एटू लोकांच्या देशात इंदूआजी !

आजी-नातवाचे  रसाळ नाते माझ्या वाट्याला येऊन चक्क वीस वर्षे  होऊन गेली हयाची जाणीव मला दुःखदपणे झाली ती एक ऑगस्टच्या पहाटे …. मी होतो दापोलीजवळच्या चिखलगावी. लोकमान्यांवरचे माझे भाषण, त्याच्या स्मृतीदिनी, त्यांच्या जन्मगावी देण्यासाठी. भल्या पहाटे पुण्याहून बाबाचा (अनिल अवचट ) फोन  खणखणला …. “अरे ….आजी गेली ….” शहाण्णव वर्षाची इंदूआजी म्हणजे बाबाची आई. अवचटांच्या पत्रकारनगरातील घराचे वेगळे आपलेपण सुनंदा (डॉ. अनिता अवचट) च्या जाण्यानंतर टिकवले ते आजीने……

सुनंदा  गेल्यावर ओतूरच्या परंपरागत वाडयामधून आजी पुण्याला बाबासोबत राहायला आली आणि मायलेकांच्या खऱ्या सहजीवनाचे एक नवे पर्व सुरू झाले, बाबा आणि आजी दोघांचेही एकमेकांशी जन्मनाळेचे  नाते…..  पण ते ‘डिसकव्हर’ झाले ह्या वीस वर्षांमध्ये. सुनंदाच्या नंतर काही काळामध्ये आजोबाही (आजीचे पती, बाबाचे बाबा) गेले…… आणि बाबाच्या घराबाहेरच्या  छोट्या पॅसेजमध्ये आजीची रांगोळी रोजची सजायला लागली. आधी घराला सुनंदाचे वळण होते, आता आजीचे…. बाबा कोणत्याच  वळणात न बसणारा…. त्याचा ‘सरळ ‘पणा भलताच वेलांटीवाला. पण घराच्या अवकाशात, बाबाच्या खोलीतील पसारा आणि विरुद्ध कोनामध्ये आजीच्या कॉटभोवतीचा ‘संसार’ असा इलाखा तयार झाला. दोघेही एकमेकांच्या राज्यातील अंतर्गत व्यवस्थेत ढवळाढवळ  करत नसत. त्या दोघांसोबत रहाणारी सहसेविका ज्योती हा या दोघांमधला दुवा. आजीला भांड्याकुंड्यांची मोठी हौस. सारे आयुष्य घरासाठी राबूनसुद्धा तिचा घरातला उत्साह जोरदार असायचा.

दर महिन्याच्या माझ्या भेटीमध्ये संध्याकाळच्या वेळी पूर्वी मी आणि बाबा पुण्यातील हॉटेल्स पालथी घालायचो. पण गेल्या काही वर्षांमध्ये मी जेवायला घरीच थांबायला लागलो. कारण “आनंद यायचाय् …… ” नावाची योजना आजीच्या डोक्यात तयार व्हायला लागायची. त्यात रात्रीच्या जेवणातली भाजी, कोशिंबीर, चटणी, पापड असायचे. उत्तम, सुग्रास चारीठाव स्वयंपाक खायचा तर आजीच्या पुण्याच्या घरी. मला सकाळच्या नास्त्याला काय आवडते ह्यावर नेहमीचीच पण नव्याने खलबते व्हायची आणि त्यातून साबुदाणा खिचडी किंवा सालंकृत पोहयासारखा (कांदा, बटाटे, शेंगदाणें, मटार, खोबरे, कोथिंबीर) बेत तयार व्हायचा…. हे परवाच्या जूनपर्यंत पूर्ण उत्साहात सुरु होते.

माझे आणि बाबाचे खाऊन झाले की बाबा आजीसाठी सकाळचे भक्तीगीत नेमाने म्हणायचा. आजी आणि बाबाची ‘मंगल प्रभात’ असे त्या कार्यक्रमाला माझे नाव होते. माझा सहभाग सिद्ध ​करण्यासाठी मी डायनिंग टेबलावर तबला वाजवून साथ करायचो…. या मासिक नेमालाही आता किती वर्षे झाली. गाणे पूर्ण झाले की बाबा आजीला वाकून नमस्कार करणार आणि आजी त्याच्या केसातून हात फिरवत आशीर्वाद देणार… शेवटच्या दृश्यामध्ये त्यांची वये आहेत अनुक्रमे ७४ आणि ९६ वर्षे!

आजीबरोबर गप्पा मारताना सविता (माझी बायको) एकदा म्हणाली, “आजी तुझ्यावेळचे कोणीच आता जिवंत उरले नाही….. त्याचा त्रास नाही का होत?…”

“अगं त्या त्या वेळचे जगणे आणि त्या त्या वेळची नाती…. तेव्हा तू कुठे होतीस माझ्या आयुष्यात? नवे जगणे, नवी नाती…” आजी म्हणाली.

आजीने घरातून बाहेर न पडता तिचा स्वतःचा असा मस्त गोतावळा जमवला होता. अवचटांचे कुटुंब, बाबांचे बृहत कुटुंब याखेरीज ‘खास’ आजीने जमवलेली मंडळी होती. एकदा आजी फोनवर बराच वेळ कुणाशीतरी बोलत होती. फोन ठेवल्यावर बाबाने प्रश्नार्थक नजर केली. त्यावर आजीचे मिश्किल उत्तर, “आमचं आपलं काउन्सिलिंग !”

फोनवरून आठवले, आमचा मुलगा कबीर पोटात होता तेव्हा सविताला आजी (फोनवरच) म्हणाली. “आता फोनचा हँडसेट वापरणे बंद करायचे. वायरचा फोन असेल तिथे जाऊन तो घ्यायचा …. सतत हालचाल व्हायला हवी.”

सतत हालचाल हे आजीचे ब्रीदवाक्य होते. आता आतापर्यंत ती घरात छान अॅक्टिव्ह असे. आजी आणि बाबा ह्यांचा दिवस लवकर सुरु होत असे. उत्तररात्रीच म्हणा ना. आजीचा नातू अक्षय म्हणायचा, “आमच्या घरी पहाटे उठायची स्पर्धा असते.”

शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने आणि नंतर त्याचे लग्न होईपर्यंत हा अक्षू घरी असायचा. तेव्हा तीन पिढ्या त्या घरात एकत्र नांदायच्या. त्यालाही खाण्यामध्ये भरपूर रस असायचा. त्याचे आणि आजीचे अगदी मेतकूट. तो आजीला कोणतेही (अक्षरशः कोणतेही) प्रश्न विचारायचा. “आजी… आजोबा स्वतः डॉक्टर असूनही तुला आठ-आठ मुले कशी झाली.?… कुटुंब नियोजन वगैरे काहीच नाही.” आजीची विकेट काढायच्या खुमखुमीने अक्षूने एकदा विचारलं…. “अरे… त्यात काय…. त्या काळात लाईट नसायचे… मनोरंजनाची साधने नाहीत.. दुसरं काय होणार!” आजीने शांतपणे पण नेहमीची मिश्किल लकेर त्यात घालून अक्षूचाच त्रिफळा उध्वस्त केला.

आजीचे सर्वांबरोबर जमायचे . त्याला वयासारखेच विषयाचेही  बंधन  नसायचे .  शरीराची नाहीतर मेंदूची  सतत  हालचाल असायची .गेल्या वर्षी सविता तिला  म्हणाली , “लसणाचे  दाणे  सोलून फोडणीत घालण्याऐवजी कधीकधी सालासकट, लसूण दुखवून फोडणीत टाकली तर वेगळी चव येते.” दोन महिन्यानंतर आजीचा सविताला फोन …….. “बरोबर ग तुझे म्हणणं ……. आज तशी फोडणी केली आणि मस्त चव आली.”

रसपूर्ण जगायचे, साधे जगायचे पण येणाऱ्या प्रत्येकाला  सहभागी करून …..  आजी कधी तिच्या तरूणपणाच्या गप्पा करायची .लग्न  होऊन घरात आली तेव्हा सख्खी  धरून चार सासुबाई होत्या घरात, त्यातल्या दोन आलवनातल्या. पहाटे तीनला विहिरीतून पाणी  भरण्यापासून दिवस चालू व्हायचा. सततचे काम. त्यात बाळंतपणे. “अंगावर सोने असायचे पण हातात पैसा नसायचा…….. बांगड्या भरायलाही कासार घरी यायचा …… सासरे लुगडी आणून  वाटायचे ….. रंग निवडायचीही मुभा नव्हती …” आजी तिच्या आयुष्याच्या  अशा  टप्प्याला होती की भूतकाळातल्या आठवणींची कटुता लोपली होती. तिला ‘पहायला’ आले होते तो प्रसंग  ती रंगवून सांगायची. त्यातला नवरा मुलगा कोणता हेच तिला शेवटपर्यंत कळले नव्हते. ‘संक्रात  कोणत्या महिन्यामध्ये येते’ हा प्रश्न तिला विचारला होता. पहायला आले होते पंचवीस आणि सगळे पुरुष असे आजी ठासून सांगायची.

श्रोते मिळाले की आजीच्या गजाली सुरू व्हायच्या. पण त्यात आठवणींबरोबर चक्क वैचारिक आणि साहित्यिक चर्चा असायची. बाबाकडे येणाऱ्या पुस्तक- मासिकाचे  बारकाईने  वाचन करून त्यावर आजी आपले परखड मत द्यायची …… त्यातून भलेभले ज्ञानपीठ विजेतेही सुटायचे नाहीत. टिव्हीवरच्या मालिका आणि पाककृतींचे कार्यक्रम ह्याकडे पहाण्याचीही तिची खास दृष्टी आणि टिप्पणी  असायची. एकदा असाच एक कार्यक्रम सुरू होता. कापलेले, मोजलेले पदार्थ सुबक भांड्यांमध्ये ठेवलेले. पडद्यावरचा शेफ सफाईने कृती करत होता….. “ह्या गाईडबुकामध्ये दाखवतात सगळे पण जीव नाही …… प्रत्येक गोष्ट चिरण्यात, सोलण्यात, वाटण्यात, ढवळण्यात  जीव असतो पदार्थाचा ….. मोजून मापून मिक्स करण्यात नाही.” आजीचा ‘मिक्स’ चा खास उच्चार !

कधी कधी आजी झोपूनच टीव्हीचा पडदा पहात रहायची. आवाजही शून्य, “आजी कशासाठी पहातेस ?…”

“काही नाही रे …….. पडदा हलत रहातो, मन डुलत रहातं !” ही अशी लयदार वाक्य टाकण्यामध्ये आजीचा हात धरणारे घरात कोणी नव्हतं. आजीची समज, वाचन आणि चातुर्य अनुभवून आमची मैत्रीण वंदना (कुलकर्णी) म्हणायची, “संधी मिळाली असती तर आजी उद्योजिका किंवा विदुषी झाली असती.” पण आजीच्या बोलण्यात वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल तक्रार नसायची.

मुक्तांगणच्या कामासाठी माझी दर महिन्याची पुणे भेट. त्यामध्ये बाबाबरोबर वेळ घालवायचा तसा गेली अनेक वर्षे आजीच्यासोबत रहाणे हा माझा क्रमच बनून गेला होता. ती माझी काळजी करायची. घरात केलेले राखून ठेवायची. निरोप देताना घरी केलेले काही छान पॅक करून द्यायची….  मुख्य म्हणजे माझे खूप कौतुक करायची. माझ्या प्रकृतीबद्दल तिला खूप कळवळा ….  हे असे लाडावलेपण कोणत्याच आजीकडून माझ्या वाट्याला आले नव्हते. म्हटले तर मी आजीचा नातू कारण अनिल माझा ‘बाबा’.पण कधी आजी प्रेमाने ‘पाचवा मुलगा’ असे सुद्धा म्हणायची. बाबा लटक्या रागाने, “तुझा आनंदच लाडका” असे म्हणायचा. आम्ही हसायचो.

प्रत्येक क्षणाला अर्थ देत जगण्याची कला आजीने मोठ्या कष्टाने साध्य केली असावी. आणि आयुष्याच्या उत्तर काळात त्याला एक निर्व्याज सहजता आली होती. खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या उन्हामध्ये मन लावून वाचणारी आजीची मूर्ती किती लोभस असायची. तिच्या गळ्यातल्या त्या ठळक बोरमाळेसकटची. आम्ही आजीच्या जपासाठी स्फटिकाची माळ आणली होती. त्याचे आजीला काय कौतुक. सविताने तिच्यासाठी लोकरीचा स्वेटरसारखा ब्लाऊज केला. तो आजीने भरपूर वापरला.  तिला सुती, नऊवारी साडी आणून देणे, दर वर्षा-दोन वर्षाला हा हा आमचा नेम होता …. आताच्या जुलै महिन्यातही मी साडी घेऊन गेलो. तिने त्यावर हात फिरवून मऊपणाची  खात्री करून घेतली. का कोण जाणे, गेल्या दोन-तीन वेळेला बाबा घरी नसतानाही मी फक्त आजीला भेटायला घरी आलो होतो. कदाचित आजीचं बोलल्यामुळे असेल. “शेवटाची सुरुवात केव्हातरी व्हायचीच असते … सगळी यंत्रे कायमची कुठे काम करत रहाणार …. ” जणू मला पूर्वसूचना देत ती म्हणाली होती.

“पण जीवावर येते ते परावलंबीत्व…. हलता येत नाही… ह्या पोरींना सर्व करायला लागते …. ते नको वाटतं” शेवटच्या महिन्यामध्ये ज्योतीबरोबर कधी फुलाआत्या. कधी अक्षुची बहीण अदिती, कधी वृषाली वहिनी सोबतीला असायच्या. मुक्ता आणि यशो ह्यांचे ह्या घराकडे अत्यंत प्रेमळ पण बारीक लक्ष असायचे. त्यांचे स्वतःचे संसार आणि कार्यक्षेत्र आहेत पण आजी – बाबाच्या ह्या घराच्या नियोजनात त्यांचा वाटा मोठा. (ह्या दोघी बाबाच्या मुली)

आजी म्हणजे सगळ्यांचा आवडता आधारवड. मायेने कवेत घेणारा. अगदी सहा महिन्यांपूर्वी आमच्या मुक्तांगणच्या ट्रस्टी मिटिंगसाठी आजीने उत्साहाने बटाटेवड्यांचा बेत केला होता. मी मुक्तांगणमधून काम करून संध्याकाळी घरी आलो की आजी विचारायची, “काय म्हणतंय मुक्तांगण?…” मी सांगितलेला वृत्तांत लक्षपूर्वक ऐकायची. आजी आणि बाबाची ही आश्वासक दुलई आपल्यासोबत सतत रहावी असं वाटायचं. मी पुण्याला निघालो की ठाण्याच्या माझ्या घरी सगळे म्हणायचे, “चालला माहेरी !… “

​घट्ट प्रेमाची नाती वंशवृक्षांच्या मुळामध्ये रुजायला हवीत असे मुळीच नसते… मायेच्या ओलाव्याचे मूळ समान मिळाले की सर्वदूर पसरतातच हे सुगंधी बंध. आजी गेली त्याआधी बरोबर दोन आठवडे होते, तेव्हा मी तिला भेटायला गेलो. थकलेली होती. स्वतःच्या विसर्जनाच्या तयारीत होती. पण बुद्धी टवटवीत होती. विंदा करंदीकरांच्या बालकवितांची पुस्तके वाचत होती. ​”आजी ही पुस्तके वाचत आहेस.?”

“एकतर छोटी आहेत… सोपी आहेत… परत परत वाचलं तर नव्याने कळत … नव्याने हसू येतं…” आजी म्हणाली.

‘एटू लोकांचा देश’ हे पुस्तक उघडून आजी शेजारी बसलो होतो. मनातच वाचत होतो. माझ्या लहानपणी वडलांनी माझ्यासाठी आणलं होतं हे पुस्तक… तिबेटच्या जरा खाली, हिमालयाच्या जरा वर! एटू लोकांचा अद्भुत देश. प्रत्येकाजवळ उडते घर!

मला त्या बालकविता नव्याने कळत होत्या. सगळ्या विसंगतीचा, विचित्रपणांचा मजेत स्वीकार करणारा एटू लोकांचा देश. “वाचून दाखव एखादी.” आजी म्हणाली.

       “जर कोणी कविता केली

       प्रथम पुरतात जमिनीखाली

       पण जुनीशी झाल्यानंतर

       शहाणे करतात जंतरमंतर

       मग कवितेतून रुजतो वृक्ष

       फुले येतात नऊ लक्ष”

मी आणि आजी एकत्र हसलो…. मोकळेपणी… शेवटचं.!

पण शेवटचं कसं म्हणू?…

रूजलेल्या वृक्षाला फुले यायला आत्ता कुठे सुरुवात होते आहे.

Advertisements

फोंडा, मालवण ते दापोली (मार्गे दोंडाईचे)

व्याख्यानांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भटकंती मला नवीन नाही. पण आपल्या विशाल प्रदेशामधली कित्येक ठिकाणे ह्या निमित्ताने पहायला मिळतात त्याची गंमत असते. गेल्या महिना दिड महिन्यात म्हणजे पाऊसकाळाच्या सुरवातीपासून भटकंती सुरु झाली ती गोव्यातल्या फोंड्यापासून. शालेय शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी सलग दोन दिवसांचे प्रशिक्षण . . . दोन अडीचशे प्रशिक्षणार्थी. लोकविश्वास संस्थेचे अनूप प्रियोळकर आणि डॉ. नारायण देसाई हे संयोजक.

दोन आठवड्यातच मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या शिक्षकांसोबत दोन दिवस प्रशिक्षण कार्यक्रम घेतला आणि त्यातल्या एका संध्याकाळी मालवणमध्ये जाहीर व्याख्यान. पालकत्वावरच्या ह्या संवादासाठी भर पावसात हजारच्यावर श्रोते येतील अशी माझी अपेक्षा नव्हती. डॉ. नाथ पै सेवांगणाने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून लोक आले.

पुढच्या पंधरा दिवसात असाच अनुभव धुळ्याजवळच्या दोंडाईचे नावाच्या छोट्या गावाने दिला. धुळ्याला गेलो होतो, देशबंधु गुप्ता फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या दोन दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला. एका संध्याकाळी पालकत्वावरचा संवाद दोंडाईचे ह्या धुळ्यापासून साठ किमी असलेल्या शहरात.

चक्क सहाशेसातशे मंडळी. व्याख्यानाचा हॉल म्हणजे मंगल कार्यालय. अनेक आया आपल्या छोट्या मुलांना घेऊन आलेल्या. त्यामुळे हलकल्लोळ. लोक येतील की नाही ह्या भीतीने आयोजकांनी वेळ दिली होती सायंकाळी साडेपाचची. मी येणार होतो साडेसहाला. लोकांना वेळेवर येण्याची सवय नसते म्हणून ही खबरदारी . . . पण साडेपाचलाच सभागृह भरले.

मी भाषणाला सुरवात केली तेव्हा मुलांचा पेशन्स संपला होता. सर्व श्रोत्यांच्या सहकार्याने भाषण संपन्न झाले तेव्हा मीच सुटकेचा निश्वास सोडला.

खानदेशातून पुन्हा उत्तर कोकणात दापोलीला पोहोचलो ते एक ऑगस्टच्या टिळक पुण्यतिथी कार्यक्रमासाठी. लोकमान्यांच्या जन्मगावी म्हणजे चिखलगावी. ‘लोकमान्य शिक्षण संस्थेच्या’ वर्धापनदिनाचे भाषण. कार्यक्रम उशीरा सुरु झाला. काहीसा लांबला. त्यामुळे विद्यार्थीगटामध्ये चुळबुळ होती. त्यामुळे माझे सदीप व्याख्यान मी तातडीने संकलित करून त्यांच्यासमोर मांडले.

समोरच्या श्रोत्यांच्या एकत्रीत अशा श्रवणक्षमतेचा अंदाज आधीच लावणे कठीण असते. परंतु समारंभ सुरु झाला की मी श्रोत्यांचे निरीक्षण करायला लागतो. त्यातून मला काय बोलायचे आणि मुख्य म्हणजे किती वेळ बोलायचे ह्याचा अंदाज यायला लागतो.

विशिष्ट विषयांना विशिष्ट् समज असलेला श्रोतृवर्ग मिळाला तर मात्र बहार येते. असा अनुभव गेल्या वर्षी मला आला होता सांगलीच्या एका व्याख्यानामध्ये. ‘रहस्य माणुसकीचे, भविष्य माणुसकीचे’ असा हा काहीसा कठीण विषय. संपूर्ण नाट्यगृह खचाखच भरले होते. जवळजवळ सव्वा तासाच्या मांडणीमध्ये मला प्रत्येक टप्प्यावर योग्य दाद मिळत होती. मी आणि श्रोते एका समान अवकाशाचा भाग बनलो होतो.

अनेक महिन्यांनी परवा आर्किटेक्ट मित्र शिरीष बेरीचा कोल्हापूरहून फोन आला. त्याच्या हातात ह्या संवादाची सीडी पडली. ती त्याला खूप आवडली. त्याने मला ही सीडी पाठवली आणि ती आता यु-ट्यूबवर उपलब्ध आहे (https://youtu.be/6fcUWOnic14).

रंगलेले व्याख्यान सर्वांसाठी उपलब्ध होणे ही गोष्ट महत्वाची.

लोकमान्यांवरच्या माझ्या भाषणाच्या सुरवातीची एक छोटी लिंकसुद्धा सोबत जोडत आहे (https://youtu.be/m91nwp3LJ3g).

मला छोट्या शहरांमध्ये जाऊन बोलायला आवडू लागले आहे. महानगरांमध्ये माहितीचे, कार्यक्रमांचे अजीर्ण झालेले असते. येणाऱ्या सोळा ऑगस्टला जातो आहे संगमनेरमध्ये . . . ‘आगऱ्याहून सुटका: महाराजांचे आपत्तीकालीन व्यवस्थापन’ असा विषय आहे (http://bit.ly/2uu8pE4)

. . . ज्या दिवशी महाराज निघाले त्याच दिवशी आणि सायंकाळीच हा थरार संगमनेरकरांसोबत अनुभवायचा आहे. सतरा ऑगस्टला आहे शिर्डीमध्ये! . . . पालकत्वावरचा संवाद.

श्रोत्यांच्या निमित्ताने माझे वारंवार अनेक विषयांवरचे चिंतन होत असते आणि त्यात नवेनवे काही गवसत असते हा माझ्यासाठी एक मोठा फायदा असतो . . .

म्हणजे प्रत्येक संवाद हा माझ्यासाठी एक शहाणे करणारा अनुभव असतो . . . खरे तर माझा अंतर्संवादच मी श्रोत्यासमोर मांडत असतो . . . त्या त्या वेळचा . . . ताजा आणि टवटवीत!