अचानक आलेल्या आगंतुक कविता

‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..

. प्लॅटफॉर्म 

तिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो

उद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.

स्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,

दोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण !

किती छान ना …

सराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात

निरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून ?

​खरंच किती छान.

. जळण्याची लय 

नाही मिळत तर जावं झुलत

आपल्याच मस्तीत गावं भटकत

बंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,

किंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;

कुणी सक्ती नाही केलेली.

नाही मिळत तरी जावं फुलत

एकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता

दाट जंगलातलं नवं झाड शोधत.

नाही मिळत तरीही जावं खुलत

फ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत

डोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं

आतल्या आत रहावं जळत.

जोपर्यंत जमत नाही म्हणायला

नाही मिळत तर गेलात उडत !

3. तुझा डिपी माझे मन

नवा डिपी चढला तुझा

तेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..

नव्याने नेसलेल्या साडीची

नव्हाळी ल्यालेली एक किशोरी

पहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे

की….

मीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात

अन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये

की…..

भविष्याचा वेग घेणारी प्रौढा….

विचारासोबत मनाला खेचणारी

की….

माझ्या मनावर पाखर घालणारी

माझी ढगात हरवलेली आई

की…..

माझी जीवाभावाची मैत्रीण

जगण्याच्या प्रवाहात गमावलेली

की….

तुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या

आणि Deciding Perspective

तेवढा माझा…!

. श्रद्धांजली 

अर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,

तर आवरशील रडणं,

अन् लागशील पुन्हा कामाला.

आठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.

नक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.

अर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,

करशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत

एवढे सारे केल्यावरती

थकलेल्या तृप्त क्षणी,

समजा आलीच माझी आठवण

तर आवरशील रडणं

अन् लागशील पुन्हा कामाला.

. बालपुरूष 

रडूनभेकून थकलोय् खरा

पण मी काही हट्टी बाळ नाही.

मनातली आई तुझ्या,

झाली आहे जागी, करतेय् माझे लाड;

शरीरातला पुरूषही माझ्या

झोपून गेलाय् का गाढ ?

६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात 

ओसंडून वहाणारी समृद्ध घागर

नवी बाग शिंपण्यासाठी.

हातालाच रोपे फुटली

तर किती बहार होईल…..

नाहीतर आहेच,

ग्रीनहाऊसमधल्या झाडांचं

बेतलेलं वाढणं….

आखलेलं वागणं.

७. हवेचा हलका झोका, 

डोलणारी समजूतदार पानं….

जाणवलं…. ते बरंच झालं.

थांबलो तरी.

नाहीतर पसरवतच होतो मूठभर माती

त्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.

. कलचांचणी 

क्षमता…. कळूनही न वळणाऱ्या

आवडी…. उत्तरोत्तर बदलणाऱ्या

व्यक्तिमत्व…. अजूनही भेलकांडणारं

आणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.

करणार कशी ‘कल-चांचणी’?

विकलतेचे Aptitude Testing.

जगण्याच्या कलत्या काळात ?

. चॅप्टर 

“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”

 टकटकच्या लयीत तो म्हणाला.

काहीसा खडसावून, भरड आवाजात.

“कळतंय रे…. पण अडचण आहे;

चॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.

पुन्हापुन्हा प्रयत्न करूनही….”

“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.

दिसेनासा झाला….

आता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे

बाइंडिंगची उसवणारी शिवण,

झाकून टाकली की सारं कसं…..

दिसायला नॉर्मल.

 

Advertisements

मला माझ्या कामाचा कंटाळा का येत नसावा ?

मनोविकारशास्त्र ह्या शाखेमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून प्रवेश केला त्याला आता छत्तीस वर्षे झाली. एम. डी. पास केल्यावर ‘कन्सल्टंट’ हे बिरुद लागले त्याला बत्तीस वर्षे झाली. खाजगी व्यवसाय सुरु केला १९८६ साली आणि बंद केला पाच वर्षांपूर्वी. ह्याचा अर्थ मी पेशंटस पहात नाही असे नाही. जे प्रायव्हेट क्लीनिक होते त्याचे काम सहकाऱ्याला सुपूर्द केले. मी फक्त आय. पी. एच. मानसिक आरोग्य संस्थेमध्ये आणि त्या संस्थेसाठीच काम करतो. सल्ल्यासाठी येणाऱ्या सर्वांना तिथेच भेटतो.

Eyecatchers - Advertising that sells - with Dr Anand Nadkarni IPH Thane II.JPG

स्वतःच्याबाबतीतले माझे निरीक्षण असे की मला आजवर एखादा दिवसही माझ्या कामाचा जबरदस्त कंटाळा आल्याचे जाणवलेले नाही. मला स्वतःलाही ते ‘अॅबनॉर्मल’ वाटले म्हणून मी ठरवले की आपण स्वतःच्या कामाची एक पहाणी करूया..

अनेक गोष्टी एकाचवेळी करण्याच्या सवयीमुळे माझा कालक्रम तसा आखीव असतो. दर महिन्याच्या पहिल्या तारखेस पुढच्या संपूर्ण महिन्याचे कॅलेन्डर तयार असते. त्याच्या प्रती संबंधितांना म्हणजे पत्नी, सहकारी, ते ड्राइवरपर्यंत दिल्या जातात. त्यापुढच्या दोन महिन्यांच्या कार्यक्रमाचा आराखडा आजच ऐंशी टक्के तरी ठरलेला असतो. त्यापुढच्या दोन महिन्यांमधली जागा अर्ध्याहून जास्त भरलेली असते. ह्याचा उघडउघड तोटा असा की मला ‘ आयत्या वेळी इच्छा झाली म्हणून’ अचानकपणे माझा दिनक्रम बदलता येत नाही. म्हणजेच कार्यक्षमतेसाठीही काही निगेटिव्ह किंमत द्यायला लागते हे मी मनोमन मान्य केले आहे. कधी एखादा उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम चुकतो, कधी मित्रांबरोबरची मैफल तर कधी एखादा कौटुंबिक सोहळा. त्याची रुखरुख राहते पण मी त्याबद्दल कुरकुर करत नाही. त्यामुळे कामाबद्दलची नकारात्मक भावना ताब्यात येते.

कंटाळा यायचा नसेल तर नकारात्मक भावनांचा निचरा पहिल्यांदा व्हायला हवा. मी ज्यावेळी सायकीअॅट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला तो माझ्या आयुष्यातला ‘मी घेतलेला’ पहिला महत्वाचा निर्णय. अजूनही मी तो वारंवार मनात घोळवतो. माझे दैनंदिन काम म्हणजे ह्या निर्णयाची रोजची नवी उजळणी आहे. माझे काम मी निवडलेले असणे ह्यातील समाधान और आहे. असे ज्यांना मिळत नाही त्यांना कामातील ‘ममत्व’ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मला त्या ‘ममत्वा’चा रियाज करायचा असतो.

Eyecatchers - Advertising that sells - with Dr Anand Nadkarni IPH Thane I

दिवसातील अनेक कामे करताना म्हणजे पेशंटस् तपासणे, गटउपचार घेणे, कार्यशाळा घेणे, भाषण देणे, प्रशिक्षण देणे… ह्यातील कोणतीही गोष्ट योजताना, तयारी करताना आणि प्रत्यक्षात आणताना मी माझा व्यावहारिक लाभ विचारातही आणत नाही हि सवय मी स्वतःला लावली आहे. करत असलेल्या कामाचे आवर्तन संपल्यावर पाहू काय व्यावहारिक लाभ होणार ते… त्यामुळे काम करण्यातला प्रत्येक क्षण जिवंत होतो.

व्यावहारिक लाभात येतात पैसे आणि प्रसिद्धी. मला मिळणाऱ्या पैशातील अर्ध्याहून अधिक भाग (कधीकधी पूर्ण भाग) हा माझ्या संस्थेला जातो. कारण माझ्यासाठी पैसा ही गोष्ट पुस्तके घेण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आणि उत्तम खाण्यासाठी जरुरी आहे. विनोबा म्हणतात तसे आयुष्याची होडी पैशाच्या पाण्यावर चालवायची असते पण होडीमध्ये पाणी साठवायचे नसते.. तुम्ही म्हणाल पैसे हा तर समाधानाचा मार्ग. परंतु पाणी होडीत शिरले की सारे काम पैशाभोवती फिरते. त्यातला ताल हरवतो. असुरक्षितता येते. एकसुरीपणा येतो आणि मग कंटाळा येतो.

प्रसिध्दीचेही तसेच… माझी ‘व्यक्ती म्हणूनची’ प्रसिद्धी आणि माझ्या ‘ज्ञानशाखेतील विचारांची’ प्रसिद्धी हा विवेक मला ठेवायचा. उत्तम विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचे मी एक माध्यम आहे असे डोक्यात ठेवले की मन आपोआप ताजेतवाने होते. आपण जे जे काही करतो त्यातून मजा आली पाहिजे, गंमत आली पाहिजे आणि ह्या भावना मलाच माझ्या प्रोसेसमधून निर्माण करायच्या आहेत… होतं असं की एखादा विषय शिकवताना एखादे उदाहरण रिपीट होऊन येते. माझी मुलगी सुखदा म्हणते (ती सहकारी सुद्धा आहे),” बाबा तुला कंटाळा नाही येत तेच उदाहरण द्यायला…” त्यावर माझे म्हणणे असे असते की प्रत्येकवेळी मी नवीन,ऐकणारे नवीन, शब्दांमागची ऊर्जा नवीन ….अशावेळी त्या उदाहरणांमधल्या नव्या जागा सापडतात… कधी नवेच उदाहरण समोर येते… आपल्या अभ्यास-वाचन-विचारांद्वारे आपल्या मनाचे कोठार जितके भरू तितकी योग्य माहिती योग्यवेळी बाहेर पडते. स्मृतीसाठी सायास लागणे हे मनःपूर्वक अभ्यासाचे लक्षण नव्हे. मिलनोत्सुक सखीसारखी स्मृती तयार हवी जाणीवेच्या दरामध्ये … मग कंटाळा फिरकतही नाही आसपास. वीसवर्षांच्या गॅपनंतर समोर उभ्या राहिलेल्या पेशंटचे सारे संदर्भ अचानक आठवतात. कधीकाळी पाहिलेल्या सिनेमाची दृश्ये, वाचलेल्या कवितेच्या ओळी तोंडात येतात…स्वतःलाच कळत नाही हे कुठे साठून राहिले होते… गेल्या आठवड्यात दमणमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमात साऱ्या भारतातून आलेले कर्मचारी होते. एका होता मध्यप्रदेशातील नेपानगरचा… त्याने नाव घेताक्षणीच मला तिथल्या कागद कारखान्याचा इतिहास, उभारणी त्यातील पंडित नेहरूंच्या संदर्भासहित कशी आठवली कुणास ठाऊक … त्या मुलाला फारच छान वाटले ! अर्थात मलाही.

अनुभवामध्ये आत्मीयता आली, वेगळे थ्रील निर्माण झाले की कंटाळा जातो. पण प्रत्येक कार्यक्षम माणसाने आराम, विरंगुळा आणि शुद्ध आळस ह्याकडेही पुरेसं लक्ष द्यायला हवं. भारतभर फिरताना प्रवासाचा आनंद घेणे हे फार महत्वाचे आहे माझ्यासाठी. लखनौच्या चौकामध्ये चाट खाणे आणि तिथल्या मार्केटमध्ये खास कापडाची खरेदी करणे हे हवेच. त्याशिवाय तिकडच्या प्रशिक्षणवर्गाचा शिणवटा कसा जाणार. सिक्कीममध्ये कारखान्याच्या मॅनॅजर्सचे ट्रेनींग घेतल्यावर गंगटोकच्या गांधी रस्त्यावर फिरून खास सिक्कीमी जेवण जेवायला हवे. होशियारपूरच्या प्लांटला जाताना पंजाबी ढाब्यावर पनीर आणि लस्सी नाही खाल्ली तर खेप फुकट आणि आंध्रमधल्या काकीनाडा शहरातून परत येताना वायझॅग शहराचे विहंगम दृश्य पहायला तिथल्या पहाडांच्या शिखरावर जायलाच हवं.

हा झाला सफरी दरम्यानचा विरंगुळा. प्रवासामध्ये पुस्तकांचा साथ जवळ ठेवायचा. रात्रीच्यावेळी लॅपटॉपवर उत्तम चित्रपट पहायचे. त्याचबरोबर भरगच्च कामाच्या दिवसांनंतर एक दिवस घरी आणि कुटुंबाबरोबर असा आखायचा की घड्याळाची पाबंदी झुगारायची. अकरा वाजेपर्यंत अंथरुणात लोळायचं. स्वयंपाकघरात लुडबुड करून एखादा पदार्थ तयार करायचा. जसा प्रवास एन्जॉय करायचा तसाच हा दिवस  पण करायचा. आमचे चारजणांचे कुटुंब आहे. आम्ही नियमतपणे बाहेर फिरायला, खायला जातो. आमचे पार्टी-बिर्टीला जाणे फारसे होत नाही. पण जवळच्या मित्रांचा सहवास आणि गप्पा ह्याला प्राधान्य असते.

दिनांक १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१७ ह्या कालावधीतील माझ्या कामाची मी तपशीलवार छाननी करायची ठरवली. इतक्या वर्षामध्ये हा विचार कधी आला नव्हता. ‘आला दिवस की गेला दिवस’ असाच माझा शिरस्ता राहिला आहे. माझ्याकडे प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाचा Data लिहिलेला असतो. एक Disclaimer द्यायला हवे की मला आत्मप्रौढीचा संदेश अजिबात द्यायचा नाही. कामामधील विविधता कंटाळ्याला कशी काबूत ठेवते हे दाखवायचे आहे. आपल्याला व्यवसायामध्ये लपलेल्या अनेक शक्यता आपण पडताळून पहिल्या तर आपण निरंतन शिकत राहतो. शिकण्याची प्रक्रिया रसपूर्ण असेल तर शीणवटा कमी येतो.

ह्या कालावधीमध्ये एकूण दिवस होते ८९. त्यातील ३७ दिवस होते आय. पी. एच.मध्ये. दिवसाला किमान आठ तास काम करून ओपीडीमध्ये सल्लामार्गदर्शन करायचे. दिवसाला सरासरी ३५ अपॉइंटमेंटस या नात्याने एकूण सत्रे झाली किमान १२९५. एकूण ३२ अन्य कार्यक्रम झाले आणि त्यासाठी दिले ४३ दिवस. म्हणजे कामाचे दिवस झाले ८०. सुट्टीचे दिवस झाले नऊ. म्हणजे साधारण दहा दिवसांनंतर एक सुट्टी.

दिल्लीपासून चेन्नईपर्यंत दक्षिणोत्तर आणि लखनौपासून जामनगर आणि दमणपर्यंत असा महाराष्ट्राबाहेरचा प्रवास झाला. कोकणामध्ये पेण, नागोठणे, दापोली, वसई ही शहरे, मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद तसेच पुणे, नाशिक, वाई, सांगली अशी उर्वरित शहरे पकडली तर मुंबई धरून अकरा शहरांचा प्रवास होतो. औद्योगिकक्षेत्रातील  सहा कंपन्यांसाठी एकूण १८ दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम झाले . लोकांसाठीची एकूण व्याख्याने झाली दहा. शाळांसाठीचे कार्यक्रम तीन. व्यसनमुक्तीचे तीन. साहित्यक्षेत्राशी निगडित कार्यक्रम तीन. डॉक्टरांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी चार कार्यक्रम. आय.पी.एच. संस्थेमध्ये दिवसभर प्रशिक्षणवर्ग घेण्याचे एकूण पाच दिवस.

आता संख्यात्मक भाग बाजूला ठेऊ. कार्यक्रमांमधली लज्जतदार विविधता पाहूया.

एक जानेवारीचे नवीन वर्ष सुरु झाले तेच कल्याणच्या वेध संमेलनाच्या मुहूर्तावर  ( त्या कार्यक्रमाचा ब्लॉग: ‘मी ते आम्ही’ : एक अखंड आवर्तन – संस्कृतीचे!) त्यानंतर ८ जानेवारी औरंगाबाद, १४ जानेवारी पेण, आणि २२ जानेवारी लातूर इथे शेकडो विद्यार्थी – पालकांसमोर त्या त्या शहरातले वेध संपन्न झाले. (अधिक माहितीसाठी पहावे www.vedhiph.com किंवा FB-VEDH पान). आजवर एकूण सत्तर वेधच्या माध्यमातून मी सुमारे साडेसहाशे मुलाखती घेतल्या आहेत. फेब्रुवारीच्या १८ आणि १९ तारखेला महाराष्ट्रातील एकूण अकरा शहरातील कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे संमेलन नाशिकला आयोजित केले होते. दोन्ही दिवसाला सरासरी सात तासांची विचारमंथन सत्रे होती. एका संध्याकाळी माझ्याबरोबरच्या मुक्त गप्पांची मैफलही झाली.

जानेवारी महिन्याच्या १५ तारखेला पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये, ‘पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना’ या सूत्रावर डॉ.अभय बंग, डॉ. अनिल अवचट आणि मी अश्या तिघांबरोबर विवेक सावंत ह्यांनी दीर्घ संवाद साधला (पहा यू-ट्यूब link – पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना.) ह्या कार्यक्रमावर आधारित पुस्तकही साधना प्रकाशनाने प्रसिध्द केले आहे. १२ मार्चला पुणे वेधतर्फे ‘संपूर्ण शारदा’ ह्या कार्यक्रमामध्ये मी सुमारे अडीच तासाच्या ऐसपैस गप्पा केल्या प्रतिभा रानडे, वीणा गवाणकर आणि उमा कुलकर्णी ह्या तीन जेष्ठ मराठी लेखिकांसोबत. त्यानिमित्ताने ह्या लेखिकांबद्दलचे लिहून आलेले बरेच काही वाचले. काही पुस्तके पुन्हा वाचली. (ह्या कार्यक्रमाचा वृत्तान्त पहा ..

Part 1 –

Part 2 –

२७ जानेवारीला वसंत लिमये ह्या मित्राच्या ‘विश्र्वस्त’ ह्या कादंबरीबद्दल प्रकाशन समारंभात मी बोललो. (वृत्तांत यूट्यूब उपलब्ध) आणि ११ फेब्रुवारीला डॉ. संज्योत देशपांडे ह्या मैत्रिणीच्या पुस्तक प्रकाशनामध्ये ‘वियोगातून सावरताना’ ह्या परिसंवादात भाग घेतला.

दिनांक १२ फेब्रुवारीच्या सकाळी मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या ‘संघर्ष-सन्मान पुरस्कार’ सोहळ्याचे संयोजन केले. ह्या संयोजनाची माझे विसावे वर्ष अध्यक्ष होत्या डॉ. राणी बंग सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र. आणि अॅसीडपीडित मुलींसाठी काम करणारी लक्ष्मी सा ह्या दोघींबरोबर मी गप्पा मारल्या. ११ फेब्रुवारीला मुक्तांगणमध्ये ‘सहचरी’ मेळाव्यामध्ये मी सोनाली कुलकर्णीबरोबर संवाद साधला. आणि त्यानंतर दीड तास व्यसनाधीन मित्राच्या सुमारे सव्वाशे पत्नी-आयांबरोबर शंकासमाधान करत गप्पा मारल्या. सात जानेवारीला संध्याकाळी औरंगाबादला मी मुक्तांगण मित्रांचा पाठपुरवठा मेळावा घेतला.

औरंगाबादच्या गायकवाड ग्लोबल स्कूलच्या पालकांसाठी संत तुकाराम नाट्यगृहामध्ये ‘ह्या मुलांशी वागावे तरी कसं’ ह्या विषयावर संवाद झाला. २३ जानेवारीला लातूरच्या ज्ञानप्रकाश शाळेत विद्यार्थ्यांबरोबर दीड तासाचे प्रश्नोत्तर आणि गाणी शिकवण्याचे सत्र झाले. त्या सत्राचे छायाचित्र सोबत आहे. वयम् मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकांमध्ये वृत्तांतही आहे. आणि मार्चच्या अखेरीस कोकणातल्या दापोलीजवळच्या चिलखलगावी राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांच्या शाळेत शिक्षकांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा झाली.

आय.पी.एच. संस्थेमध्ये माझे शिकवण्याचे कामही सुरु असते. ४ आणि ५ फेब्रुवारी तसेच ४-५ मार्च असे चार दिवस रोजचे सात तास, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचा वर्ग घेतला चाळीस व्यावसायिकांसाठी. माझी मुलगी डॉ. सुखदा ह्याच पद्धतीच्या प्रशिक्षणाचे काम करते. तिच्या दहा इंटर्न विद्यार्थ्यांसाठी मी ‘REBT & Spirituality’ तसेच ‘History of treatment in Mental Health’ अशी दोन दीर्घ सत्रे घेतली. आय.पी.एच. संस्थेमध्ये चालणाऱ्या कौन्सिलिंग स्किल्स कार्यशाळेत मी ‘पालकांसाठीचे समुपदेशन’ ह्या विषयावर सत्र घेतले.

आय.पी.एच. संस्थेमध्ये मैत्र ही दूरध्वनी सेवा चालवणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिबीर घेतले, तरुण जिमनॅस्टस् बरोबरचे क्रीडामानसशास्त्र प्रशिक्षण घेतले आणि मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांबरोबरही चर्चासत्र घेतले.

या तीन महिन्यांमध्ये विविधस्तरावरील डॉक्टरांचे प्रशिक्षण घेण्याचाही योग आला. दिल्लीमधल्या इंद्रप्रस्थ अपोलो आणि मेदान्त ह्या मोठ्या रुग्णालयातील ICU Teams साठी मी आणि सुखदाने एकेक दिवसाची दोन सत्रे घेतली ‘रुग्णाच्या कुटुंबीयांशी सुसंवाद’ या विषयावर. मुंबईच्या पश्र्चिम उपनगरातील जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी मी व्यसनमुक्ती उपचारांवर सत्र घेतले. तर जी.एस.मेडिकल म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये प्रथम वर्ष एम.बी.बी.एस.च्या मुलांबरोबर संवाद साधला ‘CCD’ ह्या विषयावर… College Campus Discoveries.

सात फेब्रुवारीचा संपूर्ण दिवस जवळजवळ नऊ तास मी होतो डिझाइन क्षेत्रातील ‘सेलिका’ नावाच्या कंपनीच्या नेतृत्व करणाऱ्या संघासोबत. प्रभावी नेतृत्वसंबंधातील चर्चा करत होतो. जानेवारी महिन्यात नागोठण्यामध्ये तरुण अभियंत्यांना Behavioral Safety वर प्रशिक्षण देत होतो. मार्च महिन्यात जामनगरमध्ये ह्याच विषयावर कार्यशाळा तर घेतलीच पण रिलायन्स कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ चारशे पत्नींसाठी महिला दिनाचा कार्यक्रमही केला भावनिक साक्षरतेवर. इंडोकोमधल्या उभरत्या नेतृत्वासाठीच्या GEMच्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्र होते ‘Values in 21st Century’  तर सीमेन्समधल्या पुण्याच्या तरुणांसाठी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्र होते ‘Me to We’ ह्याच सूत्राभोवतीच्या एकूण तीन बॅचेस घेतल्या अल्केम कंपनीच्या दमण प्लॅन्टमधल्या फार्मसी क्षेत्रातील तरुण अधिकाऱ्यांसाठी. उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या काळात होतो बाराबंकीला.तिथल्या रिलायन्स प्लॅन्टमध्ये दोन दिवसांचे विविध कार्यक्रम घेत… पण त्यातही लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठात एक संध्याकाळ घालवली. श्रुतीताई सडोलीकरांबरोबरच्या चवदार गप्पा आणि भोजनासमवेत. असे अठरा दिवस होते रिलायन्स, सीमेन्स, इंडोको, सॅनोफी, सेलीका आणि अल्केम ह्या कंपन्यांसाठी दिलेले.

विनोबांच्या जीवनविचारांवर आधारीत एक दीर्घ सादरीकरण मी करतो. वीस जानेवारीला त्याचा प्रयोग झाला वाईमध्ये तर तेवीस जानेवारीला लातूरमध्ये. (त्या संदर्भात सविस्तर लवकरच) सहा फेब्रुवारीला मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात स्मृतिव्याख्यान होते ‘Magic of Empathy’ ह्या विषयावर. नाशिकच्या वाघ मेमोरियल व्याख्यानात बोललो ‘मन वढाय वढाय’ ह्या विषयावर तर विरारजवळच्या नंदारवाल इथे फादर डिब्रीटो आणि सातशे रसिकांसमोर उलघडले ‘शरीर मनाचे नाते’. सांगलीमध्ये तुडुंब भरलेल्या भावे नाट्यगृहामध्ये डॉ. कुलकर्णी स्मृती व्याख्यान झाले ‘रहस्य माणुसकीचे भविष्य माणुसकीचे’ ह्याविषयावर; तर दापोलीला झाल्या ‘बहुरंगी गप्पा’. औरंगाबादला पालकत्वावर बोललो तर पुण्याला MKCLच्या कार्यालयात झालेल्या शिबिरामध्ये ‘अॅप्टीट्युड टेस्टींग’ या विषयावर.

हा आढावा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. संवादाची शैली, विषयांची विविधता, प्रेक्षकांची विविधता ह्यातले वेगळेपण जितके जास्त तितका कंटाळा कमी. संवादाची स्थळे आणि वातावरण ह्यातली विविधताही महत्वाची. म्हणजे कशातही रुटीनपणा नाही. प्रत्येक नवा विषय, नवा संवाद मला अधिक अंतर्मुख करतो… नवीन विचार शोधण्याची प्रेरणा देतो. विचार नेहमीचा असला तरी मांडणी वेगळी करण्यासाठी प्रवृत्त करतो.

कंटाळा टाळायचा तर प्रत्येक क्षण ‘Here & Now’ ह्या न्यायाने अनुभवायला हवा. म्हणजेच त्या क्षणाबरोबरची तन्मयता, एकाग्रता जितकी जास्त तितका कंटाळा कमी. मग ते ओपीडीतले कन्सल्टे शन असो की जाहीर भाषण. असे असले तर आपली उत्कटता समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असावी. रांगेने सहा भाषणांमध्ये असा अनुभव आला की माझा शेवटचा शब्द वातावरणात विरल्यावर निमिषार्धाची शांतता होती. आणि टाळ्या वाजवताना समोरचा समुदाय उभा राहिला आणि प्रतिसाद देऊ लागला.. त्यातील उस्फुर्तता ‘ह्या हृदयीचे ते हृदयी घातले’ अशा जातकुळीची असली पाहिजे.

प्रत्येक ज्ञानशाखेच्या पोटामध्ये अनंत शक्यता दडलेल्या असतात. त्या त्या शाखेतील व्यावसायिकाने रूढीने बनवलेल्या चौकटीपासून स्वतःची मुक्तता करून घेणे खूप महत्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील रंगछटा शोधताना माझा प्रवास तर रंगतदार झाला आहेच पण कंटाळाही दूर पळाला आहे…….

एका फुलपाखराची गोष्ट

माझ्यासमोर आत्ता माहितीच्या महाजालामध्ये अर्थात इंटरनेटवर नुकतीच उमललेली एक साईट आहे . . . नव्याने उमलणे, मिटणे हे सारे ह्या महाजालामध्ये नित्यनेमाने होतच असते . . . पण ह्या साईटचे आपल्या साऱ्यांपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे . . .

www.thebeautifulmind.co.in ह्या संकेतस्थळाच्या होमपेजवर म्हणजे गृहपृष्ठावर एक छानसे चित्र आहे. एका सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा प्रवास ह्या चित्रात दाखवलेला आहे. साईटच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येईल की विषय आहे मानसिक आरोग्य . . . आणि ही साईट आहे डॉ. सुखदा चिमोटे ह्या तरुण मनोविकासतज्ज्ञाची.

सात वर्षांपूर्वीची गोष्ट . . . माझ्यासमोर बसली होती एक लाजरी-बुजरी मुलगी. नागपूरच्या वैदयकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यानंतर तिने बालरोग चिकित्साशास्त्र म्हणजे Paediatrics मध्ये D.C.H. ही पदविका मिळवली. तेव्हाही तिचे स्वप्न होते मनोविकारतज्ञ् बनण्याचे. वैयक्तिक आयुष्यातल्या काही हेलकाव्यांमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. . .  त्या हेलकाव्यांचे वादळ बनले होते. त्या वादळातून स्वतःची वाट स्वतःच शोधायची अशा इराद्याने ही मुलगी मला भेटायला आली होती.

तिला हवं होतं मार्गदर्शन. . .  सायकियाट्रिस्ट बनण्यासाठीचे. मी तिला माझ्या पद्धतीने सांगितले की, “बसत जा माझ्याशेजारी ओपीडीमध्ये . . . पेशंटस पहायला . . . कळेल तरी तुला मनोविकार कसे असतात ते . . .” त्याप्रमाणे ती यायला लागली. माझ्या लक्षात आले की ह्या मुलीला भावनिक तणाव आहे. दोन पेशंटच्या दरम्यान आम्ही गप्पा मारायला लागलो. ती त्या वेळेस ज्या वैयक्तिक अडचणींचा सामना करत होती त्यातून मीही एकेकाळी गेलो होतो. . .  मुख्य म्हणजे ‘शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट’ ह्या माझ्या पुस्तकाचे लिखाण तेव्हा सुरु होते. त्यातल्या दोन प्रकरणांचा मसुदा मी तिला वाचायला दिला . . . आमच्यामधल्या आस्थेची वीण बांधणारा क्षण होता तो . . .

दुसऱ्या दिवशीपासून आमचा संवाद अधिक खुला झाला. मी कामानिमित्त जिथे जायचो तिथे मी तिला घेऊन जायचो. सायकियाट्रिमध्ये आता पदविका मिळवायची तर प्रवेश-परीक्षा द्यायची. त्याची तयारी तिने सुरु केली. त्यात यश मिळाले. तिला ऍडमीशन मिळाली. कळव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तिची रेसीडेन्सी सुरु झाली . . . ती क्वार्टर्समध्ये रहायची. आपोआपच तिची ‘local guardianship’ माझ्याकडे आली. आता ती आमच्या घरी यायला लागली. हळूहळू घरची झाली. घरातल्या कबीरची दीदी बनली. सविताला ‘दी’ म्हणू लागली. आमच्या आजीला तिने नाव ठेवले ‘रूपा’ म्हणजे ‘रुम पार्टनर’ कारण सुखदा रहायला आली की त्या दोघी एका खोलीत झोपायच्या.

सुरवातीच्या काळात सुखदाला शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही अडचण आली. गळ्यामध्ये एक गाठ आली. थायरॉईड ग्रंथींच्या चाचण्या झाल्या. मायक्रोस्कोपखाली त्या ग्रंथी दिसल्या. दिसायला नकोत अशा पेशी. हा आजार वाढायच्या आधीच शस्रक्रिया करायला हवी. ऑपरेशन पार पडले. हॉस्पीटलमधून तिला आम्ही आमच्याच घरी आणले. त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा काही संशयास्पद गाठी. पुन्हा ऑपरेशन. पण या वेळी मात्र रिपोर्ट क्लीयर. तिच्या नाजुक शरीरयष्टीमध्ये असलेला निर्धार आम्हाला हळूहळू कळायला लागला होता. दोन वर्षे सरली. D.P.M. अर्थात Diploma in Psychological Medicine ची परीक्षा आली. रेसीडेन्सी संपल्यामुळे आता कुठे राहायचे हा प्रश्न होता. आम्ही म्हणालो, ‘आता इथेच ये राहायला’. . .  परीक्षा झाली. निकाल आला. सुखदाला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. मधल्या काळामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यातले मळभही दूर झाले . . . आणि आमचे नाते आता बाबा आणि लाडक्या मुलीचे बनले.

साडेचार वर्षांपूर्वी आमच्या नात्याने वेगळे वळण घेतले. आय.पी.एच. संस्थेमध्ये सुखदा माझी सहकारी बनली . . . हळूहळू तिच्या पेशंट्स मध्ये लोकप्रिय व्हायला लागली. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्यासाठी मी प्रशिक्षण कार्यक्रम घेतो तिथे ती माझ्याबरोबर यायला लागली. हळूहळू बोलायला लागली. स्वतः वाचन-अभ्यास करायला लागली. आणि आज भारत पेट्रोलियम, कॅस्ट्रॉलसारख्या कंपन्यांमध्ये आपली आपण संपूर्ण दिवसाचे प्रशिक्षणक्रम घ्यायला लागली.

हळूहळू तिच्या (आणि माझ्याही) लक्षात आले की Rational Emotive Behavior Therapy (REBT) म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचारपद्धतीमध्ये तिला रस आहे. उत्तम हस्ताक्षर, सौंदर्यदृष्टी आणि व्यवस्थितपणा ह्या गुणांची जोड तिच्यातल्या संवादकलेला मिळाली आणि आय.पी.एच. संस्थेमध्ये ती दोन दिवसांची कार्यशाळा घेऊ लागली. ABCD of REBT! . . . गेल्या अडीच वर्षांमध्ये डझनांहून अधिक कार्यशाळा झाल्या आणि . . . चक्क ३५० लोकांनी त्यात भाग घेतला . . . मी अनेकांना Feedback साठी चाचपतो . . . प्रत्येकजण तिची अक्षरश: तोंड भरून स्तुती करतो . . . लेखी Feedback तर अनेक!

अहो, सुरुवातीला वाटलं ही धिटुकली मुलगी काय शिकवणार. . . पण दोन दिवस गुंगवले तिने . . . अशा प्रतिक्रिया यायला लागल्या. आय.पी.एच. सोबतच आता सुखदा जळगाव, कोल्हापूर, नगर, सांगली, पेण, कुडाळ, अशा ठिकाणी कार्यशाळा घ्यायला लागली. दरम्यान तिने ‘पालकत्व’ ह्या विषयावरची अनेक पुस्तके वाचली आणि ‘मस्त मजेचे आईबाबा’ ही कार्यशाळा तयार केली. स्त्रियांसाठी ‘क्षितिज अंतरीचे’ तर मुलींसाठी ‘अस्मि’ हे कार्यक्रम सुखदाने डिझाईन केले. अहमदनगरच्या ‘स्नेहालय’ संस्थेच्या कार्यकर्त्यांचे नियमित प्रशिक्षण ती घेऊ लागली. आता रेणू आणि राजा दांडेकरांच्या दापोलीच्या शाळेसाठी ती काम सुरु करत आहे.

विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विषयाला धरून ‘फिल्म-क्लिप्स’ वापरण्याची कला आता तिने अशी साध्य केली आहे की बस्स! त्यासाठी तिने अनंत क्लिप्सचा, स्वतःचा साठाही तयार केला आहे. एखाद्या विषयाच्या मागे लागून त्यात प्राविण्य मिळवण्याचा तिचा ध्यास मला खूप आवडतो. ह्या ध्यासामुळेच तिने न्यूयॉर्कच्या, ‘अल्बर्ट एलीस इन्स्टिटयूट’ च्या तज्ञांतर्फे घेण्यात येणाऱ्या खास कार्यशाळांमध्ये नाव नोंदवायचे ठरवले. सुखदा आमच्या संस्थेव्यतिरिक्त कुठेच प्रॅक्टिस करत नाही. ह्या कोर्सेसची फी तशी भक्कम. तिने स्वतःच्या बचतीतून आणि मित्र-सुहृदांच्या मदतीतून ती रक्कम उभी केली . . . आता ती REBT च्या मूळ संस्थेने अधिकृत मान्यता दिलेली Therapist झाली आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे ह्या संस्थेचे भारतातील एक ‘सॅटेलाईट सेंटर’ ऑफीस म्हणून कार्य करण्याची मान्यता तिने मिळवली आहे.

माझ्याबरोबर किंवा स्वतंत्रपणे अशा अनेक कार्यक्रमांनी तिची डायरी आता गजबजू लागलेली आहे. रुग्णसेवेमधे ती जराही कुचराई करत नाही. पेशंट्सना वेळ देऊन योग्य पद्धतीने तपासते. आता मी तिच्याकडे REBT च्या उपचारासाठी काही खास रुग्ण पाठवतो. त्या सर्वांचे तिच्याबद्दलचे मत किती उत्तम आहे हे ते मोकळेपणाने मला सांगतात.

ती आता इतक्या पातळ्यांवर काम करते आहे परंतु ते फार कुणाला ठाऊकच नाही. कारण स्वतःच्या कामाबद्दल पिपाणी वाजवण्याची तिला सवयच नाही. पण तिच्या कामाची Dimensions कळायला तर हवीत . . . त्याशिवाय ते पुढे कसे जाणार . . . म्हणून ह्या साईटची कल्पना!

गेले काही महिने, जसा वेळ मिळेल तसा मी तिला गीताई शिकवतो आहे . . . इतक्या वर्षांमध्ये, माझ्याकडे असलेला मनोविकारशास्त्रातला अनुभव, REBT चे वाचन, चिंतन, फिल्म माध्यमाची जाण आणि तत्वज्ञान शिकण्याची इच्छा असे सारे एकत्र असलेला विद्यार्थी मला मिळाला नव्हता. तो तिच्या निमित्ताने मिळाला. एकदा बोलताना ती मला म्हणाली, “बाबा . . . तू जसा तुझ्या लिखाणातून, बोलण्यातून हे विवेकनिष्ठ मानसशास्त्र समाजापर्यंत पोहोचवलेस ते तुझे काम मी पुढे नेणार . . .”

हे ध्येय सुखदाने माझ्यासमोर मांडले तोपर्यंत तिने त्या दिशेने खरे तर पावलेही टाकायला सुरुवात केली होती. . . कारण आज तिच्या व्यवसायाच्या प्रत्येक अंगामध्ये ती REBT वापरते आहे. समाजापर्यंत पोहोचायचा एकही मार्ग तिने सोडलेला नाही . . . आमच्या आय.पी.एच. संस्थेमध्ये डॉ.शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी आणि मी ह्यांच्यामुळे ही उपचारपद्धती सर्व टीममेंबर्स पर्यंत पोहोचली . . . त्यामध्ये सातत्याने अभ्यास करून, प्रयोग करून आणि कार्यशाळांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन भर घालण्याचे काम आता सुखदाने हाती घेतले आहे.

विवेकनिष्ठ विचारांचा हा प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम म्हणजे सुखदाचे हे संकेतस्थळ . . . हे प्रतीक आहे तिच्या स्वतःच्याच प्रवासाचे . . .  कोशातून बाहेर पडून, सुरवंटाचे फुलपाखरू बनून भरारी घेण्याचे . . .

. . . माझ्यासमोरचा कॉम्पुटर स्क्रीन काहीसा धूसर झाला आहे अचानक . . . आणि माझा हाताचा तळवा उभारला गेला आहे शुभाशीर्वादासाठी . . .  thebeautifulmind . . . एका फुलपाखराची गोष्ट . . . मी पाहिलेली . . . . अगदी जवळून अनुभवलेली!

. . . सुखदा . . . शुभास्ते पंथानः सन्तु!

तुझा

बाबा

Understanding Excellence – Part I

I was facilitating an interactive session with school going students under the banner of ‘Shikshak Prabhodhini’ – a project where teachers are being trained to mentor exceptional students. We were discussing ‘emotions’.  A young girl of eighth standard, an aspiring singer, was discussing with me her emotions before a performance, in front of about 80 other students. We talked about the ‘Result’ and the ‘Process’. The ‘result’ was the end of the performance when the audience would clap and appreciate. The ‘Process’ was the actual performance that would lead to this result. We concluded that before starting the actual performance we need to make the ‘result’ ‘out of focus’ that is blurred and bring the actual performance in sharp focus … by sharp focus we meant, we will now focus on every minute of the performance… minute by minute.

The girl visualized aloud the exact moment of starting the performance. She described it as if in a trance, I was helping her to shape her responses … Here she was, as steady as a rock … breathing rhythmically..  Image   of her guru in front of her eyes … and the only overriding thought, I am going to do my best…

“   And who are you? …  what are you? …  at this moment? …”

“I am music …” pat came the reply

“A moment of excellence is born” I said.

It was a very strong experience emotionally for all of us present. A rare, delightful insight into an experience called ‘excellence’ … It was exhilarating in an enlightened manner.

At times, the experiential truth  is so strong that is difficult to catch it in words, however, if one has to consolidate the emotional insight into a  blinding design of wisdom, one has to fall back on words again.

So what is excellence?

I do not think excellence has one single definition. In the future segments of this communication, I will explore different   ways by which this theme can be understood. Here is the first one.

Let us take for example, a popular skill amongst students such as   ‘orator’s skill’.  Translated in school-reality, it means participating and winning elocution and debating competitions.

A student that is generally chosen by teachers for developing this skill is an expressive and communicative one who also has a ‘pleasant’ and ‘smart ‘disposition’.

Suppose there is   an elocution competition and five topics are given, out of which she has to select one. The mentor here will ask her to think and talk about each one of the topics  …  what are the thoughts that come to her mind when she reads topics such as , ‘Protecting My Earth’ or ‘The Life and Times of  Shivaji Maharaj’ .  She is encouraged to explore each topic; in her own way. She has to just go on talking about each topic. The mentor listens keenly.

“Can you now make a choice?” the mentor puts the question unconstructively.  She needs to give her own explanation why she is deciding to opt for a particular topic. If she is confused, the mentor helps her to explore her confusion (please note, not to clear it).

When she makes a choice she has to give justification for it. Having heard that; the mentor poses certain relevant queries regarding her choice. What   is the most important aspect of the topic that she has liked? What according to her is the part of the topic that she may find difficult? If she has ‘liked’ two topics what is one consideration that will help her to choose the one that she has chosen?

At the end, the mentor and student will decide a time interval where the student has to think of all the points raised and come back with a decision.

“But sir, I have already made up my mind” suppose the student says.

“Yes, I appreciate … I want you now to tell me one by one why and how you discarded the other topics. I am interested in knowing how you did it…”

“How I did it? I just did it” student.

“Let us explore, how you could have done it… I am taking a paper and writing all topics. I want you to write all the thoughts that came to your mind … that could help …”

The mentor helps the student to identify consciously the thinking process that went behind her decision.

The topic is now selected.

The mentor now motivates the student to gather information on the topic. The mentor shares the spirit of enquiry, exploration and excitement.

Having adequate ‘database’ the mentor helps the student to evolve the structure of presentation. The structure is not imposed. Any deviation from standard procedure of delivering a speech, is respected and discussed. The mundane use of quotations, use of lofty words, adult and literary phrases is questioned. The originality of expression is encouraged.

A draft is now ready.

The mentor and the student now discuss the style of presentation. The mentor does not impose his or any other’s style on the student.   They make a list of ‘impressive orators’ that they have observed   in media as well as in public life. The student makes note of the qualities that she would like to imbibe from each one of them.

The written draft is taken as a guideline rather than a script.

While rehearsing   the speech, placement of all phrases and points is discussed. The contents are rearranged, realigned and the impact is noted.

Then the student is given different scenarios and told to present the speech

  • Student is the first speaker
  • Last speaker
  • All the points covered by the previous speaker
  • Distracted audience
  • Tired judges
  • Interruption because of electricity / technical faults.

Each performance is discussed.

Then the ‘emotions’ during preparation and rehearsal are discussed. Boredom, anxiety, satisfaction…Each emotion is named and each emotion is acknowledged. The emotions that will help the performance are identified. How can the student continue to generate these helpful emotions? … different strategies are planned by which this can be done.

The issue of ‘ownership’ of performance is now discussed. This ‘ownership’ can be burdening or enjoyable, the way you look at it.

On the day of the performance, the mentor and the student spend a short ‘exclusive time’ together.

After the performance the mentor and the student discuss pros and cons of her own performance. Rather than saying “your delivery was too fast”, it is put as “These were the sentences where your speed was fast” Rather than saying “you need to work on your eye-to-eye contact” it is put as, “you need to cover periodically all corners of the audience by your eyes”.

After the performance is discussed, both mentor and student sincerely sit through some other contestants’ speeches and discuss those. Slowly they evolve a detailed format of performance appraisal which is kept as a record by the student.

After the result of the competition, the mentor explores resultant emotions with the student. They decide on their next goal.

As the time progresses, the student starts becoming more responsible and empowered and the mentor maintains a meaningful presence throughout this journey.

The student now grows confident and starts exploring the experience further. The mentor now focuses on ‘involvement’, ‘commitment’, ‘process satisfaction’ and ‘result satisfaction’ which are psychologically more sophisticated terms. The discussion revolves around, what is the ‘self- talk’ at such times and how different types of self-talk can be either helpful or harmful; how the student can exercise her choice to choose the most helpful self-talk.

As the string of performances continues and each is utilized as a ‘learning’ experience, there will come an experience the mentor is watching for… a memorable moment when the student and the speech being delivered becomes so synchronized that it becomes ONE. The student is at her best at that moment.

This moment is again shared and explored by both. It is a magical moment. A touch of brilliance.             Now, the mentor and the student keep on working further to make this moment appear often as well as how they can make it ‘better’. Here better, means more meaningful, more memorable, more intense…

And slowly, the moments of excellence start trickling… then flowing… Naturally … In a rhythm. The student has discovered her own way of expression.

The mentor watches with his ever-watchful eyes her track-record of glories with moist eyes, with all the memories gathering one by one in his mind… “There was a day when I helped her to make her choice” he says in his mind and smiles.

Dr Anand Nadkarni

एक मदत हवी आहे……

एक मदत हवी आहे……

आय. पी. एच. अर्थात Institute for Psychological Health ही आपली संस्था गेली सत्तावीस वर्षे ठाणे शहरात कार्यरत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह टिम आणि स्वयंसेवक मिळून दोनशेच्यावर व्यक्ती येथे काम करतात. वैयक्तीक, कौटुंबीक सेवा तसेच एकाचवेळी चालणारे अनेक उपक्रम लाक्षात घेता त्यातील प्रशासकीय तसेच इतर समन्वयाच्या कामासाठी एका अनुभवी व्यक्तीची गरज आहे.

आपल्या संस्थेच्या उपकेंद्रामध्ये रोज येणाऱ्या लोकांची संख्या सरासरी पाचशे ते सहाशे असते. विविध उपचारगट, प्रशिक्षण कार्यशाळा ह्यासाठी तसेच नोंदणी/ माहितीसाठी सतत ये- जा सुरु असते. संस्थेचे व्हेंडर्स, नगरपालिका, सरकारी संस्था, धर्मादाय आयुक्त ह्यांचेबरोबर वेळोवेळी संवाद साधणे गरजेचे असते.

औद्योगिक/ सामाजिक क्षेत्रातील व्यवस्थापनाची जाण असणारी ही व्यक्ती हवी. अर्थातच ही ‘नोकरी’ नव्हे. ह्या कामाचे योग्य ते मानधन देता येईल. पण ते ‘मानधन’ असेल ‘पगार’ नव्हे.

ह्या व्यक्तीला संगणकाचा वापर उत्तमप्रकारे करता येणे अपेक्षित आहे. संभाषणचातुर्य आणि संघटनचातुर्य हे गुणही आवश्यक ठरतील.

आपल्या संपर्कामध्ये अशी व्यक्ती असल्यास (किंवा आपणच अशी व्यक्ती असल्यास ) आपल्या आत्मवृत्तासह (C.V.)  संपर्क साधावा. Email :- iphthane@gmail.com

श्रेय आणि श्रेयस

सामाजिक जीवनामध्ये काही माणसे नम्रपणे का वागतात हे समजून घ्यायच्या प्रयत्नांत मी आहे . रूढार्थाने ज्यांना achiever म्हणता येईल अशी खरं तर ही माणसे असतात . . . ह्या विचारांना चालना मिळण्याचे कारण असं की चारच दिवसांपूर्वी मी चक्क सचिन तेंडुलकर आणि पुलेला गोपीचंद अशा दोघांनाही भेटलो. दोघांना तास-दोन तास जवळून पहाता आले. . .  सचिन आला तसा त्या समारंभातल्या ‘व्हिआयपी’ रूम मध्ये असलेल्या अनेकांची त्याच्या बरोबर फोटो काढण्याची स्पर्धा लागली. रुमालापासून ते डायरीपर्यंत अशी अनेक माध्यमे,   सहीसाठी सामोरी आली . . . तो सर्वांना अगदी संयमाने, हसतमुखाने तटवीत होता . . . no gap between bat and pads. त्याच्यासाठी हा झमेला पाचवीला पुजलेला असणार. विलक्षण सहजतेने त्या प्रसंगाचा सामना करत होता तो! . . . आमची ओळख आणि संभाषण झाले असेल पाच मिनीटे. . . . परंतु समारंभातून रजा घेताना माझ्यासमोरून जाताना त्याने माझा चक्क निरोप घेतला . . . त्यामुळे बाजूची चार डोकी चक्रावली.

. . . गोपीचंदचीही तीच तऱ्हा.  त्याचा दिवस पहाटे तीनला सुरु होतो असे कुणीतरी सांगितल्यावर तो म्हणाला, “तीन नव्हे सव्वाचार.” माणूस अगदी शांत . . . पण बोलणे ठाशीव . . . मधूनमधून एखादे हिंदी वाक्य. कॉफी पिता-पिता तो त्याच्या ऍकेडमी बद्दल बोलत होता. मी ऐकत होतो. त्याला प्रश्न विचारणारी असामी होती पी.साईनाथ! लेखक-पत्रकार आणि म्यॅगासेसे पुरस्कार विजेते विद्वान . . . तेही असे सहजपणे प्रश्न विचारत होते . . . दोन्ही बाजूने अभिनिवेश नाही . . . मी तर थक्कच झालो.

आता तुम्ही विचाराल, ही पर्वणी मला लाभली कशी? तर माझा मित्र ऍड. सुहास तुळजापूरकर ह्याच्या Legasis नावाच्या कंपनीच्या वार्षिक समारंभासाठी ही मंडळी एकत्र आली होती . . . स्वतः सुहास हा यशस्वी उद्योजक . . . औद्योगिक क्षेत्रामधल्या compliances  म्हणजेच ‘शिस्तबद्ध आणि बिनचूक प्रणाली’ राबवण्याचे तंत्रज्ञान आणि ज्ञान देणे हा त्याच्या कंपनीचा उद्देश. कोणत्याही कंपनीमध्ये अशी प्रणाली जर आत्मसात झाली तर गुणवत्ता होणार जागतिक दर्जाची. त्या समारंभाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रांमध्ये बोलण्यासाठी सुहासने ह्या साऱ्यांना बोलवले होते . . . आणि सुहासही अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखा पळापळ करत राबत होता.

सुहासचा भाऊ आणि माझा सख्खा मित्र देवीदास तुळजापूरकर माझ्याबरोबरच होता. त्याने माझी ओळख करून दिली अलाहाबाद बँकेच्या माजी चेयरवुमन शुभलक्ष्मी पानसे ह्यांच्याबरोबर . . . एखाद्या माध्यमिक शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका वाटल्या मला त्या वेळी . . .  पण व्यासपीठावर चढल्यानंतर बँकांविषयक परिसंवादात अस्खलीत इंग्रजीत ठामपणे बोलताना बाईनी टाळ्या घेतल्या. व्यासपीठावरून उतरल्यावर पुन्हा त्या डायरेक्ट प्रेमळ शुभाताई झाल्या. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एक अधिकारी म्हणून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर कुठच्याकुठे पोहोचल्या होत्या मॅडम ! . . . पण चेहरा हसतमुख, बोलणे नेमकं, अगदी नम्र!

ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर भेटले. १९६५ च्या भारत – पाक युद्धामध्ये त्यांचे विमान पाकिस्तानी प्रदेशात मारून पाडले गेले. योग्य वेळी निसटल्याने ते पॅरेशूटमुळे सुखरूप उतरले . . . पण शत्रुप्रदेशात ! “युद्धामध्ये पकडलेल्या प्रत्येक सैनिकाचे कर्तव्य असते, पळून जाण्याचा प्रयत्न करणे” . . . अगदी साधेपणाने ते म्हणाले. . . . त्यांच्या वाक्याचा अर्थ मनात उतरला तसा माझा ‘आ वासला’ गेला . . . पण स्टोरी तर पुढेच होती . . . ह्या गृहस्थांनी युद्धकैदी छावणीतून अफगाणिस्थान मार्गे यशस्वी पलायन केले. त्यातल्या काही चित्तरकथा त्यांच्या तोंडून ऐकताना काय वाटले असेल विचार करा . . .. त्यांच्या ‘वीरभरारी’ ह्या आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे औचित्य सुहासने दाखवले. त्याचबरोबर निवृत्त सैनिकांना नोकऱ्या देण्याचा एक संपूर्ण प्रकल्प ‘इज्जत’ ह्या नावाने सुरु केला. कॅप्टन परुळेकरांबरोबर ब्रिगेडियर अजित आपटे भेटले . . . सैन्यात रुजू झालेली त्यांची तिसरी पिढी. ते म्हणाले, “एका अर्थाने दिलीप नशीबवान . . . एअरफोर्समधला माझा भाऊ सुद्धा ह्या युद्धात सापडला . . . पण शत्रूच्या हाती वाचला नाही.” हे बोलताना ब्रिगेडियरचा करारी शांतपणाही मला हलवून गेला … देशासाठी सर्वकाही दिलेली ही माणसे मी अनुभवत होतो.

समारंभ संपला आणि जेवणाच्या आणि पेयपानाच्या गर्दीमध्ये हळूच कानोसा घेत भटकलो. त्या पंचतारांकित वातावरणात जोरदार नटलेल्या स्त्रीपुरुषांची कमी नव्हती . . . मध्येमध्ये दिसणारी ‘पेज थ्री’ टाईप संभाषणेही नजरेतून सुटत नव्हती . . . मला मोठी गंमत वाटली. एकीकडे ही चमकदमक आणि दुसरीकडे कर्तृत्ववान पण नम्र माणसे . . . दोन्ही एकाच वास्तवाचा भाग . . .

भारतरत्न सचिन तेंडुलकरला भेटण्याची संधी जशी चालून आली त्या दिवशी; तशाच भाग्यवान क्षणी मी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, रतन टाटा अशा व्यक्तींनाही ‘वन-टू-वन’ भेटलेलो आहे . . .  त्यांच्यातला साधेपणा मला स्पर्शून गेलाय . . . माझे  महदभाग्य की अनेक क्षेत्रातली कर्तृत्ववान पण नम्र माणसे माझ्या घरातल्यासारखी माझ्या असण्यात विरघरळून गेली आहेत. त्यात अभयदादा (अभय बंग) आणि बाबा (अनिल अवचट) सारखे अनेक आहेत. तसेच ज्यांच्या आता स्मृतीच सोबतीला असे हेमंत करकरे, सदाशिव अमरापूरकर, माझ्या डॉ. शरदिनी डहाणूकर मॅडम, डॉ. सुनंदा अवचट असेही अनेक आहेत . . .

परवाच्या समारंभाच्या निमित्ताने ह्या साऱ्यांमधला एक समान धागा पुढे आला . . . उपनिषदामध्ये ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ अशा कल्पना सांगितल्या आहेत . . . पैसा, प्रसिद्धी, सत्ता, वलय ह्या साऱ्या गोष्टी ‘प्रेयस’ मध्ये येतात . . .  तुम्ही जे करता, बोलता, जगता, त्यामध्ये तुमच्या असण्याचा हेतु मिसळला गेला की ‘श्रेयस’ कडे जाण्याचा प्रवास सुरु होतो. हळू जगणे अर्थपूर्ण होणे, स्वतःच्या जगण्यातला अर्थ सापडणे, आणि त्या प्रवासामध्ये घडणाऱ्या सर्व कृती-प्रक्रिया अगदी एकजीव आणि अभिन्न होऊन जातात . . . असे झाले की श्रेय मिळायला हवे, कुणीतरी आपल्याला आपण काही केल्याचे ‘श्रेय’ द्यायला हवे हा भाग लोपून जातो . . .  कारण ज्याला आपण बोलीभाषेत ‘श्रेय’ म्हणतो ते  खऱ्या अर्थाने ‘प्रेयस’ असते . . .

त्यामुळे अशी माणसे समरसून जगतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्यापेक्षा कर्तृत्वालाच बोलू देतात . . . ‘मी-मी’ चा पाढा वाचणारी कर्तृत्ववान माणसेही मी पहिली आहेत. प्रचंड यशस्वी पण ‘मी’पणातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही न करणारी . . . कसा करणार प्रयत्न? . . . कारण ‘मी’ मध्ये रमणेच किती रमणीय असते. अशा माणसांबरोबर बोलताना (म्हणजे त्यांचे ऐकताना) मी हळूहळू मंदस्मित द्यायला लागतो. समोरच्या तशा व्यक्तीला वाटते की मी त्यांना दाद देत आहे . . . म्हणून ते अजून जोरदार टोलेबाजी करतात . . .

. . . माझ्या त्या (बुद्धासारख्या) मंदस्मिताचा अर्थ असतो . . . अजून नाही मिळालेला ‘श्रेयस’चा रस्ता . . . सध्या ऐकतोय . . . पण प्रेयसकडून श्रेयसकडे जाल तेव्हा संवादाला जास्त मजा येईल.

  • आनंद नाडकर्णी