एका फुलपाखराची गोष्ट

माझ्यासमोर आत्ता माहितीच्या महाजालामध्ये अर्थात इंटरनेटवर नुकतीच उमललेली एक साईट आहे . . . नव्याने उमलणे, मिटणे हे सारे ह्या महाजालामध्ये नित्यनेमाने होतच असते . . . पण ह्या साईटचे आपल्या साऱ्यांपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे . . .

www.thebeautifulmind.co.in ह्या संकेतस्थळाच्या होमपेजवर म्हणजे गृहपृष्ठावर एक छानसे चित्र आहे. एका सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा प्रवास ह्या चित्रात दाखवलेला आहे. साईटच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येईल की विषय आहे मानसिक आरोग्य . . . आणि ही साईट आहे डॉ. सुखदा चिमोटे ह्या तरुण मनोविकासतज्ज्ञाची.

सात वर्षांपूर्वीची गोष्ट . . . माझ्यासमोर बसली होती एक लाजरी-बुजरी मुलगी. नागपूरच्या वैदयकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यानंतर तिने बालरोग चिकित्साशास्त्र म्हणजे Paediatrics मध्ये D.C.H. ही पदविका मिळवली. तेव्हाही तिचे स्वप्न होते मनोविकारतज्ञ् बनण्याचे. वैयक्तिक आयुष्यातल्या काही हेलकाव्यांमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. . .  त्या हेलकाव्यांचे वादळ बनले होते. त्या वादळातून स्वतःची वाट स्वतःच शोधायची अशा इराद्याने ही मुलगी मला भेटायला आली होती.

तिला हवं होतं मार्गदर्शन. . .  सायकियाट्रिस्ट बनण्यासाठीचे. मी तिला माझ्या पद्धतीने सांगितले की, “बसत जा माझ्याशेजारी ओपीडीमध्ये . . . पेशंटस पहायला . . . कळेल तरी तुला मनोविकार कसे असतात ते . . .” त्याप्रमाणे ती यायला लागली. माझ्या लक्षात आले की ह्या मुलीला भावनिक तणाव आहे. दोन पेशंटच्या दरम्यान आम्ही गप्पा मारायला लागलो. ती त्या वेळेस ज्या वैयक्तिक अडचणींचा सामना करत होती त्यातून मीही एकेकाळी गेलो होतो. . .  मुख्य म्हणजे ‘शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट’ ह्या माझ्या पुस्तकाचे लिखाण तेव्हा सुरु होते. त्यातल्या दोन प्रकरणांचा मसुदा मी तिला वाचायला दिला . . . आमच्यामधल्या आस्थेची वीण बांधणारा क्षण होता तो . . .

दुसऱ्या दिवशीपासून आमचा संवाद अधिक खुला झाला. मी कामानिमित्त जिथे जायचो तिथे मी तिला घेऊन जायचो. सायकियाट्रिमध्ये आता पदविका मिळवायची तर प्रवेश-परीक्षा द्यायची. त्याची तयारी तिने सुरु केली. त्यात यश मिळाले. तिला ऍडमीशन मिळाली. कळव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तिची रेसीडेन्सी सुरु झाली . . . ती क्वार्टर्समध्ये रहायची. आपोआपच तिची ‘local guardianship’ माझ्याकडे आली. आता ती आमच्या घरी यायला लागली. हळूहळू घरची झाली. घरातल्या कबीरची दीदी बनली. सविताला ‘दी’ म्हणू लागली. आमच्या आजीला तिने नाव ठेवले ‘रूपा’ म्हणजे ‘रुम पार्टनर’ कारण सुखदा रहायला आली की त्या दोघी एका खोलीत झोपायच्या.

सुरवातीच्या काळात सुखदाला शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही अडचण आली. गळ्यामध्ये एक गाठ आली. थायरॉईड ग्रंथींच्या चाचण्या झाल्या. मायक्रोस्कोपखाली त्या ग्रंथी दिसल्या. दिसायला नकोत अशा पेशी. हा आजार वाढायच्या आधीच शस्रक्रिया करायला हवी. ऑपरेशन पार पडले. हॉस्पीटलमधून तिला आम्ही आमच्याच घरी आणले. त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा काही संशयास्पद गाठी. पुन्हा ऑपरेशन. पण या वेळी मात्र रिपोर्ट क्लीयर. तिच्या नाजुक शरीरयष्टीमध्ये असलेला निर्धार आम्हाला हळूहळू कळायला लागला होता. दोन वर्षे सरली. D.P.M. अर्थात Diploma in Psychological Medicine ची परीक्षा आली. रेसीडेन्सी संपल्यामुळे आता कुठे राहायचे हा प्रश्न होता. आम्ही म्हणालो, ‘आता इथेच ये राहायला’. . .  परीक्षा झाली. निकाल आला. सुखदाला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. मधल्या काळामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यातले मळभही दूर झाले . . . आणि आमचे नाते आता बाबा आणि लाडक्या मुलीचे बनले.

साडेचार वर्षांपूर्वी आमच्या नात्याने वेगळे वळण घेतले. आय.पी.एच. संस्थेमध्ये सुखदा माझी सहकारी बनली . . . हळूहळू तिच्या पेशंट्स मध्ये लोकप्रिय व्हायला लागली. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्यासाठी मी प्रशिक्षण कार्यक्रम घेतो तिथे ती माझ्याबरोबर यायला लागली. हळूहळू बोलायला लागली. स्वतः वाचन-अभ्यास करायला लागली. आणि आज भारत पेट्रोलियम, कॅस्ट्रॉलसारख्या कंपन्यांमध्ये आपली आपण संपूर्ण दिवसाचे प्रशिक्षणक्रम घ्यायला लागली.

हळूहळू तिच्या (आणि माझ्याही) लक्षात आले की Rational Emotive Behavior Therapy (REBT) म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचारपद्धतीमध्ये तिला रस आहे. उत्तम हस्ताक्षर, सौंदर्यदृष्टी आणि व्यवस्थितपणा ह्या गुणांची जोड तिच्यातल्या संवादकलेला मिळाली आणि आय.पी.एच. संस्थेमध्ये ती दोन दिवसांची कार्यशाळा घेऊ लागली. ABCD of REBT! . . . गेल्या अडीच वर्षांमध्ये डझनांहून अधिक कार्यशाळा झाल्या आणि . . . चक्क ३५० लोकांनी त्यात भाग घेतला . . . मी अनेकांना Feedback साठी चाचपतो . . . प्रत्येकजण तिची अक्षरश: तोंड भरून स्तुती करतो . . . लेखी Feedback तर अनेक!

अहो, सुरुवातीला वाटलं ही धिटुकली मुलगी काय शिकवणार. . . पण दोन दिवस गुंगवले तिने . . . अशा प्रतिक्रिया यायला लागल्या. आय.पी.एच. सोबतच आता सुखदा जळगाव, कोल्हापूर, नगर, सांगली, पेण, कुडाळ, अशा ठिकाणी कार्यशाळा घ्यायला लागली. दरम्यान तिने ‘पालकत्व’ ह्या विषयावरची अनेक पुस्तके वाचली आणि ‘मस्त मजेचे आईबाबा’ ही कार्यशाळा तयार केली. स्त्रियांसाठी ‘क्षितिज अंतरीचे’ तर मुलींसाठी ‘अस्मि’ हे कार्यक्रम सुखदाने डिझाईन केले. अहमदनगरच्या ‘स्नेहालय’ संस्थेच्या कार्यकर्त्यांचे नियमित प्रशिक्षण ती घेऊ लागली. आता रेणू आणि राजा दांडेकरांच्या दापोलीच्या शाळेसाठी ती काम सुरु करत आहे.

विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विषयाला धरून ‘फिल्म-क्लिप्स’ वापरण्याची कला आता तिने अशी साध्य केली आहे की बस्स! त्यासाठी तिने अनंत क्लिप्सचा, स्वतःचा साठाही तयार केला आहे. एखाद्या विषयाच्या मागे लागून त्यात प्राविण्य मिळवण्याचा तिचा ध्यास मला खूप आवडतो. ह्या ध्यासामुळेच तिने न्यूयॉर्कच्या, ‘अल्बर्ट एलीस इन्स्टिटयूट’ च्या तज्ञांतर्फे घेण्यात येणाऱ्या खास कार्यशाळांमध्ये नाव नोंदवायचे ठरवले. सुखदा आमच्या संस्थेव्यतिरिक्त कुठेच प्रॅक्टिस करत नाही. ह्या कोर्सेसची फी तशी भक्कम. तिने स्वतःच्या बचतीतून आणि मित्र-सुहृदांच्या मदतीतून ती रक्कम उभी केली . . . आता ती REBT च्या मूळ संस्थेने अधिकृत मान्यता दिलेली Therapist झाली आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे ह्या संस्थेचे भारतातील एक ‘सॅटेलाईट सेंटर’ ऑफीस म्हणून कार्य करण्याची मान्यता तिने मिळवली आहे.

माझ्याबरोबर किंवा स्वतंत्रपणे अशा अनेक कार्यक्रमांनी तिची डायरी आता गजबजू लागलेली आहे. रुग्णसेवेमधे ती जराही कुचराई करत नाही. पेशंट्सना वेळ देऊन योग्य पद्धतीने तपासते. आता मी तिच्याकडे REBT च्या उपचारासाठी काही खास रुग्ण पाठवतो. त्या सर्वांचे तिच्याबद्दलचे मत किती उत्तम आहे हे ते मोकळेपणाने मला सांगतात.

ती आता इतक्या पातळ्यांवर काम करते आहे परंतु ते फार कुणाला ठाऊकच नाही. कारण स्वतःच्या कामाबद्दल पिपाणी वाजवण्याची तिला सवयच नाही. पण तिच्या कामाची Dimensions कळायला तर हवीत . . . त्याशिवाय ते पुढे कसे जाणार . . . म्हणून ह्या साईटची कल्पना!

गेले काही महिने, जसा वेळ मिळेल तसा मी तिला गीताई शिकवतो आहे . . . इतक्या वर्षांमध्ये, माझ्याकडे असलेला मनोविकारशास्त्रातला अनुभव, REBT चे वाचन, चिंतन, फिल्म माध्यमाची जाण आणि तत्वज्ञान शिकण्याची इच्छा असे सारे एकत्र असलेला विद्यार्थी मला मिळाला नव्हता. तो तिच्या निमित्ताने मिळाला. एकदा बोलताना ती मला म्हणाली, “बाबा . . . तू जसा तुझ्या लिखाणातून, बोलण्यातून हे विवेकनिष्ठ मानसशास्त्र समाजापर्यंत पोहोचवलेस ते तुझे काम मी पुढे नेणार . . .”

हे ध्येय सुखदाने माझ्यासमोर मांडले तोपर्यंत तिने त्या दिशेने खरे तर पावलेही टाकायला सुरुवात केली होती. . . कारण आज तिच्या व्यवसायाच्या प्रत्येक अंगामध्ये ती REBT वापरते आहे. समाजापर्यंत पोहोचायचा एकही मार्ग तिने सोडलेला नाही . . . आमच्या आय.पी.एच. संस्थेमध्ये डॉ.शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी आणि मी ह्यांच्यामुळे ही उपचारपद्धती सर्व टीममेंबर्स पर्यंत पोहोचली . . . त्यामध्ये सातत्याने अभ्यास करून, प्रयोग करून आणि कार्यशाळांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन भर घालण्याचे काम आता सुखदाने हाती घेतले आहे.

विवेकनिष्ठ विचारांचा हा प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम म्हणजे सुखदाचे हे संकेतस्थळ . . . हे प्रतीक आहे तिच्या स्वतःच्याच प्रवासाचे . . .  कोशातून बाहेर पडून, सुरवंटाचे फुलपाखरू बनून भरारी घेण्याचे . . .

. . . माझ्यासमोरचा कॉम्पुटर स्क्रीन काहीसा धूसर झाला आहे अचानक . . . आणि माझा हाताचा तळवा उभारला गेला आहे शुभाशीर्वादासाठी . . .  thebeautifulmind . . . एका फुलपाखराची गोष्ट . . . मी पाहिलेली . . . . अगदी जवळून अनुभवलेली!

. . . सुखदा . . . शुभास्ते पंथानः सन्तु!

तुझा

बाबा

Advertisements

परभणीचा अदभूत वेध

अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही असे एक सावधगिरीचे वाक्य  आपण मनात घोकतो. पण अपेक्षा ठेवल्या नाहीत तर पूर्तीचे समाधानही दसपट वाढते  हे काही लक्षात घेत नाही . . . असाच एक सुखद अनुभव आला यंदाच्या परभणीच्या ‘वेध‘ व्यवसाय प्रबोधन परिषदेच्या दुसऱ्या आवर्तनामध्ये. परभणीचे नायक सर हे तिथल्या एका शाळेचे मुख्याधापक . . . गतीमंद, मतीमंद मुलांसाठीच्या खास शाळेत ते काम करतात. पाच-सहा वर्षांपूर्वी ते ‘वेध‘ चळवळीच्या संपर्कात आले आणि ते स्वतः, त्यांच्या पत्नी रेखावाहिनी, मुलगी विशाखा आणि मुलगा विजय असे  नेमाने सर्व शहरातल्या वेधला येऊ लागले. त्यांनी परभणीमध्ये समविचारी मंडळींचा गट तयार केला. त्या सर्वांचे प्रशिक्षण आय.पी.एच. संस्थेमध्ये झाले. आणि गतवर्षी पहिल्यांदा ‘वेध’चे आयोजन परभणी शहरामध्ये झाले. . . . त्यानंतर आयोजनातील चुका, कमतरता ह्यांचा एक लेखाजोखा झाला आणि परभणी वेध टीमने मला आश्वासन दिले की पुढल्या वर्षी ह्या साऱ्या त्रुटी टाळल्या जातील.

त्याप्रमाणे यंदाच्या ‘देणं समाजाचं’ ह्या सूत्रासंदर्भातली आखणी सुरु झाली. गेल्या आठवड्यात ‘वेध‘च्या निमित्त्ताने नायक सरांच्या घरी तर त्यांनी तयार केलेले व्यासपीठाचे ३-D मॉडेल पहिले. प्रत्येक फ्लॅट कसा लावायचा, त्यावर फ्लेक्स कसे लावायचे, व्यासपीठावरचे फर्निचर ह्या साऱ्याचे सुरेख मॉडेल . . . गंमत म्हणजे व्यासपीठही अगदी तसेच सजले. सरांचा मुलगा विजय, ‘वेध’च्या सचिन गांवकर सोबत नेमाने ठाणे-पुणे वेधला तांत्रिक बाबी शिकण्यासाठी असतो. त्याचा परिणाम म्हणून LED चे स्क्रीन, उत्तम प्रकाशयोजना, तीन कॅमेरे आणि उत्तम ध्वनीव्यवस्था झालेली होती. . . खुद्द सचिन गांवकर सुद्धा परभणीला सोबत होताच . . .

गतवर्षीप्रमाणेच साडेसातशे-आठशेचे प्रेक्षागृह खचाखच भरले. पालक आणि विद्यार्थी तर होतेच . . .  शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण आठ तासांमध्ये प्रत्येक जण स्वतःच्या आधी ठरवून दिलेल्या आसनावरच बसला. आठ तासांमध्ये एकदाही प्रेक्षागृहातून मोबाईल वाजला नाही. सत्र सुरु असताना एकाही व्यक्तीने जागा सोडली नाही. . .  ही रोमहर्षक शिस्त तर होतीच पण सारा समुदाय प्रत्येक सत्राच्या बारीक-सारीक ‘जागां’ना दाद देत होता. . .  रेणूताई गावस्कर, अनुराधाताई प्रभुदेसाई (लक्ष्य फाऊंडेशन) ह्यांच्या सत्रामध्ये तर मी असा अनुभव घेतला की वक्त्यांच्या डोळ्यात पाणी आणि स्टेजवरच्या प्रकाशाच्या प्रेक्षागृहात फाकलेल्या उजेडात मला शेकडो डोळ्यांच्या ओलसर कडा दिसत होत्या. . .

गेवराईच्या संतोष गर्जेने त्याचे अनाथ मुलांसाठीची ‘बालग्राम’ कसे उभारले त्याची कथा सांगितली. त्याचे सत्र संपले तेव्हा सायंकाळचे सहा वाजून गेले होते. पण प्रेक्षागृहात चूळबूळ नव्हती. कार्यक्रम संपल्यावर लोक अगदी Reluctantly बाहेर पडले.

संतोषच्या आधीचे सत्र होते अनुराधाताईंचे . . . बॅंकेतली एक अधिकारी टूरीस्ट म्हणून कारगीरला जाते आणि तिला ध्येय मिळते जवान आणि जनता ह्या दोघांमधला दुवा बनण्याचे . . . हा सारा प्रवास इतक्या मोकळेपणी मांडला त्यांनी. . .  असेच मनस्पर्शी सत्र झाले रेणुताई गावस्करांचे. २०१५ साली झालेल्या ठाणे वेधमध्ये मी त्यांची मुलाखत घेतली होती. . .  पण ह्या गप्पा त्या सत्रापेक्षा खूपच वेगळ्या ठरल्या . . . त्याआधी होता सायकल वरून १४००० किमीची भारतयात्रा करणारा ‘वेध’चा कार्यकर्ता सचिन गांवकर. खरे तर त्याच्या सत्राने पूर्ण दिवसाला एक भावनिक बेस दिला. स्वतःच्या पलीकडे पाहिल्याशिवाय ‘खरे साफल्य’ मिळत नाही असे सांगणारा.

पूर्ण दिवसाला वैचारीक पाय देण्याचे काम केले प्रारंभीच्या सत्रातल्या राहुल रेखावार ह्या तरुण IAS अधिकाऱ्याने. परभणीच्या नगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम पहाणारा राहुल मराठवाड्याच्या मातीतला. स्वतःच्या विचार-भावना-वर्तनाचा प्रवास त्याने प्रांजळपणे, साध्या शब्दांमध्ये इतका प्रभावीपणे मांडला कि बस्.! . . . त्यामुळे दिवस उत्तरोत्तर चढत, रंगत गेला.

परभणीच्या बाल विद्या मंदीर प्रशालेचा संगीतगट विलक्षण सूरीला होता. ‘वेध’ची गाणी त्यांनी अतिशय दमदारपणे उभी केली होती. काही ठिकाणी आलापी, सरगमची अतिशय मनोद्न्य  भर घातली होती. ‘वेध’ची गाणी मी लिहितो आणि त्यांना चाल देतो ही गोष्ट मी सहसा जाहीर करत नाही . . . पण ह्यावेळी अनुराधाताईंनीच त्यांच्या सत्राआधीच्या ‘नीलगगन’ हरीत धरा’ ह्या देश्प्रेमावर आधारीत गाण्यानंतर ही गोष्ट प्रेक्षकांना सांगून टाकली. . . वेधला येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात गाण्यांची पुस्तिका असते. त्यातही माझे नाव छापलेले नसते. . . . असे होताहोता माझ्याकडून चक्क ३४ गाणी लिहिली गेली आणि त्यांना चालही दिली गेली . . . तर ह्या संगीतसंचामुळे वेधच्या एकूण कार्यक्रमाच्या रंगतीमध्ये खूपच भर पडली.

संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी थकवा होता. ह्या वर्षी त्यांना निधी जमवण्यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त प्रयास करावे लागले. पण तरीही त्या आघाडीवरही ते यशस्वी ठरले.

अशाप्रकारे ‘वेध‘च्या सर्वच केंद्रांच्या दृष्टीने, परभणीच्या कार्यकर्त्यांनी एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. समाजाचा व्यापक सहभाग हे वेध उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे . . . गतवर्षी कल्याण वेधमध्ये स्थानिक निवडणुकांमुळे स्पॉन्सरशिपस आणि देणग्या मिळत नव्हत्या तर ‘चिंतन क्लासेस’च्या माजी विद्यार्थ्यांनी (जे वेध अनुभवत मोठे झाले) एकत्र येऊन स्वकमाईतून चक्क पावणेदोन लाख रुपये उभे केले होते. . . ‘वेध‘चा उपक्रम त्या त्या शहराचा होणे खूप गरजेचे आहे . . . तो जर आयोजन करणारे गट, संस्था, व्यक्ती, ह्यांच्यापुरता मर्यादित राहिला तर त्यांच्या उत्साहानुसार उपक्रमाचे सातत्य वरखाली होते.

परभणी वेधच्या कार्यकर्त्यांना भक्कम आधार असतो पुणे वेधच्या पळशीकर सरांचा आणि लातूर वेधच्या धनंजय कुलकर्णीचा. हे दोघेही यंदाच्या परभणी वेधला उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून दुसऱ्या दिवशी ठाण्याला घरी आल्याआल्या मी पळशीकर सरांना फोन केला. त्यांना सारे सविस्तर रिपोर्टींग केले. तर ते म्हणाले, “थोडक्यात अदभूतच घडला यंदाचा परभणी वेध! . . .”

येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस एकूण दहा शहरांमध्ये वेधचे वार्षिक आवर्तन पूर्ण होईल तेव्हा माझ्याकडून एकूण सत्तर वेधचे सारथ्य घडलेले असेल . . . सत्तर वेध . . . सुमारे ५५० संवादसत्रे  . . . २५ वर्षे  . . . सलग आणि सतत . . .  हेही अदभूतच की!

रिवाइंड…..

तुझे जगणे रिवाइंड करून पुन्हा एकवार प्ले करायला मिळाले तर कुठला काळ तुला परत जगायला आवडेल? माझ्या पत्नीने मला एकदा विचारले. काही प्रश्नांची उत्तरे इतकी लख्ख दिसतात की बस्स! … “मी मेडीकलला गेलो तिथपासून मी मेडीकल कॉलेज सोडले ती दहा वर्षे… १९७६ ते १९८६” मी म्हणालो.

ठाण्याच्या कॉलेजातून जी. एस. मेडिकल सारख्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक महाविद्यालयात येणे हा माझ्यासाठी जबरदस्त ‘कल्चर शॉक’ होता. घर सोडून हॉस्टेलमध्ये राहणे हा अजून एक बदल. माझ्या पोलियोग्रस्त पायांमुळे मला जीएस मेडिकलच्या परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. नाहीतर पहिल्या वर्षाचे हॉस्टेल लांब नायगावला होते. माझा रूमपार्टनर पाच वर्षे सिनीयर असा इंटर्न होता. मूळचा आफ्रिकेतला गुजराथी. सुदैवाने हॉस्टेलची मेस, कॉलेजचे कॅन्टीन इथे खायची सोय छान होती. पहिले दीड वर्ष स्वतःला सांभाळण्यात गेले. पण सेकंड एमबीबीएस पासून सगळेच बदलले.

कॉलेज-हॉस्पिटल परिसरातल्या छोट्यातछोट्या कर्मचाऱ्यापासून डीनपर्यंत ओळखी झाल्या. मराठी वाङमय मंडळाचे काम सुरु झाले. नाटकाच्या प्रदेशातल्या शिक्षणाची सुरवात विजय बोन्द्रे सरांकडे झाली. जोरदार ग्रुप तयार झाला. डॉ. रवी बापटसर आणि डॉ. शरदिनी डहाणूकर अशा ज्येष्ठांचे प्रेमछत्र मिळाले. आता शनिवार- रविवारी घरी जायचे म्हंटले की जरा जीवावरच यायला लागले.

पाठी वळून पाहताना जाणवते की शून्यातून जनसंपर्क तयार करणे, उपक्रमशीलतेला आकार देणे आणि एकट्याने राहणे ह्या तीन पायांवर माझी डेव्हलपमेंट सुरु झाली. त्यात भर पडली दोन घटनांची. माझे लेख महाराष्ट्र टाइम्स, मनोहर, साधना अशा वृत्तपत्र-नियतकालिकांमधून चक्क छापून यायला लागलेत. आणि मी लिहिलेल्या पहिल्या-वहिल्या एकांकिकेला आंतरमहाविद्यालयीन नाट्यविश्वात प्रचंड यश मिळाले. स्वतःमधल्या कार्यशक्तीचा प्रत्यय येण्याचा टप्पा होता तो. मी प्रभावी लिहू शकतो आणि मी लिहिलेले लोकांना आवडते आहे हा अनुभव आगळा होता. मी प्रभावी बोलू शकतो हे वक्तृत्वातल्या तोवरच्या यशामुळे ठाऊक होते. परंतु इंग्रजीत भाषणे देऊन आपण जीएस मेडिकलचा जीएस म्हणजे जनरल सेक्रेटरी होऊ इथपर्यंत मजल गेली माझी एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षापर्यंत.खरेतर शेफारून जाण्याची उत्तम रेसीपी होती ती. पण दरम्यानच्या काळात बापटसर आणि डहाणूकर मॅडममुळे जीवनातल्या विविध क्षेत्रातली इतकी उत्तुंग व्यक्तिमत्वे इतकी जवळून बघायला मिळाली की स्वतःची जागा कळून आली. त्यात भर पडली भरतशास्त्र ह्या नाट्यविषयाला वाहिलेल्या मासिकाच्या ग्रुपची. ह्या मासिकाचा सहसंपादक म्हणून मुलाखती घ्यायला, लेख मिळवायला त्या क्षेत्रातल्या दिग्गजांपर्यंत विनासायास जाता आले. डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकरांपासून ते छबिलदासच्या बॅकस्टेज वर्करपर्यंत ओळखी झाल्या. बॅरीस्टर चा प्रयोग झाल्यावर रविंद्र नाट्यमंदिरच्या लॉन वर तरुण, तडफदार, विक्रम गोखल्यांची मुलाखत घेतली आणि अनेक मुलाखतींची मालिकाच सुरु झाली.

दोन वर्षातच आम्ही ‘स्पंदन’ हा दिवाळी अंक काढायला लागलो. त्यामुळे साहित्य क्षेत्रात शिरकाव झाला. जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके, विद्याधर पुंडलिकसर अशा अनेकांना जवळून पाहायला मिळाले. बोलायचे कमी अन पाहायचे, ऐकायचे जास्त हा नियम कसोशीने पाळला. दिनकर गांगलांमुळे ‘ग्रंथाली’ वर्तुळ आपले झाले. ‘दिनांक’ साप्ताहिकामुळे मोठा मित्रगट मिळाला. भरतशास्त्र आणि स्पंदनांच्या अंकांना जाहिरात मिळवण्यासाठी अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस, जाहिराती कंपन्या पायाखाली घालायला लागलो . लेखांमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात मित्र मिळाले.

या साऱ्या ‘नेटवर्किंग’ चा फायदा पुढे आकाराला आलेल्या संस्थारूप कामाला झाला, अजूनही होतोय त्याची मूळे सारी त्याकाळात. बरे ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी मी तसा ‘माझा माझा जात होतो. म्हणजे ‘अमुकचा मुलगा’, ‘तमुकचा पुतण्या’ अशी काही ओळख नाही. आता असे वाटते की ह्या साऱ्या भानगडींमध्ये मी मेडीकलचा अभ्यास केला तरी कसा?… कारण रात्रीच्या भटकंती, भरपूर चित्रपट, नाटके, चर्चा ह्या साऱ्यांबद्दल मी लिहिलेच नाही आहे… आता जाणवते की ‘टाइम मॅनेजमेंट’ म्हणजे काय हे न कळताच मी ते आपोआप शिकत होतो… शिवाय अतिडाव्या गटांपासून ते आरएसएस पर्यंतच्या प्रत्येक राजकीय रंगछटेच्या लोकांबरोबर संपर्क आणि दोस्ती होत गेली. ही केइएमची कृपा. त्याकाळी समाजातील सर्व प्रतिष्ठित केइएम सारख्या सार्वजनिक रुग्णालयांमध्येच उपचाराला यायचे. बापटसरांनी तर त्यांचा सारा जनसंपर्क उदारपणे माझ्याकडे हस्तांतरित केला होता. कवीवर्य सुरेश भट , बापटसरांकडे अॅडमिट होते. त्यांना हवं नको पाहण्याची थोडी जबाबदारी सरांनी माझ्यावर टाकली होती. अगदी अलीकडे म्हणजे सहासात वर्षांपूर्वी बापटसरांनी, भटसाहेबांनी त्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत मला पाठवली. ‘तुमच्यानंतर तुमच्या जनसेवेचा वारसा चालवणारा विद्यार्थी मला आनंद नाडकर्णीमध्ये दिसतो’ हे वाक्य इतक्या वर्षांनंतरही अंगावर तलम पीस फिरवून गेले.

हे सारे करताना अभ्यास सांभाळून माझे भरमसाठ अवांतर वाचनही सुरु होते. एमबीबीएसचे अंतिम वर्षातील एक अपयश पचवून त्याच परीक्षेत भरघोस यशस्वी  ठरल्याने मॅच्युरिटीच्या दोन पायऱ्या आपोआप पार झाल्या. अपयशानंतर आलेले यश म्हणजे काय ‘बोनस’ असतो ते कळल्याने इंटर्नशिपच्या वर्षाचे सोने करण्याचा निश्चय केला. ‘वैद्यकसत्ता’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. ‘मयसभा’ हे नाटक, राज्य- नाट्य स्पर्धेत सादर झाले. ‘लोकप्रभा’ आणि ‘दिनांक’ साप्ताहिकांमध्ये नियमित कॉलम सुरु झाले. किर्लोस्करसारख्या दिवाळी अंकांमध्ये कथा छापून यायला लागल्या.

म्हणजे मेडीकलचे विश्व विसरून नाट्य- साहित्य क्षेत्रामध्ये जायला छानच परिस्थिती होती. पण तोवर ‘सायकिअॅट्री’  नावाच्या विषयाने मनाचा कब्जा घेऊन टाकला होता. आपले व्यक्तिमत्व, आवड, आणि क्षमता ह्यांना वाव देणारा विषय नक्की झाला होता. खरेतर तोवरच अभ्यास हा बऱ्याच अंशी कर्तव्यबुद्धीने केलेला होता. आता मात्र आपला निर्णय, आपली जबाबदारी अशी परिस्थिती होती.

मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना पुढे काय करायचे ह्याचे स्वप्न मी लिहून काढले. मला एक संस्था काढायची होती, त्या संस्थांतरे समाज आणि मानसिक आरोग्य ह्यातील दरी कमी करायची होती. मला असे स्वप्न पडण्याची प्रक्रिया खरेतर त्या आधीच्या सहा वर्षांमधल्या अनुभवाच्या इंद्रधनुष्यात होती. जगण्याच्या प्रत्येक अंगातले वास्तव मी अनुभवत होतो. त्या त्या क्षेत्रातील तळाचे प्रवासी आणि शिखरावरचे योगी असे सारेच पाहत होतो… माझ्या वैद्यकशाखेकडे तरी मी एकपदरी दृष्टीने कसे पाहणार होतो?

माझ्या व्यसनाधीनता विरोधी उपचाराच्या शिक्षणालाही सुरवात होत होती. पुढे ब्राऊनशुगरच्या निमित्ताने मी अनेक एकखांबी उपक्रम करायला सुरवात केली. त्यातून अनिल-सुनंदा (अवचट) ह्यांची दोस्ती गवसली. आणि पुढे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा प्रवास सुरु झाला.एमडीच्या तीन वर्षे अभ्यासाच्या वर्षात साऱ्या अवांतर हालचाली तर जोरात सुरु होत्याच. एकूण तीन पुस्तके प्रसिद्ध झाली होती… मध्येमध्ये येऊन जाणारी प्रेमप्रकरणे आणि अस्फुट आकर्षणेही होतीच. त्यातही भावनिक ऊर्जा लावायला लागायचीच. सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल ह्या पदार्थांशी माफक ओळख होऊन दोस्ती न करण्याचा निर्णयही आपोआपच झाला होता. भांग आणि चरस ह्यांचे प्रयोगही झाले होते. ते पुन्हा न करण्याचा निश्चयही झाला होता.

एम.डी. पास झाल्यावर व्यसनमुक्तीच्या कामाने वेग घेतला. प्रेमात पडण्याची प्रक्रिया यशस्वी झाली. ‘गध्देपंचविशी’ नावाचे सदर किर्लोस्कर मासिकातून लिहितानाच जणू मी ते अनुभवत होतो. अनुभवांची इतकी विविधता कमी म्हणून की काय माझा रूमपार्टनर डॉ. महेश गोसावी एम.डी. परीक्षेत फेल झाल्यानंतर त्याने सुरु केलेल्या एकाकी लढतीमुळे निर्माण होणाऱ्या वादळाचा मी पहिला साक्षीदार ठरलो. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री, एक राज्यपाल, एक कुलगुरू, ह्यांना पायउतार करायला लावणारे हे प्रकरण माझ्यासाठी अनेक धडे शिकवणारे होते. त्याआधी मार्ड ह्या निवासी डॉक्टरांच्या अपयशी संपानेही मला खूप शिकवले  होते. आपल्याला जे योग्य वाटते त्यासाठी संघर्ष करताना यश-अपयश काहीही आले तरी त्याची तमा न बाळगता पुढे जात रहायचे हा सर्वात महत्वाचा धडा… हवाबंद भासणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्याचे एकतरी नैतिक छिद्र असतेच हे मला ह्या दोन प्रकारणांनी शिकवले… व्यवस्थेपुढे हरायचे नाही कारण लढण्याच्या प्रवासात एक विधायक झिंग असते… झिंग हा शब्द नकारात्मक आहे. किक ह्या शब्दासाठी तो वापरला आहे. पण जेव्हा ध्येय विधायक, प्रयत्न सत्यवादी असतात तेव्हा निर्माण होणाऱ्या आनंदाला काय म्हणायचे? … शुद्ध समाधान, सात्विक आनंद? फारच भारी शब्द वाटतात….

ह्या दहा वर्षांनी मला वारंवार हे समाधान, ही मजा इतक्या वेळा दिली की ती एक सवयच बनून गेली माझ्यासाठी. ह्या दहा वर्षातल्या अनुभवाची रत्ने मी पोतडीत घालत गेलो. आणि नंतरच्या आयुष्यात त्यांना जेव्हा पिशवीच्या बाहेर काढले तेव्हा त्यांनी मला प्रकाश दिला… एखादे अनुभवरत्न बाहेर काढायला मी वीस-वीस वर्षेही घेतली.

त्याकाळात प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते ह्यांच्या घरी ‘ज्ञानेश्वरी’ वर दर महिन्याला चर्चासत्रे होत असत. अस्मादिक तिथेही पोहोचले. डॉ. रा.भा, पाटणकर, डॉ. सरोजिनी वैद्य असे अनेक मान्यवर असायचे. अभ्याससत्रानंतर छान जेवण असायचे.ती सारी तात्विक, अध्यात्मिक चर्चा चक्क वीस वर्षे पडून राहिली होती मनाच्या पोतडीत. २००२ साली कॉर्पोरेट क्षेत्रात तणाव-नियोजनाचे सत्र घेताना विचारण्यात येणाऱ्या भग्वद्गीतेवरच्या प्रश्नांमुळे मी ह्या वाटेवर वळलो… विनोबांचे बोट धरून ज्ञानेश्वरांपर्यंत जाऊन पोहोचलो. पण मला रत्न मिळाले कधी तर ह्या दहा वर्षांमध्येच. काही वर्षांपूर्वी माझे ‘मनोगती’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर डॉ. रवीन थत्ते सरांनी मला शाबासकी देणारे एक सविस्तर पत्र लिहिले. खरेतर ऋणाची सुरुवात त्यांच्यापासूनच!…

१९८६ मध्ये मी केईएम रुग्णालयाचे बोट सोडून माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९८७ मध्ये माझे लग्न झाले. १९८८ मध्ये ठाण्यातील व्यसनमुक्ती केंद्र सुरु झाले तर १९९० मध्ये इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ हे माझ्या स्वप्नातील रोपटे. त्यानंतरच्या दोन दशकांच्या प्रवासात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा ह्या पोतडीतल्या शिकवणींनी मला हात दिला. कधी मी नुसताच त्या काळाला आठवायचो आणि ऊर्जा मिळवायचो. त्या काळात जोडलेल्या शेकडो, हजारो व्यक्तींनी ह्या पुढच्या काळात मला मदत केली, माझ्या प्रयत्नांना हातभार लावला.

म्हणजे ज्या काळाने मला जगण्यावर प्रेम करायला शिकवले त्याच काळाने जगण्याला सामोरे जाण्याची शिदोरी दिली….That decade gave me my passion and mission…. and wow ! They got blended thereafter ……

Cut to……….

नोव्हेंबर २००९…. मी लीलावती रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर मध्ये. माझ्या पोलियोच्या पायांवर व्हेरीकोज व्हेन्स, डीव्हीटी अशा आजारांची कलाकुसर झाल्याने, व्हेरीकोज अल्सरची नक्षी उजव्या पायावर अधूनमधून येत असते. त्यावरचे ऑपरेशन करण्यासाठी मी अॅडमीट झालो. अॅनेस्थेशिया विभागाचा तज्ञ माझ्या केईएमच्या दिवसांचा साक्षीदार, साथीदार निघाला. ऑपरेशन करणारा सर्जन त्यादिवसातल्या आणि आजवरच्या मैत्रिणीचा नवरा… त्यामुळे ह्या ‘व्हिनोप्लास्टी’ च्या ऑपरेशनसाठी मी अगदी निवांत पहुडलो होतो. अॅनेस्थेटिस्ट बाईंनी भूल देण्याआधी सारी तपासणी केली आणि म्हणाल्या, “अहो तुमचा पल्स, बीपी, ईसीजी, श्वासोच्छवास सगळे नियमितपणाच्या रेषेच्या जराही आतबाहेर नाही… All parameters so much stable and steady….. तणावनियोजनाचे वर्ग घेण्यास खरेच योग्य तज्ञ आहात तुम्ही…”

ऑपरेशन आधीच्या त्या छानदार भूलझोपेत जाताना मी हसलो. त्यांना काय माहित इथेही माझ्या केईएम काळाचेच सुरक्षाकवच माझ्याभोवती होते म्हणून…मनातही आणि प्रत्यक्षात सुद्धा!

डॉ. आनंद नाडकर्णी