Dr. Anand Nadkarni

गाणे कुठून येते? . . .

गाणे कुठून येते? . . . जा पूस त्या क्षणाला.
मंगेश पाडगावकरांच्या ह्या ओळी पहिल्यांदा गद्य स्वरूपात वाचल्या तेव्हा कळल्या होत्या. पण भिडल्या नव्हत्या. डॉक्टर मित्रमैत्रिणींच्या आमच्या ‘स्वच्छंद’ ह्या संगीतगटामध्ये मित्रवर्य डॉ. मनोज भाटवडेकरने ह्या शब्दांना चाल लावली. आणि ‘अहा . . .’ असे उद्गार मनात उमटले. मनोज हा यशवंत देवांसारख्या, शब्दप्रधान गायकीचा पुरस्कार करणाऱ्या गुरूंचा शिष्य. ‘गाणे कुठून येते’ ह्या शब्दांनंतरचे प्रश्नचिन्ह सुरांमध्ये कसे दाखवायचे हे मनोज समजून सांगत होता. आणि ‘विचार त्या क्षणाला’ ह्या उत्तरामधली ठाम ऊर्जा चालीत आणायचे प्रात्यक्षिक देत होता.
माझे मन शिकत होते…….
नाही म्हणावयाला, आता असे करूया |
प्राणात चंद्र ठेवू हाती उन्हे धरूया. ||
नुकतेच लिहिलेले ताजे-ताजे शब्द कवी सुरेश भट, गायक भीमराव पांचाळेंना शिकवत होते.
नेले जरी घराला, वाहून पावसाने |
डोळ्यातल्या घनांना हासून आवरूया.||
वा! . . . क्या बात है . . . भीमरावांना तान जमली आणि भट साहेबांनी खुशीने ताल धरला.
माझे मन शिकत होते……
प्रसंग; गणपतीची आरती . . . काळ तीस वर्षांपूर्वीचा . . . स्थळ मुंबईतील प्रभुकुंज नावाची इमारत. खुद्द समर्थ रामदास आपले शब्द सुरांमध्ये अनुभवायला उभे असावेत असे कोपऱ्यात उभे असलेल्या मला वाटत होते. गणपतीचा चेहरा तर खूपच खुललेला दिसला. मंगेशकर बंधु-भगिनी एकत्रित स्वरात म्हणत असलेली आरती मी याचि देही याचि डोळा अनुभवत होतो.
माझे मन शिकत होते…….
संध्याकाळ सरली होती. घरातले दिवे लागायचे होते. झोपाळ्यावर बसलेल्या किशोरीताई. मंद लयीत हलणारी त्यांची आकृती. संगीतातील रागाची रचना काय आणि कशी असते ते त्या रंगून सांगताहेत. समोर मी आणि मित्र विदुर महाजन.
माझे मन शिकत होते…….
शब्द आणि सुरांचे नाते माझ्यासमोर बहरून आणणाऱ्या अशा अनेक क्षणांचा साक्षीदार होता येणे हे अहोभाग्य. त्या रसामध्ये तुडुंब बुडून जाताना, न शिकण्याएवढा मी पाषाण नव्हतो. कवितेमधला गाण्यामधला शब्द, जेव्हा सूरांचे वलय चढवतो तेव्हा तो कसा ऊर्जेचा साथ घेऊन येतो ते अनुभवणे अद्भुत असते. पण अशा वातावरणामध्ये स्वतःला वारंवार घेऊन जावे लागते. कॉलेजच्या दिवसापासूनचा मित्र-मैत्रिणींचा असा गट, अनेक दिग्गजांच्या निकट सहवासाचे क्षण ह्यातून माझे मन शिकत होते.
त्या अनुभवांचे नियमित मंथन व्हायचे, त्याचे श्रेय एका व्यक्तीचे आहे. बाबा अर्थात् डॉ. अनिल अवचट. बाबा उत्तम बासरी वाजवायचा. मी ठेका धरायचो. तो मध्येच गायला लागायचा. मीही गायचो. आम्ही एखाद्या भावगीतापासून, चित्रपट गीतापासून सुरुवात करायचो. मग बाबा त्या-त्या रागामधल्या बंदिशीमध्ये घुसायचा. कधी सकाळी, कधी रात्री, कधी प्रवासात तर कधी आमच्या एकत्रित कार्यक्रमाच्या पुढे-मागे. माझे कान आणि मन उघडे करण्यात आणि ठेवण्यामध्ये बाबाचा वाटा म्हणजे अगदी यमन मालकंसाच्या तोडीचा. देस, मारवा, श्री, जोगिया अशा रागांचे सूर आम्ही आळवायाचो. तर कधी ‘छैंया छैंया’ सारखे फिल्मी ठेके. बाबाला कबीराचे दोहे यायचे, आसामी लोकगीते यायची, बाऊल संगीत ठाऊक असायचे, गझलींचा अंदाज असायचा आणि अभंगाचा सूर गवसायचा. माझ्या रचना ऐकून त्याने दिलेली दाद आणि सुचवलेल्या सूचना हा माझा कायमचा ठेवा.
‘वेध’ ह्या जीवन शिक्षण परिषदेच्या पेणच्या एका सत्रामध्ये आरती अंकलीकरबरोबर गप्पा चालल्या होत्या. माझी-तिची पंचवीस-तीस वर्षांपासूनची ओळख. त्यातही बाबाचा सहभाग आहेच. तर कार्यक्रमाच्या शेवटी मी तिला भैरवी म्हणायची विनंती केली. ती मला म्हणाली, “डॉक्टर, पाठी तुम्ही सूरांचा लूप धरा” मी क्षणभर धास्तावलो. पण म्हटले ही एवढ्या विश्वासाने सांगते आहे, करू प्रयत्न. ‘अवघा रंग एक झाला’ असे आवर्तनामध्ये म्हणत राहायचे होते. जणू तो तानपुरा आहे. त्या कॅनव्हासवर आरती स्वरांची मंडले रेखाटणार . . . गडबड काय असते की आपण त्यात वाहवत जायचे नाही. आपली लय बदलायची नाही. विद्यार्थीदशेत तबला शिकायचो तेव्हा माझे तेलवणे सर सांगायचे, तालाची गती गाण्याच्या गरजेप्रमाणे वाढली, कमी झाली पाहिजे. तुझ्या गरजेप्रमाणे नाही. नाहीतर गडबड . . . ते आठवून सूर लावला आणि धरून ठेवला . . . काय मजा आली . . . टिपूर चांदण्यामध्ये माहेश्वराला नर्मदेचा प्रवाह पहावा तसे वाटले . . . पण पाण्यामध्ये पडायचे नाही, प्रवाहात पोहायचे नाही . . . काठावर पण सूरस्थ राहायचं . . . भिजायचं पण गुंतायचं नाही. सूर झेलायला तयार असतात पण म्हणून मनाला पडायची परवानगी नाही द्यायची. शब्द-सूर-अर्थ-आशय सारे कसे नर्मदामैयासारखे एक जीव वहायला हवे.
‘वेध’ परिषदेच्या निमित्ताने पन्नासहून जास्त स्वरचित गीतांना चाली रचण्यामागे असलेल्या स्वाध्यायाच्या ह्या काही हृद्य आठवणी. माझ्याकडून शब्द आले, त्यांना चाल मिळत गेली. मी काही ‘संगीतकार’ नाही ह्याची स्पष्ट जाणीव मला आहे. पण तरीही ह्या पन्नासावर गीतांच्या रचनेमध्ये विविधता जरूर आहे. ही प्रक्रिया काहीशा तपशीलाने मांडण्यामागची भूमिका अशी आहे की त्यातून अनेकांना स्फूर्ती मिळावी. त्यांच्या प्रवासाला दिशा मिळावी. माझा ‘मोठेपणा’ सांगण्याचा लहानसा सुद्धा हेतू माझ्या मनात नाही. नर्मदेकडे पाहणे म्हणजे स्वतःच्या प्रवासाकडे ‘केस-स्टडी’ म्हणून पाहणे . . . पाहूया किती गोटे लागतात हाताला.


‘वेध’ परिषदेच्या निमित्ताने सहा-सात तास बसून राहणाऱ्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कंटाळा येऊ नये, जे आशयसूत्र सांगण्यासाठी ते जगणाऱ्या व्यक्ती व्यासपीठावर येतात त्यांची वृत्ती गद्यापलीकडे जाऊन पद्यातही सांगावी आणि स्वयंशिस्तीचे पालन मार्दवाने व्हावे ह्यासाठी विकासगीतांचा जन्म झाला.
शब्दांसोबतच चाल येऊ शकते हे मलाही प्रथमच कळले. पहिले गाणे हिंदीमध्ये तयार झाले. गाणे आणि चालण्यासाठी शब्दांचे प्रेम हवे, भाषेचा स्वाध्याय हवा आणि डोळस वाचन हवे. संगीताचे प्रशिक्षण नसले तरी आतुर मनाने सूर ग्रहण करणारी आवड हवी. ह्या गोष्टींइतकीच महत्त्वाची आहे, आपण ज्या हेतुसाठी काम करतोय् त्या हेतुबद्दलची, उद्दिष्टाबद्दलची आत्मीयता.
आपल्या आयपीएच (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) संस्थेचे ध्येयवाक्य आहे, सुदृढ मन सर्वांसाठी . . . समाजाच्या ज्या ज्या स्तरांपर्यंत, गटापर्यंत जाता येईल तिथे मनाच्या आरोग्याचा वसा घेऊन जायचा. शास्त्रीय भाषेत ह्याला म्हणतात, Community Mental Health. ही गोष्ट छंद म्हणून करण्याची नसावी, ध्यासाची असावी. प्रेयसीवरच्या वेड्या प्रेमासारखी, शास्त्र विषयाबद्दलच्या अनावर ओढीसारखी आणि क्रांतिकारकाच्या उचंबळून येणाऱ्या देशप्रेमासारखी असावी. मग आपल्यातले हुन्नर आपल्यालाच गवसू लागते. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक, वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये जम बसावा म्हणून समाजाबरोबर काम करतात. ती सुरुवात असावी. चालेल. पण त्याची गोडी लागून नंतर या उपक्रमांना आपोआप अपरिहार्यता यायला हवी, त्या व्यावसायिकाच्या मनात. तरच त्याचा कार्यकर्ता बनेल.
मी गीतकार, संगीतकार नाही पण ‘वेध’च्या निमित्ताने मात्र उत्तम लिहू शकतो, रचू शकतो, गाऊ शकतो. अभ्यासाशिवाय ध्यास नाही. अभ्यासाला सातत्य तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तो अभ्यास एन्जॉय कराल. मला कुठे ठाऊक होते १९९६ साली, जेव्हा पहिले गाणे रचले गेले तेव्हा की त्याचे पुस्तक होणार आहे. पण सातत्याला समाधानाची साथ हवी. तन्मयता असेल तर सारे होते. कारण आपल्या उद्दिष्टाच्या अभिव्यक्तीचे आपण एक साधन असतो . . . गणपतीला दूर्वा वाहतात, लाल फुल ठेवतात तेव्हा दुर्वा आणि फुल ह्यांची काय भावना असेल . . . पूर्ण समर्पणाची! दुर्वा आणि फुल प्रत्यक्षात बोलणार नाहीत ह्याची जाणीव जागृत ठेवूनही जेव्हा भोवताल तुमच्याशी बोलायला लागतो तेव्हाच कवी, गीतकार जागृत होतो आणि म्हणतो,
यशमानाचे मुकुटतुरे हे
दिनमानातच सुकून जाती
सद्भावाच्या मऊ लकेरी
हृदयामध्ये मिसळून रहाती
कृती असू दे कालसारखी
तन्मयतेने नवीन होते
कंठ तोच अन् शब्द तेच ते
गाणे तरीही पुन्हा जन्मते.

अभ्यासविषय म्हणून शब्द न्याहाळले तर ‘मान’ हा शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे. सद्भावनेच्या लकेरी मृदू आहेत आणि त्या ‘मिसळून’ पण ‘राहत’ आहेत. कृती जरी एकसूरी दिसली तरी रोजची अंगाई नवी, रोजची ओवी नवी आणि अभंगही! गाण्यामधला मेसेज अर्थात शिकवण हीसुद्धा त्या मऊ लकेरीसारखीच मिसळून राहणारी हवी.
‘वेध’चे आशयसूत्र पक्के करून जाहीर करण्याचा प्रघात आम्ही आदल्या वर्षीच्या वेधच्या शेवटी करत असतो. कार्यकर्त्यांवरची जबाबदारी त्यातून तयार होते. वेधच्या प्रत्यक्ष परिषदेपूर्वी ते सूत्र माझ्या डोक्यात फिरायला आणि भिनायला लागले की एका क्षणाला गाणे तयार होते . . . जा पुस त्या क्षणाला!
‘शिस्त आणि नियोजन’ ह्या सूत्रावरचे गाणे मला एक कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन येत असताना विमानातच सुचले होते.
लेफ्ट राईट, दाएँ बाएँ उजवा आणि डावा ।
ठाँक ठाँक तालावरती रस्ता संपून जावा।
असे ध्रुपद मिळाले. माझ्यातल्या गीतकारामध्ये, डॉक्टरही आपोआप मिसळून राहतो.
उजवा मेंदू कल्पकतेचा, हिशोबी असे डावा।
नियोजनाचे केंद्र एक, तर दुसरा भाव विसावा
दोहोंमधल्या संवादाचा अमोल आहे ठेवा
ठाँक ठाँक तालावरती रस्ता संपून जावा
मस्त, ऊर्जाभरल्या चालीवरती जेव्हा हजारो विद्यार्थी ही गाणी गातात तेव्हा ऐकायला खूपच धमाल असते.
गाणी लिहिता लिहिता शब्दांबद्दलचा माझा कॉन्फिडन्स स्थिर होण्यात काही वर्षे गेली. एकविसावे शतक सुरु होत होते तेव्हां ठाणे वेध मध्ये आशयसूत्र होते ‘उभरता भारत’. प्रत्येक क्षेत्रातील तरुणाई तिथे अवतरणार होती. वेधचा कार्यक्रम ठाण्यामध्ये आयोजित होतो डिसेंबर महिन्यात. त्या वर्षीचे गाणे मात्र ऑगस्टमध्येच आले .
नील गगन , हरित धरा, शुभ्रतेत न्हात झरा
हिमशिखरी किरणांचा, लालकेशरी ग तुरा
चित्र मिळून सारे, रोज रेखूया
प्रगल्भ भारताचे निशाण होऊया
निसर्गा मध्ये तिरंगा पहाणे हा पूर्वार्ध आणि त्या रंगाने आपण प्रत्येकाने निशाण बनावे हा उत्तरार्ध …..’प्रगल्भ ‘ ह्या शब्दामध्ये Wisdom आहे, मुरलेले शहाणपण आहे. माणसानेच निशाण व्हायचे ही कल्पना कशी आली डोक्यात ? ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या होत्या उषा मेहता. स्वातंत्र्य-लढ्यामध्ये एकदा ह्या सर्व मुलींनी पोलिसठाण्यावर मोर्चा नेला होता. त्यांच्यावर बेफाम लाठीहल्ला झाला. पूण मुलींची मने दुखावली गेली कारण तिरंगा तुडवला गेला होता. दुसऱ्या दिवशी ह्या मुली, तिरंग्याच्या रंगाच्या साड्या नेसून पुन्हा पोलिसठाण्यावर जातात. कालचे वळ ताठपणे दाखवणाऱ्या मुलींवर पोलीस हल्ला करू शकत नाहीत. वृत्तपत्रामध्ये ही बातमी वाचून खुद्द गांधीजी ह्या मुलींना पत्र लिहितात ….. हा इतिहास असा उमटायचा होता.
उन्नतीचे आत्मागीत गातसे तिरंगा
भक्तीनेच ईशरूप, येतसे अभंगा
विश्वास उजळणारा, विश्वास देऊया
प्रगल्भ भारताचे निशाण होऊया
ह्या कडव्यामध्ये, प्रगतीचे गाणे असे न म्हणता, ‘उन्नती ‘ हा शब्द वापरला. उन्नती मध्ये Transcendence आहे. प्रगतीमध्ये गती आहे. दिशा आहे पण ‘स्तर’ बदलत नाही. पुन्हा ‘आत्मगीत ‘ या शब्दाचा संदर्भ गीतेच्या सहाव्या अध्यायातल्या,’ उध्दरेत् आत्मानम आत्मनः ‘ ह्या वचनाशी आहे. भारतीय परंपरेमध्ये भक्त आणि देव ह्यांच्यात अभेद आहे. देशाला ईश्वरुप कल्पून केलेली भक्ती असेल तर ती ‘अभंग’ म्हणजे ‘न भंगणारी ‘ रचना असणार. अभंग ह्या शब्दात तोच भावार्थ आहे. ‘विश्वाला उजळणार विश्वास देऊ ‘ असेही म्हणता येईल किंवा ‘वैयक्तिक विश्वासातून सामूहिक विश्वास निर्माण करू ‘ असेही म्हणता येईल .
संत साहित्याच्या वाचनाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. काव्याची आवड आणि आस्वादकता ही आधीपासून होतीच . मराठी भाषेचे अंतर्बाह्य सौष्ठव दाखवले विनोबांनी. वेधगीतांमध्ये भजन -अभंगाचा फॉर्म येणे अपरिहार्य होते .
पुण्याच्या वेधचे सूत्र होते, ‘मकसद् ‘ …म्हणजे खोल अर्थ देणारे पक्के उद्दिष्ट. साधी गमतीदार रचना यमनाची सुरावट नेसून सामोरी आली .
हेतूविण प्रयास, दिशेविण प्रवास ।
(O२) ओटूविना तोकडा प्रत्येक श्वास ।।
संथपणे धृपद आळवल्यावर गायकांमध्ये संवाद होतो,
‘अहो बुवा ….हेतू, कळला , दिशा सापडली पण हा ओटू काय असतो हो ? “
“अरे, ओटू म्हणजे ज्याला मराठीमध्ये ऑक्सिजन आणि इंग्रजी मध्ये प्राणवायू म्हणतात तो बरं का !”
“समजलं … फिट्ट समजलं “
आणि टाळ- ढोलकीचा ताल सुरु होतो .
कृतिविण मती, भावाविण कृती
स्नेहाविना कोरडा, प्रत्येक श्वास .

इथे विनोबा उतरलेच. कर्माच्या नोटेवर भावनेचा शिक्का नसेल तर ते फक्त कागदाचा कपटाच रहातो असे विनोबा म्हणतात. आणि पांडित्याला परिश्रमाची जोड नसेल तर काय फायदा. स्नेह ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक आहे स्नेहभावना आणि दुसरे आहे तूप, किंवा तेल. खूपच मजा आली पुण्याच्या स्वरचमूला हे गाणे गाताना. साधना प्रकाशनातर्फे, महाराष्ट्र फौंडेशनच्या मदतीने एक कार्यक्रम आयोजित केला होता, ‘पुढे जाण्यासाठी मागे वळून पहाताना’. डॉ .अनिल अवचट, डॉ. अभय बंग आणि डॉ .आनंद नाडकर्णी ह्यांच्याशी गप्पा मारणार होते विवेक सावंत. (यूट्यूबवर उपलब्ध आहे) त्या कार्यक्रमाला पुण्याच्या बालगंधर्व मध्ये सवाईगंधर्व महोत्सवाची गर्दी अवतरली होती. कार्यक्रमाची सुरुवात ह्या रचनेने झाली. तसे अभयदादा मला कानात म्हणाले, ‘ फर्मास जमलंय गड्या हे गाणे “
‘ बाह्यरंग ते अंतरंग ‘ या सूत्रासाठी भजनाच्या धर्तीवर हिंदी शब्द आले.
बाहरसे सब लागे न्यारा
सुन अंतरके बोल
मितवा, मनकी आँखे खोल
मितवा, मनकी आँखे खोल
ह्या गाण्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानच एक प्रकारे मांडले आहे. गाण्याच्या स्वरचमूमधली सहकारी मंजुश्री पाटील, हिच्या आवाजाच्या जातकुळीला हे योग्य गाणे होते. गीतकाराच्या अबोध मनात नक्की गायकाचा विचार असतो. मी नाटकाची संहिता लिहितो तेंव्हा अनेकदा कलाकारांना त्या अवकाशात पाहून लिहीत जातो. पुढे त्याच कलाकाराने ती भूमिका करायला पाहिजे असे नाही. तर मंजुश्रीने हे गाणे रंगून म्हटलेच पण तिच्या गायनाच्या मैफिलींमध्येही ती हे गाणे म्हणत असते. वेदान्त शिकणारी माझी एक जर्मन सहाध्याथी आहे. तिचे नाव ॲन. ती छान हिंदी बोलते. गाते. मी तिला हे गाणे समजावले आणि शिकवले. तामिळनाडूमध्ये कोईमतूरजवळच्या अनयकट्टी गावाजवळच्या जंगलातल्या ‘आर्ष विद्या गुरुकुल ‘ ह्या आश्रमात आमची तालीम सुरु होती. आणि ॲनचा स्वर शांततेमध्ये इतका उत्तम लागला की भक्तीने द्वैताला पार करत त्या वनामध्ये तो स्वर मुरवला …. खूपच धन्य वाटले मला .
”सारेगमप लिटील चॅम्प्स ‘ च्या पहिल्या सत्रातील सगळ्या गायकांसोबत मी बसवले होते, ‘सॉंग ऑफ लाईफ ‘ हे गाणे .त्यात इंग्रजी आणि मराठीचे फ्यूजन आहे. गम्मत म्हणजे त्यानंतर खूप वर्षांनी आर्या आंबेकर आणि मुग्धा वैशंपायन ह्या दोघींनाही हे गाणे आठवत होते .
काही गाणी हिंदीमध्ये येतात तर काही फ्यूजन रूपामध्ये. ‘शून्य ते शिखर ‘ ह्या सूत्रासाठी, पाश्चात्य स्ट्रिंग्स-ड्रम्स आणि पौर्वात्य वाद्यमेळ ह्याची एकत्रित रचना केली. ही रचना सुद्धा सगळ्या गायक-वादकांनी मिळून विकसित केली. सिंफनी हा पाश्चात्य संगीताचा गाभा, आणि मेलडी ही आपली परंपरा. संगीताने बनवलेल्या तटबंद्या नसतात. त्या उभारणे आणि त्यांचे उल्लंघन हे माणसाचे काम.
परभणी वेधच्या पहिल्या वर्षी रचला गेला ‘सूर्याचा पोवाडा ‘ ‘गोष्ट आमुच्या घडण्याची ‘ असे सूत्र होते.
अस्मानीचा सूर्य सांगतो, गोष्ट आपुल्या घडण्याची. |
अंधार जरी आला दाटून, दाखव हिंमत जगण्याची. ||
परभणीच्या सरांच्या नेतृत्वाखाली, दणकून झाला पोवाडा. ‘वेध’ च्या प्रत्येक केंद्रामध्ये स्वरचमू जमणे आणि त्यात सतत हालचाल होत रहाणे हा अजून एक फायदा. ठाण्याच्या ‘वेध’ साठी आम्ही कधीकधी कल्याणच्या वेधचे टॅलेंट आमंत्रित करतो. ह्या गटांना चाल शिकवणे हा माझ्यासाठी सुंदर अनुभव असतो. समजून उमजून म्हटल्याशिवाय गाण्यामध्ये राम उतरत नाही. सुदैवाने प्रत्येक शहरातील वेधगटांचे संगीत कार्यकर्ते, हौशी परिश्रमी आणि प्रतिभाशाली भेटत गेले. माझ्यासोबत ह्या उत्सवात, उत्साहाने सामील होणारे. आता तर चालीच्या मांडणीची ऑडियो फाईल इथून तिथे जाते. व्हिडीओ कॉलवर मी गाण्याची तालीम पाहू शकतो.
आज ह्यातले प्रत्येक गाणे मी गुणगुणतो तेव्हा त्या वेधच्या अनुभूतीचे भांडार अलगद खुले होते. ‘सफर संशोधनाची’ ह्या सूत्रासाठी रचले गेलेले गीत अगदी विनासायास घरंगळत पेनामध्ये आले होते.
अज्ञाताच्या क्षितिजावरती, तेजाची पाऊले ।
ज्ञानपताका घेऊनि हाती, शोधक हे चालले ।।

चालीमध्ये घोळतघोळतच बाहेर आले हे गीत …. सुधीर फडक्यांच्या ‘ज्योतीकलश झलके ‘ ह्या गाण्याचा स्वरसाज म्हणजे प्रस्तुत गीताच्या चालीचे स्फूर्तिस्थान. ‘बदल पेरणारी माणसं ह्या सूत्रासाठी गाणे लिहिताना मी एका ट्रान्समध्ये गेलो होतो हे आठवते आहे. पुढचे नाही.
कुंपणे तोडुनी सारी, विरघळून गेले काही
काळाने द्यावी दाद हा हट्टही धरला नाही.

धृपदावर मांड बसली की कडवी उलगडतात हा माझा नेहमीच अनुभव बनला आहे. ‘शहाणे वादळ’ ह्या सूत्रावरच्या गीताच्या शेवटच्या ओळी माझ्या मलाच खूप आवडल्या. त्या ‘मी’ लिहिलेल्या नव्हत्या. पण आवडणाऱ्या ‘मी’ ने त्यावर तात्काळ मालकी हक्क बजावलाच.
शहाणे वादळ, नाहीच वादळ
तो तर झाला ऊर्जास्रोत
मने फुलवतो, प्रेरक होतो
अंतरातला प्रकाशझोत
ह्या शब्दांकडे पहाताना जाणवते आहे की एका अर्थाने हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचेच वर्णन नाही का. शेवटी प्रत्येक गाण्यामध्ये माझ्या वैयक्तिक अस्तित्वाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या काही खूणा उमटणारच. त्या पुसायच्या नाहीत पण ठसठशीत करून मिरवायच्या देखील नाहीत.
कार्यकर्त्याला नेहमी असे वाटते की आपण कलाकार नाही. आपल्यात ‘प्रतिभा’नाही. परिवर्तनाच्या कामात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाकडे प्रतिभेचे देणे असतेच. आपल्या उद्धिष्टांसाठी ती मनापासून कारणी लावली की ती फुलुन येते. आपल्या चाकोरीबाहेरच्या कामांची आपण उगीचच भीती बाळगतो. मी तर काय बाबा पडलो डॉक्टर, इंजीनीयर, वकील, सी. ए, गृहिणी, शिक्षिका, वगैरे वगैरे…. अरे, पण आपल्या माणूसपणाला साद घालणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत की … आणि त्यामधून मिळणार काय?…. अहो, रोमांचक अनुभव….. भिवंडीजवळच्या अनगावमध्ये शाळेतले विद्यार्थी माझे स्वागत वेधगीताने करतात. लातूरमध्ये ज्ञानप्रकाशची शेकडो मुले तन्मयतेने माझ्यासमोर वेधगाणी गातात…. नाशिकच्या आनंदनिकेतनमधले विद्यार्थी वेधगाण्यांवर वार्षिकोत्सवात नृत्य बसवतात. ‘सुदृढ मन सर्वांसाठी ‘चा मंत्र अहोरात्र जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासाठी दुसरा कोणता ओटू अर्थात मराठीतला ऑक्सिजन असणार बरं !

डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

गाण्यांमागची गोष्ट

मानसशास्त्राचा अभ्यास करताना, ‘जोहारी विंडो’ नावाची संकल्पना शिकवतात. जसे खिडकीचे चार भाग असतात तसे चार कप्प्यांमध्ये व्यक्तीची गुणवैशिष्ठ्ये विभागलेली असतात. पहिला कप्पा आहे अशा क्षमता-कमतरतांचा ज्या व्यक्तीला स्वतःलाही ठाऊक असतात आणि इतरांनाही. म्हणजे रुग्णांचे निदान करून उपचार करण्याची माझी क्षमता किंवा कोणतेही वाहन चालवता न येणे ही कमतरता मला आणि जगाला ज्ञात आहे. काही गुणदोष फक्त माझे मलाच ठाऊक असतात. माझ्या मनातली सव्वा लाखाची झाकली मूठ असते ती.  तिसरा कप्पा आहे, ‘ब्लाइंड स्पॉट’.  मला ठाऊक नाही पण इतरांना कळणारी वैशिष्ट्ये. उदाहरणार्थ मी झोपेत कसा घोरतो हे मला कळत नाही पण इतरांना अगदी तीव्रपणे कळते. आणि खिडकीचा चौथा भाग आहे ‘अज्ञाताचा’. माझ्यातल्या काही क्षमता ( किंवा कमतरता ) ना मला कळलेल्या असतात ना इतरांना! … जोसेफ आणि हॅरी ह्या शास्त्रज्ञांनी ही मांडणी केली म्हणून ‘जोहॅरी ‘… त्याचे भारतात झाले ‘जोहारी’. इतके तेल नमनाला घातल्यावरचा मुद्दा असा की, ‘मला गाणी लिहिता येतात’ आणि ‘त्यांना चाली लावता येतात’ हे माझ्यातले सुप्त-गुण ना मला ठाऊक होते ना इतरांना.आयपीएच ( इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ ) ह्या संस्थेच्या १९९० पासूनच्या प्रवासात, स्वतःची नव्याने ओळख घडण्याचे प्रसंग अनेकदा आले.

गीत-संगीताच्या दुनियेतील प्रवासाला सुरुवात झाली ती आमच्या संस्थेच्या ‘वेध’ ह्या उपक्रमामुळे. व्यवसाय मार्गदर्शन परिषद म्हणून सुरू झालेला हा वार्षिक उपक्रम आज तीन दशकांनंतर, ठाण्यासमवेत महाराष्ट्रातील नऊशहरांमध्येआयोजित करण्यात येतो. ह्या निमित्ताने लिहिल्या गेलेल्या आणि संगीतसाज चढवलेल्या गीतांची संख्या पन्नासाच्यावर गेल्याचे लक्षात आले आणि मीच स्वतःला विचारले, यार, कैसे हो गया ये सब?… चौथ्या कप्प्यातील सुप्तगुण पहिल्या कप्प्यात आले कसे ?आणि एक मजेदार कथानक, स्मरणातून कागदावर  उमटू लागले.

१९६२ साली, भारतचीन युद्ध झाले तेव्हा, ग.दि. माडगूळकरांचे, ‘जिंकू किंवा मरू’ हे गाणे आमच्याही घरात पोहोचले. समरगीते म्हणजेच स्फुर्तीगीते असा माझा समज झाला. देशभक्तीपर गाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिकवली, गायली जायची. मराठी भावगीतांचा प्रवाह त्यावेळी हिंदी, ‘बिनाका रेडियो सिलोन’ इतकाच जोरात होता. रात्रीच्या वेळी जागून ‘आपली आवड’ ऐकणारे कितीतरी रेडिओरसिक असायचे. माझ्या वडिलांना अनेक भावगीते यायची. भा.रा. तांबे हे त्यांचे आवडते कवी. ‘गगनी उगवला सायंतारा’ हे गजानन वाटव्यांनी गायलेले गीत ते रंगून म्हणायचे  . त्यांच्यामुळेच साने गुरुजींची आणि राष्ट्र सेवा दल कलापथकाची गाणी आमच्या घरी आली. ‘तुझ्या घामामधून, तुझ्या कामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान! चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या युगाची आन्’।। हे माझे आवडते गाणे होते. 

अशाप्रकारे संपूर्ण शालेय जीवनात खूप स्फुर्तीगीतांनी पाठराखण नव्हे कानराखण केली. रेडिओ हाच सूरचालक असल्याने मराठी-हिंदी गाण्यांनी सतत सोबत ठेवली. गाण्याचे कोणतेही शिक्षण न घेता मी गाणी गायला लागलो. ती ऐकणाऱ्यांनाआवडत होती. पाचवी इयत्तेमध्ये, शाळेतल्या गायनस्पर्धेत मी, ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनी चला विनवतो, रखुमाई विठ्ठला।।’ हे गाणे म्हणून पहिले बक्षीस मिळवले तेव्हा नियमितपणे गाणे शिकणाऱ्या माझ्या स्पर्धक मित्र-मैत्रिणींना वाईटच वाटले होते. पण माझ्या आईवडिलांनी मला गाण्याच्या क्लासला न घालता तबल्याच्या क्लासला घातले. हा बहुदा टेबलासारख्या पृष्ठभागावर तबला वाजवण्याचा परिणाम होता. तबला शिकवणारे ठाण्याचे तेलवणे सर अगदी घोटून घोटून शिकवायचे. त्या तीन वर्षांमध्ये तालाचा हिशोब पक्का झाला. सरावाअभावी कौशल्य खुंटले.

अभ्यास, वक्तृत्व, नाटक ह्या साऱ्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन वर्षां मध्ये संगीत मागे पडत गेले. त्याला बहर आला मेडीकल कॉलेजमधल्या आमच्या मराठी कवितांवर आधारीत वाद्यवृंदामुळे. सलग पंचवीस वर्षे आमचा गट रंगमंचीय कार्यक्रम करायचा. मराठी काव्यविश्वातील अनेक कवींच्या निवडक कवितांना स्वरसाज ला​वायचा आमचा मित्र  डॉ. मनोज भाटवडेकर. आणि आमच्या संचातील डॉक्टर मंडळीच गायक आणि वादक असायची. मी ह्या कार्यक्रमाचा कायमचा निवेदक ! . . . पण संगीताचे संस्कार मात्र होत राहिले तसेच कवितेचेही. बोरकरांपासून मुक्तीबोधांपर्यंत आणि पाडगावकर, बापटांपासून, ग्रेस, महानोर, ढसाळांपर्यंत कविता वाचल्या गेल्या. बा.भ. बोरकर, आरती प्रभू, विं.दा, इंदिरा संत, धामणस्कर अशा अनेकांच्या कवितांचा रसास्वाद घडून आला.

आमच्या प्रत्येक कार्यक्रमात माझ्या कविता वाचनाचा प्रयोग असायचा. ‘गडद निळे, गडद निळे जलद भरून आले। कोमलतनु चपलचरण निघाले।।‘  अशी तालबद्ध गाणी मी सादर करायचो. कधी मर्ढेकर तर कधी नारायण सुर्वे . . . त्यात भर पडली सुरेश भटांच्या प्रत्यक्ष सहवासाची. त्यांच्या काही कवितांचा पहिला श्रोता होण्याचे भाग्यही लाभले. पुल आणि सुनिताबाईंचे काव्यवाचन ऐकले. महानोरांसमोर बसून दोन तास त्यांच्या कविता ऐकल्या. 

हे सारे संस्कार इतके आकर्षक होते की ते रुजले नसते तरच नवल. ते झिरपत आहेत हे कळायचे पण उद्या कसे उगवणार याचा विचारही मनात नव्हता. 

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ  ह्या संस्थेचा जन्म झाला मार्च १९९० मध्ये. जानेवारीच्या दहा तारखेला माझे वडील अचानक निवर्तले होते. आणि दोन महिन्यातच आम्ही काहीतरी नवीन निर्माण करू पाहत होतो. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ अर्थात Mental Health for All’ हे ध्येय वाक्य असलेल्या ह्या संस्थेने अशा सेवा, उपक्रम, कार्यक्रम आखायला सुरुवात केली, ज्यांची समाजाला तोंडओळखही नव्हती. उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार किंवा एपिलेप्सी अर्थात फिट्सचा आजार ह्या समस्यांनी ग्रस्त व्यक्ती आणि त्यांचे त्रस्त कुटुंबीय ह्यांच्या जाणीवजागृती परिषदा ! असाच एक उपक्रम होता व्यवसाय मार्गदर्शन चाचण्यांचा अर्थात् Aptitute tests चा. मुलांनी सायन्सला जायचे तर मुलींना आर्ट्सला, अशा विचारधारांचा जमाना होता तो. मुंबईमध्ये मेट्रो सिनेमाच्या समोर सरकारचे एक केंद्र होते अशा शैक्षणिक चाचण्यांचे. आजच्यासारखे ऑनलाईन-ऑफलाईन तपासण्यांचे पेव नव्हते फुटलेले. 

आमच्या टीममध्ये, अशा चाचण्या घेण्यास पात्र अशा सहकारी होत्या शर्मिला लोंढे आणि पूजा ठक्कर. पण येणार कोण पैसे देऊन ह्या व्यवसाय निवड चाचण्या करण्यासाठी? आपल्या सेवा (Services) लोकप्रिय करायच्या तर आपणच समाजाकडे जायला हवे म्हणून आम्ही व्यवसाय प्रबोधन परिषद सुरू केली वेध अर्थात् Vocational Education Direction Harmony . . . VEDH ! १९९१ च्या डिसेंबरमध्ये ठाण्यामध्ये ही परिषद पहिल्यांदा भरली. त्यानंतर नित्यनेमाने दरवर्षी भरत राहिली (अपवाद, डिसेंबर १९९३ चा ज्या वर्षी बाबरी मशीद-आयोध्या प्रकरण घडले)

पुढच्या सहा वर्षांमध्ये ह्या वार्षिक उपक्रमाने बाळसे धरले. १९९६ सालापर्यंत आठशे ते हजार विद्यार्थी हया परिषदेला हजेरी लावू लागले होते. १९९७ साली तर आमिर खान, जयंत नारळीकर, विजय तेंडुलकर असे एकाहून एक दिग्गज लागोपाठ ह्या व्यासपीठावर आले आणि विद्यार्थीपालकांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली.

ह्या साऱ्या प्रेक्षकांना दिवसाचे सहा-सात तास शांत आणि तन्मय मन:स्थितीत एकतान बसवायचे कसे असा प्रश्न पडायचा. त्याच सुमारास आमच्या संस्थेचा, पहिला स्वयंसेवक आधारीत प्रकल्प सुरू झाला ‘जिज्ञासा.’ कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी जीवन शिक्षणप्रकल्प असे स्वरूप असलेल्या हया प्रकल्पाची कार्यवाही करायची होती, स्वयंस्फुर्तीने आलेल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन. आमच्या आयपीएच  संस्थेबरोबर सहयोगी संस्था होत्या स्त्रीमुक्ती संघटना आणि मुंबई पोलीस ! . . . व्यसनाधीनताविरोधी अभियानाशी हा प्रकल्प जोडण्याची कल्पकता दाखवली होती तत्कालीन डीसीपी हेमंत करकरे ह्यांनी.तर ह्या प्रशिक्षणा दरम्यान स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या, त्यांची चळवळीची गाणी गायला लागल्या. ‘मैं अच्छी हूं, घबराऊ नको, ऐसा खतममें लिखो’ हे गाणे ज्योती म्हापसेकर आणि शारदा साठे आमच्या स्वयंसेवकांकडून गाऊन घ्यायच्या. मजा यायची. समूहगीतांमुळे स्फुर्ती निर्माण होते हा अनुभव खूप छान होता. 

म्हणून ‘वेध’च्या कार्यक्रमांमध्ये ही गाणी मी शिकवायला लागलो. सुरुवातीला ज्योतीसुद्धा बरोबर असायची. ‘गीत गा रहे है आज हम, रागिनीको  ढुंडते हुए’ हे गाणे वेधसाठी आलेल्या मुलांना खूप आवडायचे. गाणे तालावर शिकवावे म्हणून मी सोबतीला ढोलकी वाजवायला सुरुवात केली. अशी स्फुर्तीगीते गाताना, शिकवताना, वाजवताना अचानक कल्पना आली की ह्या वेध व्यवसायपरिषदेच्या आशयसूत्राला अनुरूप असे गाणे आपणच का लिहू नये? 

त्यावेळी वेध हा उपक्रम फक्त ठाण्यामध्ये व्हायचा. त्यामुळे वर्षाला एक गाणे तर लिहायचे होते. चळवळीतल्या बहुतेक गाण्यांच्या चाली, लोकप्रिय गाण्यांची दोन वापरून केलेल्या असायच्या. चाल सवयीची असली की नवे शब्द त्यात पटकन् बसतात, मुखोद्गत होतात. माझ्याकडून पहिले गाणे लिहून आले ते ‘जोश मस्ती अपने अंदर, हम है वोही कलंदर, मेहनत् जिनकी मुठ्ठीमें है उनका नाम सिकंदर’ ह्या शब्दांबरोबर आपोआपच एक सोपी चाल तयार झाली. 

वेधच्या गाण्यांचे शब्द साधे हवेत, चाल पटकन् गळ्यावर चढणारी हवी. हार्मोनियमवर सूर लावणेही ठाऊक नसलेल्या माझ्यासारख्याला ती शिकवता यायला हवी. पहिले गाणे विद्यार्थ्यांना आवडले. आत्मविश्वास वाढला. वेध व्यवसाय परिषदेला दर वर्षी एक सूत्र असते. त्या सूत्राभोवती विचार चालू व्हायचा. वक्त्यांची निवड व्हायची. त्यांना प्रश्न कोणते विचारायचे ह्यावर मन काम करायला लागायचे. आणि गाणे आपोआप तयार व्हायचे. गाणे उगवायला लागले की मनातला त्या वर्षीचा ‘वेध’ ट्रॅक सुरू झाला असा सिग्नल मिळायचा.

मीच गाणे रचायचे, शिकवायचे, ढोलकी वाजवायची आणि सत्रामध्ये मुलाखत पण घ्यायची हे काम कसरतीचे होते. म्हणून गायिका आणि वादक ह्यांचा वापर करावा असे ठरले. सुदैवाने आमच्या टीममध्ये गायनकला कंठात मुरलेल्या डॉ. अनघा वझे, शर्मिला लोंढे आणि मंजुश्री पाटील अशा तीन सहकारी आहेत. आयपीएच् संस्थेच्या कुमारवयीन मुलांच्या उपक्रमांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमधून वादक मिळायला लागले आणि कोरससाठीचे गायक सुद्धा. अशाप्रकारे ठाणे वेधचा समूहगानचमू तयार झाला.

माझा सख्खा मित्र सदाशिव अमरापुरकर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब ह्यांच्या प्रयत्नांमधून वेध उपक्रमाचे सीमोल्लंघन झाले अहमदनगर मध्ये. तोवर चार गाणी तयार झाली होती. नगरवेधच्या आयोजनात तिथल्या शाळेचा सहभाग असल्याने समूहगानचमू लागलीच तयार झाला. येणाऱ्या विद्यार्थी-पालकांच्या हातामध्ये गाण्यांच्या शब्दांची पुस्तिका द्यायची. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला एकेक गाणे घ्यायचे. दिवसभरामध्ये सगळेच जण ती गाणी गुणगुणायला लागायचे.

विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गाण्यांची छापील पुस्तिका आणि त्यामध्ये वाचतवाचत गाणी शिकवायच्या पद्धतीमुळे आपोआप शिस्त निर्माण होऊ लागली. नगरच्या पाठोपाठ औरंगाबाद, पुणे, नाशिक, परभणी, लातूर आणि कल्याण या सेंटर्समध्ये हळूहळू गायक आणि वादकांचे वृंद तयार झाले. 

 नाशिकच्या वाद्यवृंदामध्ये गाणे गाणारा मल्हार मला कित्येक वर्षानंतर उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भेटला तेव्हा त्याला ‘वेध’ ची गाणी आठवत होती. म्हणजे सूर आपोआपच रुजत होते. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये ही गाणी गायली, बसवली जाऊ लागली. त्यावर नृत्यरचना केल्या जाऊ लागल्या. औरंगाबादच्या, टेंडर केअर होम अर्थात ‘टीसीएच’ या शाळेने, निधी उभारणीसाठी अडीच तासांचा पूर्ण कार्यक्रम तयार केला. फक्त वेधगीतांच्या सादरीकरणाचा. त्याचे निरूपण करताना मला खूपच मजा आली. 

गाणी साठत गेली तशी कल्पना आली की त्याची सीडी तयार करावी. ‘नव्या शतकाचे’ गाणे ही पहिली सीडी बाहेर आली. ‘सॉन्ग ऑफ लाईफ’ ही दुसरी. असे एकूण तीन अल्बम आयपीएच संस्थेतर्फे प्रसिद्ध झाले.  पुढे ‘सीडी’ हा प्रकार इतिहास जमा होऊ लागला. यू-ट्युब नावाच्या बाळाने बाळसे धरायला सुरुवात केली. दरम्यान संस्थेने स्वतःचा माध्यम विभाग सुरू केला. ‘आवाहन आयपीएच’ ह्याच नावाने यू-ट्युब चॅनेल सुरू झाले. त्यामध्ये वेधमधल्या मुलाखतींबरोबरच काही गाण्यांच्या चित्रीकरणाची एक प्ले- लिस्ट तयार झाली.  ‘वेध’ ही गाणी आता ‘पाहिली’ जाऊ लागली. 

काही काळापूर्वी ‘कोविड’च्या महासाथीमुळे ‘वेध’ चे वार्षिक कार्यक्रम घडू शकले नाहीत. पण आवाहनतर्फे आम्ही ‘ग्लोबल वेध’ अशी ऑन-लाईन संकल्पना राबवली. सहा देशांमध्ये राहणाऱ्या सहा ‘ऑफ बीट’  ‘व्यक्तींसोबत’ ऑन- लाईन सत्रे शूट करायची असे ठरवले. आमच्या चॅनलवर ‘ग्लोबल वेध ‘ ह्या फाईलमध्ये ह्या साऱ्या मुलाखती आहेत. प्रश्न आला, वेध- गीताचा ! चार ओळी तयार झाल्या, …. 

विश्व होई सैरभैर कोणाचा न ताळमेळ,

सूक्ष्म विषाणूने केला, असा दुःखाचा कल्लोळ,

घरी बंद झाली आशा, गर्द चिंतेच्या सावल्या

चला नवे मैत्र जोडू, लावू ज्ञानाच्या दिवल्या

ह्या शब्दांना चाल दिली, पुणे वेधच्या स्वरचमूतील पल्लवी गोडबोलेने. शब्द लिहायचे आणि स्थानिक वृंदाने त्याची चाल लावायची ही पुढची पायरी. 2023 सालच्या लातूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, परभणी, वेधसाठी ही पद्धत सुरू झाली आहे. लातूरच्या ‘वेध’चे सूत्र होते, ‘वुई द पीपल’ भारतीय संविधान आपापल्या पद्धतीने जगणाऱ्या पाच तरुणांबरोबरच्या मुलाखती !  ‘एकत्रातून समग्रता’ अशी कविता झाली.

नकाशातल्या रेषांमध्ये

जाण आमची बंद नसे

मनाजनांच्या समृद्धीतून

अखंड भारत गात असे

लातूरच्या ज्ञानविकास शैक्षणिक प्रकल्पाच्या स्वरचमूने इतके दणक्यात म्हटले हे गीत की मनाजनांच्या गळ्यामध्ये कायमचे विसावले . 

गीत लिहिण्याची जबाबदारीसुद्धा आता  स्थानिक कार्यकर्त्यांकडे  सुपूर्द करायची आहे.  लातूर वेध च्या डॉ. मिलींद पोतदारने तशी सुरुवातही  केली आहे.  पेण वेधची सावनी  गोडबोले आणि डॉ . गोडबोले ह्या जोडीनेही आपली प्रतिभा ह्या उद्दिष्टामागे लावली आहे .

सर्व शहरांमधल्या गटांना गीतरचना आणि चालबांधणी शिकवायची तर सारी गाणी एकत्र करूया अशी कल्पना      आली.  तीसाहून अधिक गाण्यांच्या ध्वनिफिती आवाहन कडे आहेत.  तर मग गीताचे शब्द छापलेले आणि गायनाचे ध्वनिचित्र , स्कॅन-कोडमध्ये असे पुस्तकच का तयार करू नये ….!

आज मराठीमध्ये हेतुपूर्वक लिहिलेल्या  स्फुर्तिगीतांची संख्या नगण्य आहे.  ‘मनोविकास ‘ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्वाचे आहे.  वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारीत भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो .   मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही ह्याचा मला एक फायदा असा झाला की  त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या.  माझे संगीत शिक्षण सुरु असते ते ‘कानसेन’ म्हणूनच .  पण ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार -संगीतनियोजक , मित्रमैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी  जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो. .

ह्या साऱ्या प्रवासात माझ्या गुणवैशिष्ठ्यांचे चारही कप्पे समृद्द झालेच पण हजारो मनांपर्यंत विकासाच्या भावना पोहोचवता आल्या हे माझे भाग्यच.  सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांमध्ये आम्ही ‘ डिझायनींग ‘ चे  शास्त्र वापरत नाही ही माझी खंत आहे .   आयपीएचच्या प्रवासामध्ये असे अनेक आकृतिबंध , रचनामाला आम्ही सजगपणे विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहोत . ‘ वेध’ च्या अनुभवाचे एक डिझाईन … एक नक्षीदार रचना….. त्यामध्ये गीताचे डिझाईन …. त्यामध्ये शब्द  आणि सूर … त्यांचे प्रेक्षकश्रोत्यांपर्यंत पोहोचणे …. त्यासाठी डिझाईन केलेला अवकाश … त्या स्पेसमधले रंग, प्रकाश, ध्वनी, माणसे , वस्तू…. त्यांच्याद्वारे येणारी भावऊर्जा …. विचार आणि आशयाबद्दलची स्पष्टता…. आशयाचा ग्राफ , भावनांचा पट आणि मिनिटांचे ठिपके !

…..ह्यातून तयार होणारी   ‘ वेध’ जीवन शिक्षण परिषदेची एक कलात्मक रांगोळी …. रंगावली … आणि त्यातून मनामनांमध्ये उतरत जाणारा समर्पक आशावाद !

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजून काय हवं असतं ? 

डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

(महेंद्र कानिटकर यांच्या ‘प्रपंच ‘ दिवाळी अंकासाठी)