मृत्यूला नवे परिमाण : आत्मनिष्प्राण

आपण सगळेजण जगण्यासाठी जितके धडपडतो त्याचे मूळ नेमके कशात बरे असेल ? . . . विज्ञान आपल्याला सांगते की सार्‍या उत्क्रांती प्रवाहाच्या मुळाशी आहे जगण्याची प्रेरणा . . . स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची ही आदिम इच्छा विश्वामध्ये जेव्हा पहिला जीव उत्पन्न झाला तेव्हापासूनच होती. Survival म्हणजे अस्तित्व टिकवणे हे व्रत अगदी एकपेशीय अमिबापासून  सर्व प्राणिमात्रांमध्ये दिसते. बरे फक्त अस्तित्व टिकवणेच नाही तर त्याचा प्रवाह (Continuity) राखणे हा सुद्धा आद्य इच्छेचाच भाग . . . म्हणजे जीवसृष्टीची रचना ही ‘जगण्या’भोवती झाली. पण त्याच रचनेचा एक अपरिहार्य भाग आहे विलय . . . मृत्यू ! मग ते झाडाचे निष्पर्ण होणे असो की माणसाच्या प्राणाचे उडून जाणे.  उत्पत्ती आणि लय ह्यांचा हा चक्राकार प्रवास माणसाला जेव्हा ‘कळला’ तेव्हा काय झाले असेल . . . साधारण सत्तर हजार वर्षे लोटली ह्या घटनेला असे शास्त्रज्ज्ञ  मानतात . . . माणसाला ‘मी’ची जाणीव झाली. ‘आत्मभाव’ गवसला. ज्या क्षणी ‘मी’ आला त्याच क्षणी ‘तो’ निर्माण झाला, ‘आम्ही’ निर्माण झाले . . . काही काळातच ‘मी’ला कळले की ह्या ग्रहावरचा त्याचा निवास कायमचा नाही. ‘मी’ची जाणीव, ते भान नव्हते तेव्हा जगण्यालाही ‘अर्थ’ नव्हता आणि म्हणूनच मरणालाही नव्हता.

आता मात्र ‘माझा’ जन्म-मृत्यू ही कल्पना मेंदूत तयार झाली. पुनरोत्पादनामध्ये निर्माण होणारी पिले ‘माझी’ संतती झाली. प्राण्यामध्येही पिल्लाबद्दलचा आदिम ‘माझा’भाव असतो. माणसाने त्यात हळूहळू ‘वात्सल्य’ ह्या भावनेची भर घातली. संवर्धन हे मूल्य विकसित केले. पण ती फार पुढची गोष्ट.  ‘मी’ आता आजूबाजूला जन्म आणि मृत्यू अनुभवायला लागला. जन्म म्हणजे बेरीज . . . बेरीज म्हणजे वाढ . . . वाढ म्हणजे आनंद. कनेक्शन लावले मेंदूने. मृत्यू म्हणजे उणे . . . मृत्यू म्हणजे वजाबाकी. हे सर्किटही तयार झाले. आणि अशाप्रकारे ‘जगणे’ झाले नॉर्मल. मरणे झाले त्रासदायक. जगण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेमध्ये समूहाचा सहभाग ठळक होत गेला. विविध कौशल्यांची माणसे एकत्र आली आणि टिकली तर जगण्याचा दर्जाही सुधारतो असे लक्षात आले. आता माणसाचा मृत्यू म्हणजे त्या ‘कौशल्या’चाही मृत्यू. त्यामुळे वजाबाकीला एक डायमेन्शन अधिकचे मिळाले. पुढे स्थायी जीवनपद्धती निर्माण झाल्यावर नात्यांमधील भावनिक गुंतवणूक वाढली आणि गुंतागुंत सुद्धा. आता मृत्यूबरोबर, मृत आणि राहिलेली व्यक्ती, राहिलेला समूह आणि मृत व्यक्ती ह्यांच्या नात्याचीही अखेर होते हे सत्य लक्षात आले. आणि शरीर नसतानाही ‘मनात’ नाते टिकू शकते हे कळले. त्या नात्याला जगवण्याचे, उजळवून किंवा काळोखून टाकण्याचे प्रकार आले. मृत्यू म्हणजे स्मरणाच्या माध्यमातून विविध भावनांची ‘उजळणी’ करणारा अनुभव झाला. 

माणसाचा सामाजिक-सांस्कृतिक पसारा वाढला तो गेल्या दहा हजार वर्षांमध्ये. कारण बारा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला. भटका माणूस स्थायी झाला . . . स्थानिक झाला. पूर्वी भटक्या माणसाला लोभ आणि मोह, दोन्ही मर्यादित असायचे. आता हा एका वातावरणात गुंगला, गुंतला . . .स्वामित्वाची भावना आली, सवयींचा आपलेपणा आला. अनुभवांमध्ये विविधता आली. नात्यांना स्थैर्य आले. आणि त्यामुळे माणसाच्या आनंदाची जातकुळी बदलली. ‘चांगले’ जगणे जसजसे आकर्षक बनायला लागले तेवढा जगण्याचा मोह वाढायला लागला. आणि मृत्यू नकोसा होऊ लागला. पिरॅमिडच्या बंदिस्त अवकाशात जपले जाऊ लागले मृत्यूनंतरचे जीवन. त्याचवेळी माणसाच्या ‘विचारी’ मेंदूने जगण्याचा आणि मरण्याचा ‘अर्थ’ लावायलाही सुरुवात केली. साधारण चार-पाच हजार वर्षांपूर्वी माणूस ह्या टप्प्यावर आला की त्याला मृत्यूचे ‘भय’ वाटायला लागले. त्या भयावर मात करायला कर्मकांडे आली. स्वर्ग-नरकाच्या कल्पना आल्या. पुनर्जन्माची थियरी निघाली . . . उद्देश एकच, मृत्यूच्या भयावर मात. अमृताच्या प्राप्तीसाठीच्या देव-असुरांच्या कहाण्या आपल्याला जगण्याची आसक्ती दाखवतात. एकीकडे तत्त्वज्ञानाची वाट सांगत होती की जन्म-मृत्यू म्हणजे फक्त ‘व्यक्त-अव्यक्त’ असा बदल ! पण ययातिच्या कहाणीतला राजा मात्र स्वतःचे सामर्थ्य पणाला लावतो कशाला तर तारुण्य राखण्यासाठी . . .  थोडक्यात जगण्याचा सोस. 

अशाप्रकारे सारेच मृत्यू दुःखदायक होत गेले. जरामरण म्हणजे वार्धक्यामुळे आलेला मृत्यू त्यातल्या त्यात कमी असह्य. जर वीरमरण म्हणजेच उच्च ध्येयासाठी झाला मृत्यू तर तो अधिक श्रेयस्कर . . . दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणे हा सुद्धा मृत्यू. पण तरीही तो उच्च मानला गेला . . . कारण त्यात जीवनाला टिकवण्याचा हेतू होता. एका माणसाने दुसऱ्याचा प्राण ‘घेणे’ हे कधी न्याय्य समजावे तर कधी अन्याय्य, कधी नैतिक कधी अनैतिक ह्याचे संकेतही निर्माण झाले. तुलनेने सारे ‘अकालमृत्यू’ हे अधिक दुःखद. कारण ते कदाचित्  टळले असते, टाळता आले असते तर . . . म्हणजे टाळता येऊ शकणारा मृत्यू जर घडला तर वेदना जास्त. आणि जर माणसाने स्वतःच्या हाताने स्वतःची प्राणज्योत मालवली तर . . . हा तर अतिशय वेगळा, अकालमृत्यू. त्याची दाहकता विशेष ! . . . आपण अशा व्यक्तीचा अंत टाळण्यासाठी पुरेसे असे काही नाही करू शकलो ह्याची तीव्र खंत किंवा मॅनेजेबल रुखरुख राहणारच पाठी राहिलेल्यांच्या मनात. 

तर मग अशा माणसाच्या मनात नेमके काय बरे होत असेल ? ते सर्वांना समजून घेता येईल का ? आणि त्यातून आपली व्यक्ती, कुटुंब, समाज म्हणूनची ‘आत्मनिष्प्राण’ ह्या घटनेला समजून घेण्याची कुवत वाढवता येईल का ? . . . काय झाले आहे, आत्महत्या-आत्मघात-आत्मनाश हे शब्द जजमेंटल आहेत. ते जणू त्या व्यक्तीलाच ‘चुकीची’ ठरवतात. समजून नाही घेत. त्या तुलनेत ‘स्वतःच स्वतःचा प्राण घेणे’ ह्या क्रियेला ‘आत्मनिष्प्राण’ असे का म्हणू नये ? ही क्रिया नेमकी कशी घडते मनामध्ये ते समजण्यासाठी आपण शारीरिक आजारांच्या एका गटाचे उदाहरण घेऊ. त्या गटाला म्हणतात, Auto-immune Disorders. ह्या आजारात काय होते . . . शरीराच्या रोगप्रतिकारशक्‍तीच्या प्रतिनिधी असलेल्या पांढऱ्या पेशींना एक समज असते . . . ‘आपला’ कोण आणि ‘परका’ कोण हे ह्या पेशींना नेमके कळते. बाहेरून बॅक्टेरिया किंवा व्हायरस् आला तर त्याच्या विरोधात ह्या पेशी मोहीम उघडतात. कधी कधी मात्र असे घडते की ह्या पेशी त्याच शरीरातल्या ‘आपल्या’ असणाऱ्या पेशींना ‘परके’ मानायला लागतात. त्यांच्यावरच हल्ला करतात. त्यातून अनेक शारीरिक त्रास उद्भवतात. शरीराच्या अनेक संस्थांना ह्या आजाराचा उपद्रव होतो. महत्त्वाचा मुद्दा काय तर बाह्य आक्रमणाविरुद्ध वापरायची रणनीती आप्तस्वकीयांवरच वापरली जाणे. रुमॅटॉईड आर्थ्रायटीस, मल्टिपल स्क्लेरॉसिस, एसएलई, ग्लुटेन सेन्सिटिव्ह एनंटेरोपॅथी अशी अनेक नावे आपल्या कानावर पडत असतात. ते आजार ह्या गटात येतात. लहान वयात होणाऱ्या मधुमेहाच्या मागेसुद्धा हा घटक असावा असे काही शास्त्रज्ञ मानतात. 

‘आत्मनिष्प्राण’ प्रक्रियेमध्ये नेमके असेच होते. सुमारे शंभर हजार वर्षांपासून माणसाच्या मेंदूमध्ये आदिम भावना निर्माण झाल्या. त्या कशा ? . . . तर त्या आदिमानवाला हरघडी सामना करावा लागायचा जगण्याला आव्हान देणाऱ्या जीवशास्त्रीय धोक्यांना. कधी जंगली जनावरे, कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी दुसऱ्या टोळ्यांची माणसे. ह्या धोक्यांना तोंड देण्यासाठी त्याच्याकडे तीन पर्याय होते. 

  • आक्रमण = FIGHT
  • पळ काढणे = FLIGHT
  • भिजून जाणे (लपून बसणे) = FREEZE

ह्या तीन पर्यायांबरोबरच आदिम भावना निर्माण झाल्या. 

FIGHT = संताप (Anger)

FLIGHT = भीती (Fear)

FREEZE =  नैराश्य (Depression)

म्हणजे हे तिन्ही पर्याय वापरायचे होते स्वतःच्या संरक्षणासाठी. जीवशास्त्रीय धोक्यांचा सामना करायला. पुढच्या काळात, संस्कृतीचा विकास झाला आणि आव्हानांमध्ये भर पडली ती मनोसामाजिक आव्हानांची . . . त्या प्रवासामध्ये मेंदूमध्येही अधिक विचारी प्रगत भावना आणि विकासाकडे  नेणाऱ्या उन्नत भावना तयार झाल्या . . . परंतु ‘धोका : Danger : Challenge’ आले की प्रथम जागृत होतात आदिम भावना. त्या आहेत मेंदूच्या हार्डवेअरचा भाग ! 

बाह्य आव्हानांना तोंड देण्यासाठी वापरायच्या ह्या भावना !. . . ‘परक्या’साठी वापरायच्या आहेत. स्वतःसाठी नाही. परंतु मनाच्या प्रतिकारशक्तीमध्ये असा बदल होतो की ह्या आदिम भावना स्वतःच्याच विरोधामध्ये वापरल्या जाऊ लागतात. ह्या तीव्र भावना स्वतःच्याच विरोधात कशा वापरल्या जातात त्यावर मानसशास्त्रज्ज्ञ कार्ल मेंनींजर ह्यांनी प्रकाश टाकला आहे. आत्मनिष्प्राण करण्याचा हेतू असणाऱ्या व्यक्तीच्या मनात असणार्‍या भावनांचे त्यांनी तीन गटांमध्ये वर्गीकरण केले. हे तीन प्रधान हेतू असतात, स्वतःचा प्राण घेण्यामागे असे त्यांचे म्हणणे. 

To kill = Anger : (मरून मारणे = क्रोध) 

‘मला ‘आत्मनिष्प्राण’ क्रिया करून उरलेल्यांना अद्दल घडवायची आहे. मी काही ह्यांना सोडणार नाही. अगदी माझ्या मृत्युनंतरही नाही.’ 

To Die = Fear = (मरण हाच पर्याय = जगण्याची भीती)

‘जगण्याची इतकी भीती वाटते आहे मला . . . इतके असह्य झाले आहे जगणे की एकच वाट आहे पळण्याची . . .  ह्या परिस्थितीपासून स्वतःला सोडवण्याची . . . आत्मनाश.’ 

To get killed = Depression : (प्राण जाऊ देणे = नैराश्‍य) 

‘काही अर्थ राहिला नाही जगण्यामध्ये. जे काही आहे त्याला जगणे कशासाठी म्हणायचे ? . . . हे आहे श्वासोश्वास सुरू असलेले मरणच. म्हणजे फक्त श्वास तर बंद करायचाय्.’

आत्मनिष्प्राण करण्यामागचा हेतू, भावना आणि त्यावेळची विचारधारा म्हणजेच मानसिक प्रतिकारशक्तीचा स्वतःवरच केलेला घाव. शारीरिक प्रतिकारशक्ती जेव्हा अशी चूक करते तेव्हा कुणी त्या चुकीसाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरते का ? . . . तिच्या कुटुंबियांना जबाबदार धरते का ? . . . नक्कीच नाही. 

शारीरिक प्रतिकारशक्तीप्रमाणेच मानसिक प्रतिकारशक्तीसुद्धा प्रत्येकवेळी बिनचूक वागत नाही. कारण स्खलनशीलता (Falliability) हा संपूर्ण जीवसृष्टीचा गुणधर्म आहे. प्रत्येक निर्मिती पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही . . . म्हणून तर उत्क्रांतीचा प्रवाह आहे. म्हणजे Suicide Prevention अर्थात् आत्महत्या प्रतिबंधक असे वेगळे काही करण्याची गरज नाही. मानसिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे सर्व प्रयत्न हे आत्मनिष्प्राण प्रतिबंधनाचे असणारच आहेत. मानसिक प्रतिकारशक्ती तीन पद्धतीने सशक्त करायची. भावनिक नियमन, विवेकनिष्ठ विचार आणि विधायक वर्तन !

म्हणजेच व्यक्ती ‘जगण्याचे’ सॉफ्टवेअर का नाकारते ? तर ऑटो-इम्यून चूक होते म्हणून. ‘आपले’ आणि ‘परके’ ह्यातला भेद जसा शारीरिक पातळीवर नष्ट होतो तसाच तो भावनिक-वैचारिक पातळीवर होतो म्हणून . . . ह्याचा अर्थ असा की ‘आत्मनिष्प्राण प्रवृत्ती’ हा एक व्हायरस आहे, जो ‘आयुष्’ ह्या सॉफ्टवेअरला तात्पुरते निकामी बनवतो. बारकाईने पाहिले तर ध्यानात येईल की आत्मभाव म्हणजे ‘सेल्फ’चे सत्व निर्माण होणे ही उत्क्रांतीमधली जीवनाभिमुख, विकासाभिमुख प्रक्रिया होती. त्या ‘आत्मभावा’लाच ‘संपूर्णपरभाव’ मानणे हा मानसिक प्रतिकारशक्तीच्या मुळावरचा घाव आहे. 

आता ह्या ‘ऑटो-इम्यून’ चुकीच्या तीन वेगळ्या प्रजाती आहेत किंवा उपगट आहेत.

  • Acute Auto immune Mind Error : हा तीव्र स्वरूपाचा झटका ज्यामध्ये विचार आणि भावनांचा ‘आपपरभाव’ हरवतो आणि माणसाची मानसिक प्रतिकारशक्ती स्वतःवरच हल्ला करते. ह्याला रुढ मानसशास्त्रीय भाषेत Impulsive Attempt of DSH (Deliberate Self Harm) असे म्हणतात. 
  • Chronic Auto immune Mind Error : ह्या प्रकारामध्ये हा व्हायरस हळूहळू पसरतो. व्यक्तीची खात्री पटते की ही अवघड अवस्था कायमची राहणार आणि सुटका होण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा एकमेव पर्याय आहे आत्मनिष्प्राण प्रक्रिया सुरू करणे. 
  • Acute on Chronic, Autoimmune Mind Error एकंदर मानसिक प्रतिकारशक्ती काही प्रमाणात खच्ची झालेली असते. त्यावर असे काही ताजे आघात होतात की काठावरचा समतोल पूर्णपणे अस्ताव्यस्त व्हावा. 

‘मनाची चूक’ अर्थात् विचार-भावनांचा गोंधळ झाल्यामुळे व्यक्तीचे त्यावेळचे स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे जजमेंट चुकते. ते जजमेंट का चुकते ? . . . त्याचे कारण आहे त्या क्षणी मानसिक प्रतिकारशक्तीचा ‘आपपरभाव’ हरवणे . . . व्यक्तीला नाही दोष द्यायचा. परिस्थितीलाही नाही. दैवालाही नाही . . . मानसिक प्रतिकारशक्तीमधली एक अत्यंत महागडी चूक ! . . . पण चूकच ! 

संपूर्णपणे टाळू शकतो का आपण ही चूक ? . . . उत्तर नकारात्मक आहे. चूक टाळण्याचे कसोशीचे प्रयत्न करू शकतो का ? . . . त्याचे उत्तर होकारात्मक आहे. कसे ? 

जगण्यातील सर्व शक्यतांकडे समतोल बुद्धीने कसे पाहावे हा ह्या प्रतिबंधक वाटेचा पाया हवा. ‘जगणे सुंदर आहे, त्याचा स्वीकार करा’ अशा घोषणा काही टिकणार नाहीत. कारण सर्वसाधारण जगण्यामध्ये सुद्धा सगळे अनुभव सुखद नसतात. ऑटोइम्यून चूक काय करते तर समतोल दृष्टिकोनावर घाला घालते. जगणे महाकठीणच नव्हे तर अशक्य झाले आहे असे सतत स्वतःला सांगते. आणि स्वतःच स्वतःचा नाश करणे हे अपरिहार्य, उपयुक्त आणि नैतिक मानते. ही तीनही विशेषणे महत्त्वाची आहेत. मला जर जगण्याबरोबर डील (Deal) करण्याची एकही वाट दिसत नसेल तर माझा मृत्यु अपरिहार्य होतो. असे केल्याने माझी सुटका होईल म्हणजे उपयुक्त. आणि अशा परिस्थितीमध्ये ही कृती ‘योग्य’ आहे हे सुद्धा तो स्वतःला सतत सांगून स्वतःभोवती ‘नैतिक’ आवरण तयार करतो. ह्या चुका सुधारण्याचे आणि कमीत कमी होऊ देण्याचे शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार करायचे ते मनाची आघातप्रतिकारशक्ती वाढवण्याचा एक भाग म्हणून. 

त्यामध्ये व्यक्तीला दोषी धरण्याचे कारण नाही. कायद्याच्या दृष्टीने पूर्वी, जीव देणे आणि जीव घेणे ह्यांना एकाच पद्धतीने पाहिले जायचे. त्यामुळे आत्महत्या करणे ह्या गोष्टीला गुन्ह्याचे स्वरूप होते. ‘आत्महत्या करायला प्रवृत्त करणे’ असाही भाग कायद्यामध्ये आहे. मुळामध्ये ‘ऑटोइम्यून एरर’ एखाद्या व्यक्तीमध्ये ॲक्टिव्ह असताना त्या व्यक्तीला नॉनजजमेंटल स्वीकाराची गरज असते. तसा न मिळणे म्हणजे ताप आलेला असताना झालेले कुपथ्य. आता काही जण असे ‘मुद्दाम’ किंवा हेतुपूर्वक करत असतील तर तो गुन्हा मानायचा की नाही हा प्रश्न कायदा क्षेत्रातील तज्ञांचा. पण तसे करताना मूळ व्यक्ती स्वतःचा जीव घेत होती हे कायद्याविरोधी आहे हा सूर राहतोच. ‘ऑटोइम्यून एरर’ प्रमाणे आपण त्या ‘व्यक्ती’ला ‘गुन्हेगार’ म्हणून पाहतच नाही आहोत. म्हणून मनोविकारशास्त्रातला DSH अर्थात Deliberate Self Harm हा शब्दही Auto-immune self-harm करायला हवा. कारण Deliberate ह्या शब्दामध्ये त्या व्यक्तीची ‘जबाबदारी’ दाखवलेली आहे. 

आत्मनिष्प्राण कृती करणार्‍यांचा एक गट असा असतो जिथे त्यांना थेट प्राण घेण्याची इच्छा नसते तर अशी कृती अगदी नियंत्रित स्वरूपामध्ये करून काही भावनिक फायदे उठवायचे असतात. अशा प्रयत्नांमध्ये त्यांच्यातील काही जण अपघाताने तीव्र अशा परिणामांना सामोरे जातात. म्हणजे व्यक्तीचा अंदाज असतो की, झोपेच्या ‘क्ष’ संखेच्या गोळ्या खाल्ल्या तर त्रास होईल पण जीव जाणार नाही. प्रत्यक्षात तसे घडत नाही. गंभीर परिणाम होतात. मला असे वाटते की ही सुद्धा ऑटोइम्यून प्रक्रियेची सुरुवात मानली पाहिजे. कारण इथेही ती व्यक्ती स्वतःला त्या त्या क्षणापुरती ‘नॉनसेल्फ’ मानायला लागली आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिकही अशा प्रयत्नांना ‘नवटंकी’ म्हणतात असे मी पाहिले आहे . . . हॅम्लेटच्या प्रसिद्ध वाक्याचा आधार घेत आत्मनिष्प्राण करण्याचा निर्णय घेणाऱ्यांची तीन गटांमध्ये विभागणी केली आहे.

  • To be = आपण आता वाचले त्याप्रमाणे ती ऑटोइम्यून चुकीची सुरुवात असेल. 
  • To be or Not to be =  मानसिक प्रतिकारशक्ती दोलायमान झालेली आहे. इथे ‘चूक’ किंवा error अधिक तीव्रतेकडे जात आहे. 
  • Not to be = सर्वात् तीव्र स्वरूपाचा एपिसोड. इथे व्यक्तीची खात्री झाली आहे की स्वतःलाच ‘परका’ मानून ‘त्या’ व्यक्तीचे प्राण घ्यायचे आहेत. आत्मभावाचे संपूर्ण परभावामध्ये रूपांतर ! 

म्हणूनच आत्मनिष्प्राण कृती ही Distress म्हणजे भावनिक तणावाची तीव्र आणि टोकाची परिणिती आहे आणि ती होण्यासाठी ऑटोइम्यून चूक कारणीभूत ठरते असे आपण म्हणू. व्यक्तीचे वय, शिक्षण, समज, व्यक्तिमत्व, कर्तृत्व ह्यापैकी कोणत्याही घटकाचा असे घडण्याशी Exclusive म्हणजे खास एकमेव संबंध नसतो. म्हणजे ‘इतका प्रतिभावान तरी असे कसे केले ?’ किंवा ‘असे करताना आपल्या माणसाचा, अगदी स्वतःच्या मुलाचा विचारही कसा केला नाही ?’ असे विचार आपल्या मनात येतील. परंतु अशावेळी मनाची सारी आघातप्रतिकारशक्ती स्वतःवरच उलटते हे ध्यानात घेऊन आपण त्या व्यक्तीवर लेबले लावणार नाही. 

मेजर डिप्रेसीव्ह डिसऑर्डर किंवा इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर अशी निदानांची लेबले आम्ही मनोविकारतज्ज्ञ लावत असतो पण ही ऑटोइम्यून भूमिका केंद्रस्थानी धरून विवेकनिष्ठ मानसोपचार किंवा सीबीटी ह्या मानसशास्त्रीय शाखांमधून एखादा प्रतिबंधक प्रशिक्षणक्रम तयार करता येईल का ह्याचाही विचार केला पाहिजे. आपल्या जवळची एखादी गुणवान् व्यक्ति जेव्हा आत्मनिष्प्राण कृती करते तेव्हा आपण सारेच विद्ध होतो. आणि ‘आपल्या हातात काय असणार’ असा विचार करत स्वस्थ बसतो. पुन्हा एकदा आपल्या दिनचर्येला लागतो. त्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देतो. माध्यमे आणि समाजमाध्यमे कोणते मुद्दे चघळत राहतात. तर नेमकी कुणाकुणाची जबाबदारी घटनेमागे ? आरोप-प्रत्यारोप आणि संशयाचे धुके निर्माण होते. कधी जाणीवपूर्वक उभारले जाते. पण वैयक्तिक आणि सामुहिक ‘आघात प्रतिकारशक्ती’ वाढवणे ह्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे प्रमाण कमी असते. आत्मनिष्प्राण क्रियेला ‘गुन्हा’ म्हणून न पाहावे असा दृष्टिकोन नुकत्याच पारीत झालेल्या मनआरोग्यामध्ये आलेला आहे. त्यापलीकडे जाऊन ह्या व्यक्तीला सामाजिक, नैतिक दृष्टीकोनातून ‘दोषी’ असाही शिक्का न लावता जे वर्तन घडले ते का घडले आणि ते टाळण्यासाठी काय करावे ह्यांच्या विस्तृत पर्याययोजना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. त्यामध्ये छंदांबद्दलचे प्रोत्साहन असू दे की व्यापक ध्येयाची दृष्टी देणारे प्रशिक्षण . . . त्या सगळ्यांमध्ये निरोगी आणि विनाअट आत्मस्वीकाराचे तत्त्व कसे अधोरेखित करायचे त्याचे इनपूटस् द्यावे लागतील. 

विशिष्ट प्रसंगांमध्ये विशिष्ट व्यक्ती अशा का वागतात ह्या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर मिळणे कठीण आहे. परंतु त्या प्रश्नाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन सर्वांपुढे ठेवण्याचा हा प्रयत्न ! . . . त्यावर सांगोपांग चर्चा व्हावी आणि त्यातून मनाच्या ह्या ऑटोइम्यून आजारावर उपचार आणि प्रतिबंधनासाठी नवी दिशा मिळावी अशी इच्छा आहे. 

  • डॉ. आनंद नाडकर्णी

          

Leave a comment