करुणालय : १

आलयम् करुणालयम्!

आजपासून सुरू….प्रत्येक पंधरा दिवसानी…सकाळ वर्तमानपत्रात….सप्तरंग पुरवणी मध्ये नवा कॉलम…करुणालय


अगदी नेमके सांगायचे तर, १ जुलै १९८१ ह्या दिवसाची गोष्ट. मनोविकारशास्त्रामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला दिवस . . . मध्य-मुंबईतील के.ई.एम्. रुग्णालयाच्या, पंधरा नंबरच्या ओपीडीची गच्च गर्दी. मी माझ्या सिनियर सहकाऱ्याच्या एप्रनला अगदी पकडून बसलेलो . . . तो नव्या रुग्णाशी बोलत होता.

“सगळे कळतंय् डॉक्टर . . . की हा अगदी वेड्यासारखा विचार आहे . . . सूर्याकडे पाहून त्याचे तेज काही माझ्या डोळ्यात उतरणार नाही . . . तरीही हा विचार आला की पाहावेच लागते सूर्याकडे . . . आणि संध्याकाळनंतर दिव्याकडे किंवा ज्योतिकडे”  समोरचा माणूस सांगत होता. त्याच्याबरोबर होती त्याची केविलवाणी बायको. प्रखर सूर्यकिरणांकडे वारंवार पाहिल्यामुळे त्याला दृष्टीदोष आला होता. म्हणून हे दोघे डोळ्यांच्या ओपीडीत पोहोचले. तिथून आमच्या विभागात. 

“हा नक्की ऑबसेसिव्ह विचार आहे . . . अवास्तव आहे हे कळत असूनही वारंवार घुसत राहणारा . . . आणि त्याप्रमाणेच वागण्याची सक्ती करणारा!” एक सिनियर सहकारी म्हणाला.

“बट् लूक अट  द बिझारनेस . . . Bizzare . . . किती विचित्र  आहे हा विचार . . . हे फक्त ऑबसेशन् नाही . . . त्या माणसाचे वास्तवाशी असलेले नाते तुटते आहे . . . ही सायकॉसिस नावाच्या आजाराची सुरुवात असू शकते.” दुसरा म्हणाला.

इंग्रजी भाषेतून त्यांची ही चर्चा किंवा वादविवाद सुरू होता. पेशंट, त्याची बायको आणि मी सम-प्रमाणात गोंधळलेले . . . अगदी मुळापासून कन्फ्युजड्! औषधे देऊन त्यांना मानसिक चाचण्यांसाठी बोलवायचे आणि साप्ताहिक, सामूहिक चर्चासत्रासाठी ही केस घ्यायची असे ठरले. माझे दोन्ही सहकारी बोलता बोलता माझ्याकडे पाहायचे, तेव्हा मी मान डोलावत होतो, माझे अज्ञान लपवण्यासाठी. 

दुपारी एकच्या सुमारास ओपीडी संपली. पेशंट्सना बसण्यासाठी बाहेरची बाके आता रिकामी झाली होती. तिथे तो पेशंट आणि बायको भाजी-भाकरीचा डबा खात बसले होते. बायको त्याला भरवत होती. मी थबकलो. हसलो. ती पण हसली, “येता का डॉक्टर जेवायला! . . .”

मानेने नाही म्हणत पुढे गेलो. पुन्हा पाठी आलो आणि त्यांच्या शेजारी बसलो. सकाळी ऐकली होती ती आजाराची ‘हिस्टरी’ होती, लक्षणांची ‘चेक् लिस्ट’ होती . . . आता मी ऐकत होतो विठ्ठल-रखुमाईची कहाणी. ह्या विचित्र आजारामुळे त्याच्या संसाराची उडालेली परवड. हा मानसिक त्रास आहे हे कोणालाच न कळल्यामुळे त्यांनी केलेले ‘उपाय’ आणि त्यासाठी झालेला खर्च. त्या विठूचा रोजगार बंद होणे, त्या रखुमाईने राबराबूनही तिला स्वतःचे दागिने विकायला लागणे. त्या परिस्थितीतही त्याने ‘भीक मागायला’ दिलेला नकार.

माझ्या पापण्या ओलावत होत्या. आता माझा पांढरा एप्रन अडसर नव्हता तर आमच्यातल्या नात्याची शुभ्रता बनला होता . . . अर्ध्या तासाने उठलो तेव्हा उमगलेले सत्य अजूनही मनाच्या तिजोरीत आणि प्रत्येक दरवाजा-खिडकीत जपून ठेवलंय् . . . Symptoms and script !

. . . आजाराची लक्षणे आणि जगण्याची कहाणी! आमच्या तज्ञ प्रशिक्षणात आणि परीक्षेतही आम्हाला शिकवले जाते आजाराचे निदान . . . त्यासाठी लक्षणांचा अभ्यास. आणि मग औषधयोजना . . . गरज पडेल तसे हॉस्पिटलात दाखल करणे, विद्युत् उपचार पद्धती वगैरे वगैरे. समोरची व्यक्ती आमच्यासाठी होऊन जाते ‘केस’ . . . “सात नंबर बेडवर स्किझोफ्रेनीया . . . स्पेशल रूममध्ये ओसीडी . . . स्त्रियांच्या वॉर्डात् बायपोलर” आम्ही माणसांना आजारांच्या नावाने ओळखायला लागतो . . . अगदी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा!

त्यामुळे माझा रुग्ण माझा मित्र बनत नाही, उपचारांमधला पार्टनर बनत नाही. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी दोन पावले सोबत चालत नाही. त्याच्याबरोबर खळाळून हसत नाही. त्याच्या सुखदुःखात सहभागी होत नाही. आज चार दशकांनंतर आमच्या आय्.पी.एच्. संस्थेच्या बाह्यरुग्ण विभागात मी किमान आठ-नऊ तास सलगपणे तीस-पस्तीस कुटुंबांसमवेत असतो. शिकण्यासाठी बसलेले तरुण मनआरोग्यव्यावसायिक कधीकधी अचंबित होतात.

“आम्हाला शिकवले जाते, पेशंट सोबत अंतर ठेवून राहायचं . . . गुंतायचे नाही . . . तसे करणे प्रोफेशनल नाही होत!” कधी कधी त्यातली एक धीर धरून विचारते.

“आपले प्रोफेशन काय आहे? . . . तणावात असलेल्या, भावनिकता अस्ताव्यस्त झालेल्या व्यक्तीला मायेचा आणि मदतीचा हात देणे. तुम्हाला समुपदेशनाची कौशल्ये शिकवताना पुस्तके आणि प्राध्यापक काय सांगतात? .  . . Empathy म्हणजे आस्था, आपुलकी महत्त्वाची. समोरच्या व्यक्तीच्या दुःखाबद्दलची कणव, करुणा महत्वाची . . . हो की नाही?” मी विचारतो.

“हो . . . पण ते एक ‘स्किल्’ आहे . . . कौशल्य!” प्रतिसाद येतो. 

“मान्य करूया ‘कौशल्य’ आहे . . . पण फक्त समुपदेशनाचे नव्हे तर समृद्ध आयुष्य जगण्याचे. माणुसकीला आपण फक्त ‘साधन’ मानायचे का? . . . ते साध्यही आहे आणि साधनही . . . म्हणूनच आस्था, करुणा ही जीवनमूल्ये आहेत . . . म्यानात काढायची, घालायची हत्यारे नव्हेत.” माझ्या आवाजात ठामपणा येऊ लागतो. मी त्या तरुण मनांचा गोंधळ समजू शकतो. आजकालच्या स्वयंकेंद्रित जगण्याच्या रिवाजामुळे त्यांना माणसाच्या भावनांपर्यंत पोहोचण्याबद्दलच साशंकता असते. मी त्यांना म्हणतो, “माझ्याबरोबर हा प्रवाह फक्त अनुभवा . . .” वय वर्षे सात ते नव्वद पर्यंतची मंडळी, त्यांचे नातेवाईक येत राहतात. कुणी माझ्यासाठी यशाची मिठाई आणतात, काही जणांचे अश्रू पुसताना मी हळुवार स्पर्श करतो. मनाच्या तळातल्या गोष्टी बोलल्या जातात. कधी माझा स्वर मार्दवाने भरलेला तर कधी अतिशय ठाम. समोरच्या व्यक्तीचा एकही प्रश्न टाळला जात नाही. कधीकधी तर मी ‘रागावतो’ सुद्धा! सगळ्या भावना मस्त रंगपंचमी खेळत असतात.

“सकाळी दहा ते संध्याकाळी सात . . . तुमची एनर्जी टिकते कशी?” . . . ते विचारतात.

“माझ्या मनाला मी सांगतो की माझ्यासाठी रुग्ण क्रमांक अमुकतमुक आहे पण त्याच्यासाठी मी एकमेव डॉक्टर ना . . . दुसरे असे की Empathy अर्थात् आपुलकी, करुणा अर्थात् Compassion ह्या भावना कधीच Draining म्हणजे थकवणाऱ्या नसतात तर Rejuvinating म्हणजे संवर्धक असतात . . . जर तुम्हाला ‘भावनिक थकवा’ आला तर स्वतःला तपासून पाहा . . . तुम्ही Empathy ऐवजी Sympathy वर गेलात का? . . . आस्था म्हणजे  समोरच्या व्यक्तीच्या भावनांबरोबर एकतानता पण त्याच्या समस्येबद्दलची समग्र, सच्ची अशी वैचारीक जाण . . .  दोन्ही एकत्र नांदतात . . . म्हणून करुणा कधीच लेचीपेची नसते. विश्वाचे आर्त स्वतःच्या मनी उतरवण्याची ज्ञानदेवांची ताकद ह्या भावनेत असते.

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, अर्जुनाच्या भावनिक विकलतेचे वर्णन करताना माऊली लिहितात, “कर्दमी रूपला राजहंसु.” किती आस्थेने पाहत आहेत ज्ञानदेव त्या अर्जुनाकडे. माझ्यासमोर मदतीसाठी आलेला प्रत्येक जण वेगळा काय असतो? विचारभावनांच्या चिखलामध्ये अडकलेला, अनारोग्यकारक सवयीच्या अरण्यात वाट चुकलेला ‘स्वत्व’ हरवलेला राजहंस . . . ज्याला ‘स्वत्वा’चे सत्व लाभते तो स्वतःमधला राजहंस जागृत करतो . . .

मानसशास्त्र सांगते की प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत. त्यांचा डोळस, विनाअट स्वीकार करू. असे करायलाही स्वतःबद्दलची आणि दुसऱ्याबद्दलची आपुलकी हवीच. भारतीय परंपरा त्यामुळे जाऊन आपला कौल, माणसातील अभिजात, पायाभूत अशा ‘सद्’भावाच्या बाजूने टाकते. ही करुणेची पुढची पायरी असते. समोरचा माणूस मुळापासून ‘वाईट” नाही असा विश्वास.

भावनिक आरोग्याच्या क्षेत्रात आणि व्यवसायात ही मूल्ये महत्त्वाची आहेत तशी जगण्याच्या कोणत्या क्षेत्रात नाहीत? ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी’ असे लिहिणारे बाकीबाब बोरकर दुसरे काय सांगतात? करुणेला अहंभावाशी वाकडे आहे, प्रौढीबद्दल नावड आहे आणि प्रसिद्धीशिवायची कृतीशीलता ही तिची वृत्ती आहे. ही गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या व्यक्तीलाच आपण ‘गुरु’ असे म्हणतो. त्याचे वर्णन करणाऱ्या एका संस्कृत श्लोकामध्ये शब्द आहेत ‘आलयं करुणालयं. आलय म्हणजे निवासस्थान. राहायचे घर. विद्या राहते ते विद्यालय,  बर्फ राहतो तो हिमालय. भावनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सेवा देणाऱ्या सर्व ठिकाणांचे खरे नाव असले पाहिजे ‘करुणालय.’

माझ्या मनातल्या करुणालयाची चार दशकांची घडण कशी घडली त्याचा मागोवा आपण वर्षभर घेणार आहोत ह्या संवादमालेतून.

– डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

Leave a comment