांगितल्या जात होत्या. चहा-कॉफी सुरू होती. तुम्हाला वाटले असते की ह्यांचे घरगुती संमेलनच चालले आहे. 

चोवीस तास तर व्यवस्थित गेले.   बाबा होता ग्लानीमध्येच !  शुद्धी आणि बेशुद्धी, ह्याचे दोन स्तर असतात. समजण्यासाठी आपण म्हणू भान (Consciousness ) आणि जाण  (Awareness ). बाबाचे भान काही पूर्वस्थितीमध्ये नव्हते पण जाण मात्र मधूनच अगदी शार्प म्हणजे आश्चर्यकारकपणे यायची, शिवाय त्याच्या मूलभूत जीवनखूणा (Virtual Parameters ) व्यवस्थित होत्या.  म्हणजे त्यांची लय मंदावत होती पण अनियमितपणा कोणताच नव्हता . “आपले मन वेडं असतं …. प्रकाशाची तिरीप दिसली की वाटते माध्यान्हीचा सूर्य आला आहे …. आपल्याला वास्तवाचे भान ठेवायचे आहे. ….. Clinical Reality  म्हणजे वैद्यकीय वास्तव, आणि Emotional Reality  म्हणजे भावनिक वास्तव …. ह्याची गल्लत नाही करायची .”  मी सगळ्या कुटुंबियांशी बोलत होतो. “आपण व्यसनमुक्तीच्या उपचारांमध्ये सांगतो, one day at a time …. प्रत्येक दिवस, नवा दिवस !… तेच तत्व आपण पाळायचं …. बाबा प्रत्येक क्षण भरभरून जगायचा.  त्या त्या क्षणामध्ये मूळापर्यंत गुंतवुन घ्यायचा.  पण त्याने एकाही  क्षणाला स्वतःभोवती गुंडाळू दिले नाही.” सगळे जण फक्त ऐकत नव्हते तर तसे वागत ही होते.  

हमको कल की फिकर सताती  ⎢

वो बस आज का जश्न मनाता  ⎢

हर लम्हें को खुल के जीता था वो    ⎢ ⎢

अटळ अशा दुःखद बिंदूकडे जाताना आपण स्वतःला सांभाळायचं एकमेकांच्या सहाय्याने; हे आम्ही सारे जगत होतो …. बाबानेच दिलेली सहृदयता होती  ती! …. बाबाच्या वागण्यातला नितळपणा किती निरपेक्ष असायचा !…. त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला स्वतःमधल्या ‘ छानपणा ‘ चे दर्शन व्हायचं …. तो चालता -बोलता  नसेना का! …. पण आपण शोधूया ना तो स्नेहभाव आणि उत्सव करू त्याचा!

आम्ही बाबाला आवडणारे ‘मेनू’ तयार करायला लागलो. त्याच्याभोवती बसून ठराव केले, “दरवर्षी सव्वीस ऑगस्टला आपण सगळे शक्यतो एकत्र आणि नाही तर जिथे असू तिथे पिझ्झा खायचा… Followed by आईस्क्रिम !” कारण हा बाबाचा वाढदिवस !

” बाबा आपली भावनिक तयारी करतो आहे त्या बेडवरुन …. वियोगाच्या दु:खाला तोंड देण्याची आपली तयारी झाली की  नाही हे पाहातोय तो … आपल्याला एकीकडे जीवनखुणांचा मागोवा घ्यायचाय, त्यातली मंद लय स्वीकारायची आहे आणि दुसरीकडे त्याची सेवा करतच  राहायची आहे.”  माझ्याद्वारे उमटणारे शब्द !

आमच्या टीम्स तयार झाल्या. बाबाचा डायपर बदलण्यापासून त्याला ‘तयार’ करणारी एक …. आदरातिथ्य करणारी एक …. खाद्यपदार्थ पुरवठा करणारी एक !…. आणि असे तीन दिवस फळाला आले…. जेव्हा डिस्चार्ज घेतला तेव्हा वाटले होते, आता काही तासांचाच खेळ !……. सव्वीस जानेवारीच्या  संध्याकाळी सर्व परिवार पांगला आणि आम्ही चारजणच  उरलो तेव्हा बाबा अचानक उद्गारला, ” शांSS त झालं सगळं ” आम्ही चमकून पाहिले. म्हणजे गेले अनेक तास त्याचे भान काही  पुनर्स्थापित होत नव्हतं. पण जाण मात्र एका पातळीवर जागृत होतीच. 

सोमवार ते गुरुवार !…. बुधवारी रात्रीपासून ठाय लयीला सुरुवात झाली. गुरुवारी, २७ जानेवारीला  सकाळी सव्वानऊला अतिशय शांतपणे बाबा विसावला. त्याची खात्री पटली असावी की, आम्ही सारे हा प्रसंग निभावून न्यायला पुरेसे तयार झालेले आहोत. 

सुलगती धुप में छाओं के जैसा  ⎢

रेगिस्तान में गाँव के जैसा  ⎢

मन के घाव पे मरहम  जैसा था वो  ⎢ ⎢

आता हे गाणे मनाला साथ द्यायला लागले होते. ह्या तीन दिवसांमध्ये आमच्यात एक संकेत तयार झाला होता. ज्या व्यक्तीला आपलं दु:ख अनावर होईल त्या व्यक्तीने बाजूच्या व्यक्तीच्या कुशीत शिरून रडायचं. आसवांना वाट करून द्यायची. आणि कुशीत घेणाऱ्याने कोणतेही ‘ ग्यान ‘ न देता फक्त आश्वासक ऊब द्यायची… त्यामुळे आम्ही सारे शांत (भासत) पुढच्या कामांना लागलो. दर्शनासाठी रीघ लागली. माध्यमांची  फळी  मी सांभाळत होतो. पुढच्या ‘व्यवस्था’ करायला मुक्तांगण टीम होतीच. बाबाला अंतिम प्रवासाला  नेण्याची वेळ आली. त्याच्या कपाळाची पापी घेतली मी. आणि फुटुन रडलो. यशो आणि मुक्ताने मला कुशीत घेतले. 

आमच्या सगळ्यांमधल्या नि:शब्द संघभावनेचे पुढचे पाऊल पडले. बाबाच्या इच्छेनुसार धार्मिक कर्मकांडे न करता वैकुंठ दाहिनीमध्ये जायचे होते. तिथे यशोने, ” वैष्णव जन तो….” हे भजन म्हटले. आम्ही सर्वांनी कोरस दिला. बाबाच्याबरोबर त्याच्या लहानग्या नातवाने अर्णवने त्याला भेट दिलेला ओरेगामीचा पक्षी त्या विद्युतदाहिनीमध्ये सोबतीला गेला. जमलेल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करताना म्हणालो, ” गांधीजींच्या मृत्यूची बातमी विनोबांना कळली तेव्हा ते म्हणाले, पूर्वी बापूंना भेटायला प्रवास करून जायला लागायचं. आता सोपे झाले. फक्त डोळे मिटायचे की भेटलेच बापू… आज आपल्या सगळ्यांची भावना ह्यापेक्षा वेगळी नाही. करुणामय आणि अनेक पदरी आयुष्य जगलेला हा माणूस अनेक पद्धतीने आपल्या सोबत आणि आपल्या आत राहाणार आहेच !”

त्या दिवशी रात्री बाबाच्या घरातल्या माझ्या नेहमीच्या जागी झोपलो आणि अचानक जाणवले…. गेली छत्तीस वर्षे मी ह्या घरात, ह्याच ठिकाणी झोपतोय !  पण ही पहिली रात्र की जेव्हा सुनंदा नाही, इंदूआजी नाही आणि बाबासुद्धा नाही. 

आधीच्या दिवसांमध्ये नकळत घडलेल्या ‘विपश्यने’मुळेच आतला आकांत शांत झाला असावा.  दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि  मुक्ता आमच्या मुक्तांगण टीम सोबतची मीटिंग घ्यायला त्या परिसरात पोहोचलो.  माझ्या सोबत सविता आणि फुलाआत्या होत्याच…..”बाबाची प्रत्येक आठवण म्हणजे स्वतःला समृद्ध करणं …. आज सकाळपासून आपण बाबाबद्दल लिहिले गेलेले खूप छान असे वाचतोय, टीव्ही वर ऐकतोय…. आपण सगळे त्याच्या सहवासात होतो… त्याची आस्था, त्याचे प्रेम, त्याची मैत्री आपल्यात उतरले आहे…. त्याला साद घालत राहायची फक्त” मी म्हणालो.  काही सहकाऱ्यांनी खूपच मनोज्ञ आठवणी सांगितल्या. शेवटी का कोण जाणे, मला वाटले “मोगरा फुलला” हा अभंग गावा. व्यक्त आणि अव्यक्ताचे नाते सांगतात ज्ञानदेव त्यामध्ये आपल्याला. आत्मबोधाचा बहर आला, की फुले वेचतावेचता, ताज्या कळ्या उमलण्याच्या तयारीमध्ये येतात…. विचारांचा गुंता करायचा की त्यांचा शेला गुंफायचा हे आपल्याच हाती …. बाबाच्या करुणेने आणि सर्जनशीलतेने त्याच्या आयुष्याचा शेला विणला. पण त्याने कधीच ‘कर्तेपण’ स्वतः कडे घेतले नाही …. समाजरूपी विठ्ठलाच्या चरणी आपले सारे सृजनकर्तृत्व वाहिले. 

शेवटच्या समेवर आलो आणि पूर्णविरामाच्या ठिकाणी एक हुंदका आपोआप आला.  निःशब्द शांततेत आम्ही सारे कार्यकर्ते  एकलय , एकतान झालो . 

त्याच ट्रान्समध्ये मुक्तांगण सोडले. सविता म्हणाली, ” इथून आळंदी किती दूर “,”जेमतेम वीस मिनिटे …”  आम्ही निघालो.  बाबाचा एक अप्रतिम लेख आहे, ‘ज्ञानदेवांचे मार्दव’ …. कोंबाची लवलव, सांगे भूमीचे मार्दव !  बाबाची खूप आवडती ओवी . त्याला भावले होते ते कवी ज्ञानदेव …. आस्थेने ओथंबलेले  ज्ञानोबा!….. बाबाने चिद्विलासवादावर काही अभ्यास केला नव्हता. पण चिद्विलास जगणाऱ्याला वेगळ्या अभ्यासाची गरजही नव्हती.  ज्ञानेश्वरांच्या समाधी जवळच्या अजानवृक्षाच्या सानिध्यात आलो…… 

जो खांडावया धाव घाली…. का लावणी जयाने केली.  

दोघा  एकची सावली वृक्ष दे जैसा. 

बाबाची अजून एक आवडती ओवी.  बाबा लिहितो, “जो झाड तोडायला धाव घालतो किंवा तो वृक्ष ज्याने लावला त्या दोघांनाही वृक्ष सारखीच सावली देतो, मनात धस्स होतं.  कसं  वाटत असेल झाडावर कुऱ्हाड पडताना ?  मुळातून जाणारे अन्नपाण्याची स्रोत जखमी होताना ?  आता मरण  जवळच  हे त्या जीवाला कळेलच की ! पण  तरी सावली देणं थांबत नाही”. 

ज्ञानेश्वरपादुकांना वंदन करून, इंद्रायणीकाठाने परत येत होतो तेव्हा बाबाची आस्था आणि ज्ञानदेवांची आस्था एकरूप झाली होती…. एकात्म झाले होते दोघे.  माझ्या मनाला emotional  closure  मिळत होते. दुःखालाही विसावा मिळणे गरजेचे.  

परतीच्या वाटेवर बाबा अनेक वेळा सांगायचा ते ज्ञानदेवांचे शब्द सोबत होते, 

वारा वाहे दूर…. झाड ओलांडून 

डोलणे ठेऊन …. फांद्यावर


– डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

करुणालय : १

आलयम् करुणालयम्!

आजपासून सुरू….प्रत्येक पंधरा दिवसानी…सकाळ वर्तमानपत्रात….सप्तरंग पुरवणी मध्ये नवा कॉलम…करुणालय


अगदी नेमके सांगायचे तर, १ जुलै १९८१ ह्या दिवसाची गोष्ट. मनोविकारशास्त्रामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला दिवस . . . मध्य-मुंबईतील के.ई.एम्. रुग्णालयाच्या, पंधरा नंबरच्या ओपीडीची गच्च गर्दी. मी माझ्या सिनियर सहकाऱ्याच्या एप्रनला अगदी पकडून बसलेलो . . . तो नव्या रुग्णाशी बोलत होता.

“सगळे कळतंय् डॉक्टर . . . की हा अगदी वेड्यासारखा विचार आहे . . . सूर्याकडे पाहून त्याचे तेज काही माझ्या डोळ्यात उतरणार नाही . . . तरीही हा विचार आला की पाहावेच लागते सूर्याकडे . . . आणि संध्याकाळनंतर दिव्याकडे किंवा ज्योतिकडे”  समोरचा माणूस सांगत होता. त्याच्याबरोबर होती त्याची केविलवाणी बायको. प्रखर सूर्यकिरणांकडे वारंवार पाहिल्यामुळे त्याला दृष्टीदोष आला होता. म्हणून हे दोघे डोळ्यांच्या ओपीडीत पोहोचले. तिथून आमच्या विभागात. 

“हा नक्की ऑबसेसिव्ह विचार आहे . . . अवास्तव आहे हे कळत असूनही वारंवार घुसत राहणारा . . . आणि त्याप्रमाणेच वागण्याची सक्ती करणारा!” एक सिनियर सहकारी म्हणाला.

“बट् लूक अट  द बिझारनेस . . . Bizzare . . . किती विचित्र  आहे हा विचार . . . हे फक्त ऑबसेशन् नाही . . . त्या माणसाचे वास्तवाशी असलेले नाते तुटते आहे . . . ही सायकॉसिस नावाच्या आजाराची सुरुवात असू शकते.” दुसरा म्हणाला.

इंग्रजी भाषेतून त्यांची ही चर्चा किंवा वादविवाद सुरू होता. पेशंट, त्याची बायको आणि मी सम-प्रमाणात गोंधळलेले . . . अगदी मुळापासून कन्फ्युजड्! औषधे देऊन त्यांना मानसिक चाचण्यांसाठी बोलवायचे आणि साप्ताहिक, सामूहिक चर्चासत्रासाठी ही केस घ्यायची असे ठरले. माझे दोन्ही सहकारी बोलता बोलता माझ्याकडे पाहायचे, तेव्हा मी मान डोलावत होतो, माझे अज्ञान लपवण्यासाठी. 

दुपारी एकच्या सुमारास ओपीडी संपली. पेशंट्सना बसण्यासाठी बाहेरची बाके आता रिकामी झाली होती. तिथे तो पेशंट आणि बायको भाजी-भाकरीचा डबा खात बसले होते. बायको त्याला भरवत होती. मी थबकलो. हसलो. ती पण हसली, “येता का डॉक्टर जेवायला! . . .”

मानेने नाही म्हणत पुढे गेलो. पुन्हा पाठी आलो आणि त्यांच्या शेजारी बसलो. सकाळी ऐकली होती ती आजाराची ‘हिस्टरी’ होती, लक्षणांची ‘चेक् लिस्ट’ होती . . . आता मी ऐकत होतो विठ्ठल-रखुमाईची कहाणी. ह्या विचित्र आजारामुळे त्याच्या संसाराची उडालेली परवड. हा मानसिक त्रास आहे हे कोणालाच न कळल्यामुळे त्यांनी केलेले ‘उपाय’ आणि त्यासाठी झालेला खर्च. त्या विठूचा रोजगार बंद होणे, त्या रखुमाईने राबराबूनही तिला स्वतःचे दागिने विकायला लागणे. त्या परिस्थितीतही त्याने ‘भीक मागायला’ दिलेला नकार.

माझ्या पापण्या ओलावत होत्या. आता माझा पांढरा एप्रन अडसर नव्हता तर आमच्यातल्या नात्याची शुभ्रता बनला होता . . . अर्ध्या तासाने उठलो तेव्हा उमगलेले सत्य अजूनही मनाच्या तिजोरीत आणि प्रत्येक दरवाजा-खिडकीत जपून ठेवलंय् . . . Symptoms and script !

. . . आजाराची लक्षणे आणि जगण्याची कहाणी! आमच्या तज्ञ प्रशिक्षणात आणि परीक्षेतही आम्हाला शिकवले जाते आजाराचे निदान . . . त्यासाठी लक्षणांचा अभ्यास. आणि मग औषधयोजना . . . गरज पडेल तसे हॉस्पिटलात दाखल करणे, विद्युत् उपचार पद्धती वगैरे वगैरे. समोरची व्यक्ती आमच्यासाठी होऊन जाते ‘केस’ . . . “सात नंबर बेडवर स्किझोफ्रेनीया . . . स्पेशल रूममध्ये ओसीडी . . . स्त्रियांच्या वॉर्डात् बायपोलर” आम्ही माणसांना आजारांच्या नावाने ओळखायला लागतो . . . अगदी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा!

त्यामुळे माझा रुग्ण माझा मित्र बनत नाही, उपचारांमधला पार्टनर बनत नाही. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी दोन पावले सोबत चालत नाही. त्याच्याबरोबर खळाळून हसत नाही. त्याच्या सुखदुःखात सहभागी होत नाही. आज चार दशकांनंतर आमच्या आय्.पी.एच्. संस्थेच्या बाह्यरुग्ण विभागात मी किमान आठ-नऊ तास सलगपणे तीस-पस्तीस कुटुंबांसमवेत असतो. शिकण्यासाठी बसलेले तरुण मनआरोग्यव्यावसायिक कधीकधी अचंबित होतात.

“आम्हाला शिकवले जाते, पेशंट सोबत अंतर ठेवून राहायचं . . . गुंतायचे नाही . . . तसे करणे प्रोफेशनल नाही होत!” कधी कधी त्यातली एक धीर धरून विचारते.

“आपले प्रोफेशन काय आहे? . . . तणावात असलेल्या, भावनिकता अस्ताव्यस्त झालेल्या व्यक्तीला मायेचा आणि मदतीचा हात देणे. तुम्हाला समुपदेशनाची कौशल्ये शिकवताना पुस्तके आणि प्राध्यापक काय सांगतात? .  . . Empathy म्हणजे आस्था, आपुलकी महत्त्वाची. समोरच्या व्यक्तीच्या दुःखाबद्दलची कणव, करुणा महत्वाची . . . हो की नाही?” मी विचारतो.

“हो . . . पण ते एक ‘स्किल्’ आहे . . . कौशल्य!” प्रतिसाद येतो. 

“मान्य करूया ‘कौशल्य’ आहे . . . पण फक्त समुपदेशनाचे नव्हे तर समृद्ध आयुष्य जगण्याचे. माणुसकीला आपण फक्त ‘साधन’ मानायचे का? . . . ते साध्यही आहे आणि साधनही . . . म्हणूनच आस्था, करुणा ही जीवनमूल्ये आहेत . . . म्यानात काढायची, घालायची हत्यारे नव्हेत.” माझ्या आवाजात ठामपणा येऊ लागतो. मी त्या तरुण मनांचा गोंधळ समजू शकतो. आजकालच्या स्वयंकेंद्रित जगण्याच्या रिवाजामुळे त्यांना माणसाच्या भावनांपर्यंत पोहोचण्याबद्दलच साशंकता असते. मी त्यांना म्हणतो, “माझ्याबरोबर हा प्रवाह फक्त अनुभवा . . .” वय वर्षे सात ते नव्वद पर्यंतची मंडळी, त्यांचे नातेवाईक येत राहतात. कुणी माझ्यासाठी यशाची मिठाई आणतात, काही जणांचे अश्रू पुसताना मी हळुवार स्पर्श करतो. मनाच्या तळातल्या गोष्टी बोलल्या जातात. कधी माझा स्वर मार्दवाने भरलेला तर कधी अतिशय ठाम. समोरच्या व्यक्तीचा एकही प्रश्न टाळला जात नाही. कधीकधी तर मी ‘रागावतो’ सुद्धा! सगळ्या भावना मस्त रंगपंचमी खेळत असतात.

“सकाळी दहा ते संध्याकाळी सात . . . तुमची एनर्जी टिकते कशी?” . . . ते विचारतात.

“माझ्या मनाला मी सांगतो की माझ्यासाठी रुग्ण क्रमांक अमुकतमुक आहे पण त्याच्यासाठी मी एकमेव डॉक्टर ना . . . दुसरे असे की Empathy अर्थात् आपुलकी, करुणा अर्थात् Compassion ह्या भावना कधीच Draining म्हणजे थकवणाऱ्या नसतात तर Rejuvinating म्हणजे संवर्धक असतात . . . जर तुम्हाला ‘भावनिक थकवा’ आला तर स्वतःला तपासून पाहा . . . तुम्ही Empathy ऐवजी Sympathy वर गेलात का? . . . आस्था म्हणजे  समोरच्या व्यक्तीच्या भावनांबरोबर एकतानता पण त्याच्या समस्येबद्दलची समग्र, सच्ची अशी वैचारीक जाण . . .  दोन्ही एकत्र नांदतात . . . म्हणून करुणा कधीच लेचीपेची नसते. विश्वाचे आर्त स्वतःच्या मनी उतरवण्याची ज्ञानदेवांची ताकद ह्या भावनेत असते.

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, अर्जुनाच्या भावनिक विकलतेचे वर्णन करताना माऊली लिहितात, “कर्दमी रूपला राजहंसु.” किती आस्थेने पाहत आहेत ज्ञानदेव त्या अर्जुनाकडे. माझ्यासमोर मदतीसाठी आलेला प्रत्येक जण वेगळा काय असतो? विचारभावनांच्या चिखलामध्ये अडकलेला, अनारोग्यकारक सवयीच्या अरण्यात वाट चुकलेला ‘स्वत्व’ हरवलेला राजहंस . . . ज्याला ‘स्वत्वा’चे सत्व लाभते तो स्वतःमधला राजहंस जागृत करतो . . .

मानसशास्त्र सांगते की प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत. त्यांचा डोळस, विनाअट स्वीकार करू. असे करायलाही स्वतःबद्दलची आणि दुसऱ्याबद्दलची आपुलकी हवीच. भारतीय परंपरा त्यामुळे जाऊन आपला कौल, माणसातील अभिजात, पायाभूत अशा ‘सद्’भावाच्या बाजूने टाकते. ही करुणेची पुढची पायरी असते. समोरचा माणूस मुळापासून ‘वाईट” नाही असा विश्वास.

भावनिक आरोग्याच्या क्षेत्रात आणि व्यवसायात ही मूल्ये महत्त्वाची आहेत तशी जगण्याच्या कोणत्या क्षेत्रात नाहीत? ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी’ असे लिहिणारे बाकीबाब बोरकर दुसरे काय सांगतात? करुणेला अहंभावाशी वाकडे आहे, प्रौढीबद्दल नावड आहे आणि प्रसिद्धीशिवायची कृतीशीलता ही तिची वृत्ती आहे. ही गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या व्यक्तीलाच आपण ‘गुरु’ असे म्हणतो. त्याचे वर्णन करणाऱ्या एका संस्कृत श्लोकामध्ये शब्द आहेत ‘आलयं करुणालयं. आलय म्हणजे निवासस्थान. राहायचे घर. विद्या राहते ते विद्यालय,  बर्फ राहतो तो हिमालय. भावनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सेवा देणाऱ्या सर्व ठिकाणांचे खरे नाव असले पाहिजे ‘करुणालय.’

माझ्या मनातल्या करुणालयाची चार दशकांची घडण कशी घडली त्याचा मागोवा आपण वर्षभर घेणार आहोत ह्या संवादमालेतून.

– डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com