अचानक आलेल्या आगंतुक कविता

‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..

. प्लॅटफॉर्म 

तिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो

उद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.

स्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,

दोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण !

किती छान ना …

सराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात

निरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून ?

​खरंच किती छान.

. जळण्याची लय 

नाही मिळत तर जावं झुलत

आपल्याच मस्तीत गावं भटकत

बंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,

किंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;

कुणी सक्ती नाही केलेली.

नाही मिळत तरी जावं फुलत

एकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता

दाट जंगलातलं नवं झाड शोधत.

नाही मिळत तरीही जावं खुलत

फ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत

डोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं

आतल्या आत रहावं जळत.

जोपर्यंत जमत नाही म्हणायला

नाही मिळत तर गेलात उडत !

3. तुझा डिपी माझे मन

नवा डिपी चढला तुझा

तेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..

नव्याने नेसलेल्या साडीची

नव्हाळी ल्यालेली एक किशोरी

पहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे

की….

मीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात

अन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये

की…..

भविष्याचा वेग घेणारी प्रौढा….

विचारासोबत मनाला खेचणारी

की….

माझ्या मनावर पाखर घालणारी

माझी ढगात हरवलेली आई

की…..

माझी जीवाभावाची मैत्रीण

जगण्याच्या प्रवाहात गमावलेली

की….

तुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या

आणि Deciding Perspective

तेवढा माझा…!

. श्रद्धांजली 

अर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,

तर आवरशील रडणं,

अन् लागशील पुन्हा कामाला.

आठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.

नक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.

अर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,

करशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत

एवढे सारे केल्यावरती

थकलेल्या तृप्त क्षणी,

समजा आलीच माझी आठवण

तर आवरशील रडणं

अन् लागशील पुन्हा कामाला.

. बालपुरूष 

रडूनभेकून थकलोय् खरा

पण मी काही हट्टी बाळ नाही.

मनातली आई तुझ्या,

झाली आहे जागी, करतेय् माझे लाड;

शरीरातला पुरूषही माझ्या

झोपून गेलाय् का गाढ ?

६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात 

ओसंडून वहाणारी समृद्ध घागर

नवी बाग शिंपण्यासाठी.

हातालाच रोपे फुटली

तर किती बहार होईल…..

नाहीतर आहेच,

ग्रीनहाऊसमधल्या झाडांचं

बेतलेलं वाढणं….

आखलेलं वागणं.

७. हवेचा हलका झोका, 

डोलणारी समजूतदार पानं….

जाणवलं…. ते बरंच झालं.

थांबलो तरी.

नाहीतर पसरवतच होतो मूठभर माती

त्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.

. कलचांचणी 

क्षमता…. कळूनही न वळणाऱ्या

आवडी…. उत्तरोत्तर बदलणाऱ्या

व्यक्तिमत्व…. अजूनही भेलकांडणारं

आणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.

करणार कशी ‘कल-चांचणी’?

विकलतेचे Aptitude Testing.

जगण्याच्या कलत्या काळात ?

. चॅप्टर 

“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”

 टकटकच्या लयीत तो म्हणाला.

काहीसा खडसावून, भरड आवाजात.

“कळतंय रे…. पण अडचण आहे;

चॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.

पुन्हापुन्हा प्रयत्न करूनही….”

“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.

दिसेनासा झाला….

आता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे

बाइंडिंगची उसवणारी शिवण,

झाकून टाकली की सारं कसं…..

दिसायला नॉर्मल.

 

Advertisements

निषेधाचे नवे मार्ग

डॉक्टरांनी ‘संप’ केल्याने नेमके  काय साध्य होणार आहे?

प्रश्न आहे वैदयकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेचा. तो महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी डॉक्टरांनी निषेधाचे सर्व कायदेशीर आणि नैतिक मार्ग वापरायला हवेत. त्यामध्ये  मोर्चा,उपोषण, निवेदने, कायदेशीर पावले, लोकप्रतिनिधी पातळीवरची जागृती अशा अनेक उपायांचा समावेश करता येईल.

परंतु समाजामध्ये आज आपल्या व्यवसायाची विश्वासार्हता कमी होत असताना, सदभावना कमी होत असताना आपण रुग्णांना सेवा देणे बंद करावे हे मला योग्य वाटत नाही.

हे वागणे असे दाखवते की वैद्यकीय व्यवसाय अन्य व्यवसायांसारखाच आहे. त्याला नैतिकतेचा आधारच नाही. ‘सामान्य’ कामगारांप्रमाणेच वागताहेत हे डॉक्टर. असे आरोप सामान्य माणसे जास्त प्रमाणात करणार. सदभावना वाढणार की कमी होणार?

निषेध हे आपले नजीकच्या पल्ल्याचे ध्येय आहे पण विश्वासार्हता पुन्हा स्थापित करणे हे व्यावसायिकांचे लांब पल्ल्याचे ध्येय असायला नको का?

आपल्याला आपल्या रुग्णांमधला विवेक जागृत करायचा असेल आणि आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने मानवतावादी आहे असे दाखवायचे असेल तर राज्यभरच्या व्यावसायिकांनी एक आठवडा (किमान एक दिवस) आपल्या सर्वांच्या सर्व सेवा निःशुल्क द्याव्यात. मी जर हॉस्पिटलात काम करणारा विशेषज्ञ् डॉक्टर असेन तर मी माझे शुल्क न घेता उपचार द्यावे, शल्यक्रिया करावी. प्रत्येक रुग्णाला असेल सांगावे की तू म्हणजे माझ्यासाठी समाजाचा प्रतिनिधी आहेस. तुझा विवेक जागृत करण्यासाठी मी ही सेवा निःशुल्क देत आहे. असेही डॉक्टर आहेत असे तू किमान दहा लोकांना आजच्या दिवसात सांग.

आपण असे समजू की संपूर्ण महाराष्ट्रात, IMA ने ‘Medical camp’ घोषित केला आहे. एक रविवार असा ठरवावा  ज्या दिवशी शहरातल्या डॉक्टरांचे गट करून त्यांनी आपापल्या विभागामध्ये खास ‘Medical camp’ घ्यावे. त्या दिवशी वैदयकीय शंकासमाधानाचे कार्यक्रम आयोजित करावे. अशी सेवा घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला व्यवसायिकांवरच्या हल्ल्यांचा आणि हिंसेचा निषेध करणारे पत्रक द्यावे; त्या रुग्णांच्या त्यावर सह्या घ्याव्यात. असे करताना व्यावसायिकाला आत्मशुद्धीचे समाधानही लाभेल. माझ्या व्यवसायातील अपप्रवृतींचा मी निषेध करतो हे सुद्धा  ह्या निमित्ताने सर्व व्यावसायिकांनी सांगितले पाहिजे. डॉक्टरांवर होणारे हल्ले सर्वसाधारणपणे कोणती व्यावसायिक मूल्ये पाळणाऱ्या किंवा पायदळी तुडवणाऱ्या व्यावसायिकांवर होतात त्याची पहाणीही व्हायला हवी.

रुग्णाला सेवा न देणे हे नकारात्मक आहे आणि ते प्रतिक्रियावादी (Retaliatory, Reactive) पाऊल आहे. निःशुल्क सेवा देऊन आपले मत समाजाला पटवणे हे सकारात्मक आणि proactive पाऊल आहे.

आपण आपापल्या समाधानी रुग्णांनाही आवाहन करायला हवे की ऐन आणीबाणीच्या वेळी वैद्यकीय व्यावसायिक त्यांच्या मदतीला कसे आले त्याचे अनुभव त्यांनी सलग आठवडाभर आपापल्या समाजमाध्यम गटांमध्ये पसरावे. सर्व प्रसार माध्यमांना आपण आवाहन करावे की त्यांनी ‘मी आणि आमचे डॉक्टर’ किंवा ‘कुटुंबाचे डॉक्टरकाका’ अशा विषयांवर वृत्तकहाण्या (Newsfeatures) आणि संवादसत्रे (Talkshow) घडवून आणावेत. काही जमावांनी दुःख आणि राग आततायीपणे व्यक्त केला म्हणून तो मार्ग सर्वांनी घ्यायचा का हा choice आहे.

समाजमाध्यमांमध्ये प्रस्तूत करण्यात आलेल्या IMA पत्रकानुसार गावागावांमध्ये डॉक्टर्स सेवाबंदी करत आहेत की नाहीत हे पहाण्यासाठी विशेष पथके तयार करण्याची सूचना आहे. तसेच ह्या कामबंद निषेधामध्ये सहभागी न होणाऱ्यांसाठी असहकाराची गर्भित धमकीसुद्धा आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इतके भावनिक व्हावे आणि विवेकाला तिलांजली द्यावी हे खूप दुःखदायक आहे.

डॉक्टर्स आणि समाज ह्यातील कटुता कमी करणे हे आपले ध्येय असायला हवे. गढूळ झालेले समाजमन अधिक गढूळ करायचे आणि आपल्या व्यवसायाबद्दलच्या नाराजीला अधिकच खतपाणी घालायचे ह्यामुळे आपली विश्वासार्हता पुन्हा येणार आहे का? उलट निःशुल्क सेवा दिल्याने आपण प्रतीकात्मकपणे पण थेट कृतीतून समाजाला हे दाखवू की आमच्यासाठी ‘आर्थिक लाभ’ हा एकमेव हेतू असणार नाही तसेच आम्ही आमच्या ‘सेवाव्रताशी’ प्रतारणा करू इच्छित नाही. माझ्या व्यवसायावर झालेल्या शारीरिक हिंसेची प्रतिक्रिया मी जर अप्रत्यक्षपणे हिंसा करूनच करणार असेन तर मी माझ्या व्यवसायाला उन्नत आणि परिपक्व असा व्रत-व्यवसाय का म्हणावे? माझा व्यवसाय हा सामाजिक विवेकाचा मापदंड असावा अशी माझी इच्छा आहे आणि ती मला माझ्या कृतीतूनच ठामपणे व्यक्त करायला हवी.

  • डॉ. आनंद नाडकर्णी

ता.क.

आज सकाळपासून मी ‘Walk the talk’ ह्या न्यायाने तीसहून अधिक रुग्णांना विनाशुल्क तपासले. प्रत्येकाला माझ्या वागण्याचे कारण सांगितले. माझे विचार समजून सांगणारे निवेदन दिले. ह्या सर्वाचा Feedback विलक्षण सकारात्मक होता. सर्वच रुग्णांनी मला सांगितले की तुमचा अभिनव मार्ग भावला. काही जणांनी माझ्यासोबत फोटो काढला, काही जण पाया पडले आणि प्रत्येकाने हा अनुभव त्यांच्या जवळच्या प्रत्येकासोबत share करण्याचे आश्वासन दिले. माझा निषेधाचा आवाज अनेकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. रात्रीपर्यंत मी अजून तीस रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचेन. काम थांबवले असते तर माझ्या व्यवसायाबद्दलची सदभावना तर मी साठ कुटुंबांपर्यंत पोहोचवली नसतीच पण माझ्याबरोबर ह्या सर्वांच्या डॉक्टरांसंदर्भातल्या गप्पाही झाल्या नसत्या.