बहुरंगी बहर – हरहुन्नरी मुलांचा शोध-प्रकल्प !

अनेक विषयांत रुची असणाऱ्या, बहुअंगाने बहरत असलेल्या हरहुन्नरी मुलांचा शोध-प्रकल्प यंदाही सुरू झालाय. डॉ. आनंद नाडकर्णी यांची IPH आणि वयम् मासिक यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. ही निव्वळ स्पर्धा नाही, तर हा एक अनुभव आहे. मुलांना स्वतःच्या मनात डोकावण्याची, स्वतःचे विचार मांडण्याची ही अपूर्व संधी आहे. कोणत्याही माध्यमाच्या शाळेतील ७वी ते ९वीची मुले यांत सहभागी होऊ शकतात. यशस्वी मुलांना अनेक मान्यवरांना भेटण्याची संधी मिळते, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केले जाते. गेल्यावर्षीच्या जबरदस्त यशानंतर यंदाही या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

अधिक माहितीसाठी खालील जोडणी (Attachment) वाचा.

Advertisements

एका फुलपाखराची गोष्ट

माझ्यासमोर आत्ता माहितीच्या महाजालामध्ये अर्थात इंटरनेटवर नुकतीच उमललेली एक साईट आहे . . . नव्याने उमलणे, मिटणे हे सारे ह्या महाजालामध्ये नित्यनेमाने होतच असते . . . पण ह्या साईटचे आपल्या साऱ्यांपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे . . .

www.thebeautifulmind.co.in ह्या संकेतस्थळाच्या होमपेजवर म्हणजे गृहपृष्ठावर एक छानसे चित्र आहे. एका सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा प्रवास ह्या चित्रात दाखवलेला आहे. साईटच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येईल की विषय आहे मानसिक आरोग्य . . . आणि ही साईट आहे डॉ. सुखदा चिमोटे ह्या तरुण मनोविकासतज्ज्ञाची.

सात वर्षांपूर्वीची गोष्ट . . . माझ्यासमोर बसली होती एक लाजरी-बुजरी मुलगी. नागपूरच्या वैदयकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यानंतर तिने बालरोग चिकित्साशास्त्र म्हणजे Paediatrics मध्ये D.C.H. ही पदविका मिळवली. तेव्हाही तिचे स्वप्न होते मनोविकारतज्ञ् बनण्याचे. वैयक्तिक आयुष्यातल्या काही हेलकाव्यांमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते. . .  त्या हेलकाव्यांचे वादळ बनले होते. त्या वादळातून स्वतःची वाट स्वतःच शोधायची अशा इराद्याने ही मुलगी मला भेटायला आली होती.

तिला हवं होतं मार्गदर्शन. . .  सायकियाट्रिस्ट बनण्यासाठीचे. मी तिला माझ्या पद्धतीने सांगितले की, “बसत जा माझ्याशेजारी ओपीडीमध्ये . . . पेशंटस पहायला . . . कळेल तरी तुला मनोविकार कसे असतात ते . . .” त्याप्रमाणे ती यायला लागली. माझ्या लक्षात आले की ह्या मुलीला भावनिक तणाव आहे. दोन पेशंटच्या दरम्यान आम्ही गप्पा मारायला लागलो. ती त्या वेळेस ज्या वैयक्तिक अडचणींचा सामना करत होती त्यातून मीही एकेकाळी गेलो होतो. . .  मुख्य म्हणजे ‘शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट’ ह्या माझ्या पुस्तकाचे लिखाण तेव्हा सुरु होते. त्यातल्या दोन प्रकरणांचा मसुदा मी तिला वाचायला दिला . . . आमच्यामधल्या आस्थेची वीण बांधणारा क्षण होता तो . . .

दुसऱ्या दिवशीपासून आमचा संवाद अधिक खुला झाला. मी कामानिमित्त जिथे जायचो तिथे मी तिला घेऊन जायचो. सायकियाट्रिमध्ये आता पदविका मिळवायची तर प्रवेश-परीक्षा द्यायची. त्याची तयारी तिने सुरु केली. त्यात यश मिळाले. तिला ऍडमीशन मिळाली. कळव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तिची रेसीडेन्सी सुरु झाली . . . ती क्वार्टर्समध्ये रहायची. आपोआपच तिची ‘local guardianship’ माझ्याकडे आली. आता ती आमच्या घरी यायला लागली. हळूहळू घरची झाली. घरातल्या कबीरची दीदी बनली. सविताला ‘दी’ म्हणू लागली. आमच्या आजीला तिने नाव ठेवले ‘रूपा’ म्हणजे ‘रुम पार्टनर’ कारण सुखदा रहायला आली की त्या दोघी एका खोलीत झोपायच्या.

सुरवातीच्या काळात सुखदाला शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही अडचण आली. गळ्यामध्ये एक गाठ आली. थायरॉईड ग्रंथींच्या चाचण्या झाल्या. मायक्रोस्कोपखाली त्या ग्रंथी दिसल्या. दिसायला नकोत अशा पेशी. हा आजार वाढायच्या आधीच शस्रक्रिया करायला हवी. ऑपरेशन पार पडले. हॉस्पीटलमधून तिला आम्ही आमच्याच घरी आणले. त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा काही संशयास्पद गाठी. पुन्हा ऑपरेशन. पण या वेळी मात्र रिपोर्ट क्लीयर. तिच्या नाजुक शरीरयष्टीमध्ये असलेला निर्धार आम्हाला हळूहळू कळायला लागला होता. दोन वर्षे सरली. D.P.M. अर्थात Diploma in Psychological Medicine ची परीक्षा आली. रेसीडेन्सी संपल्यामुळे आता कुठे राहायचे हा प्रश्न होता. आम्ही म्हणालो, ‘आता इथेच ये राहायला’. . .  परीक्षा झाली. निकाल आला. सुखदाला ‘गोल्ड मेडल’ मिळाले. मधल्या काळामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यातले मळभही दूर झाले . . . आणि आमचे नाते आता बाबा आणि लाडक्या मुलीचे बनले.

साडेचार वर्षांपूर्वी आमच्या नात्याने वेगळे वळण घेतले. आय.पी.एच. संस्थेमध्ये सुखदा माझी सहकारी बनली . . . हळूहळू तिच्या पेशंट्स मध्ये लोकप्रिय व्हायला लागली. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्यासाठी मी प्रशिक्षण कार्यक्रम घेतो तिथे ती माझ्याबरोबर यायला लागली. हळूहळू बोलायला लागली. स्वतः वाचन-अभ्यास करायला लागली. आणि आज भारत पेट्रोलियम, कॅस्ट्रॉलसारख्या कंपन्यांमध्ये आपली आपण संपूर्ण दिवसाचे प्रशिक्षणक्रम घ्यायला लागली.

हळूहळू तिच्या (आणि माझ्याही) लक्षात आले की Rational Emotive Behavior Therapy (REBT) म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचारपद्धतीमध्ये तिला रस आहे. उत्तम हस्ताक्षर, सौंदर्यदृष्टी आणि व्यवस्थितपणा ह्या गुणांची जोड तिच्यातल्या संवादकलेला मिळाली आणि आय.पी.एच. संस्थेमध्ये ती दोन दिवसांची कार्यशाळा घेऊ लागली. ABCD of REBT! . . . गेल्या अडीच वर्षांमध्ये डझनांहून अधिक कार्यशाळा झाल्या आणि . . . चक्क ३५० लोकांनी त्यात भाग घेतला . . . मी अनेकांना Feedback साठी चाचपतो . . . प्रत्येकजण तिची अक्षरश: तोंड भरून स्तुती करतो . . . लेखी Feedback तर अनेक!

अहो, सुरुवातीला वाटलं ही धिटुकली मुलगी काय शिकवणार. . . पण दोन दिवस गुंगवले तिने . . . अशा प्रतिक्रिया यायला लागल्या. आय.पी.एच. सोबतच आता सुखदा जळगाव, कोल्हापूर, नगर, सांगली, पेण, कुडाळ, अशा ठिकाणी कार्यशाळा घ्यायला लागली. दरम्यान तिने ‘पालकत्व’ ह्या विषयावरची अनेक पुस्तके वाचली आणि ‘मस्त मजेचे आईबाबा’ ही कार्यशाळा तयार केली. स्त्रियांसाठी ‘क्षितिज अंतरीचे’ तर मुलींसाठी ‘अस्मि’ हे कार्यक्रम सुखदाने डिझाईन केले. अहमदनगरच्या ‘स्नेहालय’ संस्थेच्या कार्यकर्त्यांचे नियमित प्रशिक्षण ती घेऊ लागली. आता रेणू आणि राजा दांडेकरांच्या दापोलीच्या शाळेसाठी ती काम सुरु करत आहे.

विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विषयाला धरून ‘फिल्म-क्लिप्स’ वापरण्याची कला आता तिने अशी साध्य केली आहे की बस्स! त्यासाठी तिने अनंत क्लिप्सचा, स्वतःचा साठाही तयार केला आहे. एखाद्या विषयाच्या मागे लागून त्यात प्राविण्य मिळवण्याचा तिचा ध्यास मला खूप आवडतो. ह्या ध्यासामुळेच तिने न्यूयॉर्कच्या, ‘अल्बर्ट एलीस इन्स्टिटयूट’ च्या तज्ञांतर्फे घेण्यात येणाऱ्या खास कार्यशाळांमध्ये नाव नोंदवायचे ठरवले. सुखदा आमच्या संस्थेव्यतिरिक्त कुठेच प्रॅक्टिस करत नाही. ह्या कोर्सेसची फी तशी भक्कम. तिने स्वतःच्या बचतीतून आणि मित्र-सुहृदांच्या मदतीतून ती रक्कम उभी केली . . . आता ती REBT च्या मूळ संस्थेने अधिकृत मान्यता दिलेली Therapist झाली आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे ह्या संस्थेचे भारतातील एक ‘सॅटेलाईट सेंटर’ ऑफीस म्हणून कार्य करण्याची मान्यता तिने मिळवली आहे.

माझ्याबरोबर किंवा स्वतंत्रपणे अशा अनेक कार्यक्रमांनी तिची डायरी आता गजबजू लागलेली आहे. रुग्णसेवेमधे ती जराही कुचराई करत नाही. पेशंट्सना वेळ देऊन योग्य पद्धतीने तपासते. आता मी तिच्याकडे REBT च्या उपचारासाठी काही खास रुग्ण पाठवतो. त्या सर्वांचे तिच्याबद्दलचे मत किती उत्तम आहे हे ते मोकळेपणाने मला सांगतात.

ती आता इतक्या पातळ्यांवर काम करते आहे परंतु ते फार कुणाला ठाऊकच नाही. कारण स्वतःच्या कामाबद्दल पिपाणी वाजवण्याची तिला सवयच नाही. पण तिच्या कामाची Dimensions कळायला तर हवीत . . . त्याशिवाय ते पुढे कसे जाणार . . . म्हणून ह्या साईटची कल्पना!

गेले काही महिने, जसा वेळ मिळेल तसा मी तिला गीताई शिकवतो आहे . . . इतक्या वर्षांमध्ये, माझ्याकडे असलेला मनोविकारशास्त्रातला अनुभव, REBT चे वाचन, चिंतन, फिल्म माध्यमाची जाण आणि तत्वज्ञान शिकण्याची इच्छा असे सारे एकत्र असलेला विद्यार्थी मला मिळाला नव्हता. तो तिच्या निमित्ताने मिळाला. एकदा बोलताना ती मला म्हणाली, “बाबा . . . तू जसा तुझ्या लिखाणातून, बोलण्यातून हे विवेकनिष्ठ मानसशास्त्र समाजापर्यंत पोहोचवलेस ते तुझे काम मी पुढे नेणार . . .”

हे ध्येय सुखदाने माझ्यासमोर मांडले तोपर्यंत तिने त्या दिशेने खरे तर पावलेही टाकायला सुरुवात केली होती. . . कारण आज तिच्या व्यवसायाच्या प्रत्येक अंगामध्ये ती REBT वापरते आहे. समाजापर्यंत पोहोचायचा एकही मार्ग तिने सोडलेला नाही . . . आमच्या आय.पी.एच. संस्थेमध्ये डॉ.शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी आणि मी ह्यांच्यामुळे ही उपचारपद्धती सर्व टीममेंबर्स पर्यंत पोहोचली . . . त्यामध्ये सातत्याने अभ्यास करून, प्रयोग करून आणि कार्यशाळांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन भर घालण्याचे काम आता सुखदाने हाती घेतले आहे.

विवेकनिष्ठ विचारांचा हा प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम म्हणजे सुखदाचे हे संकेतस्थळ . . . हे प्रतीक आहे तिच्या स्वतःच्याच प्रवासाचे . . .  कोशातून बाहेर पडून, सुरवंटाचे फुलपाखरू बनून भरारी घेण्याचे . . .

. . . माझ्यासमोरचा कॉम्पुटर स्क्रीन काहीसा धूसर झाला आहे अचानक . . . आणि माझा हाताचा तळवा उभारला गेला आहे शुभाशीर्वादासाठी . . .  thebeautifulmind . . . एका फुलपाखराची गोष्ट . . . मी पाहिलेली . . . . अगदी जवळून अनुभवलेली!

. . . सुखदा . . . शुभास्ते पंथानः सन्तु!

तुझा

बाबा