पैसा किती मोठ्ठा? (लेखांक दुसरा) : माझ्या मनातला पैसा

mazhya manatla paisa

मी लहान असताना माझ्या आईवडलांच्या कधीमधी होणाऱ्या ज्या कुरबुरी कानावर पडायच्या त्यात आईची एक तक्रार असायची की वडील त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी पैसे मिळवतात . . . माझे वडील प्राध्यापक होते आणि त्यांच्या पगाराव्यतिरिक्तचे पैसे ते शिकवण्यातून कमावायचे नाहीत. म्हणजे अनेकांना वर्गाबाहेर शिकवायचे पण ‘शिकवण्या’ करायचे नाहीत. आपला संसार स्थिरपणे चालावा यासाठी माझ्या काटकसरी आईला त्यामुळे खर्चाचा तोल राखावा लागे. आई फणकाऱ्याने म्हणायची, “दोन आण्याची वेणी तर कधी आणली नाहीच  . . . पण मुलांची तरी हौस करायची.”

पण त्या दोघांनी आम्हा मुलांना ‘गरिबी’ हा Feel मात्र कधीच दिला नाही. जे अनुभवायचं ते सुंदरपणे, एकत्र, तृप्तीने . . . त्यामुळे मला माझे बालपण ‘संपन्न’च वाटत आले. छोट्या गावातून मुंबईत यायचो आम्ही सुटीसाठी तेव्हा माझे काही नातेवाईक आणि आम्ही ह्यांच्या रहाण्यातला फरक लक्षात यायचा . . . माझी आणि माझ्या भावंडांची प्रवृत्ती हट्टाकडे वळली नसावी त्याचे एक कारण आमच्या घरी प्रत्येक सण साजरा व्हायचा. राष्ट्रपुरुषांचे दिवस साजरे व्हायचे. टरबूज खाण्यापासून कोजागिरीचे दूध आटवण्यापर्यंत प्रत्येक कृतीचा सोहळा असायचा. पुस्तके नावाच्या वस्तुवर खर्च म्हणजे गुंतवणुक असे मानले जायचे.

साधेपणाला लय असते ती त्या जगण्याला होती. त्याचवेळी आपण दुसऱ्याला खूप किंमती काही नाही दिले तरी भावनेने भरलेले देऊ ही वृत्ती होती. माझे वडील आपल्या प्रत्येक बहिणीला राखी-भाऊबीजेला खास पत्र लिहायचे. घरातल्या सर्वांच्या वाढदिवसासाठी घरातच शुभेच्छा कार्डे बनायची आणि त्याचे कौतुक असायचं . . . निर्मितीचा आनंद आणि खरेदीचा आनंद ह्यांचे हे व्यस्त प्रमाण माझ्या आईबाबांना कसं गवसलं कुणाच ठाऊक . . . पण त्यामुळे पैसे असणे, कमी असणे, नसणे ह्या गोष्टींना फारसे महत्व दिलं गेले नाही.

मेडीकल कॉलेजला आल्यावर मात्र अचानकपणे पैशाचे महत्व नव्याने कळलं. कारण हॉस्टेल मधले रहाणे . . . घरून येणारे पैसे पुरेनात. कारण चांगली पुस्तके (फुटपाथवरून) विकत घेणे, चित्रपट-नाटक-संगीताच्या कार्यक्रमांना जाणे, तऱ्हेतऱ्हेचे खाणे पिणे आणि त्या वयाला साजेसे काही शौक . . . पण वडलांकडे ह्यासाठी पैसे मागायचे नाहीत हे गृहीत पक्के होते. सुदैवाने त्या काळात माझ्या लेखनाला सुरवात झाली. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांसाठी नियमित लिखाण करून मी थोडेथोडे पैसे जोडायला लागलो. शिल्पी नावाच्या जाहिरात संस्थेसाठी योगायोगाने चक्क कॉपीरायटिंग करायला लागलो. कधी भाषांतरे तर कधी जिंगल्स लिहिणे . . . तिथेही पैसे मिळायचे. अशा प्रकारे माझे पूरक उत्पन्न सुरु झाले. त्यात मी खर्चाबरोबरच बचत करू लागलो. पुढे एम.डी. झाल्यावर खाजगी प्रॅक्टिस सुरु करताना जेवढा खर्च करावा लागला तो ह्या बचतीमधून केला. आणि व्यवसाय सुरु केल्यावर तर सुरवातीला तिथून मिळणाऱ्या पैशाचे हिशोब वडलांच्या हातातच सोपवले. पण चारच वर्षांमध्ये वडील वारले आणि कमावलेल्या पैशाची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली.

‘स्वतःच्या हिंमतीवर ब्लॉक घेण्याचा निर्णय’ . . . हा अध्याय लवकरच रचला गेला. ‘घेऊन बघ उडी . . . पुढे होते सगळे’ असे म्हणत एका आधुनिक कॉम्प्लेक्समध्ये (१९९१ साली) एक प्रशस्त फ्लॅट बुक केला. आता खरा हिशोबाचा तोल साधण्याचा ताण जाणवायला लागला होता. सारी कर्जे फेडण्यात सहासात वर्षे गेली…  व्यावसायिक रंगभूमीवर मी लिहिलेल्या नाटकाची मानधनेसुद्धा त्यात जायची.

पण ‘स्वतःचे घर’ नावाची भावना प्रबळ होती. ‘आपली कमाई’ असा सूर होता . . . पण घटना अशा घडल्या की १९९७च्या एप्रिल महिन्यात मी त्या ‘स्वतःच्या घराच्या’ बाहेर पडलेलो होतो. त्या घराची मालकी कायदेशीरपणे सोडून देऊन . . .

पैसा नावाच्या गोष्टीच्या ‘येणे-जाणे’ ह्या क्रियेचे टोकाचे अनुभव होते ते. बँकेतली बचत संपलेली, डोक्यावर छप्पर नाही . . . चाळिशीपासून काही वर्षे लांब . ..  जवळ तीन सुटकेसेस आणि लिहिण्यासाठी वापरायचे एक लाकडी डेस्क . . . ‘आर्थिक धूळधाण’ म्हणजे काय ते सांगणाऱ्या त्या क्षणाने मला शिकवले की पैसा ही तुझी पहिली प्रायोरिटी कधीच असणार नव्हती, नाही, पुढेही नाही. इतर कोणत्याही व्यक्तीच्या अनुभवांबरोबर तुलना न करता स्वतःचे पैसेविषयक सत्य स्वतःलाच स्वीकारायला लागते.

पुढे विनोबा वाचायला लागलो तेव्हा त्यांचा दृष्टांत मिळाला. जगण्याची होडी पैशाच्या पाण्यावरून चालवावी हे इष्ट पण म्हणून काही पाण्याला होडीत साठवायचे नाही. तसे केले तर होडी बुडेल.

असे काही जण पहातो ज्यांची स्वतःचीच स्पष्टता नसते की पैसा कशासाठी हवा?

माझ्या दृष्टीने चांगले आणि निरोगी आरोग्य जगण्यासाठी पैसा हवा. म्हणजे त्याला क:पदार्थ का लेखावे. चिमणीने काडी काडीने घर बनवावे तसे मी पुन्हा एकदा घर बसवले. त्याचे कर्ज फेडले. तेव्हाच ठरवले की आपल्या गरजेपुरते छोटे घर घ्यायचे. त्याच्या पलीकडे घर नावाच्या गोष्टीत जीव (आणि पैसा) नाही गुंतवायचा. प्रवास, पुस्तके, खाद्ययात्रा ह्यासाठी पैसे हवेत. जबाबदाऱ्या पार पाडण्याइतपत हवेत. बस्स.

‘किती हवेत पैसे?’ हा प्रश्नही सुटलाच आपोआप. मी सुमारे अठ्ठावीस वर्षे खाजगी वैद्यकीय व्यवसाय केला. सर्वसाधारणपणे माझ्या शहरात जी फी आकारली जायची त्याहून अर्धीच असायची . . . त्यात मी फार ग्रेट असा सोशल त्याग करत नव्हतो. मला किती पैसे हवेत ते स्पष्ट होते म्हणून.

पण पैसे उभे करण्याच्या माझ्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. पस्तीस वर्षांमध्ये माझ्या कार्यासाठी, संस्थेसाठी मी भरपूर पैसे उभे केले . . . त्याचा हिशोबही न ठेवता . . . पण त्यातही त्याग होता असे मला वाटत नाही . . . मानसिक आरोग्य क्षेत्रातील माझा विचार पुढे न्यायचा तर लागणारे एक साधन म्हणजे पैसा.

ही स्पष्टता येत गेली तसे आश्चर्यकारकपद्धतीने आमच्या संस्थेच्या कामाला आर्थिक मदत देणाऱ्यांची संख्या वाढली. त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला की इथे पैसा योग्य कारणासाठी साधन म्हणून वापरला जाईल.

मी कार्यासाठी ‘Fund Raise’ करण्यात वाघ असतो पण मला स्वतःसाठी काही मागावे तर जीभ रेटत नाही. तिथेही खूप समजूतदार माणसे भेटली. दोन वेळा महागडी ऑपरेशन्स करायची वेळ आली तर सर्जन मित्रांनी एक पैशाची फी आकारली नाही.

म्हणजेच माझी भावनिक सुरक्षितता ही काही पैसे नावाच्या गोष्टीबरोबर फिक्स करून टाकायची गरज नाही. भौतिक सुखासाठी पैसा हवा. संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी हवा. भावनिक सुख मिळेल ते इतर अनके गोष्टींमधून . . . अक्षरशः असंख्य गोष्टींमधून.

माझ्या गरजा काय, माझी सोया-सुविधा कोणती आणि माझी ‘चैन’ कोणती ह्या तीन व्याख्या जितक्या स्पष्ट तितकी पैशाप्रति असलेली बांधिलकी कमीजास्त! . . . म्हणजे मलाही कधी अगदी वेगळ्या, उच्च प्रतीच्या हॉटेलात जाऊन खास असा खाजगी भोजन समारंभ करायला आवडतो. पण ती माझी चैन . . . कधीकधी येणारा, शक्यतो आखलेला अनुभव!

सोय आणि सुविधा म्हणजे कामासाठी लागणारा वेळ वाचावा ह्यासाठी केलेला विमानप्रवास . . . लांबचा ट्रेन प्रवास असेल तर दोन किंवा तीन टायरने शीतल प्रवास करणे ही सुविधा. वयाची पंचेचाळिशी पार होईपर्यंत मी सदासर्वदा सार्वजनिक वाहन व्यवस्थेने प्रवास केला. चार चाकी वाहन आयुष्यात आले कारण कामाची गती आणि व्याप्ती वाढली म्हणून. तेही आजवर खाजगी मालकीचे नाही . . . कारण प्रत्येक शहरामध्ये माझ्याकडे अनेक गाड्या हक्काच्या आहेतच की . . .

माझ्या गरजांच्या व्याख्येमध्ये वाचन येते . . . पुस्तके विकत घेऊन वाचणे येते . . . वीस वर्षे सुती-खादी वापरत असल्याने माझा वस्त्र ह्या गरजेवरचा खर्च मर्यादित असतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातले आम्ही सारे ‘समान व्याख्य्या’वाले आहोत . . . त्यामुळे मूळात पैसे कमवायचे किती, खर्च किती-कसे करायचे आणि बचत करून गुंतवायचे किती ह्यामध्ये बऱ्यापैकी एकमत असते.

पण तसे नसेल तर गडबड होण्याची शक्यता खूप जास्त . . . पती आणि पत्नी, आईवडील आणि मुले ह्यांच्या गरज-सुविधा-चैन ह्या व्याख्या जर वेगवेगळ्या असतील तर एका घरात अनेक ‘आर्थिक’ दृष्टिकोन निर्माण होतात. एकसंघता जाते. काही जणांचा भूतकाळ आर्थिक जिकिरीचा असेल तर बाह्य स्थिती सुधारली तरी जुन्या सवयी सुटत नाहीत. काही जण बाह्य आर्थिक स्थिती बदलल्यावर पैसे उधळायला लागतात.

म्हणजे पैसे हे आयुष्यातले साध्य मानायचे की साधन हा निर्णय फक्त पैसे आहेत की नाहीत ह्या वास्तवावर अवलंबून नसतो. गरिबी किंवा श्रीमंती ही अंशतःच बँकबुकात अथवा तिजोरीत असते. उरलेली वृत्तीमध्ये असते.

आदिवासी समाजातून येऊन डॉक्टर आणि आयएएस झालेल्या डॉ. राजेंद्र ह्या तरुणाबरोबर गप्पा मारत होतो एकदा. धुळे जिल्ह्यातल्या पाड्यामधली त्याची बालपणातली आठवण तो सांगत होता. पावसाळी रात्र होती. झोपडी गळत होती. चिरगुटांच्या सोबतीने कुडकुडण्याला काबूत ठेवत मुले पावसाकडे पहात होती. राजेंद्रचे काका त्यांच्या वहिनीला म्हणजे राजेंद्रच्या आईला म्हणाले, “ह्या पावसामध्ये आपली ही परिस्थिती तर गरिबांचे काय होत असेल . . . ” राजेंद्र सांगतो की त्या क्षणाने मला शिकवले की जगण्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा बाह्य परिस्थितीपेक्षा जास्त महत्वाचा आहे.

हे तत्व लक्षात येणे आणि जगण्यात उतरणे म्हणजेच मनाची श्रीमंती.

होडीमध्ये पाणी शिरायला नको असेल तर स्वतःच्या मनाचे इतके सारे प्रशिक्षण करायला हवे!

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s