आजगावकर सर : माझे ‘गोड’ गुरु

त्या काळामध्ये एमबीबीएस डिग्रीसाठीच्या अभ्यासक्रमात दीड वर्षाच्या काळाला ‘वर्ष’ म्हणायचे. म्हणजे प्रथम ‘वर्षा’चा विद्यार्थी ‘दिड वर्षा’नंतर व्दितीय एमबीबीएसला जायचा. हा महत्वाचा टप्पाबदल. कारण तोवरचे शिक्षण तसे पुस्तकाधिष्ठीत असायचे. अॅनेटाॅमीच्या डिसेक्शनचा तेवढा काय तो प्रत्यक्ष अनुभव … व्दितीय एमबीबीएसला गेला विद्यार्थी कि सकाळी एप्रन घालून, स्टेथॅस्कोपचा दागीना मिरवत ‘वाॅर्ड-टर्मस्’ सुरु व्हायच्या. रुग्णाबरोबरच्या अनुभवाधिष्ठीत शिक्षणाला सुरवात. माझ्या आयुष्यात हा टप्पा आला गेल्या शतकातल्या सत्तरीच्या दशकामध्ये …. त्या काळी बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘ऑनररी सिस्टीम’ असायची. शहरातले प्रथितयश डॉक्टर्स सकाळचे चार-पाच तास सर्वसाधारण रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थी यांचेसाठी द्यायचे… जवळजवळ विनामूल्य ! त्या काळातले अनेक ऑनररी आजच्या अनेक ‘फूल टाईम’ प्राध्यापकांपेक्षा जास्त प्रामाणिकपणे आणि समरसतेने काम करायचे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांमध्ये अशा डॉक्टरांची परंपरा होती. सायनचे वैद्यकीय महाविद्यालय तेव्हा तसे बाल्यावस्थेत होते.

आम्ही विद्यार्थ्यांसाठी, ‘इन्फेक्शस डिसीजेस’ ह्या गटातल्या आजारांच्या शिक्षणासाठी साधारणपणे महिना-दिड महिन्याची एक ‘टर्म’ असायची. सर्व संसर्गजन्य आजारांवरचे खास रुग्णालय होते ‘कस्तुरबा हॉस्पीटल’ ह्या नावाचे. आर्थर रोड जेलच्या बरोबर समोर ह्या रुग्णालयाची हद्द सांगणारी भिंत सुरु व्हायची. संसर्ग झालेला रुग्ण म्हणजे सुद्धा कैदीच ! इतरांपासून त्याला दूर ठेवायचा. बाहेरच्या उंच भिंतींमुळे बंदीस्त वाटणारे हॉस्पीटल आत गेल्यावर बऱ्यापैकी प्रशस्त होते. कौलारु इमारती होत्या. डिप्थेरिया, टिबी, यकृताचे आजार असे अनेक विभाग आणि त्यासाठीचे वॉर्ड होते. मुंबईतल्या तमाम वैद्यकीय कॉलेजांमधल्या विद्यार्थ्यांना ह्या टर्मसाठी इथे यायला लागायचं. प्रशासकीय दृष्टीने हे रुग्णालय नायर रुग्णालयाला  जोडलेले होते. आम्ही केईएमचे विद्यार्थी असलो तरी हि ‘टर्म’ कस्तुरबामध्येच करायला लागायची.

माझ्या आयुष्यातला हा काळ ‘नाटक’ नावाच्या गारुडाने भरून टाकलेला होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये मी लिहिलेल्या एकांकिका गाजायला लागल्या होत्या. अर्थातच हॉस्टेलच्या दिनक्रमामध्ये ‘रात्रीचा दिवस’ करण्यासाठी अनेक विषय असायचे. सकाळी (तुलनेने) लवकर उठून, आवरून बस पकडायची आणि परळहून (आमच्या जीएस मेडिकलच्या परिसरातून ) सातरस्त्याकडे निघायचे हे कठीण काम होते. त्यामुळे ह्या टर्मच्या पहिल्या दिवशी दांडी मारणे क्रमप्राप्त होते. वॉर्डच्या नंतर दुपारी कॉलेजमध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असायची. त्या वेळी बॅचमध्ये मित्र सांगत आले , “अरे तुझे नाव घेऊन डॉ. आजगावकरसार विचारत होते … तू एबसेन्ट का म्हणून ! ” अरे बापरे ! … आपण ज्या सरांना कधी पाहिलेही नाही ते आपल्याला ओळखायला कसे लागले ? … डॉ. विजय आजगावकर हे कस्तुरबा रुग्णालयातले ‘ऑनररी’ प्राध्यापक. दुसऱ्या दिवशी सकाळी कस्तुरबाला जाणे आवश्यक होते. आमची बॅच वॉर्डच्या ‘राऊंड’ला निघाली. मला भीती वाटली होती त्या तुलनेत सरांचे व्यक्तिमत्व फारच सौम्य निघाले. मध्यम बांधा, गोरा रंग, मिश्कील डोळे ! .. साधे सुती कपडे, चष्मा !..  आणि दिलखुलास बोलणे !

सरांनी माझ्या एकांकिका पहिल्या होत्या. कुठेकुठे छापून आलेले लेख वाचले होते.  त्या काळामध्ये मी ‘साधना’ साप्ताहिकामध्ये, अगदी अनोखे बालपण असलेल्या मुलांची व्यक्तिचित्रे लिहायचो. सरांनी ती सुद्धा वाचली होती. सरांनी पहिल्या भेटीत माझे वारेमाप कौतुकच केले. ओरडले असते तर दांडी मारण्याची इच्छा प्रबळ झाली असती. ती आता मागे पडायला लागली.

मी नियमितपणे सरांचे शिकवणे ऐकायला लागलो आणि त्यांच्या प्रेमातच पडलो. राऊंडमध्ये पेशंटस्  आणि नातेवाईकांशी आपुलकीने बोलणारे सर, संभाषणाचा सांधा पटकन आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आणि एखादा शास्त्रीय मुद्दा समजावून सांगत.पुन्हा त्या रुग्णांशी संवाद अशा सहजतेने साधत की ‘क्या बात है’ ! ‘बेड साईड क्लिनीक’ नावाचा शब्द ह्यापूर्वी फक्त ऐकला होता. आता तो अनुभवायला मिळत होता. संसर्गजन्य आजारांव्यतिरिक्त सरांचे काही खास आवडीचे विषय होते. त्यासाठी ते आमची लेक्चर्स घ्यायचे. ‘इसीजी’ कसा वाचायचा ह्यावर सरांनी एकदा तासभर शिकवले. आज एवढ्या वर्षांनंतर त्यांनी शिकवलेले मुद्दे लक्षात आहेत. फक्त तेवढेच आठवताहेत. आजही हातात  इसीजी पडला तर त्यावरच्या ‘वेव्हज्’ माझ्याशी सरांच्याच आवाजामध्ये बोलतात.

कस्तुरबाला जाता-येता एक तपशील माझ्या लक्षात आला. हॉस्पीटलच्या भिंतीलगतच्या फूटपाथवर एक पत्र्याची शेड होती. तिथे कामचलाऊ बाके होती. समोरच्या जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे नातेवाईक भेटीची वाट पहात तिथे बसायचे. मी तिथे जाता-येता थांबायला लागलो. त्यांच्या कथा ऐकायला लागलो. ह्या विषयावर मी एक तपशीलवार लेख लिहिला. महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीमध्ये तो छापून आला. माझा अशा प्रकारचा आणि छापून आलेला ह्या पहिलाच लेख. तोवर आमची टर्म संपलेली. काही महिन्यांनी आमच्या कॉलेजात मराठी वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम होता. अस्मादिक ‘मवामं’चे सक्रिय कार्यकर्ते. सर अगत्याने कार्यक्रमाला आले होते. मला बाजूला घेऊन त्यांनी लेखाबद्दल शाबासकी दिली. ती शाबासकी ‘डोळे आणि कान उघडे ठेवण्याबद्दल’ होती.

खरे म्हणजे सर काही आमच्या मेडीकल कॉलेजला ‘अटॅच्ड’ नव्हते. पण ते सर्व कॉलेजांमधल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘अटॅच्ड’ असायचे. मला त्यांनी स्वतःच्या कन्सल्टिंग रूमवर बोलवले. मी मध्येमध्ये जायला लागलो. होताहोता माझे एमबीबीएस संपले. इंटर्नशिप सुरु झाली. तोवर मला सायकीअॅट्रीमध्ये रस निर्माण झालेला. ह्या मार्गाने जायला मला उत्साह देण्यामध्ये सरांचा मोठा हात होता. (माझ्या शिक्षकांमध्ये डॉ. रवी बापटसर आणि डॉ. शरदिनी डहाणूकर मॅडम हे माझे दुसरे दोन खांब !) माझ्या वैद्यकीय शिक्षणामध्ये (आणि नंतरही) ह्या तिघांनी माझ्यावर जी मायेची पाखर घातली ती इतक्या वर्षांनंतरही जाणवते आणि विचार येतो …. ना माझी ह्यांची कौटुंबिक ओळख, ना मी कुणा बड्या डॉक्टरांचा मुलगा. बरं, असं निरपेक्ष प्रेम करणे ही ह्या सगळ्यांची अंगभूत सवयच जणू ! ….

तर मनोविकारक्षेत्रामध्ये माझी उमेदवारी सुरु झाली. सरांनी एका संध्याकाळी मला त्यांच्या क्लिनीकवर बोलवले. मला मनोविकारशास्त्रामधला अनुभव तो काय असेल त्यावेळी, तीन-चार महिन्यांचा ! सरांच्या गाडीतून आम्ही एका कुटुंबाला भेटायला गेलो. त्या घरातल्या शाळकरी मुलीला बालमधुमेह झाला होता. सरांच्या लक्षात आले होते की फक्त इन्शुलीनची इंजक्शने, डाएटचे तक्ते आणि तपासण्यांचा ढीग ह्या गोष्टींमुळे ‘संपूर्ण’ उपचार होऊ शकत नव्हता. ‘सायन्स’ ची महत्ता रुजू झाली होती, गरज होती ‘आर्ट’ची भर घालण्याची ! मी त्या मुलीशी गप्पा मारल्या. परत भेटण्यासाठी सरांच्या क्लिनीकवरची वेळ आणि तारीख ठरवली.

कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये आमच्या टर्मच्या शेवटच्या दिवशी सरांनी ह्याच विषयावर क्लिनीक घेतले होते. लक्षणांवर उपचार नव्हे तर माणसाच्या मनावर फुंकर. आजाराशी युद्ध नव्हे तर आजारपणासोबत दोस्ती. व्यक्तीचा आजार तरी कुटुंबावर मानसिक भार ! सरांनी सांगितलेली सूत्रे मला अनुभवायला मिळणार होती. माझ्या आयुष्यातल्या एका नव्या अनुभवापर्यंत आणले होते सरांनी मला ; अलगद बोटाला धरुन आणि अनामिक विश्वासाने. मी ह्या बालमधुमेही मुलांबरोबर, पालकांबरोबर बोलायला लागलो. मुलं-पालकांच्या गटचर्चा सुरु झाल्या. दर महिन्याला खास व्यक्तिंबरोबरच्या गाठीभेटी होऊ लागल्या. ही मुले आणि पालक ह्याची वार्षिक शिबीरे सुरु झाली.

सरांच्या नेतृत्वाखाली डॉ. अस्पी ईराणी, डॉ. दीपक दलाल, मी आणि नंतर डॉ. मनोज भाटवडेकर असे अनेक जण ह्या चळवळीला येऊन मिळाले. एखाद्या शारीरिक आजाराच्या भावनिक, कौटुंबिक, सामाजिक बाजू काय असतात हे मी प्रत्यक्षात शिकत होतो. आली अडचण कि तोडगा काढायला शिकत होतो. सर्वसमावेशक म्हणजे holistic treatment कशी असते ह्याचा तो वस्तुपाठ होता. एका अर्थाने, पुढे माझ्या हातून मानसिक आरोग्य क्षेत्रात जे काम घडले त्याचा तो आरंभबिंदूच होता.

आमच्या ‘ज्युवेनाईल डाएबेटीक फाऊंडेशन’ अर्थात जेडीएफच्या कुटुंबामध्ये आम्हा डॉक्टरांचे केव्हाच ‘काका’ बनून गेले. आणि सर आम्हा सर्वांचे ‘आबा’. अलीकडल्या काही वर्षांमध्ये ‘सर’पण सुटुनच गेले आहे संवादामधले ! मोबाइलमध्ये सुद्धा त्यांचा नंबर ‘आबा’ म्हणूनच सेव्ह केलाय.

माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या सगळ्या वर्षांमध्ये मी सरांच्या शिवाजीपार्कच्या क्लिनीकवर आठवड्याला दोन वेळा थांबायचो. बालमधुमेही मुलापालकांच्या ‘अपाॅइंटमेंटस्’ असायच्या. होताहोता मी एम.डी. झालो. सरांना जवळून पहायची संधी मिळाली. सरांना अनेक भारतीय भाषा संवादापुरत्या पण सफाईदारपणे येतात. शिवाय सर्व प्रांत-धर्म-परिसर ह्यातील पद्धती-प्रघातांबद्दलचे सखोल ज्ञान. त्यामुळे समोरचा पेशंट कोणत्याही जाती-भाषा-धर्माचा असला तरी धागे जुळायला सोपे जायचे. सरांचा खास प्रांत म्हणजे डाएबेटीस. नव्या पेशंट्सना सर सांगायचे घरची एक चपाती आणि नेहमीच्या वापरातली वाटी आणायला. हा तपशील फार महत्वाचा असतो. कारण आपल्याकडे चपातीचा परीघ हा घराघराप्रमाणे बदलणारा. आणि एक वाटी भात असे म्हटले तर कोकणातली आणि देशाकडची  ‘वाटी’ अगदीच वेगळ्या आकारमानाची. सरांना सर्वसाधारण भारतीय स्वयंपाकातले ‘मधुमेही’ बारकावे मुखोद्गत असायचे. त्यामुळे समजा पेशंट पुरुष असेल तर त्याची पत्नी लंबकाप्रमाणे मान हलवायची. आणि पेशंट स्त्री असेल तर सोबतच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य ओसंडून वहायचे.

प्रत्यक्ष जीवनात मात्र सर ‘अस्वाद’ व्रताचे पालन करणारे. चहा नाही कि कॉफी नाही. ताव मारुन जेवणे नाही. जेवणाबद्दल तक्रारही नाही. त्यांची सगळी भूक बहुतेक ‘पुस्तक’ नावाच्या एका पदार्थावर एकवटलेली असायची. दवाखानाभर पुस्तके, गाडीमध्ये पुस्तके… घरात तर पुस्तकेच पुस्तके. सरांचे वडील डॉ.श्री.शं.आजगावकर हे भारतातले अत्यंत जेष्ठ मधुमेहतज्ञ-आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. मी सरांच्या क्लिनीकमध्ये जायला लागलो तेव्हा ऐंशीच्या घरातले अण्णा नियमित प्रॅक्टीस करायचे. (आता तोच कित्ता आबाही गिरवताहेत. असो.) पण अण्णा मला जरा करारी भासायचे. आदरयुक्त भीती वाटायची.सर म्हणजे सगळा मोकळा कारभार. पेशंटच्या वेदनांनी हेलावून गेलेल्या सरांनी मी डोळे पुसताना पाहिलं आहे. आमच्या एखाद्या बालमधुमेही मुलाच्या आईबाबांना ते भरल्या डोळ्यांनी जवळ घेताना अनुभवले आहे. इतक्या भावुकतेने इतकी नाती आजन्म जपणारा माणूस मी खचितच पहिला आहे.

आज पस्तीस वर्षे होतील; माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पहिला फोन आबांचा असतो. माझ्या पत्नीच्या आणि आमच्या कबीरच्या वाढदिवशीसुद्धा. कबीर सकाळी सातला शाळेत जातो हे माहित झाल्यावर सकाळी पावणेसातला फोन. बरं सरांच्या अशा प्रातःकालीन शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवणारे आम्ही एकटे नव्हे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही संख्या शेकड्यात नाही तर हजारांमध्ये आहे. बरे ह्यातला नियमितपणा कधी यांत्रिक नाही झालेला. स्वरातला गोडवा आणि ओलावा तोच आणि तसाच.

तर सांगत काय होतो… सरांच्या प्रॅक्टीसची पद्धत पहात मी शिकत होतो. त्यांची ओपीडी संपली की सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते, कुणी लेखन-पत्रकार असे खास लोक असायचे. समाजासाठी काम करणाऱ्या अनेकांना सर सल्ला, औषधे तर द्यायचेच पण जाताना पैसेपण द्यायचे. मला फी घेणारे डॉक्टर माहीत होते. इथे सगळे वेगळेच !… तो वेगळेपण अंगी लागला म्हणून की काय, मी सरांना म्हणालो की मी जोवर केईएम रुग्णालयात लेक्चरर म्हणून पूर्णवेळ काम करतोय, मी इथे कुणाकडून पैसे नाही घेणार. सरांना ते वागणे आवडले असावे. आता माझ्याकडे सरसुद्धा अनेकांना सल्ल्यासाठी पाठवायला लागले. बालमधुमेही मुलांचे काम सुरु होतेच. एम.डी. पास झाल्यावर दोन वर्षांनी निर्णय घेतला की आता प्रॅक्टीस सुरु करावी. सर म्हणाले ‘कर सुरूवात इथे !’… माझ्या खाजगी प्रॅक्टीसची सुरुवात मी अण्णा आणि आबांना नमस्कार करुन केली. अण्णांनी माझ्या पाकिटामध्ये शंभर रुपयाची नोट ठेवली.

शिवाजी पार्क म्हणजे मुंबईचा प्रतिष्ठीत मध्यवर्ती भाग. तिथे व्यवसायाला अशी जागा मिळणे त्या काळीही कठीण होते. सरांनी पहिले वर्षभर माझ्याकडून भाडेसुद्धा घेतले नाही. पेशंट्सचे काम पाहणाऱ्या रघू कंपाऊंडरला मी पैसे द्यायचो. पुढे त्यांनी माझ्याकडून अगदी नाममात्र भाडे घेतले. ते सुद्धा बहुतेक मला बरं वाटावे म्हणून … आता माझी ओळख वहिनींबरोबर म्हणजे गुरुपत्नीबरोबरही झाली होती. त्या अगदी शांत सावलीसारख्या ! सरांच्या तिन्ही मुलांबरोबरही दोस्ती जमली. सगळ्यात धाकट्या माधवीचा तर मी आवडता आनंदकाका झालो.

मानसिक आरोग्यविषयक संस्था सुरु करण्याचे माझे स्वप्न सरांना ठाऊक होतेच. १९९० साली संस्था स्थापन झाल्यावर विश्वस्थ मंडळाचे पहिले अध्यक्ष सरच होते. संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा आशीर्वाद द्यायला सर प्रत्यक्ष हजर होते. १९९३ च्या मार्च महिन्यामध्ये सगळी मुंबापूरी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटांनी हादरली. सरांचे क्लिनिक ज्या इमारतीमध्ये आहे त्या शेजारच्या पेट्रोलपंपाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. सरांच्या मुलाने म्हणजे ज्ञानेशाची साऱ्या क्लिनीकचे नूतनीकरण मोठ्या हौसेने केले होते. तो पैसा आणि श्रम क्षणात वाया गेले. त्या संध्याकाळी मी क्लिनिकमध्ये पोहोचलो तेव्हा फाटलेले छत, लोंबणाऱ्या वायर्स, जमिनीवर पसरलेला प्रचंड कचरा असे दृश्य होते. सर त्या वेळी क्लिनीकमध्येच होते. दुपारच्या वेळी ते तिथेच विश्रांती घ्यायचे. सुर्दैवाने त्यांना काही ईजा झाली नव्हती.

मी एक पाहिले आहे की दुसऱ्यांच्या वेदनेने सद्गदीद होणारे सर अशा बाक्या प्रसंगांमध्ये अगदी शांत असतात. सगळ्या नुकसानीचा अंदाज घेत त्यांनी दुरुस्तीचे वेळापत्रक बांधले. काळाच्या काट्यांना पुन्हा रुटीनमध्ये आणले. असाच एक अचानक आघात पुन्हा आला सरांच्या आयुष्यात. अगदी पलीकडच्या इमारतीमध्ये रहाणारी सरांची मोठी मुलगी, तिला आम्ही वत्सलताई म्हणायचो; अचानक वारली. मी आणि माझी पत्नी सविता बातमी कळताच संध्याकाळी सरांकडे गेलो. अशा प्रसंगी ते ‘फिलॉसॉफीकल’ राहू शकतात हे ठाऊक असूनही त्यांची काळजी वाटत होती. पण त्यातून सर सावरले. पुढे वहिनींच्या प्रकृतीचे चढउतार सुरु झाले. त्यांची काळजी घेताघेता सरांना कॅन्सरचे निदान झाले. त्यावरचा उपचार सुरु झाला.सरांना आयुष्यात प्रथमच आयसीयू मध्ये अनेक दिवस काढावे लागले. सरांचा फोन धाकट्या  मुलीकडे असायचा. मी त्यावर फोन करुन तिच्याशी बोलायचो. सरांचा आवाज ऐकायला येईल त्या दिवसाची वाट पाहायचो. सरांची धाकटी मुलगी माधवी तोवर युरोपात स्थायिक झालेली तर मुलगा कॅनडामध्ये राहणारा ! सर त्या आजारपणातून बाहेर पडले. सकाळचे तीन तास पुन्हा पेशंट पहायला लागले. आणि …आणि वहिनींची साथ कायमची सुटली.आमच्या आय.पी.एच. संस्थेच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये ‘कॅलप्रो’ नावाची ब्रेकफास्ट सीरीयल बनवली जाते. आजाराच्या काळात वहिनींना ती आवडायची. म्हणून ठाण्याहून सरांच्या नातेवाईकांमार्फत ती नियमितपणे पाठवली. जायची. वाहिनी गेल्या तेव्हासुद्धा सरांनी स्वतःच्या दुःखाला अंतर्मनाच्या मर्यादेत ठेवले.

“मी लहान असताना भित्रा आणि घाबरट होतो. दरवाज्यावरुन कुणाची अंत्ययात्रा गेली तरी लपून बसायचो. एका बाजूला अण्णांना रोज पहायचो. त्यामुळे डॉक्टर बनण्याची इच्छा होती आणि दुसरीकडे ही भीती ! …” एकदा गप्पा मारतामारता सर सांगत होते, “मग ठरवले की मृत्यूला सामोरे जायचे प्रशिक्षण जाणीवपूर्वक द्यायला हवं मनाला.स्वतःमधला बदल स्वतःच घडवायचा. आजोबांच्या मृत्यूला सामोरा गेलो तो स्वतःवरचा उपचार म्हणून. आणि पुढे माझ्या आईचा मृत्यू तर माझ्या मांडीवरच पहिला…”

सरांचा जन्म आहे १९३१ सालचा !… “जागतिक आरोग्य दिन बरं का !… WHO Day… सात एप्रिल …” सर सांगतात. सरांचे वडील म्हणजे अण्णा, डॉक्टर झाले १९२९ साली. जन्मापासून मॅट्रीकपर्यंत सर होते मालवणमध्ये. त्यामुळे अस्सल मालवणी बोलण्यामध्ये त्यांना अजूनही खूप मजा येते. १९४८ मध्ये अण्णा मुंबईला आले. सरांचे कॉलेज शिक्षण झाले इस्माईल युसुफ कॉलेजात. आणि त्यानंतर नायर रुग्णालयाच्या टोपीवाला मेडिकल कॉलेजमध्ये. पदव्युत्तर शिक्षणानंतर सरांनी नायरमध्ये ट्यूटर-लेक्चरर म्हणून काम सुरु केले. पण काही कारणानी त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टीसमध्ये यावे लागले. सर जेव्हा एमबीबीएस झाले १९५६ मध्ये तेव्हा मी जन्मलोपन नव्हतो.सरांना अण्णांच्याकडून विद्येचा आणि सेवेचा वसा मिळाला. पण अण्णांच्या लौकिकाचे ओझे काही सरांनी डोक्यावर घेतले नाही. अनेक दशके ह्या दोघांची ओपीडी स्वतंत्र असायची. ज्यांचे पेशंट त्याच्याकडे.

एम्.डी झाल्यावर सर कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये काम करु लागले ते १९६४ च्या सुमारास … ते पुढची पंचवीस वर्षे ! १९८९ मध्ये निवृत्त झाल्यावरही २००५ पर्यंत ते आठवड्याला एकदा तिथे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. ‘शिकवणे’ हा जणू सरांचा श्वासच आहे. सरांच्या विद्यार्थ्यांची मुले आज एमबीबीएसला आली. त्यांच्यासाठी सर अजूनही घरी शिकवण्या घेतात. त्याला त्यांनीच नाव दिलं आहे ‘अड्डा मिटींग’. अर्थात ह्या साऱ्या शिक्षणयात्रेमध्ये ज्ञान आणि सद्भाव सोडून कोणतेही चलन वापरलेले नाही.

विद्यार्थ्यांना शिकवणे हा माझा ‘तरुण रहाण्याचा उपाय’ आहे असे सर म्हणतात. बालमधुमेही मुलांच्या ज्या चळवळीला सरांनी सुरुवात केली ती संस्था आज तीन दशके सुरु आहे . ज्युबेनाईल डाएबेटीक फाऊंडेशनच्या मुंबई शाखेमध्ये आज १५०० मुलेमुली रजिस्टर्ड आहेत. आणि सरांच्या विद्यार्थ्यांमार्फत अशा तऱ्हेचे प्रकल्प सुरु आहे नागपूर, भावनगर, राजकोट, जामनगर आणि अहमदाबाद अशा शहरांमध्ये. ज्या छोट्या मुलीकडे मला सरांनी नेले होते ती आज स्वतः ‘डाएबेटाॅलाॅजीस्ट’ म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत आहे. आमच्या गटात सुरुवातीपासून असणारी आमच्या वृंदासारखी मुलगी आता संस्थेची विश्वस्त आहे. आणि ह्या साऱ्या निर्मितीचा आनंद घेऊनही त्यावर हक्क न सांगणारे सर आजही त्याच उत्साहाने वार्षिक कॅम्पला जाऊन पेशंट मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिकवताहेत.

सरांना शिकवण्याबरोबरच शिकण्याचा उत्साह प्रचंड आहे. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचा Comparative Mythology  ह्या नावाचा अभ्यासक्रम केला. नंतरच्या वर्षी संस्कृत भाषेचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर पूर्णवेळ विद्यार्थी बनून इतिहासामध्ये एम. ए. साठी नाव नोंदवले. एम.ए.च्या दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेच्या दिवशी सकाळी मला सरांचा फोन आला. “अरे,मला जरा ‘बेस्ट ऑफ  लक’ दे … पेपरला जातोय …” मी हसतहसत शुभेच्छा दिल्या आणि त्यांना चिडवायला म्हणालो,” काय सर, परीक्षेचे टेन्शन आले की काय ! …” तर म्हणाले, ” विषयाचे नाही रे पण लिहिण्याचे टेन्शन आले आहे.. डोके व्यवस्थित शाबूत आहे पण बहात्तराव्या वर्षी हात पूर्वीसारखा चालत नाही ना …”

“रायटर घेऊन बघा ना, सर ” माझा सल्ला.

“नाही रे, स्वतःचे विचार स्वतःच लिहिणे हे चांगले” सर म्हणाले. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आमचे सर छान मार्कांनी एम.ए. पास झाले.

सरांच्या पंचाहत्तरीला सगळ्या मित्र-सुह्रदांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये मित्र- सुह्रदांची मनोगते आणि सर-वहिनींचा सत्कार असा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सुविहीत झाला पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मला खूप रुखरुख वाटली. सरांच्या व्यक्तिमत्वाला तिथे न्याय मिळाला नाही असे माझे मत झाले. अधिक अनौपचारीकपणे डिझाईन करायला हवा होता हा प्रसंग. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या एका ख्यातनाम तज्ञांनी पहिल्या दोन मिनीटतच सांगितले की त्यांची आणि सरांची फारशी ओळख नाही. माझे त्या कार्यक्रमातले लक्षच उडाले… माझ्यासाठी सरांचा वाढदिवस त्यांच्या घरी होणाऱ्या दिड दिवसाच्या गणपतीच्या उत्सवासारखा मोकळा आणि प्रेमाचा व्हायला हवा होता. सरांच्या घरच्या गणपतीला त्यांचे सारे आप्त-मित्र वर्षानुवर्षे नित्यनेमाने हजेरी लावायचे. त्या दोन दिवसांमध्ये त्या घराचे दरवाजे रात्रीसुद्धा बंद होत नसत. सरांनी अखंडपणे जपलेली अनंत नाती त्या निमित्ताने एकत्र जमायची. त्या प्रत्येकाचे आगतस्वागत सर रसरशीतपणे तर वाहिनी शांतशीतलपणे करायच्या. सरांचा बंगला आहे जुहूच्या परिसरामध्ये. पण ‘जुहू’ म्हटल्यावर एखाद्या बंगल्याची जी प्रतिमा उभी राहील त्यात अजिबात न बसणारा. अगदी आवश्यक फर्नीचर, भरपूर मोकळी जागा ! एक प्रशस्त देवघर आणि प्रचंड लायब्ररी ! अण्णांचे आणि आबांचे अस्तित्व हेच त्या जागेचे वैभव.

मी पाठी वळून पहातो तेव्हा लक्षात येते की आता पस्तीस वर्षे होतील सरांची आणि माझी ओळख होऊन…एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कडूगोड वळणावर ते माझ्यासोबत राहिले आहेत. पुन्हा फक्त माझ्यासोबत नाही तर अशा शेकडो, हाजारो जणांसोबत, जणींसोबत. आणि हे करताना स्वतःचा क्रूसही स्वतःच सहजपणे वहाताहेत. अनेक वर्षांपूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो तेव्हा त्या बातमीचे त्यांनी उत्साहाने स्वागत केले होते. पुढे माझे लग्न आणि संसार, ह्या टप्प्यांवर त्यांची आपुलकी होतीच. माझ्या संसाराचा पहिला डाव जेव्हा फिसकटण्याच्या उंबरठ्यावर होता त्या एका निर्णायक क्षणीही सर माझ्याबरोबर होते. पती-पत्नीचे नाते भावनिक दृष्टीने उध्वस्त होण्याची एक जीवघेणी प्रक्रिया असते. आणि अशा नात्यामधून व्यवहाराच्या आणि कायद्याच्या पातळीवर बाहेर पडणे हाही तापदायक अनुभव असतो. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतरच्या काळामध्ये मी त्या टप्प्यावर होतो. नात्याची कायदेशीर सोडवणूक करण्याआधी आर्थिक गोष्टींवर एकवाक्यता व्हायला लागते. भावना संपल्यावर अर्थशून्य वाटणे आणि त्या पार्श्वभूमीवर फक्त ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी असे त्या बैठकीचे स्वरूप असते. तर त्या मिटींगमध्ये दोन्ही बाजूंना मान्य असा लवाद म्हणून सर बसले होते. सरांचे जसे माझ्यावर अकृत्रिम प्रेम तास त्या मुलीच्या कुटुंबाबरोबरही अनेक वर्षांचा गाढ स्नेह. अशा परिस्थितीमध्ये भावनांचे कढ बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ चर्चा घडवून आणणे खूप कठीण असते. माझ्या बाजूने अर्थातच मी स्वतः आणि माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान असे दोघे होतो… त्या दोन तासांमध्ये मी सरांचे वेगळेच रुप पाहिले. केवळ त्यांच्या असण्या – बोलण्यामुळे दोन्ही बाजूंमधली कटुता मर्यादेमध्ये राहिली.मी तर त्यावेळी प्रचंड ताणामध्ये होतो. ती बैठक ‘यशस्वी’ झाल्यावर परत येताना मझे मेहुणे मला म्हणाले,”तुझ्या सरांनी ही सिच्युएशन फारच चांगली हाताळली.”

पुढे माझ्या संसाराचे दुसरे सुखी पर्व सुरु झाले त्याचेही साक्षीदार सर आहेतच. मध्यंतरी त्यांनी त्यांच्या ‘प्रॉपर्टी’चे वाटप करायचे ठरवले. ‘प्रॉपर्टी’ म्हणजे पुस्तके. माझ्यासाठी म्हणून काही गठ्ठे बांधून ठेवलेले. ते नेण्यासाठी आम्ही सहकुटुंब सरांकडे गेलो. तेव्हा आमच्याबरोबर जसा कबीर होता तशी आम्हाला ‘देवाने मोठी करुन पाठवलेली’ आमची डॉक्टर मुलगी सुखदासुद्धा. मला सरांनी जसा अडचणींमध्ये आधार दिला त्याच अडचणींमधून ती जात असताना आम्ही तिच्यासोबत उभे राहिलो होतो.

“बाबा, आपली आधीची साधी ओळखदेखील नसताना तू माझ्या मागे का उभा राहिलास?…” ती मला मधूनच विचारायची. सरांशी तिची भेट घालून दिली आणि जिना उतरताना विचारलं, ” मिळाले तुला प्रश्नाचे उत्तर?…” तिने मान डोलावली. घेणारे हात घेताघेता कधी देणारे होऊन जातात…त्यांचे त्यांनाही काळात नाही.

म्हणूनच अलीकडे, आबा आपल्याबरोबर सतत असल्याचे फिलींग वाढायला लागले आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s