कर्ता शेतकरी : निर्मिती ते प्रस्तुती – डॉ. आनंद नाडकर्णी

आय. पी. एच. (इन्स्टिट्यूट  फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ)  ही मनआरोग्याच्या  क्षेत्रात कार्यरत अशी संस्था यंदा तेहतीस वर्षांची  झाली . मानसिक स्वास्थविषयक दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यासाठीच ‘आवाहन’ हा माध्यमविभाग जन्माला आला बारा – तेरा वर्षांपूर्वी. ह्या  विभागातर्फे जे यू-ट्यूब चॅनेल चालवले जाते, त्याचे नाव आहे ‘आवाहन आय. पी. एच.’ आज ह्या विभागाकडे स्वतःचा स्टुडियो आहे. स्वतःची यंत्रसामुग्री आहे. चित्रपटावर संकलन आणि तांत्रिक संस्कार करणारी पूर्ण यंत्रणा आहे.  ध्वनिमुद्रण करण्यासाठी स्वतंत्र स्टुडियोसुद्धा आहे.

चित्रपटाचे  शूटिंग करण्यासाठी आम्ही साधारण २५० फुटांचा स्टुडियो वापरतो, तो ‘कर्ता शेतकरी’साठीच्या सेटने सजायला लागला. ‘ कर्ता शेतकरी ‘ प्रकल्पाचा लोगो सचिनने तयार केला.  हिरव्या रंगाची पार्श्वभूमी असणाऱ्या सेटच्या लाकडी चौकटीसुद्धा आमच्या ऋषिकेश (पांचाळ) ह्या तरुण नेपथ्यकाराने बनवल्या. योग्य ते लाईट्स योग्य जागी लागले. शूटिंग नसलेल्या दिवशी हीच जागा रंग बदलते  आणि विद्यार्थ्यांच्या व्यवसाय कल – चाचण्यांसाठी वापरण्यात येते; ह्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु मुंबई – ठाण्यासारख्या महानगरामध्ये आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्थेला जागेचा ‘इंच इंच’ असा लढवावा लागतो.

जालन्याजवळच्या ‘जांब समर्थ’ गावाहून राजकुमार तांगडे येऊन पोहाचला. त्याच्याबरोबर ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती ह्या संदर्भातली; परंतु ज्या ‘वेध’ उपक्रमामध्ये मी विलास शिंदेंची मुलखात घेतली होती, तशाच एका उपक्रमामध्ये औरंगाबादला मी राजकुमारबरोबर गप्पा मारल्या होत्या. आमच्या नियोजनाप्रमाणे साधारणपणे पंचवीस ते अठ्ठावीस मिनिटांचे एकूण चाळीस एपिसोड्स आम्ही टप्याटप्याने शूट करणार होतो.  सुवर्णा (बोबडे) आणि शिल्पा ( जोशी ) ह्यांनी तयार केलेले पहिल्या पाच प्रकरणांची संहिता हातात होती. मी आणि राजकुमार स्क्रिप्ट घेऊन बसलो. मोठ्याने वाचायला लागलो.  पाच मिनिटानंतर दोघांनी एकमेकांकडे पहिले……  आमच्या दोघांच्याही डोळ्यातले भाव सारखेच होते. “ह्या संहितेमधले मुद्दे आणि त्यांचा क्रम तसाच ठेवून आपण उत्स्फूर्तपणे  बोलत गेलो तर”,  ही आमची भूमिका ठरली. म्हणजे आपल्या गप्पा प्रेक्षकांना अकृत्रिम वाटतील आणि तरीही मानसिकतेबद्दलचे मुद्दे मात्र एक-एक करून सलग क्रमाने मांडता येतील.  आमचा पहिला भाग होता ‘कर्ता शेतकरी’ म्हणायचे कोणाला? आणि दुसरा भाग  मन म्हणजे काय ?

आम्ही दोघांनी आमच्या संवादाचा प्रवाह म्हणजे ‘फ्लो’ एका कागदावर लिहून घेतला आणि ‘एपिसोड क्रमांक एक’ला सुरवात झाली……. कॅमेरा रेडी …. साऊंड रोलिंग ….  ‘कर्ता शेतकरी’ एपिसोड वन, टेक वन ….ऍक्शन!

ह्या क्षणापासून माझी आणि राजकुमारची ‘स्पेस’, आमचं ‘अवकाश’ सुरु झालं. ठरवलेल्या चाळीस भागांमध्ये दोन भागांची भर पडली. परंतु आमच्या संवादाची लय कोणत्याही भागात ‘हलली’ नाही.  एकूण आठ दिवस, ऐंशी तास आणि एकवीस तासांहून जास्त लांबीचे बेचाळीस भाग.

दृकश्राव्य माध्यमामध्ये वावरायला लागून आता चार दशके लोटली मला. त्याचा एक फायदा असा, की घड्याळाकडे न पाहता मला सरकणाऱ्या वेळेचा अंदाज असतो. मी सत्तावीस मिनिटे ही कालमर्यादा असेल, तर तीस ते चाळीस सेंकंदाच्या ‘इकडेतिकडे’ मध्ये थांबू शकतो.  हाच हिशोब मी दोन मिनिटांच्या ‘बाईट’मध्येही  हलू देत नाही, ह्या ‘आजीचा घड्याळा’चे राजकुमाराला इतके अप्रूप, कौतुक वाटले, की  पुढेपुढे एपिसोडचा ‘ टेम्पो ‘ म्हणजे ‘ गती ‘ तो माझ्यावर सोडून द्यायचा.

आमच्या ‘उत्स्फूर्त’ बोलण्याचे त्या क्षणीच लेखी स्वरूपात डॉक्युमेंटेशन होणे महत्वाचे होते. प्रत्यक्ष शूटिंग सुरु असताना एकवीस-बावीस तासांची ही टिपणे काढली आमची सहकारी वैदेही भिडेने.  अठराव्या एपिसोडमध्ये आलेले एखादे उदाहरण छत्तिसाव्या भागात डोकावता कामा नये, ह्यासाठी ही बाजू फारच महत्वाची होती.

अशा प्रकारे ‘आवाहन’चे एकूण चार सदस्य आणि आम्ही दोघे, अशा फक्त सहा जणांची ही टीम सगळीच कामे करत होती. सचिन -शैलेश आणि ऋषिकेश तर सामान लावणे, काढणे, पॅक करणे, अनपॅक करणे, असे सगळेच कष्टाचे काम करायचे. आमच्या संस्थेचे व्यवस्थापकीय  काम पाहणारा माझा मित्र मंगेश (बाणे) शूटिंगचीही व्यवस्था पाहायला यायचा. माझी पत्नी डॉ सविता, आमचे शूटिंग पाहायला यायची आणि तिचे विणकाम करत बसायची. राजकुमारने तिचे नाव ठेवले ‘वीणा वर्ल्ड…….नि शब्द’.   म्हणजेच  चोख काम करता करता आम्ही धमालही सतत करायचो.

व्यसनाधीन व्यक्तींच्या  पत्नींनी चालवलेला  ‘सहचारी स्वादम ‘ हा  सहकारी किचनचा आमच्या संस्थेचा अजून एक उपक्रम.  त्यांचातर्फे आम्हाला रुचकर नाष्टा – भोजन मिळायचे. आमचे ‘टेक’ चालू झाले, की  कधी कधी आसमंतातल्या फेरीवाल्यांना अगदी ऊत यायचा . आमचा स्टुडियो, संपूर्ण व्यावसायिक स्टुडिओइतका ‘साऊंडप्रूफ’ नाही. कधी नंदीबैल यायचा शेजारचा रस्त्यावर, तर कधी पॉमपॉम  असा हॉर्न वाजवत इडली विकणारा इडलीवाला…. अशावेळी वृत्तीचे समत्व  ढळू न देणे, हा मोठाच भावनिक व्यायाम.

पहिल्या दोन दिवसांच्या शूटिंगमध्ये आम्ही चक्क आठ भाग प्रत्यक्षात आणू शकलो. आत्मविश्वास वाढला. आता पुढचा कसोटीचा प्रसंग होता ‘मुलगी’ दाखवण्याचा.

शूटिंग संपलं, की मी आणि राजकुमार लगेचच आपापल्या वाटांना लागायचो; पण उरलेली टीम मात्र एडिटिंगच्या टेबलवर स्वतःला जुंपून घ्यायची. प्रत्यक्ष दिसणारा साधारण अर्ध्या तासाचा एक भाग तयार व्हायला कधी चौदा तास लागायचे, तर कधी सोळा. त्यातील रेखाचित्रे, ग्राफिक्स हे सारे ह्याच टीमने बनवले. शीर्षकगीत रेकॉर्ड झाल्यावर त्याचे दृश्यरूप म्हणजे ‘मोंटाज’सुद्धा बनवला आणि आमची उपवर मुलगी अर्थात ‘तयार’ झालेले सहा एपिसोड्स ‘पाहायला’ ‘सह्याद्री फार्म्स’चे विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी संस्थेच्या केंद्रात पोचले. स्टुडिओचा पसारा आहे तिथून काही मिनिटांच्या अंतरावर आय. पी. एच. (इन्स्टिट्यूट  फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) हे उपक्रम केंद्र आहे. तीन मजल्यांच्या ह्या जागेत रोज शेकडो कुटुंबे मनआरोग्याचा सल्ला घेण्यासाठी येतात. एका मजल्यावर आमचा प्रशिक्षणाचा हॉल आहे, तिथे हा ‘समारंभ’ व्हायचा होता.

पहिल्या दोन भागांमध्येच जेव्हा हे ‘खास’ प्रेक्षक हसून दाद द्यायला लागले तेव्हा वधुपक्षीयांचा जीव भांड्यात पडू लागला. ‘मुलगी पसंत आहे’, हे कळले. काही गोष्टी अधिक चांगल्या कशा करता येतील, ह्यावर चर्चा झाली आणि ‘सह्याद्री फार्म्स’च्या चमूने आम्हाला आर्थिक बळासोबत मोलाचे भावनिक बळही दिले.

स्टुडिओमधल्या एकाच पार्श्वभूमीवर भाग चित्रित होत होते. त्यामध्ये नावीन्य आणण्यासाठी मी आणि राजकुमार ‘भूमिकानाट्य’ म्हणजे ‘रोल प्ले’ वठवत होतो. एक आयडिया डोक्यात आली, की  निसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकेशन’ शूटिंग का करू नये? आमचीच एक मनोविकारतज्ञ सहकारी डॉ. अनघा वझे आणि तिचे पती गिरीश वझे ह्यांचा एक प्रशस्त शेतीप्रकल्प ठाणे जिल्ह्यात वाडा-मनोर परिसरात आहे. ती जागा पाहण्यासाठी सचिन आणि शैलेश जाऊन आले. नदीकाठावरचे फार्म हाऊस ….शांत आसमंत, भरगच्चं झाडी…. आम्हाला सहा-सात ‘जागा’ सापडल्या. त्यातली एक जागा इनडोअर होती; पण काचेच्या मोठ्या खिडक्या असल्याने त्याला वेगळा ‘फील’ होता. आमचे सारे युनिट तीन दिवसांसाठी ह्या लोकेशनवर पोहोचले.  ‘आवाहन’ टीमची धावपळ आणि नियोजन अनेक पटींनी वाढले. नैसर्गिक प्रकाशात शूटिंग करणे, हे वेगळे तंत्र. मात्र उत्साह आणि योजकता ह्या बळावर आम्ही एकूण बारा भाग या निसर्गरम्य वातावरणात चित्रित केले.

आता एपिसोडस तयार होत होते. एका बाजूने एडिटिंग सुरु झाले होते. आम्ही बेचाळिसावा म्हणजे शेवटचा भाग पूर्ण केला आणि एका विलक्षण समाधानामध्ये सारेच एकमेकांसोबत स्तब्ध, निवांत शांततेमध्ये बसलो. केलेल्या संकल्पामधला एक टप्पा पार पडला होता. आता ही प्रस्तुती घेऊन पुढे जायचे होते, ह्या कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी. ‘सह्याद्री’ मधले प्रमोद राजेभोसले आणि सहकारी ह्यांच्यासोबत बैठका होऊ लागल्या. दिनांक १ मे २०२२ रोजी, ‘सह्याद्री फार्म्स’च्या परिसरामध्ये निवडक शेतकरी कार्यकर्त्यांसाठी होणार होता ह्या चित्रपटमालिकेचा ‘प्रीमियर’, अर्थात मुहूर्ताचा शो!

(क्रमशः)

Dr. Anand Nadakarni

कर्ता शेतकरी – प्रस्तुती ते प्रसार – ३

‘सह्याद्री फार्मस्’ ही कंपनी आहे, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली सहकारी संस्था. ह्या संस्थेच्या नेतृत्वाने उद्यमशीलतेचा एक नवा मापदंड महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तयार केला. परंतु ही उद्योजकता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग तयार करणे हा विषय महत्त्वाचा. दिनांक १ मे २०२२ रोजी ‘कर्ता शेतकरी’ ह्या मालिकेचा शुभारंभ शेतकरी कार्यकर्त्यांसमोर झाला. सह्याद्री फार्मसचे मोबाईल ॲप आहे ‘फार्म सेतू.’ त्या ॲपवर एकेक भाग अपलोड होऊ लागला. चार भाग झाले की एक प्रतिसादपत्र भरणे आवश्यक असायचे. त्याशिवाय पुढचा भाग ‘उघडायचा’ नाही. ह्या शिकण्यामध्ये नियमितपणा राखायचा तर शेतकरी गटांसाठीचे प्रेरक तयार करायला हवेत. त्यांना नाव दिले गेले ‘शेतकरी मित्र.’ नोव्हेंबर महिन्यापर्यंत ह्या गटाने ४२ भागांचा हा कार्यक्रम तर पाहिलाच पण प्रत्येक दहा भागानंतर त्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आखण्यात आले. ही जबाबदारी पेलली आमच्या संस्थेच्या शिल्पा (जोशी) आणि डॉ. सुवर्णा (बोबडे) ह्या मानसशास्त्रज्ञांनी. प्रौढ जीवनामध्ये आपल्या सगळ्यांची ‘अभ्यास करण्याची’ सवय हळूहळू बाजूला पडत जाते. अशा वेळी शेतकऱ्यांच्या छोट्या गटांसाठी ह्या भागांचे नियमित प्रसारण करता येईल. पण त्यासाठी ‘शेतकरी मित्र’ अर्थात् प्रेरक-प्रशिक्षक मोठ्या संख्येने तयार व्हायला हवेत. तर असे प्रशिक्षण देणारे संपूर्ण ‘मॅन्युअल’ म्हणजे ‘प्रशिक्षण-मार्गदर्शक ग्रंथ’ तयार करता येईल का?, अशी कल्पना आली. आनंदाची गोष्ट म्हणजे, शेतकरी मित्रांचे ‘थेट प्रशिक्षण’ घेतल्यामुळे, सुवर्णा आणि शिल्पाने हा संपूर्ण ग्रंथ आता तयार केला आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकरी समूहातील कार्यकर्त्यांसाठी आता ‘कर्ता शेतकरी’ मनआरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे सर्व भाग अधिक प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे मार्गदर्शक पुस्तक ह्या दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत.

‘फार्म-सेतू’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याला काही मर्यादा दिसत होत्या. प्रेक्षकांचे असे मत होते की हा कार्यक्रम प्रत्येक कुटुंबाने पाहायला हवा. त्यासाठी काय बरं करता येईल? ‘एबीपी माझा’ ह्या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर ह्यांच्याबरोबर फोनवर संभाषण झाले आणि त्यांनी, ह्या वृत्तवाहिनीच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवरून सर्व भागांचे क्रमाप्रमाणे प्रसारण करण्याचे मान्य केले. त्यानंतर तांत्रिक बाबींसाठी, कायदेशीर बाबींसाठी खूप उहापोह आणि काथ्याकूट झाला पण त्यातून सहमतीचा आलेख तयार झाला. जानेवारी २०२३ पासून, ‘एबीपी माझा’ डिजीटल प्लॅटफॉर्मवर आठवड्याचे एपिसोड येऊ लागले. तेच  भाग आवाहन आय्.पी.एच्. आणि सह्याद्री फार्मसच्या, यू-ट्यूब चॅनेलवर सुद्धा दिसू लागले.

सध्याला ह्यातील काही भाग अनेक प्रगतीशील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपस् वर फिरू लागले आहेत. मी कामानिमित्त महाराष्ट्रात फिरतो तेव्हा एखाद्या छोट्या गावात जरी थांबलो तरी अचानक एखादा, त्याचा मोबाईल माझ्यासमोर धरत विचारतो, “तुम्हीच ना ह्यातले डॉक्टर गुर्जी?”

राजकुमारने ह्या कार्यक्रमात माझे हे नवीन संबोधन तयार केले आहे. ‘गुर्जी’ हा अगदी मराठमोळा शब्द आहे. ‘सर’ ह्या शब्दातही आदर आहेच पण ‘गुर्जी’ शब्द थेट खळ्यातला अन् शिवारा मधला आहे.

पुढच्या काही महिन्यांमध्ये हे सर्व एपीसोड जनार्पण होणार आहेत. पण त्यांचा नियोजनबद्ध प्रसार व्हायचा तर भरपूर प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रातल्या तमाम कृषी विद्यापीठ प्राध्यापकांना आता हा कार्यक्रम शिकवता येईल आणि त्यांच्याद्वारे कृषी क्षेत्राचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला थेट विद्यार्थीदशेपासूनच मनआरोग्याची दिशा सापडेल. अशा विस्तृत प्रसारासाठीच्या रस्त्यांचा शोध घेताना अर्थातच् पुढचे नाव आले ‘ॲग्रो वन’ ह्या साप्ताहिकाचे. सध्या ह्या प्रकल्पामध्ये दोन साधने आहेत. बेचाळीस दृकश्राव्य भाग आणि त्यांचे प्रशिक्षण कसे द्यावे हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका . . . मी गंमतीने म्हणतो की ‘बाल-भारती’ आणि ‘किशोर-भारती’ ही साधने आहेत. आता हवे आहे ‘कुमार-भारती’चे पुस्तक . . . आणि त्यासाठी हवा आहे ‘ॲग्रोवन’ सारखा सशक्त मंच.

सुदैवाने ‘ॲग्रोवन’च्या संपादकीय विभागाने ही कल्पना उचलून धरली. मे महिन्यापासून क्रमशः ‘कर्ता शेतकरी’ हा अभ्यासक्रम आता शब्दरूपात तुमच्यासमोर येणार आहे. विज्ञानाचे पुस्तक वाचा आणि यू-ट्यूब वर जाऊन …. ….. ॲकेडमी’ सारखे व्हिडिओ पाहा. किंवा व्हिडिओ पाहिल्यावर पुस्तक वाचा . . . नेमका हाच हेतू असणार आहे ह्या लेखमालेचा. साधारणपणे एका एपिसोडचा आशय एका लेखामध्ये पकडण्याचा प्रयत्न असेल आमचा. वाचकांनी स्क्रीनवरचा भाग पाहून नंतर लेख वाचावा किंवा उलटे करावे. मानसशास्त्रामधल्या माहितीचे एक वैशिष्ट्य असे आहे की वाचताना, ऐकताना सगळे छान, साधे, सरळ वाटते पण नंतर लक्षात ठेवण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात.

आणि कृषि क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या कुणालाही विचारा. सगळे प्रश्न येऊन भिडतात ते मनालाच. आपल्या विचार आणि भावनांची मॅनेजमेंट म्हणजेच नियोजन योग्य पद्धतीने करता येणे ही सगळ्याच शेतकरी बांधवांची गरज आहे. आपल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये आपण आधार घेतला आहे, विवेकनिष्ठ मानसशास्त्र अर्थात् Rational Emotive Behaviour Therapy (REBT) ह्या प्रणालीचा. अमेरिकेमध्ये डॉ. अल्बर्ट एलीस ह्या मानसशास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ह्या पद्धतीचा एक भक्कम धागा पोहोचतो मराठी मातीमधल्या संतपरंपरेशी आणि भागवत धर्माबरोबर. म्हणजेच, ही पद्धती जरी पाश्चिमात्य असली तरी ती भारतीय परंपरेच्या अनुकूल दिशेने जाणारी आहे.

म्हणूनच हा आशय प्रत्येक कुटुंबापर्यंत तर पोहोचायला हवाच पण तो विविध भारतीय भाषांमध्येही रूपांतरीत व्हायला हवा. आम्ही मराठी आशयाचे डबींग (भाषा-परिवर्तन) आणि सबटायटलींग  (संहितामुद्रण) करण्यासाठीचा एक प्रकल्प तयार केला आहे. त्यासाठी योग्य आर्थिक मदत मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. ह्या साऱ्या प्रकल्पाची दिशा, सर्व प्रगतीशील आणि विचाराने तरुण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासाची आहे. आपल्या भाषेतला, आपल्या संस्कृतितला पण आधुनिक मानसशास्त्रावर आधारीत असा हा एक प्रकारचा ‘जीवन शिक्षण उपक्रम’ आहे.

पुढच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील किमान तीन लाख शेतकऱ्यांनी ह्या अभ्यासक्रमाचा अतिशय नेटका अभ्यास करावा आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये तीस लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवावा अशी इच्छा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे.

मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला, त्या टप्प्याला माझ्यासाठी आज चार दशकांकडून अधिक काळ लोटला आहे. मनाचे आरोग्य म्हणजे निव्वळ मानसिक आजारांवरचे उपचार नव्हेत तर मनामनांमध्ये विवेकाचे दिवे प्रज्वलित करून अज्ञानाचा अंधार दूर करण्याची निरंतर प्रक्रिया आहे असे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलेच आहे. ह्याच हेतूने कटीबद्ध अशी आमच्या संस्थेची वाटचाल सुरू आहे. माऊलींची कृपाच म्हणायची की आमच्यासारख्या शहरी भागात काम करणाऱ्या व्यावसायिकांना महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या घरात पोहोचण्याचे भाग्य मिळाले आहे. त्याचे श्रेय निश्चितच ‘सह्याद्री फार्मस्’चे. ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने, आमच्यासारखी मंडळी जी आजवर फक्त सर्व तऱ्हेच्या शेतमालाची ग्राहकच होती त्यांना ह्या बळीराजासाठी काहीतरी ज्ञान-माहिती देण्याची संधी मिळते आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी जनतेच्या प्रबोधनाची यात्रा काही नवीन नाही. संतांपासून ते कृषि क्षेत्रातील संशोधक, संघटक आणि संस्थांमार्फत ही मालिका अविरतपणे सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्रामगीता ह्या ग्रंथाच्या विसाव्या प्रकरणामध्ये सांगतात,

समाज झाला रुढीबद्ध । तेथे सांगावे सिद्धांत शुद्ध ।

समाजकार्याहि  करावे  विशद । वेळ पडेल त्यापरी ।।

 आपला कर्ता शेतकरी प्रकल्प ह्या ‘शुद्ध सिद्धांत मालिके’तील ताजा मणी आहे.

पुढे तुकडोजी महाराज जणू ‘काऊन्सेलिंग’ ह्या शब्दाची व्याख्याच आपल्यासमोर मांडतात.

प्रसंग पाहोनि उपदेशावे । सत्य तत्व तें न सोडावें ।

सत्याचि गोड करोनि सांगावे । वेळ काळादि पाहोनि ।।

एकविसाव्या शतकाच्या ह्या पूर्वार्धामध्ये प्रबोधनाचा म्हणजेच ‘उपदेशाचा’ हा प्रयोग तुमच्या आमच्यासाठी, सत्य गोड करून सांगण्याचा ठरावा हीच शुभेच्छा!

– डॉ. आनंदनाडकर्णी

kartashetkari@gmail.com