अचानक आलेल्या आगंतुक कविता

‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..

. प्लॅटफॉर्म 

तिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो

उद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.

स्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,

दोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण !

किती छान ना …

सराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात

निरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून ?

​खरंच किती छान.

. जळण्याची लय 

नाही मिळत तर जावं झुलत

आपल्याच मस्तीत गावं भटकत

बंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,

किंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;

कुणी सक्ती नाही केलेली.

नाही मिळत तरी जावं फुलत

एकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता

दाट जंगलातलं नवं झाड शोधत.

नाही मिळत तरीही जावं खुलत

फ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत

डोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं

आतल्या आत रहावं जळत.

जोपर्यंत जमत नाही म्हणायला

नाही मिळत तर गेलात उडत !

3. तुझा डिपी माझे मन

नवा डिपी चढला तुझा

तेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..

नव्याने नेसलेल्या साडीची

नव्हाळी ल्यालेली एक किशोरी

पहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे

की….

मीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात

अन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये

की…..

भविष्याचा वेग घेणारी प्रौढा….

विचारासोबत मनाला खेचणारी

की….

माझ्या मनावर पाखर घालणारी

माझी ढगात हरवलेली आई

की…..

माझी जीवाभावाची मैत्रीण

जगण्याच्या प्रवाहात गमावलेली

की….

तुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या

आणि Deciding Perspective

तेवढा माझा…!

. श्रद्धांजली 

अर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,

तर आवरशील रडणं,

अन् लागशील पुन्हा कामाला.

आठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.

नक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.

अर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,

करशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत

एवढे सारे केल्यावरती

थकलेल्या तृप्त क्षणी,

समजा आलीच माझी आठवण

तर आवरशील रडणं

अन् लागशील पुन्हा कामाला.

. बालपुरूष 

रडूनभेकून थकलोय् खरा

पण मी काही हट्टी बाळ नाही.

मनातली आई तुझ्या,

झाली आहे जागी, करतेय् माझे लाड;

शरीरातला पुरूषही माझ्या

झोपून गेलाय् का गाढ ?

६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात 

ओसंडून वहाणारी समृद्ध घागर

नवी बाग शिंपण्यासाठी.

हातालाच रोपे फुटली

तर किती बहार होईल…..

नाहीतर आहेच,

ग्रीनहाऊसमधल्या झाडांचं

बेतलेलं वाढणं….

आखलेलं वागणं.

७. हवेचा हलका झोका, 

डोलणारी समजूतदार पानं….

जाणवलं…. ते बरंच झालं.

थांबलो तरी.

नाहीतर पसरवतच होतो मूठभर माती

त्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.

. कलचांचणी 

क्षमता…. कळूनही न वळणाऱ्या

आवडी…. उत्तरोत्तर बदलणाऱ्या

व्यक्तिमत्व…. अजूनही भेलकांडणारं

आणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.

करणार कशी ‘कल-चांचणी’?

विकलतेचे Aptitude Testing.

जगण्याच्या कलत्या काळात ?

. चॅप्टर 

“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”

 टकटकच्या लयीत तो म्हणाला.

काहीसा खडसावून, भरड आवाजात.

“कळतंय रे…. पण अडचण आहे;

चॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.

पुन्हापुन्हा प्रयत्न करूनही….”

“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.

दिसेनासा झाला….

आता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे

बाइंडिंगची उसवणारी शिवण,

झाकून टाकली की सारं कसं…..

दिसायला नॉर्मल.

 

Advertisements

विनोबांची साथसंगत…..

(ह्या लेखाची पार्श्वभूमी कळण्यासाठी ‘विनोबांचे दर्शन’ हा लेख वाचावा. त्याची  link आहे.  https://manogati.wordpress.com/2016/09/20/दर्शन-विनोबांचे )

म्हणता म्हणता विनोबांचा संवादाच्या तिसऱ्या सादरीकरणाची वेळ आली. एम. के. सी. एल. ने आयोजित केलेला हा कार्यक्रम झाला पुण्याच्या टिळक स्मारक सभागृहामध्ये.  सर्व वयोगटातील मंडळींनी नाट्यगृह भरुन ओसंडत होते. अध्यक्षस्थानी होते डॉ. राम ताकवले आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील जाणते श्रोते उपस्थित होते. विनोबांबद्दल बोलताना नेहमीसारखीच तंद्री लागली. तीन तासाचा कार्यक्रम संपन्न झाला. बाबाने (अनिल अवचटांनी) फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात तो लिहितो, “काल आनंद नाडकर्णीचे विनोबा या विषयावर व्याख्यान झाले. केवळ अप्रतिम. त्याचा थक्क करणारा अभ्यास, त्याने केलेली त्या विषयाची आधुनिक मानस शास्त्राशी जोडणी, त्याने छोट्या गोष्टींची अधून मधून केलेली पोषक पखरण… वा वा, तृप्त झालो, पण तृप्ती नंतर तुस्त न होता तल्लख झालो ! मागच्या पिढीतील अनेक उत्तम वक्त्यांनी भाषणे ऐकलेली. पण या भाषणाची जातकुळीच वेगळी. – बाबा “

अॅड. असीम सरोदेच्या बाबांचे यवतमाळहून पत्र आले. बाबासाहेब सरोदे लिहितात, ” आपले सर्वांगसुंदर, अभ्यासपूर्ण ऐकण्याचा योग घडून आला. आनंद अनुभवला. वयाच्या ९व्या वर्षी चौथ्या वर्गात असताना विनोबांचे प्रथम दर्शन घडले. आमच्या वडिलांनी १९५४ साली विनोबांच्या भूदान यज्ञामध्ये ६० एकर जमीन दिली. दहा आदिवासी परिवार (आजही) उत्तम प्रकारे उदरनिर्वाह करत आहेत. “

विनोबांचे अभ्यासक डॉ. मिलींद बोकील हजर होते त्यांनी कळवले, “कालचा ‘विनोबा संकीर्तनाचा’ कार्यक्रम बहारदार झाला. प्राचीन परंपरेला तुमचे आधुनिक योगदान”

प्रा.सुरेन्द्र ग्रामोपाध्ये लिहितात, “विनोबांना अपेक्षित असं कर्म, विचार, भाव यांचं आचरण तुमच्याकडून घडत असल्याने माझ्यासारख्या ‘जड’ माणसाला विनोबा ‘भेटले’. “

पुणे वेधचे संयोजक दीपक पळशीकर सरांची प्रतिक्रिया, “विनोबाजींनी भेटल्याचा प्रत्यय आला. मी दहा वर्षाचा होतो. विनोबा आमच्या घरी आले होते. आम्ही बडोद्याला होतो. माझे वडील आणि विनोबाजी धुळ्याच्या जेलमध्ये एकत्र होते.”

अनुरूप विवाह संस्थेच्या गौरी कानिटकरने लिहिले, “सर कालचा विनोबांवरचा कार्यक्रम अप्रतिम झाला. सत्य, ब्रह्मचर्य, तन्मयता हे सगळं भावलं आणि माझ्यात बदल घडवून आणण्याची इच्छा निर्माण झाली.”

असे खूप एसएमएस, मेल्स आले. रेणुताई गावस्करांना एसएमएस असा होता, “डॉक्टर, आपल्या कालच्या भाषणाच्या संदर्भात पुण्यात हलचल माजली आहे.” अनेक तरुण श्रोत्यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिल्या. मी ह्या सादरीकरणाचे पुस्तक करावे अशा सूचना आल्या.

त्या दिवशी कार्यक्रमाला हजर होते वाईचे फडणीस सर. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. २१ जानेवारी २०१७ ला विनोबांची वाईमध्ये येऊन १०० वर्षे पूर्ण होणार. त्याच्या पूर्वसंध्येला वाईमध्ये हे सादरीकरण करायचे. मी अर्थात होकार दिला. वाईचा कालखंड विनोबांच्या घडणीतला अत्यंत महत्वाचा.

वाईच्या कार्यक्रमाला पवनार आश्रमाच्या कालिंदीताई, विनोबांचे चरित्रकार विजय दिवाण, भूदान अभ्यासक पराग चोळकर अशी महनीय माणसे उपस्थित होती. माझी जेष्ठ मैत्रीण चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे खास पुण्याहून वाईला आली होती. पुन्हा सभागृह भरगच्च. आजची समाधी काही वेगळीच. वाईच्या संदर्भात जरा जास्त तपशीलात बोललो. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर साताऱ्याहून आले होते ऐकायला. माझी पाठ थोपटत म्हणाले, “तू महाराष्ट्रातला आजघडीचा सर्वोत्तम प्रवचनकार आहेस.” (गंमत म्हणजे नेमकी अशीच शाबासकी मला वसईच्या फादर फ्रॅन्सीस डिब्रीटोंनी दिली. असो.) कालिंदीताई गहिवरून म्हणाल्या, ” माझा बाबा भेटला रे मला…”

सुमित्रा आणि मी तर रात्रीसुद्धा गप्पा मारत राहिलो. तिला बनवायचा आहे विनोबांवरचा चित्रपट. हे तिचे, माझे तसेच बाबाचे आणि अभयदादाचे (डॉ. अभय बंग ) समान स्वप्न आहे. पैसे देणाऱ्या निर्मात्याचा शोध  सुरु आहे. वाईहून परतलो आणि दोन दिवसातच पोहोचलो लातूरला. लातूरच्या आमच्या वेधच्या कार्यकर्त्यांनी, ‘ विनोबा स्वचे विसर्जन’ हा कार्यक्रम तिकिटे लावून ठेवला होता. आणि आठशे लोक तिकिटे घेऊन आले होते. पुन्हा एकदा तोच अनुभव… मराठी म्हणवणाऱ्यांना, भारतीय म्हणवणाऱ्यांना विनोबा किती कमी ठाऊक आहेत. आचार्य अत्र्यांनी लिहिलेला ‘विनोबा कि वानरोबा’ हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला लेख ठाऊक आहे काहींना पण त्यानंतर काही वर्षांनी अत्रे साश्रु डोळ्यांनी विनोबांना भेटल्याचे ठाऊक नाही. त्या क्षमेचा क्षणाच्या साक्षीदार होत्या कालिंदीताई. वसंत साठ्यांनी विनोबांनी लिहिलेले ‘अनुशासन पर्व’ हे शब्द देशभर प्रसिद्ध केले पण त्यानंतर विनोबांनी काढलेले ‘?’ असे प्रश्नचिन्ह मात्र स्वतःकडेच गोठवले… आणि विनोबा तर प्रथमपासूनच समजगैरसमजांच्या पलीकडे. त्यांना जे योग्य – अयोग्य वाटायचे ते मांडायला ते कचरले नाहीत. पितास्थानी असलेल्या गांधीजींच्या उत्तर आयुष्यातल्या ब्रम्हचर्यविषयक प्रयोगांबद्दलची नापसंती विनोबांनी स्पष्ट शब्दात नोंदवली आहे. विनोबांचा अभ्यास करताना त्यामागची संगती स्पष्ट होते. विनोबांच्या मते ब्रम्हचर्य हे ‘शरीरसुखाचा निग्रहपूर्वक त्याग’ एवढयापुरते सीमित नव्हतेच. याचा उहापोह माझ्या सादरीकरणामध्ये आहे.

विनोबा म्हणतात की माझ्याकडे स्वतःचे असे ज्ञान नाही. मी फक्त इतर सर्वांनी निर्माण केलेल्या ज्ञानधनाचा ‘फुटकळ विक्रेता’ आहे. ह्या न्यायाने माझी भूमिका फेरीवाला किंवा रस्त्याच्याकडेला बसलेल्या सर्वात फुटकळ विक्रेत्याबरोबरच करायला हवी. विनोबांचे विविध विषयांवरचे विचार मांडताना मी त्यात तल्लीन होतो आणि प्रत्येक सादरीकरण वेगळे होते हे मात्र खरं.

पहिल्या कार्यक्रमाला वर्ष व्हायच्या आतच पाच शहरांमध्ये पाच भरगच्च कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने वारंवार विनोबांच्या अधिकाधिक जवळ जायला मिळत आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी ‘कबीर कालातीत’ ह्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. चोवीस जूनच्या संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या ह्या कार्यक्रमातील निरूपणाचे शब्द माझ्याकडून येतील पण कबीराचा भाव स्वरातून उमटणार आहे महेश काळेच्या गळ्यातून… कबीर आणि विनोबा.. खरेतर एकाच माळेचे मणी.. एकेका मण्याला समजून घेतले तर माळेचा प्रवाह समजून घेताना आनंद वाढतो…समजलेले इतरांना सांगताना ते समाधान दशगुणित होते… स्वतःकडून जगाकडे. विनोबांच्या शब्दात, ‘जय जगत!’

  • एम. के. सी. एल. आयोजित कार्यक्रमाची चित्रफीत पाहता येईल https://youtu.be/2BmxGSasMIE ह्या लिंकवर. रंगमंचावरून दाखवलेले पॉवरपॉइंट फार स्पष्टपणे दिसत नाही आणि ध्वनीची गुणवत्ताही फार दाणेदार नाही. त्यामुळे आस्वादात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमा करावी. पण हा कार्यक्रम अंशतः तरी अनुभवता यावा ह्यासाठी हा दृश्य दस्तावेज उपयुक्त ठरावा.