‘दर्शन’ विनोबांचे

मला पक्क आठवतं आहे, १९७८ सालचा फेब्रुवारी  महिन्यातला शनिवार.. पहाटेची वेळ. वर्धा रेल्वे  स्टेशनच्या बाहेर जुन्या मॉडेलची एक टॅक्सी उभी होती. आम्ही चार प्रवासी त्यात बसलो. थंडी चांगलीच कडकडीत होती. टॅक्सी पवनार आश्रमाच्या दिशेने निघाली… आपण विनोबांचे दर्शन घेऊया ही कल्पना माझ्याबरोबर असलेल्या दोन ज्येष्ठ डॉक्टरांची. हे दोघे जळगावचे. डॉ. राम आपटे आणि डॉ. सदाशिव आठवले… माझे जन्मगाव जळगाव. हे दोघेही मला बालपणापासून ओळखणारे…

आम्ही वर्धा स्टेशनवर उतरलो होतो ते वरोऱ्याच्या आनंदवनामध्ये जाण्यासाठी. फेब्रुवारीतल्या शनिवार-रविवारी तिथे मेळावा भरायचा. मी आणि माझा मित्र अरुण घाडीगावकर मुंबईहून निघालो होतो. दोन्ही डॉक्टरकाका जळगावला चढले होते. वर्ध्याहून वरोऱ्याकडे जाणारी एक छोटी ट्रेन सकाळी निघायची. मधल्या दोन-आडीच तासात करायचे काय तर पवनारला भेट.. त्यावेळी इंदिरा गांधींची आणीबाणी उठून जनता सरकार राज्यावर आले होते. त्याकाळात विनोबांवर अनेक दूषणांची खैरात व्हायची. ‘सरकारी संत’ म्हणून त्यांना हिणवलं जायचं. ‘अनुशासन पर्व’ ह्या त्यांनी लिहिलेल्या शब्दाभोवती तत्कालीन इंदिरा सरकारने एक जबरदस्त जाहिरात कॅम्पेन तयार केलं होतं. अर्थात विरोधी लोकमताचे चटके विनोबांना नवलाईचे नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येही त्यांच्या भूमिकेमुळे आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर ‘विनोबा कि वानरोबा’ अशा शीर्षकाचा जळवळीत अग्रलेख लिहिला होता. ही माहिती मला राम आपटेकाकांनी दिली.. मला आणीबाणी अनुभवायला मिळाली होती.. मी एम.बी.बी.एस.चा विद्यार्थी होतो. आणीबाणीच्या काळातली भूमिगत अनियतकालिके वाचणारा होतो. त्यामुळे विनोबांबद्दलचे कुतुहल नकारात्मकच होतं.3

गर्द अंधारामध्ये आम्ही आश्रमात प्रवेशलो. शांतता होती. विनोबांचे मौन सुरु होते. आम्ही त्यांच्या रहात्या खोलीबाहेर अगदी दबा धरल्यासारखे बसून राहिलो. प्रकाश यथातथाच होता. गर्द रंगाची कानटोपी घातलेले कृश पण काटक विनोबा बाहेर आले. ते स्वतःच्या तंद्रीत होते. आठवलेकाका थोडे खाकारले. विनोबांनी आमच्याकडे पहिले. आम्ही जवळ जाऊन त्यांना उभ्यानेच नमस्कार केला. त्यांनी आमच्याकडे पहात आशीर्वादासारखा हात उंचावला.. क्षणभरात ते वळले आणि जणू अंधारात विलीन झाले…

ती ओझरती गूढ भेट मात्र सतत स्मरणात राहिली… तिला उजाळा मिळाला तब्बल बावीस वर्षांनी.. झालं असं की  मानसिक आरोग्यविषयक कार्यक्रम घेताना, ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ह्या गीताश्लोकाबद्दल प्रश्न विचारले जायचे.. ”फळाची आशा न धरता आपण आपलं कर्म करतच राहायचं… हाच कर्मयोग ना?” अशा विचारणा व्हायला लागल्या. त्यातला निराशावादी, दैववादी सूर मला खटकायचा.. आहे काय हा कर्मयोग म्हणून मी गीतेचा अभ्यास करायचे ठरवले. संस्कृतबरोबरची साथ शाळेतल्या अकरावीतच सुटली होती. म्हणून मराठीतली ‘गीताई’ आणि ‘गीताप्रवचने’ हातात घेतली.. आणि त्या दिवसापासून गेली सोळा वर्षे विनोबा भेटल्याशिवायचा दिवस गेलेला नाही.

माझ्या संग्रहातील विनोबांनी लिहिलेल्या आणि त्यांच्या अनुषंगाने लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या सत्तराच्या वर गेली. माझ्या लिखाणामध्ये आणि बोलण्यामध्ये त्यांचे संदर्भ सतत यायला लागले… त्यांची भाषा, त्यांचे ज्ञान, त्यातला सोपेपणा, विज्ञाननिष्ठा आणि विवेकनिष्ठा ह्यांनी मी त्यांच्या पुरता प्रेमात पडलो.

आणि मग माझ्या काही जवळच्या मित्रांपैकी जे विनोबाप्रेमी, त्यांच्या सोबत संवादाचे एक नवे दालन उघडले… त्यात खास स्थान आहे ते अभयदादाला (डॉ. अभय बंग) आणि विवेकला (विवेक सावंत). मिलींद बोकील (लेखक) आणि हेमंतमोनेसर  (खगोलतज्ञ) हे माझे जुने मित्र.. दोघेही विनोबा अभ्यासक. नागपूरचे पराग चोळकर, गागोद्याचे विनय दिवाण ह्या अभ्यासकांबरोबर स्नेह जडला. आणि अनेक वर्षे विनोबांसहित चालल्यावर एक कल्पना मनात रुजली… विनोबांचे आजच्या काळातले महत्त्व अधोरेखित करणारा अभ्यास करायला हवा. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महान व्यक्तिमत्त्वांभोवती निंदानालस्तीची  राळ उडवायचीही एक परंपरा आहेच. आपापल्या विचारधारेप्रमाणे ह्या व्यक्तिमत्त्वांना ‘वापरण्याची’ तर वहिवाटच बनली आहे.

सहा-सात महिन्यांपूर्वी नव्याने अभ्यास सुरु केला. मानसशास्त्रामध्ये ‘स्व’ म्हणजे SELF ह्या संकल्पनेला मूलभूत मानले आहे. ‘स्व’चा स्वीकार अर्थात् निरोगी, विनाअट आत्मस्वीकार हे मानसिक आरोग्याचे पायाभूत तत्व आहे, तर ह्या संकल्पनेच्या अनुषंगाने विनोबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे आयुष्य, त्यातील घटना ह्यांचा आढावा का घेऊ नये? दिशा मिळाली तशी वाचनाला गती मिळाली. टिपणे काढू लागलो. जवळ-जवळ पंचेचाळीस पुस्तके नव्याने पालथी घातली.. आणि अवाक् झालो.

निरोगी आत्मस्वीकाराच्या पातळीच्याही पुढे जाऊन विनोबांनी ह्या ‘स्व’ चा विस्तार कसा केला हे लक्षात यायला लागले. आणि त्यापुढे जाऊन ह्या ‘स्व’ जाणीवेचे पूर्ण विसर्जन करण्याचा आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणाला आकाशाची व्यापकता देण्याचा त्यांचा प्रवास जाणवायला लागला. भूदानाचा यज्ञ म्हणजे जणू ‘स्व’चा विस्तार करण्यासाठीचा प्रयोगमंच. वेदान्त तत्त्वज्ञानात सांगितलेल्या संकल्पना विनोबा कसे जगत होते ते कळत गेले. एका उच्च पातळीवरची विवेकनिष्ठा (Rationality) आणि अथांग आस्था (Empathy) ह्याचे अर्थ उलगडत गेले.

आणि पॉवरपॉइंटच्या सहाय्याने जवळजवळ पाच तास सलग बोलता येईल एवढे साहित्य जमा झाले. त्याचे संकलन करून तीन तासाचा ऐवज नव्याने जोडला. त्यामध्ये छायाचित्रे बसवली. सुहास बहुलकर ह्या कलाकार मित्राने विनोबांच्या तैलचित्राची सॉफ्टकॉपी पाठवली. दीनानाथ दलालांनी काढलेल्या गांधी-विनोबांच्या पेंटींग्जच्या डिजीटल प्रती मिळवल्या आणि माझे प्रेझेंटेशन, आशयाने आणि रूपाने फुलायला लागले.

आता ओढ लागली होती सादरीकरणाची. ती संधी दिली नाशिकच्या मनोवेध संस्थेने. ओळीने तीन दिवस मी अनुक्रमे विवेकानंद, शिवाजी महाराज आणि विनोबांबद्दल बोलणार होतो. विनोबांच्या सादरीकरणाचे नाव ठेवले ‘स्व’चे विसर्जन. पहिलाच प्रयोग… पूर्ण भरलेले साईखेडकर नाट्यमंदीर… हळूहळू कार्यक्रम रंगायला लागला.. तीन तासानंतर नाट्यगृहाने विनोबांना Standing Ovation दिली. मी त्याला निमित्तमात्र झालो एवढेच.

2परवाच्या अकरा सप्टेंबरला  विनोबांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने ठाण्याला हाच कार्यक्रम ठेवला होता ‘वुई नीड यू’ या संस्थेने. रविवारची संध्याकाळ. गणपतीचे दिवस… कार्यक्रमासाठीचा हॉल भरला… खुर्च्या भरल्या… जमीन भरली.. दरवाजाबाहेर गर्दी… सगळेजण शांतपणे ऐकत उभे.

मध्यन्तरामध्ये त्याच इमारतीमधले मोठे सभागृह उघडून शेकडो लोक शिस्तबद्धपणे पुन्हा एकदा बसले. एवढ्यात रस्त्यावर मिरवणुकीतल्या ताशाचा कडेलोट कल्लोळ सुरु झाला. पूर्ण तासभर त्या पार्श्वभूमीवर मी आणि श्रोत्यांनी एकतानपणे विनोबांचे विचार अनुभवले.. कार्यक्रम संपल्यावर लोक गहिवरून भेटत होते. बोलत होते. त्यात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात होते हे महत्त्वाचे.

मानसिक आरोग्य आणि महनीय व्यक्तिमत्त्वे ह्यांची सांगड घालण्याच्या माझ्या प्रयत्नांमधला हा माझा सातवा अभ्यास… प्रत्येक अभ्यास मला अधिक श्रीमंत करून जातो. विनोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा असा अभ्यास कुणी केल्याचे माहितीत नाही. पण ह्यात माझे श्रेय नगण्यच. खुद्द विनोबाच म्हणायचे कि, ‘ माझ्याकडे स्वतःचे काही नाही. मी एक फुटकळ विक्रेता आहे.’ त्या न्यायाने मी तर स्वःताला टोपली डोईवर घेऊन जाणारा फेरीवाला म्हणायला हवे.. परंतु अशा अभ्यासाचा आनंद काही वेगळाच असतो..

ठाण्याचा कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या दिवसापासून फोन सुरु झाले. थेट सेवाग्राम आश्रमापासून ते गागोद्याला असलेल्या विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठानपर्यंत… कार्यक्रम करण्याची आमंत्रणे, श्रोत्यांचे फोन, एस.एम.एस. आणि मेल्स..

अडतीस वर्षांपूर्वी घडलेल्या त्या प्रातःकालीन दर्शनानंतरचे विनोबांचे हे दर्शन किती प्रभावी आणि यथार्थ होते..

ता.क. ‘विनोबा – स्व चे विसर्जन‘ (हा कार्यक्रम आता दिनांक १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पुण्याला आयोजित केला जाणार आहे.)

निरूपण: डॉ. आनंद नाडकर्णी