पैसा किती मोठ्ठा? (लेखांक चौथा) : ‘मौल्यवान’ अनुभव कशाला म्हणायचं?

2

माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने काही वर्षापूर्वी ‘मराठी’ लग्नसोहोळा साजरा केला. नऊवारी साड्या, नथी इत्यादी परंपरागत दागीने ह्यावर जोरदार खर्च केलाच पण ‘हत्तीवरून साखर वाटणे’ ह्यासारख्या गोष्टी, एक नव्हे तर चार हत्ती झुलत ठेवून केल्या . . . पुरुषमंडळींचे वेश तर पेशवाई होतेच पण कट्यार-तलवारीपासून शस्त्रेही होती . . . आमच्यासारखे काही पाहुणे, बापुड्या एकविसाव्या शतकातले कपडे घालून हा सोहळा ‘अनुभवत’ होते . . . वधुवरांवर सोने-चांदीच्या फुलांचा वर्षाव झाला . . . अस्सल मराठमोळ्या पकवान्नाचे जेवण झाले . . . हा सारा थाटमाट जमवण्यासाठी काय बरं बजेट लागले असेल, ह्याबद्दल आमचे (गेल्या शतकातले) मध्यमवर्गीय हिशोब कधीचेच तोटके पडलेले. कार्य संपन्न झाल्यावर वरमाय म्हणाली, “ज्याज्या कुणी हे लग्न अनुभवलं . . . विसरणार नाही कधी आयुष्यात . . .”

“पण पैशाची केवढी उधळपट्टी” एक दबला सूर आला . . . “

“हे बघा . . . Exclusive आणि Rich अनुभव घ्यायचा तर तो पैसे मोजल्याशिवाय येतो का? . . . आणि अनुभवासाठी पैसा खर्च झाला तर तो कारणी लागला . . .  करायचा काय त्याला साठवून ठेवून” खाल्ल्या मेजवानीला जागून तो दबका सूर शांत झाला.

लग्न कसे साजरे करावे आणि त्यासाठी किती पैसे खर्च करावे ह्या ‘खाजगी’ प्रश्नात न जाता मला त्या वरमाईने केलेल्या विधानाकडे यायचे आहे . . . पैसे मोजल्याशिवाय खास, संपन्न, सौदर्यपूर्ण अनुभव येतच नाही ही विचारधारा अनेकांच्या मनात असते.

पैशाचे वैभव जिथे जिथे प्रकर्षाने दिसते ते अनुभव लक्षात रहातात हे खरं परंतु पैसे खर्च केल्यामुळेच तो अनुभव मौल्यवान झाला हा हेका आणि ठेका कितपत वास्तववादी?

माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले तो अनुभव अजून माझ्या स्मरणात ताजा आहे. आमच्या घरी लग्नाची तयारी आणि लगबग सुरु होतच होती तर बातमी आली की माझ्या भावी वहिनीच्या वडलांना हार्ट अटॅक आला आहे आणि ते अतिदक्षता विभागात आहेत. उत्साहाची जागा चिंतेने घेतली. दोन दिवस उलटले. त्यांची परिस्थिती स्थिर पण जोखमीची होती . . . भाऊ रहायचा अमेरिकेत. तो रजा घेऊन आलेला . . . समजा काही वाईट घटना घडली तर लागलीच विवाहसोहळा कसा करता येईल? . . .  दोन्ही बाजूच्या लोकांनी निर्णय घेतला की पुढच्या छत्तीस तासामध्ये छोट्याशा समारंभात लग्न करायचे. माझ्या वडिलांनी तयारीचा भार उचलला . . .  त्या वेळी बृह्दकुटुंबातील विविध पिढ्यांची मंडळी सहकार्याला तयार झाली. एका आत्याच्या ऎसपैस दिवाणखान्याचा आम्ही ‘लग्नाचा हॉल’ केला . . .  सर्व भावंडानीच सजावट केली . . . कुटुंबातल्या प्रत्येक चुलत-आते-मामे भावंडानी आणि त्यांच्या आईवडलांनी ह्या लग्नात  आपापला सहभाग दिला . . . “एकंदर परिस्थिती गंभीर असली तरी प्रत्यक्ष समारंभावर त्याचे सावट न पाडण्याचा आपण प्रयत्न करू . . . ” माझे वडील म्हणाले. आणि झालेही तसेच . . . संपूर्ण बृहतकुटुंबाने अत्यंत आनंदाने तो ‘घरगुती’ समारंभ संपन्न केला . . . . नुसता ‘पार पाडला’ असे नाही. त्यानंतरच्या काळात वहिनीच्या वडिलांची प्रकृती सुधारली हा बोनसच मिळाला.

हा लग्नसमारंभसुध्दा ‘मौल्यवान’ म्हणून माझ्या लक्षात राहिला आहे. खरे तर त्यात थाटमाट आणि खर्च तुलनेने शून्य होता . . . म्हणजेच अनुभवाचे मोल करावे कसे?

कल्पना करा . . . लडाखमधली हिमालयाच्या कुशीतली एक रात्र. आकाश असे ताऱ्यांच्या गुच्छांनी फुललेले . . . वाटतंय की हात उंच करावे आणि तारे खुडावे . . . जगाच्या गच्चीत पहुडलो आहोत आपण असा अनुभव . . . शांततेचा अनाहत स्वर . . .

हा अनुभव घेणाऱ्या दोन व्यक्ती . . . एक आहे पंचतारांकित टेन्ट हॉलीडे रिझॉर्टमध्ये  . . . दुसरा आहे एक बायकर . . . तो खेड्यामध्ये एका घरी उतरला आहे . . .  स्लिपींग बॅग उघडत आहे.

सुविधा आणि आरामाच्या दृष्टीने विचार केला तर पहिला अनुभव अधिक ‘रॉयल’ असेल . . . पण अनुभव ग्रहण करण्याची व्यक्तीची क्षमता अधिक महत्वाची की भोवतालची राजेशाही सोय? . . .

थोडा विचार केला तर जाणवेल की अनुभव ग्रहण करण्याची संवेदनशीलता आणि अनुभवाची संख्या, व्याप्ती, विविधता ह्यांचा परस्परसंबंध आहे . . . केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार . . . ह्यामुळे मनुजांची ग्रहणशक्ती वाढावी . . . त्यातूनच ‘शहाणपण’ येते असे म्हणतात . . . अनुभवामध्ये असलेले शहाणपण शोधण्यासाठी ग्रहणशक्ती विकसित करावी लागते . . . कलांच्या संदर्भात आपण ह्या कौशल्याला ‘दर्दी रसिकता’ म्हणतो. ह्या मानसिक प्रक्रियेचा आणि आपण किती पैसे खर्च केले (हा अनुभव घेण्यास) ह्याचे नाते बेताचेच आहे.

परंतु ‘मार्केट’ वाली संस्कृती आपल्याला सांगते की जितका महागडा अनुभव तितका तो जास्त ग्रेट . . . नव्या हाऊसिंग स्कीमच्या जाहिराती बघा . . . ते अनुभव विकतात . . . चारचाकीचे नवे मॉडेल्ही ‘अनुभव’ देते . . . सूटिंग-शर्टींगही complete man झाल्याचा ‘अनुभव’ देते. हॉस्पीटल्सही (जाहिरातीमध्ये) आरामदायक उपचारांचा ‘अनुभव’ देतात.

पूर्वी ‘मालकी’ ह्या भावनेला प्राधान्य होते. अलीकडे तो मागे पडत चालले आहे. चलती होत आहे ‘अनुभव’ विकण्याची . . . शहरातल्या उपहारगृहांमधली अंतर्गत रचना म्हणजे ‘Ambience’ पहा . . . पैसे फक्त खाण्याचे नसतात तर अनुभवण्याचे असतात. उपयुक्तता मागे पडली तरी चालेल पण ‘Divine Shopping experience of this decade’ अनुभवायला हवा.

‘जितके पैसे जास्त तितका अनुभव श्रेष्ठ’ ही विचारधारा रुजू लागली की, ‘अरे, इतके स्वस्त कसं मिळतंय . . .  दर्जा तर बरा आहे ना . . . ‘ असा संशय येऊ लागतो . . .

होताहोता आपण साऱ्यांनी अनुभव कसा आणि कोणत्या पध्दतीने घ्यायचा हे सुध्दा अनुभव विकणारे अनुभवी विक्रेतेच सांगायला लागतात . . . ह्यापलीकडे दुसरा अनुभव असणारच नाही असा दावा करत हळूच किंमतीची चिठी वाढवून ठेवतात.

काही विक्रेते ‘वेगळा अनुभव’ म्हणून विकतात. काही जण आपल्याला आनंददायक अनुभवाची आसक्ती निर्माण करून पुनपुन्हा यायला लावतात . . . दोन्हीकडे पैसे मोजणारे आपण . . . अनुभवाला सामोरे जाऊन त्यातील पदर, छटा शोधण्याचे आपले स्वातंत्र्य तर आपण संकुचित करत नाही आहोत?

सिंधुदुर्गमधल्या एका परंपरागत खानावळीत बसून मासळीचे ताट समोर आले आहे आणि पंचतारांकित ‘कोकण कॅफे’ मध्ये आपण मत्स्यास्वाद घेत आहोत . . . मी ‘अनुभव’ म्हणून दोन्ही enjoy करेन पण . . . दोन्ही अनुभवांची प्रतवारी करणार नाही. उच्चनीचता जोखणार नाही . . . मुख्य म्हणजे असे करताना पैसे हा निकष लावणार नाही. . .

‘कसली ती खेडवळ, भिकारडी खानावळ’ असे म्हणणे आणि ‘फक्त पैशाचा चुराडा हो . . . मासे काय शेवटी सगळीकडे तसेच’ असे विधान . . . दोन्ही Judgemental statements.

अनुभवांवर लेबले न लावता ते अनुभवावे . . .  किंमतीचे लेबल हे त्यातले एक.

शहाणपणाच्या व्याख्या काळाप्रमाणे बदलतात. प्राचीन काळी ज्या लोकांचे धर्मग्रंथ पाठ असायचे ते ज्ञानी होते. पुढे ज्यांच्याकडे माहितीचे भांडार जास्त तो शहाणा म्हटला जाऊ लागला. आताच्या काळात ‘अनुभवाची समृध्दी’ हे शहाणपणाचे सूत्र मानले जाऊ लागले . . . ह्या सूत्राभोवती पैशाची बंधने घट्ट करत हाच एक ‘प्रॉडक्ट आहे आणि आमच्यासारखा विक्रेता तुम्हाला मिळणारच नाही असा दावा लोक करू लागले आहेत.

आपलेच पैसे मोजून अनुभव विकत घेताना . . . तो बोथट तर होत नाही ना हा विचार आपण करायचा.

अनुभवाचे सौंदर्य नेमके कशात आहे आणि तो ग्रहण करणारी संवेदनशीलता कशी वाढवायची ह्यावर आपण स्वतःचे प्रशिक्षण करणार असू तर पैशाचा वापरही विवेकाने होईल. . . . आणि मुख्य म्हणजे ‘मखर आणि मुर्ती’ ह्यात गल्लत होणार नाही.

 

Advertisements

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक तिसरा) : ही निकामी आढयता का?

indianrupee_bb_20160212

माझ्या माहितीमधले एक सद्गृहस्थ आहेत. ते जन्मले आणि वाढले मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका चाळीमध्ये. त्या काळातले मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब…. हे तपशील फक्त जीवनशैली दर्शवण्यासाठी . . . ह्यांचे शिक्षण झाले, नोकरी केली . . . जीवनशैली मूळचीच. काही बदल काळाप्रमाणे. मिळालेला प्रत्येक पैसा वाचवला आणि गुंतवला. निवृत्तीनंतर आज एकूण तीन उत्तम रहात्या जागा, अनेक शेयर्स आणि एफड्या (एफडी म्हणजे Fixed Deposits चे हे मराठी बहुवचन) . . . थोडक्यात परिस्थिती छान . . . जुन्या चाळीतली भाड्याची जागा वडलांनंतर ह्यांच्या नावावर . . . भाडे रुपये साठ दर महिन्याला. ह्यांनी ती खोली विकली . . . असेल पंचवीसतीस लाखाला. त्यांच्या कुटुंबात दोन बहिणी, एकुलत्या एक सख्ख्या चुलतभावाचा काहीसा अकाली मृत्यू झालेला . . . अशा परिस्थितीमध्ये ह्या गृहस्थांनी इतर तीन भावंडांना काही पैसे द्यावे . . . स्वखुशीने द्यावे अशी त्यांची अपेक्षा होती . . . पण प्रत्यक्षामध्ये त्यांना व्यवहार झालेलाही अपरोक्षच कळला . . .

आपण ह्या गृहस्थांना श्रीयुत एबीसी म्हणूयात. एबीसीना जेव्हा विचारण्यात आले की त्यांनी एकट्याकडेच ते पैसे का ठेवले तेव्हा एबीसीनी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या पैशावर ‘माझीच मालकी कशी योग्य’ यावर स्वतःची बाजू मांडली. एबीसींच्या हातात आलेला हा पैसे स्वकर्तृत्वाचा नव्हता. त्यामुळे त्यांनी दाखला दिला व वडिलोपार्जित जागेचा . . . एकमेव वारस असल्याचा; वडिल गेल्यापासून भाड्याची पावती त्यांच्या नावावरच कशी वगैरे . . . वगैरे . . . आणि बंद जागेचा ‘मेंटेनन्स’ त्यांनीच इतकी वर्षे कसा केला हे सुध्दा सांगितले.

‘स्वकष्टार्जित’ मालमत्तेबद्दल ते म्हणाले, ‘निखालस माझीच’ . . . खरे म्हणजे त्यांची जीवनशैली काटकसरीची ठेवण्यात त्यांच्या आईवडलांचा किती मोठा वाटा. त्यांच्या स्वभावासकट त्यांना स्वीकारणाऱ्या पत्नीचा किती मोठा सहभाग . . . ते ज्या कंपनीत नोकरीला होते ती कंपनी भरभराटीला आणणाऱ्या कंपनीच्या मॅनेजमेंटचे कर्तृत्व मोठे की ह्या मध्यलयीतील मॅनेजरचे? . . . आणि एबीसीना ज्या सर्व शिक्षकांनी शिकवले त्यांचे श्रेय? . . . त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे वरीष्ठ मिळाले त्यांचा वाटा? . . . .

म्हणजे जिथे हवे तिथे म्हणायचे ‘मी मिळवलेला पैसा’ आणि जिथे हवे तिथे द्यायचा ‘वारसाहक्क’!

मला खरं सांगा, आपल्यापैकी कोणीतरी असे म्हणू शकतो का की ‘फक्त माझ्या कर्तृत्वावर मी माझा पैसा मिळवला आहे.’ एबीसी जेव्हा घरात लहानाचे मोठे होत होते तेव्हा त्यांच्या शारीरिक नसेल पण भावनिक विकासामध्ये दोन्ही बहिणींचा वाटा होता. एकुलता एक भाऊ म्हणून त्या दोघींनी ह्यांच्यावर सतत मायेची पाखर घातली . . . म्हणजे माणूस जेव्हा कृतज्ञतेला पारखा होतो तेव्हाच म्हणू शकतो . . . मी . . . मी . . . मी कमावलंय आणि राखलाय पैसा . . . एबीसींच्या गुंतवणुकीला फळ मिळाले तर ते म्हणणार माझे मार्केटचे चाणाक्ष निरीक्षण. आणि पैसे बुडाले तर मार्केट किंवा दैवाच्या नावावर बिल फेडायचे.

पैसा कमावणे, राखणे, गुंतवणे ह्या वरवर पहाताना जरी वैयक्तिक मालकीच्या गोष्टी वाटल्या (आणि कधीकधी त्या कायद्याने व्यक्तीगत मालकीच्या असल्या) तरीही पैशाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्त एकच व्यक्ती आणि तिचे कर्तृत्व असते का? . . . माझ्याकडे खूप पैसे आहेत ह्याचा वाजवी अभिमान असावा पण आत्मकेंद्रित आढयता असावी का? . . .

‘कमावलेला पैसा फक्त माझा’ ही मानसिकताच, अविवेकी निर्णय घेऊन पैसे गमावण्यामागे आणि मिरवण्यामागेही नसते का? . . . “मी कमावतो आहे . . . मी ठरवणार कसा खर्च करणार” . . . ही भूमिका तर्क आणि वास्तव ह्या दोन्हीवर तपासून पहायला नको का?

आज समजा मी एका पेशंटचे काऊन्सेलिंग करून त्याला औषध दिले आणि त्याने ‘मला माझी’ फी दिली तरी . . . मी जे ज्ञान वापरले त्यात मानसशास्त्रज्ञ, संशोधक, माझे शिक्षक, ह्याआधीचे पेशंट्स ह्या साऱ्यांचा वाटा नव्हता का? . . . ह्या साखळीतला ‘त्याच्यासाठी’ शेवटचा म्हणून त्याने ‘मला’ पैसे दिले. हे ओळखले तर पैसे स्वीकारताना नम्रता येईल. आणि ती खर्च करतानाही वास्तवाचे बोट सुटणार नाही.

माझा एक ‘बिझी डॉक्टरमित्र आहे. दिवसाला दिडशे पेशंट्सची ‘ओपीडी काढतो.’ . . . दहा-बारा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तीन मजली अद्ययावत हॉस्पीटल बांधले आहे. . . ‘माझे’ हॉस्पीटल, ‘माझा बंगला असे मिरवत होता . . . हॉस्पिटलची सारी व्यवस्था त्याची पत्नी पहात होती.  . . घरातले सारे त्याची आई पहात होती. . . सलग चौदा तासाची ओपीडी पहाताना ह्याला दर दोन तासाला उत्तम खाणे मिळत होते . . . रात्री अकराला थकून आल्यावर मायेचे स्वागत होत होतं . . . . लौकीक अर्थाने त्याची आई आणि पत्नी शिकलेल्या नाहीत. ‘स्वतः’ पैसे कमावत नाहीत . . . पण त्यांच्या हातभाराची भावनाच ह्याच्या ‘मी’ मध्ये दडपलेली . . .

मुंबईकर चाकरमान्याला घरगुती जेवण मिळायचे तर मध्ये कशी आठ-दहा डबावाल्यांची साखळी असते तसे हे आहे . . . रोज जेवताना ‘अन्नदाता, अन्नभोक्ता’ यांचे सोबत ह्या ‘अन्नदूता’चा समावेशही प्रार्थनेत करायला नको का? . . . पैसाच कशाला कोणतीही वस्तु जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्यामागे किती जणांचे हात असतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

आता तुम्हीही विचाराल ह्या भूमिकेचे महत्व काय? . . . कारण व्यक्तीने मिळवलेला पैसा, दाखवलेले कर्तृत्व, निर्माण केलेली वस्तु अथवा साधन ह्या प्रक्रियेमध्ये अनेकांचा असलेला सहभाग ‘परस्परावलंबन’ हे महत्वाचे जीवनमूल्य सांगतो म्हणून. ह्या मूल्याचा आदर केला तर माणूस ‘स्वतःच्या’ पैशाचा संयमाने उपभोग घेईल, कुटुंबाच्या भविष्यासाठी गुंतवणुक करेल पण समाजातील इतरांच्या भल्यासाठीसुद्धा हे धन वापरण्याचा विचार ‘स्वतःहून’ करेल. पैशाच्या गुंतवणुकीकडे पहातानाच दोन कप्पे करेल . . . एक स्वतः आणि कुटुंबासाठी तर दुसरा समाजासाठी.

ज्याच्याकडे बख्खळ पैसे आहेत त्यानेच समाजाचा विचार करायचा असे नाही. मला असा अनुभव आला आहे की ‘परस्परावलंबन’ राखणारी वृत्ती आणि उपलब्ध पैसा ह्यांचा संबंध असतोच असे नाही. आमच्या आयपीएच मानसिक आरोग्य संस्थेला एका कंपनीने भक्कम देणगी दिली. त्या कंपनीच्या प्रवर्तकांना मी आभाराचे पत्र लिहिले. त्यांनी जे उत्तर लिहिले त्यातली एक ओळ अशी, “तुम्ही जरी आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली तरी हा निधी निर्माण करणाऱ्या आमच्या सहाशे सहकाऱ्यांपर्यंत तुमच्या सदिच्छा पोहोचवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.” ह्यालाच म्हणायचे ‘यज्ञवृत्ती.’

यज्ञार्थ आचरी कर्म, अर्जुना मुक्त संग तू. (गीताई अध्याय ३:९)

व्यक्तिगत स्वार्थ हेच ज्याचे प्रयोजन अशा कर्मापासून ‘यज्ञार्थ कर्म’ हा स्वतंत्र गट कल्पिला आहे. अशा कर्मामध्ये परस्परावलंबनाचा आदर असतो, एकहाती मालकीची मग्रुरी नसते, स्वतःबरोबर सर्व संबंधित इतरांच्या सौख्याची योजना असते आणि तरीही फुशारकी मारण्याची आणि मिरवण्याची वृत्ती नसते. ‘मुक्तसंग’ म्हणजे मालकी मिरवण्याचा आसक्तीपासून जो मुक्त झाला आहे तो.

व्यवहारामध्ये आपण अशी माणसे पहातो जी त्यांनी ‘स्वतः’ कमावलेल्या पैशाबद्दल, तो पैसा कुठे आणि कसा साठवला, गुंतवला आहे ह्याबद्दल जवळच्या कुटुंबीयांनाही संपूर्णपणे अंधारात ठेवतात. संकुचित ‘मी’ चे हे एक रूप . . . गेली पंचवीस वर्षे माझ्याकडे येणारे आणि आता पंचाहत्तरी पार केलेले माझे एक ज्येष्ठ पेशंट आहेत . . . ते मला प्रत्येक फॉलोअप व्हिजिटला त्यांच्या एकूण मालमत्तेच्या लेटेस्ट फिगर्स ऐकवतात. . . त्यांचे पैसे आणि त्यांनी त्यांच्या मुलांचे गुंतवलेले पैसे ह्याची किंमत आता अनेक कोटी रुपयांची आहे . . . मी एकदा हळुवारपणे त्यांना गरजू लोकांना करायच्या मदतीबद्दल विचारले. “इतक्या कष्टाने मिळवलेला पैसा मी कुटुंबाबाहेर कशाला देऊ . . . द्यायचा तर फक्त रक्ताच्या नात्याच्या माझ्या नातवा-पणतवंडांना देईन . . . ” ते म्हणाले.

मी म्हणालो, “तुम्ही अतिशय कष्टाने पैसे मिळवले हे मान्य आणि ते कसे वाटायचे हा तुमचा हक्क (आणि हट्ट) हेही मान्य पण परिश्रमपूर्वक मिळालेला पैसा असल्यामुळेच हा हक्क तुम्हाला मिळाला असे म्हणाल तर मग . . . ज्यांना पैसा आयता मिळेल त्यांनी तो कसाही उडवला तरी चालेल असाही अर्थ निघतो . . . समजा पुढच्या पिढीने तुमच्या ‘परिश्रमपूर्वक’ मिळवलेल्या पैशाचा आदर तुम्हाला हवा तसा नाही ठेवला तर . . . आणि तेव्हा तुम्ही कुठे असणार ह्या जगात?”

आता हे गृहस्थ विचारात पडले. जोवर आपण जिवंत आहोत तोवरच ‘मालकीचा हट्ट’ सुरु रहाणार हे त्यांना कळले. परिश्रमपूर्वक मिळवलेल्या पैशामुळे आपला मालकी अग्रहक्क अधिकच तेजाळतो असे अनेकांना वाटते ते किती वास्तववादी आहे ? . . . ‘परिश्रम करणे’ ही काही स्पेशल गोष्ट आहे का? . . . आणि परिश्रम किंवा कष्ट ह्याबरोबर smart work जास्त महत्वाचे नाही का? . . . ‘कष्टाने पै पै जोडून’ हे जर एखाद्या अंगमेहनत करणाऱ्याने म्हटले तर जास्त वास्तववादी ठरेल पण अनेकदा वर्षानुवर्षे गाड्या- एसी ऑफिसेस वापरणारे ‘निढळाचा घाम गाळण्याची’ उदाहरणे देतात तेव्हा गंमत वाटते.

कष्ट आणि परिश्रमामध्ये काही लोक आपल्या प्रचंड वैचारीक, बौध्दिक कष्टांचा उल्लेख करतात . . . त्यांनी हे सारे फक्त पैशासाठीच केले आहे की त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी? . . . असे विचारले की काही जण बॅकफूटवर जातात. कोणतेही काम स्वतःच्या सर्व शक्ती पणाला लावून करणे हा खरे तर जीवनमूल्याचा भाग असायला नको का? पैसा आणि परिश्रम ह्यांचे सरळसोट समीकरण बनवणारे आपापल्या कामातील आनंदापासून स्वतःला पारखे तर करत नाहीत?

काही जण आढयतेसाठी, ‘सचोटी’ने कमावलेला पैसा असे सारखे ऐकवतात. सचोटीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा पर्याय त्यांनी स्वतः स्वीकारलेला असेल तर त्यात स्वतःला विशेष मानायची काही गरज आहे का? आपण जगापेक्षा जास्त नैतिक आहोत असे स्वतःलाच सांगितल्यामुळे आपला रथ काय भुईवरून दोन अंगुळे वर चालणार आहे?

कमावलेल्या पैशावर स्वतःचे ‘स्वत्व’ तोलणे ह्यातून आढयता निर्माण होते . . . ह्या गटातली मंडळी अनेकदा आढयतेचा एक आविष्कार म्हणून देणग्या देतात, दानधर्म करतात . . . प्रत्येक ठिकाणी आपले नाव होईल असेही पहातात. . . . ही काही खरी ‘यज्ञवृत्ती’ नसते.  . . पैसे देऊन प्रसिध्दी वसूल करण्यासाठी काही जण इतरांना आर्थिक मदत देतात.

ज्याच्याकडे पैसा जास्त त्याला प्रतिष्ठा जास्त . . . ह्या धारणेला सर्वसाधारण समाजाने अर्धवट आंधळेपणी स्वीकारले आहे. त्यामुळेच पैशाची श्रीमंती आणि सामाजिक प्रतिष्ठा ह्यामध्ये नातेसंबंध निर्माण झाला आहे. उत्तम ज्ञान, कौशल्य, गुण असणाऱ्यांनाही आपण प्रतिष्ठा देतो; नाही असे नाही . . . पैसे नसणाऱ्या संन्याशालाही देतो. पण तरीही ‘पैसा = प्रतिष्ठा’ ह्या समीकरणामुळे पैशाने श्रीमंत असणाऱ्यांना अहंकाराची एक संधी मिळते.

म्हणजेच, पैशाची ‘वैयक्तीक’ मालकी ही गोष्ट Exclusive, Permanent नाही हे लक्षात घेतले की मर्यादा कळेल. मर्यादा कळली तर नम्रतेकडे जाण्याची वाट सापडू शकेल.

आरती प्रभुंची एक कविता आहे,

ही निकामी आढयता का?

दाद द्या अन शुध्द व्हा.

मैफलीमध्ये बसलेल्या सर्व stiff upper neck श्रोते-प्रेक्षक ह्यांच्यासाठी ह्या ओळी आहेत. ‘मी मी’ पणा सोडा आणि अनुभव घ्या मोकळ्या मानाने . . .

मैफलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली

न्या तुम्ही गाणे घराला, फुल किंवा पाकळी

गाणे अनुभवण्याऐवजी लोक महाग तिकिटाच्या पहिल्या रांगेत बसूनच मैफिलीचे सार्थक झाल्यासारखे वागतात. . . . असे लोक काय नेणार स्वरांची फुले आणि लयीच्या पाकळ्या!

दाद देणे हेही गाण्याहूनि आहे दुर्धर

गुंफणे गजरे दवांचे, आणि वायूचे घट

पैशाची आढयता आली की अनुभवाची तरलता गेली. कवी आपल्याला सांगतोय अरे माणसा मोकळा हो . . . . अंगावरच्या दागिन्यांवरून, सोन्याच्या चैनींवरुन, मणामणाच्या अंगठ्यांवरून स्वतःला नको तोलूमापूस . . . सूरांपुढे नम्र होऊन दाद दे . . . त्या अनुभवातली अमूर्त गोडी अनुभव . . . दवबिंदुचे गजरे आणि वायुंचे घोटीव घट . . . अमूर्तालाही क्षणभर दिठीमध्ये पकडता आले तरी चालेल . . . त्यामुळे पुढचा क्षण प्रसन्न होईल .. .  दंवबिंदुही नष्ट होणार . . . वाराही ओलांडून जाणार पण मनामध्ये तरीही गजऱ्याचा सुवास आणि घटाचा घाट . . . अजूनही सापडेल की तुला.

पैशाच्या श्रीमंतीच्या मग्रुरीमध्ये सारेच अनुभव पैशामध्ये मोजले जातात . . . हळूहळू माणसे, नाती . . . आणि अगदी स्वतःचे असणे देखील . . .

त्यातून बाहेर पडणे म्हणजे ‘शुध्द’ होणे.

त्यालाच गीताई म्हणते ‘मुक्त संग’!

 

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक दुसरा) : माझ्या मनातला पैसा

mazhya manatla paisa

मी लहान असताना माझ्या आईवडलांच्या कधीमधी होणाऱ्या ज्या कुरबुरी कानावर पडायच्या त्यात आईची एक तक्रार असायची की वडील त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी पैसे मिळवतात . . . माझे वडील प्राध्यापक होते आणि त्यांच्या पगाराव्यतिरिक्तचे पैसे ते शिकवण्यातून कमावायचे नाहीत. म्हणजे अनेकांना वर्गाबाहेर शिकवायचे पण ‘शिकवण्या’ करायचे नाहीत. आपला संसार स्थिरपणे चालावा यासाठी माझ्या काटकसरी आईला त्यामुळे खर्चाचा तोल राखावा लागे. आई फणकाऱ्याने म्हणायची, “दोन आण्याची वेणी तर कधी आणली नाहीच  . . . पण मुलांची तरी हौस करायची.”

पण त्या दोघांनी आम्हा मुलांना ‘गरिबी’ हा Feel मात्र कधीच दिला नाही. जे अनुभवायचं ते सुंदरपणे, एकत्र, तृप्तीने . . . त्यामुळे मला माझे बालपण ‘संपन्न’च वाटत आले. छोट्या गावातून मुंबईत यायचो आम्ही सुटीसाठी तेव्हा माझे काही नातेवाईक आणि आम्ही ह्यांच्या रहाण्यातला फरक लक्षात यायचा . . . माझी आणि माझ्या भावंडांची प्रवृत्ती हट्टाकडे वळली नसावी त्याचे एक कारण आमच्या घरी प्रत्येक सण साजरा व्हायचा. राष्ट्रपुरुषांचे दिवस साजरे व्हायचे. टरबूज खाण्यापासून कोजागिरीचे दूध आटवण्यापर्यंत प्रत्येक कृतीचा सोहळा असायचा. पुस्तके नावाच्या वस्तुवर खर्च म्हणजे गुंतवणुक असे मानले जायचे.

साधेपणाला लय असते ती त्या जगण्याला होती. त्याचवेळी आपण दुसऱ्याला खूप किंमती काही नाही दिले तरी भावनेने भरलेले देऊ ही वृत्ती होती. माझे वडील आपल्या प्रत्येक बहिणीला राखी-भाऊबीजेला खास पत्र लिहायचे. घरातल्या सर्वांच्या वाढदिवसासाठी घरातच शुभेच्छा कार्डे बनायची आणि त्याचे कौतुक असायचं . . . निर्मितीचा आनंद आणि खरेदीचा आनंद ह्यांचे हे व्यस्त प्रमाण माझ्या आईबाबांना कसं गवसलं कुणाच ठाऊक . . . पण त्यामुळे पैसे असणे, कमी असणे, नसणे ह्या गोष्टींना फारसे महत्व दिलं गेले नाही.

मेडीकल कॉलेजला आल्यावर मात्र अचानकपणे पैशाचे महत्व नव्याने कळलं. कारण हॉस्टेल मधले रहाणे . . . घरून येणारे पैसे पुरेनात. कारण चांगली पुस्तके (फुटपाथवरून) विकत घेणे, चित्रपट-नाटक-संगीताच्या कार्यक्रमांना जाणे, तऱ्हेतऱ्हेचे खाणे पिणे आणि त्या वयाला साजेसे काही शौक . . . पण वडलांकडे ह्यासाठी पैसे मागायचे नाहीत हे गृहीत पक्के होते. सुदैवाने त्या काळात माझ्या लेखनाला सुरवात झाली. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांसाठी नियमित लिखाण करून मी थोडेथोडे पैसे जोडायला लागलो. शिल्पी नावाच्या जाहिरात संस्थेसाठी योगायोगाने चक्क कॉपीरायटिंग करायला लागलो. कधी भाषांतरे तर कधी जिंगल्स लिहिणे . . . तिथेही पैसे मिळायचे. अशा प्रकारे माझे पूरक उत्पन्न सुरु झाले. त्यात मी खर्चाबरोबरच बचत करू लागलो. पुढे एम.डी. झाल्यावर खाजगी प्रॅक्टिस सुरु करताना जेवढा खर्च करावा लागला तो ह्या बचतीमधून केला. आणि व्यवसाय सुरु केल्यावर तर सुरवातीला तिथून मिळणाऱ्या पैशाचे हिशोब वडलांच्या हातातच सोपवले. पण चारच वर्षांमध्ये वडील वारले आणि कमावलेल्या पैशाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली.

‘स्वतःच्या हिंमतीवर ब्लॉक घेण्याचा निर्णय’ . . . हा अध्याय लवकरच रचला गेला. ‘घेऊन बघ उडी . . . पुढे होते सगळे’ असे म्हणत एका आधुनिक कॉम्प्लेक्समध्ये (१९९१ साली) एक प्रशस्त फ्लॅट बुक केला. आता खरा हिशोबाचा तोल साधण्याचा ताण जाणवायला लागला होता. सारी कर्जे फेडण्यात सहासात वर्षे गेली…  व्यावसायिक रंगभूमीवर मी लिहिलेल्या नाटकाची मानधनेसुद्धा त्यात जायची.

पण ‘स्वतःचे घर’ नावाची भावना प्रबळ होती. ‘आपली कमाई’ असा सूर होता . . . पण घटना अशा घडल्या की १९९७च्या एप्रिल महिन्यात मी त्या ‘स्वतःच्या घराच्या’ बाहेर पडलेलो होतो. त्या घराची मालकी कायदेशीरपणे सोडून देऊन . . .

पैसा नावाच्या गोष्टीच्या ‘येणे-जाणे’ ह्या क्रियेचे टोकाचे अनुभव होते ते. बँकेतली बचत संपलेली, डोक्यावर छप्पर नाही . . . चाळिशीपासून काही वर्षे लांब . ..  जवळ तीन सुटकेसेस आणि लिहिण्यासाठी वापरायचे एक लाकडी डेस्क . . . ‘आर्थिक धूळधाण’ म्हणजे काय ते सांगणाऱ्या त्या क्षणाने मला शिकवले की पैसा ही तुझी पहिली प्रायोरिटी कधीच असणार नव्हती, नाही, पुढेही नाही. इतर कोणत्याही व्यक्तीच्या अनुभवांबरोबर तुलना न करता स्वतःचे पैसेविषयक सत्य स्वतःलाच स्वीकारायला लागते.

पुढे विनोबा वाचायला लागलो तेव्हा त्यांचा दृष्टांत मिळाला. जगण्याची होडी पैशाच्या पाण्यावरून चालवावी हे इष्ट पण म्हणून काही पाण्याला होडीत साठवायचे नाही. तसे केले तर होडी बुडेल.

असे काही जण पहातो ज्यांची स्वतःचीच स्पष्टता नसते की पैसा कशासाठी हवा?

माझ्या दृष्टीने चांगले आणि निरोगी आरोग्य जगण्यासाठी पैसा हवा. म्हणजे त्याला क:पदार्थ का लेखावे. चिमणीने काडी काडीने घर बनवावे तसे मी पुन्हा एकदा घर बसवले. त्याचे कर्ज फेडले. तेव्हाच ठरवले की आपल्या गरजेपुरते छोटे घर घ्यायचे. त्याच्या पलीकडे घर नावाच्या गोष्टीत जीव (आणि पैसा) नाही गुंतवायचा. प्रवास, पुस्तके, खाद्ययात्रा ह्यासाठी पैसे हवेत. जबाबदाऱ्या पार पाडण्याइतपत हवेत. बस्स.

‘किती हवेत पैसे?’ हा प्रश्नही सुटलाच आपोआप. मी सुमारे अठ्ठावीस वर्षे खाजगी वैद्यकीय व्यवसाय केला. सर्वसाधारणपणे माझ्या शहरात जी फी आकारली जायची त्याहून अर्धीच असायची . . . त्यात मी फार ग्रेट असा सोशल त्याग करत नव्हतो. मला किती पैसे हवेत ते स्पष्ट होते म्हणून.

पण पैसे उभे करण्याच्या माझ्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. पस्तीस वर्षांमध्ये माझ्या कार्यासाठी, संस्थेसाठी मी भरपूर पैसे उभे केले . . . त्याचा हिशोबही न ठेवता . . . पण त्यातही त्याग होता असे मला वाटत नाही . . . मानसिक आरोग्य क्षेत्रातील माझा विचार पुढे न्यायचा तर लागणारे एक साधन म्हणजे पैसा.

ही स्पष्टता येत गेली तसे आश्चर्यकारकपद्धतीने आमच्या संस्थेच्या कामाला आर्थिक मदत देणाऱ्यांची संख्या वाढली. त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला की इथे पैसा योग्य कारणासाठी साधन म्हणून वापरला जाईल.

मी कार्यासाठी ‘Fund Raise’ करण्यात वाघ असतो पण मला स्वतःसाठी काही मागावे तर जीभ रेटत नाही. तिथेही खूप समजूतदार माणसे भेटली. दोन वेळा महागडी ऑपरेशन्स करायची वेळ आली तर सर्जन मित्रांनी एक पैशाची फी आकारली नाही.

म्हणजेच माझी भावनिक सुरक्षितता ही काही पैसे नावाच्या गोष्टीबरोबर फिक्स करून टाकायची गरज नाही. भौतिक सुखासाठी पैसा हवा. संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी हवा. भावनिक सुख मिळेल ते इतर अनके गोष्टींमधून . . . अक्षरशः असंख्य गोष्टींमधून.

माझ्या गरजा काय, माझी सोया-सुविधा कोणती आणि माझी ‘चैन’ कोणती ह्या तीन व्याख्या जितक्या स्पष्ट तितकी पैशाप्रति असलेली बांधिलकी कमीजास्त! . . . म्हणजे मलाही कधी अगदी वेगळ्या, उच्च प्रतीच्या हॉटेलात जाऊन खास असा खाजगी भोजन समारंभ करायला आवडतो. पण ती माझी चैन . . . कधीकधी येणारा, शक्यतो आखलेला अनुभव!

सोय आणि सुविधा म्हणजे कामासाठी लागणारा वेळ वाचावा ह्यासाठी केलेला विमानप्रवास . . . लांबचा ट्रेन प्रवास असेल तर दोन किंवा तीन टायरने शीतल प्रवास करणे ही सुविधा. वयाची पंचेचाळिशी पार होईपर्यंत मी सदासर्वदा सार्वजनिक वाहन व्यवस्थेने प्रवास केला. चार चाकी वाहन आयुष्यात आले कारण कामाची गती आणि व्याप्ती वाढली म्हणून. तेही आजवर खाजगी मालकीचे नाही . . . कारण प्रत्येक शहरामध्ये माझ्याकडे अनेक गाड्या हक्काच्या आहेतच की . . .

माझ्या गरजांच्या व्याख्येमध्ये वाचन येते . . . पुस्तके विकत घेऊन वाचणे येते . . . वीस वर्षे सुती-खादी वापरत असल्याने माझा वस्त्र ह्या गरजेवरचा खर्च मर्यादित असतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातले आम्ही सारे ‘समान व्याख्य्या’वाले आहोत . . . त्यामुळे मूळात पैसे कमवायचे किती, खर्च किती-कसे करायचे आणि बचत करून गुंतवायचे किती ह्यामध्ये बऱ्यापैकी एकमत असते.

पण तसे नसेल तर गडबड होण्याची शक्यता खूप जास्त . . . पती आणि पत्नी, आईवडील आणि मुले ह्यांच्या गरज-सुविधा-चैन ह्या व्याख्या जर वेगवेगळ्या असतील तर एका घरात अनेक ‘आर्थिक’ दृष्टिकोन निर्माण होतात. एकसंघता जाते. काही जणांचा भूतकाळ आर्थिक जिकिरीचा असेल तर बाह्य स्थिती सुधारली तरी जुन्या सवयी सुटत नाहीत. काही जण बाह्य आर्थिक स्थिती बदलल्यावर पैसे उधळायला लागतात.

म्हणजे पैसे हे आयुष्यातले साध्य मानायचे की साधन हा निर्णय फक्त पैसे आहेत की नाहीत ह्या वास्तवावर अवलंबून नसतो. गरिबी किंवा श्रीमंती ही अंशतःच बँकबुकात अथवा तिजोरीत असते. उरलेली वृत्तीमध्ये असते.

आदिवासी समाजातून येऊन डॉक्टर आणि आयएएस झालेल्या डॉ. राजेंद्र ह्या तरुणाबरोबर गप्पा मारत होतो एकदा. धुळे जिल्ह्यातल्या पाड्यामधली त्याची बालपणातली आठवण तो सांगत होता. पावसाळी रात्र होती. झोपडी गळत होती. चिरगुटांच्या सोबतीने कुडकुडण्याला काबूत ठेवत मुले पावसाकडे पहात होती. राजेंद्रचे काका त्यांच्या वहिनीला म्हणजे राजेंद्रच्या आईला म्हणाले, “ह्या पावसामध्ये आपली ही परिस्थिती तर गरिबांचे काय होत असेल . . . ” राजेंद्र सांगतो की त्या क्षणाने मला शिकवले की जगण्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा बाह्य परिस्थितीपेक्षा जास्त महत्वाचा आहे.

हे तत्व लक्षात येणे आणि जगण्यात उतरणे म्हणजेच मनाची श्रीमंती.

होडीमध्ये पाणी शिरायला नको असेल तर स्वतःच्या मनाचे इतके सारे प्रशिक्षण करायला हवे!

 

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक पहिला) : पैसा आणि माणसाचे मन

paisa

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला दर्यावर्दी स्पॅनिश सैन्याने मेक्सिकोमधल्या अॅझटेक जमातीवर हल्ला केला तेव्हा स्थानिक लोकांना राहूनराहून आश्चर्य वाटत होते की ह्या लोकांना ​पिवळ्या रंगाच्या चकचकीत धातुबद्दल एवढे आकर्षण का ? … ह्या धातुचे ही काही उपयोग होते निःसंशय पण स्थानिक लोक खरेदी-विक्रीसाठी वापरायचे कोकोच्या बियांचे चलन. आपल्यासाठी सामान्य असणाऱ्या धातुसाठी आटापिटा कशाला हे विचारले एकाने स्पॅनिश म्होरक्याला. “मला आणि माझ्या मित्रांना एक विलक्षण हृदयरोग जडला आहे ज्याचा उपचार फक्त आणि फक्त सोनेच करू शकतं.” स्पॅनिश नेत्याचे उत्तर.

पैसा आणि माणूस ह्यातले असोशीचे नाते तर आहेच ह्या उत्तरामध्ये पण आणखी एक मुद्दा आहे … पैसा म्हणजे कवड्या, नाणी, नोटा, धातु नव्हेच … पैसा म्हणजे जडवस्तूचे अस्तित्व नव्हे. पैसा ही मुळातच एक ‘मानसिक -सामाजिक- सांस्कृतिक प्रतिकव्यवस्था’ आहे. माणसाच्या सामुहिक कल्पकतेचा गरजेनुसार बनलेला हा एक अविष्कार आहे. परस्परविश्वास नावाची भावना नसेल तर एकतरी चलन चालेल का? खरेतर पैसा हे विश्वासाचे चलन आहे. विश्वासाखेरीज क्रयशक्ती नाही. डॉलरच्या नोटेवर ट्रेझरी सेक्रेटरीची सही असते आणि ‘In God We Trust’ लिहिलेले असते. भारतीय नोटेवर रिझर्व बँकेच्या मुख्याधिकाऱ्याची सही आणि राष्ट्रपुरुषाच्या छबीचे आशीर्वाद….

जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वी सुमेरियन संस्कृतीमध्ये केलेली कुशीम नावाच्या माणसाची (की अधिकाऱ्याची) पहिली सही ही अकाउंटंटची आहे …  राजाची नव्हे, प्रेषितांची नव्हे की कवीची नव्हे…. तेव्हापासून माणसाच्या व्यवहारांवर, (भौतिक आणि भावनिक)पैसा ह्या कल्पनेचे अधिराज्य सुरू आहे. म्हणजे शिंपले असोत की नाणी भावना महत्त्वाची. आज जगातील नव्वद टक्के पैसा तर कॉम्प्युटरच्या सर्व्हरवरच तर आहे. आज आपण ‘इलेक्ट्रॉनिक डेटा’च वापरतोय पैसा म्हणून.

मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्था टिकली त्याचे एक उत्तर जसे विश्वास तसे दुसरे उत्तर आहे सोय! पैशामुळे आज जगात आपण अक्षरशः कशाचेही रूपांतर कशातही करू शकतो. अनंत वस्तू देऊ-घेऊ शकतो … आणि मुख्य म्हणजे पैसे ‘साठवू’ शकतो.

ह्या टप्प्यावर अजून एक मानसिक अवस्था जन्म घेते. साठवणुकीतून निर्माण होणारी सुरक्षितता. पैसा असेल तर आपण ‘काहीही’ देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट विकाऊ आहे ह्या विचारामुळेच पुढचा (फिल्मी पण वास्तवातलाही) डायलॉग येतो की “हर आदमी की भी किमत होती है। “

‘पैसा’ नावाच्या संकल्पनेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये गंमतीदार पैलु आहेत. भाषा, प्रांत, राजवटी, विचारधारा ह्या पलीकडे जाण्याची क्षमता इतिहासकाळापासून पैशामध्ये आहे. मध्ययुगामध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान ह्यांच्यामध्ये धर्मयुद्धे आणि रक्तपात होऊनसुद्धा दोन्ही धर्मांच्या निशाण्या असलेली चलने दोन्ही देशांमध्ये त्याच किंमतीने आणि हिंमतीने चालत राहिली. आजही जगाच्या बहुतेक देशांमध्ये तुमच्याकडे डॉलरची नोट असेल तर तुमचे अडणार नाही. एकमेकांना अजिबात ओळखत नसलेले वेगवेगळ्या देशातील लोक डॉलरच्या नोटेला प्रमाण मनात एकमेकांबरोबर सहकार्य करतात… प्रचंड विश्वासाने. खरेतर पैशाची खरी ‘पॉवर’ ह्या व्यवहारामध्ये आहे.

जागतिक रूपांतरीतता (Universal convertibility) हे पैसा हे कल्पनेचे एक सामर्थ्य आहे आणि सहकार्यावर आधारित विश्वास हे दुसरे!

आता आपण त्यातल्या त्रासदायक बाजूकडे येऊया.

माणसाची संस्कृती, कुटुंबव्यवस्था यामध्ये एक मूलभूत कल्पना आहे ती अशी…. सर्वच वस्तूंचे /सेवेचे /वर्तनाचे /नात्याचे मूल्य करता येत नाही…. काही व्यवहार ‘अमूल्य ‘ म्हणजे priceless म्हणजे पैशापलीकडचे असायला हवेत. उदाहरणार्थ आत्मसन्मान, निष्ठा, स्नेहभाव, नैतिकता ह्या गोष्टी बाजारातील क्रयविक्रयाच्या पलीकडे असल्या पाहिजेत.

अगदी देवाण-घेवाण आणि क्रयविक्रयावर आधारित सेवा असली तरी त्यातील ‘उत्कृष्टता’ अमूल्य असावी. जे.आर.डी. टाटांच्या चरित्रामध्ये एक आठवण आहे. पूर्वीच्या एअर इंडिया कंपनीच्या विमानातून प्रवास करताना हे चेअरमन स्वतःला प्रवाशाच्या भूमिकेमध्ये ठेऊन अगदी बारकाईने नोंदी करायचे. ह्या नोंदी संबंधितांपर्यंत पोहोचतील ह्याची खात्री करायचे. एका प्रवासासंदर्भातील नोंद अशा अर्थाची आहे की, “मी लिहितो आहे त्या चेअरमनच्या आज्ञा म्हणून घेऊ नये. ही निरीक्षणे कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी वापरू नये. उत्कृष्ट सेवा देणे ही आपली निष्ठा असायला हवी.” यापुढची निरीक्षणे अशी. विमानाच्या खुर्च्या जेव्हा पाठी रेलतात त्यांच्या कोनामधली असमानता काढायला हवी. प्रवासी जिथे हात ठेवतात ते हॅन्डल्स बदलायला हवेत. चहा आणि कॉफी ह्यांचा रंग समान कसा? प्रवासामध्ये डार्क बिअरपेक्षा लाईट बिअर असेल तर प्रवाशांसाठी ते जास्त चांगले … जेआरडींची तळमळ आहे ती दर्जा आणि गुणवत्ता ह्या गोष्टींना ‘प्रवासी आणि भाडे’ ह्या समीकरणाच्यावर उचलण्याची.

नात्यांबद्दलही असेच म्हणता येईल. गुरूने शिष्याला विद्या द्यायची ती गुरुदक्षिणेवर डोळा ठेवून नव्हे…… मी ज्यांच्याकडून वेदान्त तत्वज्ञान शिकतो ती जोडीगोळी आहे निमा आणि सूर्या!  निमा ही युनोमध्ये अधिकारी होती तर सूर्या हा एस.पी. जैन संस्थेमध्ये मॅनेजमेंटचा प्राध्यापक आहे. हे दोघे माझे जवळचे मित्रमैत्रीण ही आहेत. त्यांचे पाच-सहा दिवसांचे वर्ग मी करतो. सकाळी आठ ते रात्री नऊ… दहा ते पंधरा विद्यार्थी…. शेवटच्या दिवशी मी एक रक्कम चेकवर लिहून त्यांना देतो. त्यातला ‘व्यवहार’ संपतो. उरलेला सारा काळ ह्या दोन हुशार आणि जग पाहिलेल्या लोकांबरोबरची बौद्धिक, भावनिक मेजवानी.

म्हणजेच मानवी संबंधामध्ये पैसे हे चलन, पैसा ही सुरक्षितता, पैसा ही सत्ता ह्यापलीकडचे काहीतरी आहे असे संस्कृतीचा एक प्रवाह सांगतो.  दुसऱ्या बाजूला ‘पैसा म्हणजे सर्वकाही’ हा दृष्टीकोन खास करून अलीकडच्या काळामध्ये ह्या साऱ्या तटबंद्यांना तडे पाडू लागला आहे.

     वैकुंठीची पेठ / हवा पैका रोख;

     किरकोळ ठोक / मिळे मोक्ष.

आध्यात्माच्या दुकानदारीमध्ये मोक्षही हॊलसेल आणि किरकोळ मिळू शकतो.

     लज्जा सांडोनिया / मांडीत दुकान

     येई नारायण / उधारीला !

एकदा नैतिकता सुटली आणि फक्त क्रयविक्रय आला तर देवही उधारखाती पडणार.

     अवघाची संसार / सुखाचा करावा;

     आनंदे भराव्या / सर्व बँका.

विंदा करंदीकरांच्या ह्या अभंगामध्ये एक ‘रोकडे’ सत्य आहे. पैसा जरी वैश्विक विश्वास पैदा करत असला तरी हा विश्वास ना माणसामध्ये रूजतो ना मूल्यांमध्ये. पैशाला विश्वास असतो फक्त पैशामध्येच. देणाऱ्याघेणाऱ्याच्या हातामध्ये नाही, मनामध्ये तर नाहीच नाही. अशावेळी जगाचा भावनारहीत बाजार बनण्याची शक्यता स्पष्टपणे दिसू लागते.

म्हणून पैसे कमावणे, खर्च करणे, गुंतवणे ह्या साऱ्याकडे पहाण्याचा समतोल कसा साधावा ह्या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

मनआरोग्याचे नवेनवे अनुभव

tecahers at akole

अहमदनगर जिल्ह्यामधले अकोले नावाचे गाव (विदर्भातले अकोला हे जिल्ह्याचे गाव वेगळे). अत्यंत निसर्गरम्य पण डोंगराळ प्रदेशातले गाव. तिथे मी पोहोचलो ते भाऊसाहेब चासकर नावाच्या धडपड्या शिक्षकाच्या आमंत्रणावरून …. भाऊच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमधून महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षकांचा एक स्वयंसेवी गट कार्यरत आहे. त्याचे नाव ‘अॅक्टिव्ह टीचर्स फोरम’! गेल्या मे महिन्यामध्ये मी ह्या सर्वांसाठी ज्ञानसंवादाचे एक गप्पासत्र नाशिकमध्ये घेतले होते. अकोल्याहून बारा किलोमीटरवर भाऊची शाळा आहे. अकोले गावामध्ये चाळीशी पार केलेले आणि पाच हजार विद्यार्थी असलेले महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या सभागृहात माझा कार्यक्रम होता. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी रस घेतला होता. श्री. कुमावत हे गटशिक्षणाधिकारी हजर होते. सकाळी अकराच्या ठोक्याला सुमारे चारशे शिक्षक-शिक्षिका हजर होते. ह्यातले अनेकजण तीस-चाळीस किलोमीटर्सचा प्रवास करून आले होते. विषय होता ‘शिक्षकांसाठी तणावनियोजन’ ! भाऊसाहेब चासकर मला प्रश्न विचारत होते. मी उत्तरे देत होतो. सारे शिक्षक तल्लीन होऊन ऐकत होते. टिपणे काढत होते. मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. शहरी शिक्षकांच्या गटात सहसा पहायला मिळणार नाही अशी एकाग्रता होती. हॉल भरल्याने मी काहीजणांना थेट स्टेजवरच बसायला बोलावले. त्यामुळे आमच्या गप्पाच सुरु झाल्या …. चक्क दोन तास आमची मानसिक आरोग्यावर प्रश्नोत्तरे झाली.

कार्यक्रम संपल्यावर नववी-दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी माझ्याबरोबर फोटो काढले. कारण नववीच्या कुमारभारतीमध्ये मी लिहिलेला धडा आहे. त्यांना हा फोटो शाळेतील मुलांना दाखवायचा होता. एका शिक्षकांनी तर माझ्या पाठावरची माझीच प्रतिक्रिया बरोबर दोन मिनिटे रेकॉर्ड केली. आता ‘व्हॉटस् अॅप’वर शेअर करू म्हणाले. अनेक शिक्षक मला कार्यक्रम संपल्यावरही प्रश्न विचारत होते. त्यांना ऊर्जा मिळालेली पाहून मलाही समाधान वाटले.

महानगरामध्ये माहितीचे अजीर्ण झाल्याने असेल किंवा आत्मकेंद्रित गतीमुळे असेल, बाहेरच्या इनपुट्सची फार किंमत असेलच असे नाही. पण दुर्गम भागात आपण काही ज्ञान- माहिती शेअर करावी तर ती पटकन स्वीकारली जाते.

empty hal at sangamner

अकोले गावापासून वीस-बावीस किलोमीटरवरच्या  संगमनेर गावात आलो. आणि एका अद्ययावत शाळेत गेलो. शाळेचे नाव ‘स्ट्रॉबेरी’…. संज्योत वैद्य आणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभी केलेली आधुनिक शाळा …. उपक्रमशील शाळा. ह्या वातावरणात एक वेगळा चटपटीतपणा होता. विद्यार्थ्यांनी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कलाप्रदर्शन भरवले होते. त्याचा आस्वाद घेतला…. शाळेच्या संगीत विभागात भरपूर वाद्ये होती. आणि मुले त्यांचा वापर करत होती. खेळाच्या सोयीसुद्धा छान होत्या. उत्तम ग्रंथालय होते.

संगमनेर परिसरातल्या शाळा, सामाजिक गट, सांस्कृतिक कार्यकर्ते ह्या सर्वांच्या भेटीगाठी करत होतो कारण २०१८ पासून हे शहर ‘वेध जीवनशिक्षण परिषदे’च्या नकाशावर चढणार आहे. दुपारीच सर्व कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली. दर दोन महिन्याला मनआरोग्याचे कार्यक्रम कसे घेता येतील त्याची आखणी झाली. प्रत्येक शहरातील वेध कार्यकर्त्यांचा गट म्हणजे मनआरोग्याचे व्यासपीठ बनायला हवं. (अधिक माहिती www.vedhiph.com)

full hall

ही बैठक आटोपते तोवर संध्याकाळच्या व्याख्यानाची वेळ झाली. ‘आग्र्याहून सुटका आणि महाराजांचे आपत्तीकालीन व्यवस्थापन’ हा विषय. सोळा ऑगस्टची संध्याकाळ ….. महाराज निसटले तोच दिवस आणि जवळजवळ तीच वेळ ! सभागृह आठशेच्यावर श्रोत्यांनी फूल !जवळजवळ दिडशे विद्यार्थ्यांना मी भारतीय बैठकीत बसण्याचे आवाहन केले. त्यांनी तत्परतेने प्रौढांना खुर्च्या खाली करून दिल्या. तरीही सभागृहाबाहेर शे-दोनशे लोक व्याख्यान ऐकत होते. इतका छान आणि समंजस श्रोतेवर्ग मिळाल्यावर मिळाल्यावर अशी बहार आली तो थरार वर्णन करताना …. दोन तास सलगपणे सारे शिवगौरवामध्ये जणू सचैल स्नान करत होते. इतिहास आणि मनआरोग्य …. एक वेगळाच आकृतिबंध … त्यातून विचार-भावना-वर्तनाच्या नियोजनाची अनेक तत्वे सांगता येतात. इतिहासाचा धागा वर्तमानाशी प्रभावीपणे जोडता येतो.

over foll hall

सतरा ऑगस्टच्या संध्याकाळी शिर्डी शहरातल्या व्याख्यानाचा विषय होता ‘ह्या मुलांशी वागायचं तरी कसं ?’….. सभागृहातील चारशे खुर्च्या भरूनही मंडळी दाटीवाटीने उपस्थित. पुन्हा ऐकण्याची उत्तम तयारी करून आलेले श्रोते … संवादाच्या लयीमध्ये कणाचाही रसभंग नाही. दोन्ही व्याख्यानांमध्ये अगदी योग्य ठिकाणी आणि समरस होऊन हशा, टाळ्या असे प्रतिसाद येत होते. शिर्डीचा कार्यक्रम आयोजित केला होता अश्वमेध फाऊंडेशनतर्फे. डॉ. ओंकार जोशी हा शिर्डीतील मनोविकारतज्ज्ञ. अगदी धडपड्या उत्साही तरुण ! त्याच्या आईवडिलांनी सुरू केलेले जोशी हॉस्पिटल म्हणजे गेल्या चार दशकांपेक्षाही जास्त काळ; शिर्डीतील जिव्हाळ्याचे ठिकाण !

आता ह्याच रुग्णालयात ‘मानसिक आरोग्या’चा विभाग ओंकारने सुरू केला आहे. सलग दोन दिवस रोजचे सात तास मी त्याच्या हॉस्पिटलमधल्या संपूर्ण टीमचे प्रशिक्षण घेतले.

ही कल्पनाच भारी होती. ओंकारचे आईबाबा म्हणजे ज्येष्ठ डॉ. श्री. व डॉ. सौ. जोशी … त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. दोन दिवस ओपीडी बंद … जवळजवळ तीस जणांना घरातून नाश्ता-जेवण… आणि प्रशिक्षणाची संधी.

मोठ्या शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये सुद्धा वॉर्डबॉय, नर्सेस, टेक्नीशियन, फार्मासिस्ट, आरएमओ, ऑफिस स्टाफ अशा साऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतले जात नाही. ओंकारने कष्टपूर्वक ह्या ट्रेनिंगमध्ये काय कव्हर व्हायला हवे त्याचे टिपणचं मला पाठवले होते. प्रभावी रूग्ण संवाद, संघनियोजन कौशल्य, इमर्जन्सी हाताळण्यातील कौशल्य, परस्पर सुसंवाद, प्रभावी निर्णयक्षमता असे अनेक पैलू होते ह्या प्रशिक्षणाला. अनेक खेळ, अॅक्टिव्हिटीज ह्यांचा त्यात वापर होता. रोल प्लेज होते. छोट्या चित्रपटांचा रसास्वाद होता.

मी आणि आय.पी.एच. संस्थेतील माझी सहकारी इरावती जोगळेकर असे दोघे होतो. ओंकारची पत्नी प्रिया ही पॅथॉलॉजिस्ट आहे. ती सुद्धा उत्साहाने सहभागी झाली होती.

दोन दिवस आम्ही साऱ्यांनी अक्षरशः हैदोस घातला …. सर्वजण विलक्षण उत्साहाने सहभागी होत होते. वातावरणामध्ये खेळकर मोकळेपणा होता. वॉर्डातील मावश्या आणि वॉर्डबॉयसुद्धा मस्त बोलते झाले होते. ..  मुख्य म्हणजे मला जे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते ते पोहोचत होते …. ओंकारचे आईबाबा प्रसिद्ध आहेत ते प्रसूतीतज्ज्ञ म्हणून. आता ओंकार त्याला जोडतो आहे मानसिक आरोग्याचा भाग. ‘जोशी हॉस्पिटल .. जन्म ते पुनर्जन्म’ असे बोधवाक्य आम्ही ह्या कार्यशाळेतून तयार केले.

पंचतारांकित रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मी प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेले आहेत …  इथे मंडळी त्या अर्थाने ‘शहरी पॉलिश’ असलेली नव्हती. साधेपणातील सौंदर्य भले सोफिस्टिकेटेड नसेल पण त्यातला गावरान गोडवा किती छान असतो. ह्या सगळ्या स्टाफने स्वयंस्फूर्तीने कार्यशाळेच्या शेवटी माझा आणि इरावतीचा सत्कार केला.

निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये असे भरगच्च तीन दिवस घालवल्यावर परतीच्या प्रवासात विचार करत होतो… Motivation …. Inspiration … स्फूर्ती … प्रेरणा … ह्या विषयांवर शहरांमधल्या आलिशान हॉटेलांमध्ये, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ; भले मोठे शुल्क लावून कार्यशाळा घेतात. आणि असे शुल्क भरण्याची ताकद असणारी(च) मंडळी ह्या कार्यशाळांना हजेरी लावतात ….

स्फूर्तीचा आणि प्रेरणेचा स्रोत किती व्यापक प्रमाणात आणि व्यापक पद्धतीने पोहोचायला हवा आहे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये … तोही कमीतकमी झगमगाट करून … मनापासूनचा थेट संवाद साधून …

संगमनेरच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणानंतर लोकांच्या गराड्यात होतो. कुणी प्रश्न विचारत होते तर कुणी फोटो काढून घेत होते. पन्नास ते साठ वयोगटातील एक गृहस्थ अचानक अमोर आले. म्हणाले, “मी कल्पनासुद्धा केली नव्हती की कधीकाळी तुम्हाला भेटेन … दहा वर्षांपूर्वी मी खूप निराश झालो होतो. परिस्थितीने गांजलो होतो… आत्महत्येचे विचार वारंवार मनात यायचे … तेव्हा तुमची दोन पुस्तके लागोपाठ वाचली … स्वभाव- विभाव आणि विषादयोग… वारंवार वाचली … स्वतःला सावरलं … आज तुमच्यासमोर उभा आहे. धन्यवाद …”

त्या गृहस्थांनी माझे हात हातात घेतले. मी अवाक होऊन ऐकत असतानाच ते म्हणाले, “पुनर्जन्माबद्दल आभार डॉक्टर !”

आणि जसे गर्दीतून आले तसे पुन्हा विलीन झाले.

“अजून काय मिळवायचं असतं लेखकाला आयुष्यात…” माझ्याजवळ उभे असलेले एक ज्येष्ठ गृहस्थ बोलून गेले …. भारावलेल्या अवस्थेत मी मान डोलावली.

…. आणि आभार मानले माझ्या शास्त्रशाखेचे … मानसिक आरोग्यातील माझ्या सगळ्या गुरूंचे आणि सतत शिकवणाऱ्या रूग्णांचेदेखील.