
आचार्य पेमा चॉड्रोन. . . कसे वाटते आहे नाव ऐकायला ? . . . ह्या बाई आज छान, परिपक्व पंच्याऐशी वर्षांच्या आहेत. कॅनडामधल्या बौद्ध मोनास्ट्रीमध्ये शिकवतात. बुद्ध विचारांचा, रोजच्या जीवनात वापर कसा करायचा ह्या संदर्भात त्यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. ‘व्हेन थिंगज् फॉल ॲपार्ट’ आणि ‘वेलकमिंग द अनवेलकम्‘ ही त्यांची पुस्तके, मला खूप प्रभावी वाटली. तर त्यांच्या लिखाणामध्ये एका तंत्राबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. त्या तंत्राचे नाव आहे ‘टॉंगलेन.’ तिबेटी बुद्धशाखेमधून जी ध्यानतंत्रे विकसित झाली त्यातले हे एक. मी ह्या तंत्राचा सराव करायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच अडचणीत आलो . . . कसा ते सांगतो.
इतर अनेक ध्यानतंत्राप्रमाणे ही पद्धत श्वासाच्या भानापासून सुरुवात करते. स्वतःच्या आणि इतरांच्या दुःख आणि वेदनांबरोबर समग्र अस्तित्वाला Connect म्हणजे जोडणे नव्हे तर एकजीव करणे असा ह्या पद्धतीचा हेतू. समजण्यासाठी आपण असे म्हणूया की, अपरिहार्यपणे ज्या भावनेचा सामना करायला लागतो त्याचे नाव दुःख (Pain). शरीरातला पाय मुरगळला किंवा जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मनाचा अपमान झाला तर दुःख होते. ह्या दुःखाबद्दलच्या अनेक भावना मनात दाटून येतात. आता पुढे काय होणार ही असते भीती. ह्या सेटबॅकमुळे माझी लय गेली ह्याचे नैराश्य. ज्याच्या ‘मुळे’ हे घडले त्याबद्दलचा संताप. ह्या संतापाचे तीन पदर. स्वतःची चूक, दुसऱ्यांचे योगदान आणि परिस्थितीतील त्रासदायक घटक . . . ह्या सर्वांवरचा संताप. स्वतःच्या चुकीबद्दल स्वतःलाच गुन्हेगार मानणारी खंत . . . ह्या सार्यातून तयार होते ती वेदना (Suffering).
आपले मन नेहमीच्या जगण्यामध्ये ही ‘जोडी’ वेगवेगळी करून पाहू शकत नाही. त्यातले घटक अलग करू शकत नाही. म्हणून ध्यानतंत्रामध्ये प्रथम पाहायचे असते की, अटळपणे आलेले दुःख कोणते आणि त्यावर आपल्या मनाने चढवलेले लेप कोणते. उदाहरणार्थ, माझ्या एकुलत्या एक भावंडाचा कोरोनामुळे मृत्यू झाला ह्याबद्दल असते, ते दुःख. पण मी त्या भावंडाला योग्य वेळी, योग्य ती मदत करू शकलो नाही ह्याबद्दलची खंत म्हणजे वेदना ! . . . चिंतन काय करायचे तर खंत ही भावना वास्तवाचा आधार असलेली आहे का याबद्दलचे. आपण चूक केली की चूक झाली ? . . . केलेली चूक गंभीर असेल पण तो गुन्हा होता का ? . . . आपण स्वतःला गुन्हेगार ठरवून काय साधणार आहोत ? . . . हा झाला वैचारिक भाग. त्याला म्हणतात Contemplation ! पण हे Meditation नव्हे . . . ध्यानामध्ये भर असतो तो दुःख आणि वेदनेच्या स्वीकारावर ! म्हणूनच समुपदेशन म्हणजे Counselling नेहमी चिंतनाला मदत करते आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान, स्वीकाराला मदत करते. ध्यानामुळे, स्वीकारासाठी मनाने घातलेल्या पूर्वअटी (Conditions) गळून पडायला मदत होते किंवा तशी मदत अपेक्षित असते. Unconditional म्हणजे विनाअट स्वीकाराचा अनुभव देण्यासाठी ध्यानामध्ये तंत्रे विकसित झाली त्यातलेच एक टॉंगलेन.
ह्या तंत्रामध्ये श्वासाबरोबर काही भावनांना आत घेण्याचा अनुभव रचायचा आहे . . . डिझाईन करायचा आहे. नि:श्वासाबरोबर काही भावनांना बाहेर पाठवायचा अनुभव रचायचा आहे. श्वास आहे Receiver आणि नि:श्वास आहे Transmitter. श्वास घेताना काय ‘आत’ घ्यायचे ते प्रथम पाहू. ह्या प्रकाराला आपण ‘आगमनक्रिया’ म्हणू आणि नि:श्वासाला ‘गमनक्रिया’ म्हणू. त्यातला ‘क्रिया’ हा शब्द ह्यापुढे मनात समजून घेऊ आणि फक्त आगमन-गमन म्हणू. तर माझी अडचण सुरू झाली आगमनाच्या सूचनेपासून.
आपले नेहमीचे लॉजिक काय असते . . . त्रासदायक भावना काढून टाका, प्रेम-उत्साह-शांति आत घ्या. दिलासादायक भावनांचे रोपण करा, मनातली ‘निगेटिव्हिटी’ काढून टाका. आणि इथे सांगितले जाते आहे की समजा, मला भविष्याततल्या असुरक्षिततेबद्दल चिंता वाटतेय् तर त्या चिंतेला श्वासाबरोबर आत घ्या ! . . . अरे बापरे ! . . . आगमनाच्या उंबरठ्यावर पडलोच मी ठेंच लागून. आणि विचार करायला लागलो, असे का सांगितले असेल ?
. . . चिंतेपासून (कोणत्याही त्रासदायक भावनेपासून) दूर पळायचे नाही. तसे केले तर ती भावना अधिक प्रभावी ठरेल. आगमन म्हणजे ह्या भावनांना सामोरे जाणे !
. . . परंतु त्यांना ‘React’ नाही व्हायचे. समजा चिंतेची भावना आत घेताना छातीचा ठोका चुकला किंवा छातीत थोडा त्रास झाला तरी तो बदल फक्त नोट करायचा . . . मला हे दोन्ही झाले होते. त्याचे कारण कोणत्या विचारात होते ? . . . चिंतेला आत घेतली आणि ती वाढली तर ! रिंपोंचे म्हणजे तिबेटन बुद्धगुरू म्हणतात, “आकाश मोठे की त्यातले ढग ? . . . मन मोठे आहे. त्यात उमटणारा, ढग कितीही मोठा असला तरी तो आकाश गिळू शकणार नाही . . . मनाच्या आकाशात ढगांची ये-जा पाहायची सवय लाव. ढग आकाशात असतात. आकाश ढगात राहत नाही.” माझे कोडे इथे उलगडले. माझ्या लक्षात आले की मी तोवर अतिशय सांभाळून आणि म्हणूनच अगदी वरवरचे आगमन-गमन करत होतो. पण आता मी सांगितलेली प्रतिमा वापरून ढगांना ‘न नाकारता’ पाहायला लागलो.
. . . आता खरी गंमत आली . . . चिंतेचे ढग आले . . . संतापाचे आले . . . वैषम्याचे आले . . . नैराश्याचे आले. दुसरी ट्यूब पेटली. मी जरी ‘माझ्या’ चिंतेला आत घ्यायला बिचकत होतो तरी ती भावना फक्त माझी कुठे होती ? . . . म्हणजे मी ‘चिंता’ नावाच्या भावनेला सामोरे जातो आहे. एका मानवी भावनेला. सर्वांनी जिचा अनुभव कधी ना कधी घेतला आहे अशा भावनेला. म्हणजे कधी आकाश ढगांनी व्याप्त असेल. कधी वादळ असेल . . . कधी वारं ! . . . कधी मळभ कधी निवांत. वेदांतामधला शब्द, चिदाआकाश ! आतापर्यंत ठाऊक होता. हे ध्यान करताना कळला.
. . . आणि अचानक, शीडातून हवा गेलेल्या गलबतासारखी ‘माझी’ चिंता मनात विसावली. ती आता पूर्वीसारखी भीषण वाटत नव्हती. मग मी हा प्रयोग, ‘संताप-अपमान’ ह्या भावनांसाठी केला. औदासिन्यासाठी केला. आणि होताहोता, माझ्या विश्वासात नवी ऊर्जा यायला लागली. कशी ?
टॉंगलेन तंत्र सांगते की, नि:श्वासासोबत तुमच्यातला सारा सद्भाव एखाद्या कारंजासारखा जगासाठी बाहेर द्या. ज्या भावना ‘माझ्या’ म्हणून राखून ठेवण्याची आपली टेंडन्सी असेल त्या द्या. तुमचे डोळे बंद असले तरी चेहऱ्यावर स्मित येईलच. तो चेहरा हळूहळू आगमनाच्या क्षणालाही हसरा राहील. माझ्या नि:श्वासाच्या वेळी मी खूप प्रिय घटना आठवत राहिलो. माझ्या मुलीचे लग्न, नातवाचा जन्म, मुलाचे त्याच्या आवडत्या कोर्सला जाणे, संस्थेच्या कामातले यशाचे टप्पे . . . आणि ह्या सगळ्या प्रतिमांमधून जाणवणाऱ्या छान भावनांना वैयक्तिक ठेवायचे नाही. सर्वांसोबत शेयर करायचे. नि:श्वासाच्या माध्यमातून.
हे करताना मला एक व्हेरिएशन मिळाले. एकदा टॉंगलेन तंत्राप्रमाणे श्वास-नि:श्वास करायचा. त्यानंतर काही नेहमीचे श्वास-नि:श्वास. त्यामुळे मनाला स्वतःचा फिडबॅक घेता येतो. पण नंतरनंतर मला प्रत्येक श्वासाला टॉंगलेन जमू लागले. श्वासाचा दमदारपणा आणि स्थिरताही वाढली. आगमनाबरोबर मनातली मुक्तीची म्हणजे ‘सुटल्या’सारखी भावना मला जाणवत होती. गमनासोबत माझ्यातली ‘समाधानी’ वृत्ती वाढत होती. सुटणे म्हणजे Escape नव्हे तर सोडवणे ह्या अर्थाने सुटल्यासारखे वाटत होते.
बुद्धविचारांमध्ये ‘Non-Rejection’ म्हणजेच ‘न-नकार’ ह्याकडून स्वीकाराकडे जाण्याचे हे तंत्र आहे. त्या पद्धतीने आपण सारे मनाच्या सर्व लाभदायक भावना आणि त्रासदायक भावना ह्यांचे संतुलन पाहू शकतो. आपल्या सगळ्यांमध्ये दुःखदायक भावनांचा चिखल आहे आणि सुंदर, सद्भावनांचे कमळ आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये कमळाचे प्रतीक खूप महत्त्वाचे मानले आहे. चिखलातूनच कमळ फुलते. त्यातच ते राहते. पण स्वतःच्या गुणांचा सुगंध आणि सौंदर्याचा आस्वाद ते सर्वांना देत राहते.
टॉंगलेन तंत्राचा सराव का करायचा ? आचार्य पेमा म्हणतात की, आपल्या इतरांच्या वेदनेबरोबर आपले नाते जुळावे म्हणून. माझ्या जगण्यामध्ये दुःख आणि वेदनेला स्थानच नाही हा अविवेकी अट्टाहास दूर व्हावा म्हणून ! . . . आपले व्यक्ती म्हणूनचे दुःख आणि ‘माणूस’ म्हणूनचे दुःख ह्यातले नाते समजून घेण्यासाठी टॉंगलेन मदत करते. मी हे तंत्र दोन्ही बाजूंनी वापरायचा सराव करायला लागलो. म्हणजे माझ्या भावनांसाठी. आणि इतरांना समजून घेण्यासाठी . . . माझ्या एका मैत्रिणीबरोबर माझी चर्चा झाली ती त्वचा आणि मन ह्यांच्या नात्याबद्दल . . . माझ्या पत्नीलाही सोरियासिसचा त्रास आहे. आणि मैत्रिणीला त्रास आहे ॲकनेचा . . . मी आता दोघींनाही टॉंगलेनतर्फे सद्भावना पाठवायला सुरुवात केली. हे तंत्र ‘रेकी’सारखे नाही. कारण त्यामध्ये तुमची एनर्जी ट्रान्सफर होते असा कोणताही दावा नाही. तुम्ही टॉंगलेन फक्त स्वतःसाठी करता. दुसऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आणि आस्था आहे पण तुम्ही फक्त स्वतःच्या आतमध्ये ही प्रक्रिया जागवता. त्यामध्ये ‘हिलींग’चा कोणताही दावा नाही. आणि माझ्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही ध्यानपद्धतीने कोणताही दावा करू नये. कारण दावा म्हणजे Outcome . . . परिणाम ! ध्यान ही प्रक्रिया स्वतःसाठी आहे. वैयक्तिक अस्तित्वातले संकुचितपण जर मला विस्तारायचे असेल तर माझ्या जवळच्या माणसांच्या वेदनेबद्दलची एकजीव सहवेदना अनुभवण्यासाठी मी ध्यानसराव करत असतो . . . बुद्धविचार आपल्याला सांगतो की, वैयक्तिक दुःखाचे नाते संपूर्ण मानवतेच्या दुःखाबरोबर आहे हे लक्षात घ्या. त्या सगळ्यांसाठी तुमचा सद्भाव विस्तारीत करा आणि करत राहा. ह्या ध्यानाचा, त्यांच्यावर काय परिणाम होणार हा मुद्दाच नाही . . . तुम्ही काय स्वतःला मोठे हिलर समजताय् ! समजत असाल तर फक्त स्वतःच्या त्रासदायक भावनांची मलमपट्टी करा. तिकडे व्रण राहणार नाहीत असे पाहा. आणि ते करताना लक्षात घ्या की ‘माझे दुःख’ नावाचा प्रकार तुमच्या आत्मभावातून आलाय् ! तुमच्या ‘अहम् म्हणजे ‘मी’ पणापासून आलाय् ! तो संकुचित, खुराड्यातला ‘मी’ पणा तुमच्यात उत्क्रांतीच्या प्रवासात आला आहे खरा ! आचार्य पेमा म्हणतात, ‘Very ancient patterns of selfishness.’ तो मोडायला सुरुवात करूया. आपले वास्तवाचे भानच आपण विस्तारीत करू.
पेमामॅडम आपल्याला सांगतात की, तुम्ही हे ध्यानतंत्र स्वतःसाठी विकसित करा. जवळच्या नात्यांसाठी करा. हळूहळू ओळखीच्या आणि अनोळखी अशा अनेकांच्या वेदनेला आपल्या मनात जागा द्या आणि तुमचा सद्भाव तुमच्या मनाने वाटत जा . . . विस्तारत जा . . . असे तुम्ही करत राहिलात तर ज्ञानेश्वरांचा विश्वभाव तुमच्या अनुभवाला येईल. दुःख आणि वेदनेचे वैयक्तिक भाग तुटत जातील आणि सद्भावना आणि आस्थेचा विस्तार हळूहळू पर्यावरणापर्यंत पोहोचेल. म्हणजे टॉंगलेनचे ध्यान करायचे. आधी आणि नंतर ज्ञानोबांचे पसायदान मनातल्या मनात म्हणायचे. काय छान वाटते म्हणून सांगू . . . एकदा नाही अनेकदा करुन पाहा . . . सवय लागेपर्यंत ! . . . पसायदानाच्या शेवटच्या शब्दांचा अनुभव मला ह्या ‘कॉम्बो’मधून आला . . . सुखिया जाला ! सुखिया जाला ! . . . सुखिया जाला ! . . .
अस्तु !
- डॉ. आनंद नाडकर्णी