अचानक आलेल्या आगंतुक कविता

‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..

. प्लॅटफॉर्म 

तिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो

उद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.

स्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,

दोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण !

किती छान ना …

सराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात

निरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून ?

​खरंच किती छान.

. जळण्याची लय 

नाही मिळत तर जावं झुलत

आपल्याच मस्तीत गावं भटकत

बंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,

किंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;

कुणी सक्ती नाही केलेली.

नाही मिळत तरी जावं फुलत

एकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता

दाट जंगलातलं नवं झाड शोधत.

नाही मिळत तरीही जावं खुलत

फ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत

डोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं

आतल्या आत रहावं जळत.

जोपर्यंत जमत नाही म्हणायला

नाही मिळत तर गेलात उडत !

3. तुझा डिपी माझे मन

नवा डिपी चढला तुझा

तेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..

नव्याने नेसलेल्या साडीची

नव्हाळी ल्यालेली एक किशोरी

पहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे

की….

मीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात

अन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये

की…..

भविष्याचा वेग घेणारी प्रौढा….

विचारासोबत मनाला खेचणारी

की….

माझ्या मनावर पाखर घालणारी

माझी ढगात हरवलेली आई

की…..

माझी जीवाभावाची मैत्रीण

जगण्याच्या प्रवाहात गमावलेली

की….

तुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या

आणि Deciding Perspective

तेवढा माझा…!

. श्रद्धांजली 

अर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,

तर आवरशील रडणं,

अन् लागशील पुन्हा कामाला.

आठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.

नक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.

अर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,

करशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत

एवढे सारे केल्यावरती

थकलेल्या तृप्त क्षणी,

समजा आलीच माझी आठवण

तर आवरशील रडणं

अन् लागशील पुन्हा कामाला.

. बालपुरूष 

रडूनभेकून थकलोय् खरा

पण मी काही हट्टी बाळ नाही.

मनातली आई तुझ्या,

झाली आहे जागी, करतेय् माझे लाड;

शरीरातला पुरूषही माझ्या

झोपून गेलाय् का गाढ ?

६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात 

ओसंडून वहाणारी समृद्ध घागर

नवी बाग शिंपण्यासाठी.

हातालाच रोपे फुटली

तर किती बहार होईल…..

नाहीतर आहेच,

ग्रीनहाऊसमधल्या झाडांचं

बेतलेलं वाढणं….

आखलेलं वागणं.

७. हवेचा हलका झोका, 

डोलणारी समजूतदार पानं….

जाणवलं…. ते बरंच झालं.

थांबलो तरी.

नाहीतर पसरवतच होतो मूठभर माती

त्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.

. कलचांचणी 

क्षमता…. कळूनही न वळणाऱ्या

आवडी…. उत्तरोत्तर बदलणाऱ्या

व्यक्तिमत्व…. अजूनही भेलकांडणारं

आणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.

करणार कशी ‘कल-चांचणी’?

विकलतेचे Aptitude Testing.

जगण्याच्या कलत्या काळात ?

. चॅप्टर 

“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”

 टकटकच्या लयीत तो म्हणाला.

काहीसा खडसावून, भरड आवाजात.

“कळतंय रे…. पण अडचण आहे;

चॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.

पुन्हापुन्हा प्रयत्न करूनही….”

“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.

दिसेनासा झाला….

आता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे

बाइंडिंगची उसवणारी शिवण,

झाकून टाकली की सारं कसं…..

दिसायला नॉर्मल.

 

Advertisements

स्वप्ने पहाण्याचं स्वातंत्र्य

blog 2

ठाणे शहरामध्ये ‘आत्मन अॅकेडमी’ नावाची एक छोटेखानी शाळा आहे. Learning Difficulty अर्थात Dyslexia अर्थात ‘तारे जमींपर’ मधल्या मुलाची अवस्था असणाऱ्या खास विद्यार्थ्यांसाठीची ही खास शाळा. गेली सतरा-अठरा वर्षे आमच्या आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेमध्ये Remedial Educator म्हणून आमच्या टीममध्ये काम करणाऱ्या मंजुश्री पाटीलने आणि तिच्या सहकाऱ्यांनी ही शाळा सुरु केली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतची सत्तर मुले ह्या शाळेत येतात. एका अर्थाने शिक्षणाच्या नेहमीच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांची ही शाळा ….. अगदी स्पष्ट सांगायचे तर Inclusive म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणपद्धतीचे, परंपरागत पद्धतीने अक्षरशः पानिपत केल्यामुळे निर्माण झालेली शाळा !

थोडेसे तपशीलात जाऊन लिहायला हवं. रूढ शालेय शिक्षणामध्ये यशस्वी व्हायचे तर विद्यार्थ्याची बुद्धी किमान सरासरीएवढी हवी. ह्या सरासरीपेक्षा कमी बुध्यंक असणाऱ्यांना गतीमंद (Slow learner) मतीमंद (Subnormal) अशा गटांमध्ये जागा मिळते. बुद्धिमत्ता सरासरीएवढी किंवा त्यापेक्षा जास्त असूनही वाचन, लेखन, अंकगणित ह्यामध्ये काही मुले मागे पडतात. त्यांना म्हणतात ‘एल. डी.’ मुले म्हणजे ‘अध्ययन अक्षमता’ असणारी मुले. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश झाला की सर्वसामान्य विद्यार्थी आणि ही मुले ह्यातील तफावत दिसायला लागते. अशावेळी योग्य प्रशिक्षण मिळाले, मानसिक आधार आणि माहिती मिळाली तर पालक आणि मुले ह्या अडचणींशी सामना करू शकतात. अशा मुलांना वेगळे न काढता इतर मुलांबरोबरच शिक्षण द्यावे असे शिक्षण तज्ज्ञ सांगतात. पण प्रत्यक्षामध्ये अनेकवेळा अज्ञानामुळे, गैरसमजांमुळे आणि मुख्य म्हणजे पूर्वग्रहामुळे अनेक शिक्षक ह्या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्नही करत नाहीत. दहावीच्या निकालातले भावी अडथळे काढून टाकण्याची चाळणी अनेक शाळांमध्ये सातवी-आठवीपासूनच सुरू होते.

आपल्या राज्यसरकारने ह्या विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा कायदा तयार केलेला आहे. प्रत्येक बोर्डामध्ये (SSC, CBSC, ICSC) ह्या मुलांसाठी सवलती आहेत. पण त्यांचा उपयोग कसा करायचा हे पालकांना समजत नाही. सवलत घेणे म्हणजे कमीपणा असाही ग्रह अनेक पालकांचा असतो. ह्या सवलती मिळवण्यासाठी साऱ्या राज्यामध्ये मुंबईतील नायर, सायन, केईएम ह्या तीन रुग्णालयांमध्येच चाचणी करावी लागते. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे छत्तीस जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये आता ही केंद्रे सुरू झाली आहेत. सरकारी अधिकाऱ्यांसमोरच फोनवर चौकशी केली तेव्हा ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अशी सोय अद्याप नसल्याचे सिव्हिल सर्जननीच सांगितले.

थोडक्यात….. पालक आणि विद्यार्थांचे भरडून निघणे…. अक्षरशः फरफट…. अनेक पातळ्यांवरची! गंमतीची गोष्ट म्हणजे ठाणे शहरामध्येच गेली सत्तावीस वर्षे आमची संस्था ह्या मुलांसोबत काम करत आहे तरी आमच्या चाचण्यांचे रिपोर्ट सरकार दरबारी मान्य नाहीत… एका छताखाली काम करणाऱ्या ६८ मानसिक आरोग्य व्यावसायिकांचा संघ असतानाही !….असो.

सर्वसाधारणपणे खाजगी शाळांमधल्या अनेक शाळा ह्या विद्यार्थ्यांबद्दल उदासीन असतात. काही शाळा ​तर सरळसरळ विरोधात. सरकारी क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मात्र सर्वसमावेशक शिक्षण राबवण्याची कल्पना आकारताना दिसते.

blog

ठाण्याच्या जि. प. शाळांमध्ये खास प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी त्यांच्या निरीक्षणानुसार १४०० च्या वर ‘खास’ मुले शोधली. आय.पी.एच. संस्थेच्या तज्ज्ञांमार्फत आम्ही ह्या मुलांचे वर्गीकरण करणारे ‘screening tool’ तयार करीत  आहोत. बुद्धिमत्तेची मर्यादा, अध्ययनअक्षमता, अतिचंचलता, स्वमग्नता अशा ठळक गटांची वर्गवारी शिक्षकांना करता आली तर सरसकट सर्वांसाठी मानसिक चाचण्या कराव्या लागणार नाहीत. ‘अध्ययनअक्षमता’ असलेल्या मुलांचीच विशेष चाचणी करावी लागेल. ठाणे जि. प.चे कार्यकारी अधिकारी विवेक धीमनवार आणि शिक्षणाधिकारी यादव मॅडम व त्यांची टीम ह्यांच्या पुढाकाराने हा प्रयोग आखला आहे. आय.पी.एच.ची टीम शिक्षकांना हे उपकरण कसे वापरायचे (प्रश्नावली व निरीक्षणावली) हे शिकवेल. खरं तर अशा प्रयत्नांची गरज सर्वत्र आहे. संघटित प्रयत्न झाले तरच दिशादर्शी आकृतिबंध तयार होईल.

तर ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर मंजुश्रीच्या धाडसाचे कौतुक करायला हवं…. तिने चक्क शाळा सुरु केली आहे. यंदाच्या तिच्या चौदा विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा यशस्वीपणे पार केली.

ह्या शाळेच्या सल्लागार समितीवर मी पहिल्यापासून आहे. आम्ही सारे आय.पी.एच.टीम सभासद शाळेतल्या मुलापालकांना वेळोवेळी शास्त्रीय मदत देतो. पण शाळेच्या सध्याच्या जागेमध्ये जाणे मात्र माझ्याकडून झाले नव्हते. मंजुश्रीच्या टिममधली प्रीती, आय.पी.एच.  मध्येही काम करते. तिच्या वार्षिक appraisal​ मध्ये तिने माझ्याकडून १४ ऑगस्टच्या सकाळची शाळाभेट माझ्या डायरीत लिहवूनच घेतली.

आणि पावसाळी सकाळी, कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी आणि सत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर मी ‘आत्मन’च्या छोटेखानी  इमारतीमध्ये पोहचलो. ठाणे महानगरपालिकेने भाडेकरारावर दिलेली ही जागा….. शाळा फी आकारते म्हणून मासिक भाडेही सहा आकडी आकारते आमची स्थानिक स्वराज्य संस्था ……. एकीकडे फुकट खिशात घातले जाणारे भूखंड आणि दुसरीकडे हे चित्र….. पण निदान जागा तरी मिळाली आहे ह्या शाळेला. भाडे कमी करण्यासाठी खरेतर ठाण्याच्या जागरूक नगरसेवकांनी आणि प्रशासकांनी आता पावले उचलायला हवीत. (पुन्हा) असो.

blog1

आत्मनच्या परिसरामधला उत्साह मात्र अशा अनेक अडचणींवर मात करणारा आहे. सगळी मुले आणि शिक्षक मस्त धमाल करत होते. इथे तास संपल्यावर बेल वाजत नाही तर संगीताची धून वाजते. (मंजुश्री उत्तम गायिका आहे. आय.पी.एच.च्या ‘वेध’ परिषदेच्या व्यासपीठावर आणि सीडीमध्येही तिचा उत्तम सहभाग असतोच.) मी शाळा पहात होतो. मधल्या सुट्टीमधले डब्बे खाणे सुरु होतं. दुसऱ्या मजल्यावरच्या छोटेखानी हॉलमध्ये सगळी मुले आणि शिक्षकवर्ग बसला. आमच्या गप्पांना सुरूवात झाली.

“तुमची आधीची शाळा आणि ही शाळा ह्यात तुम्हाला कोणते फरक जाणवतात?” असा प्रश्न मी विचारला आणि उत्तराचा धबधबा सुरु झाला. आधीच्या शाळांमध्ये आडव्या रुळानें हातावर मारण्यापासून ते थोबाडीत मारण्यापर्यंत केलेले शिक्षकांचे अनुभव पाचवी-सहावीतली मुले सांगत होती. तुम्ही कसे निक्कमे, धरतीपर बोझ, पागल, रिटार्डेड आहात अशा अनेक विशेषणांची यादी मुलांनी दिली. शिक्षकांचे जर असे वर्तन तर वर्गातल्या इतर मुलांच्या चिडवण्याला काय मर्यादा असणार….. ठाणे मुंबईतल्या बऱ्यापैकी प्रतिष्ठित शाळांमधून आत्मनमध्ये आलेल्या मुलांची ही कथा…. मुलांचे आत्मभान पोखरणारा केवढा हा हल्ला…..

ह्या तुलनेत मुलांना ‘आत्मन’ शाळा म्हणजे स्वर्ग वाटली तर नवल नाही. “इथल्या सगळया टीचर्स सुंदर आहेत” एक चिमूकली म्हणाली.  “आम्ही आणि टीचर्स इथे एकसाथ शिकतो.” एक मुलगा म्हणाला.  “इथे आम्हाला कळेपर्यंत शिकवतात.” सातवीतील एक मुलगा.

इतके सारे असले तरी बाहेरच्या जगात ह्या शाळेतल्या मुलांना ‘पागल लडकोंके ​स्कूलमे जानेवाला’ असेही म्हणतात. आत्मनचा अपभ्रंश करून ‘प्रेतात्मा स्कूल’ किंवा ‘जीवात्मा स्कूल’ असेही म्हणतात. “आमची शाळा आमच्यासाठी स्पेशल आहे म्हणून ती स्पेशल स्कूल आहे ” एकजण म्हणाला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

”हम सब जब पास होंगे तब सबके मूह बंद हो जाऐंगे” एक मुलगी म्हणाली. मग मी त्यांना ‘आत्मन’ ह्या शब्दाचा अर्थ सोपा करून सांगितला. अगदी गीताईमधल्या श्लोकांपर्यंत…… आत्माचि आपुला मित्र /आत्माचि रिपू आपुला.

आपणच स्वतःचे मित्रही बनू शकतो किंवा शत्रूही…..ह्याची उदाहरणे त्यांना दिली. माझ्या लहानपणातले काही अनुभव सांगितले.

शेवटी त्यांना विचारले, ”तुमचे स्वप्न काय आहे?”

तर शेफ, क्रिकेटर, आर्टिस्ट, सिंगर, टिचर, आर्मी ऑफिसर, इंजिनीअर  अशा अनेक स्वप्नांची भेंडोळी मुलांनी जोरदारपणे हवेत भिरकावली. आणि अचानकपणे मला आत्मन शाळेचा ‘स्पेशल’नेस जाणवला…… मुले त्यांच्या स्वप्नांबद्दल मुक्तपणे बोलत होती. कदाचित आधीच्या शाळेमधल्या वातावरणामुळे त्यांना स्वप्ने पाहण्यामधली गंमतच जाणवली नसेल. स्वप्ने पहायची भीती वाटली असेल, जबरदस्त धाक बसला असेल……

ह्या शाळेने त्यांना त्यांचे स्वप्न पहाण्याचे मूलभूत स्वातंत्र्य पुन्हा एकदा बहाल केले  होते. उद्धारेंत् आत्मना आत्मानम् …. स्वतःचा विकास स्वतःच करायचा, स्वतःचे सत्व स्वतःच शोधायचं तर स्वीकार हवा आणि स्वातंत्र्य हवं ….. असं झालं तर ‘जबाबदारी’ शिकवायला वेगळे श्रम करावे लागत नाहीत.