प्रकाशआणि उज्जेड!

दिवाळी उंबरठ्यावर आली कीआमच्या घरातला पसारा आटोक्यात आणण्याचे (नेहमीचे अयशस्वी) प्रयत्न सुरु होतात… तसेच ते याही वर्षी झाले. आता घर (पूर्वी पेक्षा) व्यवस्थित झालेआहे असे मनाचे समाधान करत मी स्वस्थपणे खुर्चीत बसून मुलगा आणि बायकोला (विकत आणलेला) आकाशकंदील लटकवण्याच्या सूचना देत होतो.

“तू आम्हाला कंदील तयार करायला का शिकवल नाहीस… तुला कसं तुझ्या बाबांनी म्हणजे दांनी शिकवलं?… ” बायको म्हणाली. “अगं करायचं तर सांगाडा बांधण्यापासून करायला हवं ना सारं… तेवढा वेळ कुणालाआहे?…” मी म्हणालो.
आणि ते संभाषण तिथेच थबकलं… …असलेल्याआणि नसलेल्या वेळाच्या नावावर किती बिलं फाडणार आहेस तू… आतले संभाषण सुरु झाले.

…अगदी खरं की त्या काळातली जगण्याची गती ठाय लयीतली होती. महत्वाचे म्हणजे ‘तयार वस्तु तुमच्या ताटात’ हा जमानाच नव्हता. त्यामुळे मूळापासूनच्या निर्मितीला वाव होता. त्यावेळच्या मध्यमवर्गाची क्रयशक्तीही आजच्या तुलनेने क्षीणच म्हणायची. ह्याचे काही फायदे होते. सगळ्या घरासाठी दिवाळी म्हणजे ‘नवनिर्मितीची धांदल’असायची… प्रत्येक वेळी ही ‘नव’ निर्मिती नसायची देखील … वार्षिक पुर्ननिर्मिती असायची. आता मात्र आपण जर कुठे continuity ठेवली असेल तर ती Finished Products मध्ये… म्हणजे आमच्याघरातला कंदील षट्कोनी, शेपटीवाला असतो… अभ्यंगस्नानाला अजूनही टाटाचा खस् साबण असतो… आमच्या फराळातले पदार्थ Traditional असतात. पण जास्त करून बाहेरून मागवलेले. या वर्षी बायकोने रव्याचे लाडू, शंकरपाळी,चकली असे सारे घरी बनवायचा घाट घातला तेव्हा माझी प्रतिक्रिया तटस्थ होती. पण भाजलेल्या रव्याचा वास यायला लागला तेव्हा माझ्या आईचे निगुतीने फराळ करणे आठवायला लागले आणि शंकरपाळ्यांचे लाटण झाल्यावर त्याचे चौकोन करायची चकली हातात घेऊन मी एकंदर प्रक्रियेमधले माझे योगदान साजरे केले… ते करताना नेमकी कसली मजा आली?1350660487_448141190_2-pictures-of-diwali-faral

सगळ्या सणांमध्ये असतात खास Products आणि ते बनवण्याचे खास Process म्हणजे प्रक्रिया कमीत कमी अनुभवून Products उपभोगण्यामध्येच सणाचे सत्व शोधायला लागलो आहोत. अहं… भुवया उंचावू नका… सगळ्या प्रक्रिया पूर्वीसारख्या नाही करता येणार हे मान्य आहे मला… पण तयार वस्तू आणि ती तयार करण्यातली आनंददायक प्रक्रिया ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण आपापल्या पद्धतीने करायला हवा असे एक सूत्र मला सापडतं आहे. म्हणजे रांगोळी काढता येणारी मंडळी घरी असली तर आपल्या रांगोळीला अभिजात कलात्मकतेचा दर्जा देऊन ती काढावी… ठिपके काढण्यासाठी जाड कागदाला उदबत्तीने छिद्रे पाडावी… गेरूने रांगोळीचा Base तयार करायला हात लाल करावेत. चिनी का स्वदेशी ह्या प्रश्नाला निकालात काढत आपण काही पणत्या तरी रीतसर वात-तेल वाल्या लावाव्या… e2ef30031a7d1780cd8a68e3e0dfeae6काही तयार आणि सौंदर्यपूर्ण लावा की… माझे म्हणजे, परंपरा जपण्यासाठीचे नसून सा-या कुटुंबाने सणाचे सामुहिक सत्व त्या त्या प्रक्रियेतून अनुभवण्यासाठी आहे. घरात सदस्य कमी असतील मीत्र शेजा-यांबरोबर अंगतपंगत करून फराळ करायला हवा… शक्य असल्यास फूले आणून सर्वांनी मिळून तोरणे बनवायला हवीत…दिवाळीतल्या घर-साफसफाईसह नंतर संपूर्ण आरास करून देणारे एक संकेतस्थळ Already अस्तित्वात आहे… दिवाळीचा किल्ला पाहिजे असेल तर त्याचे extra charges आहेत… शिवाय दोन दिवसांसाठी ‘Traditional Bumb’ म्हणजे ‘बंब’ भाड्याने देण्यची सोय त्यांच्याकडे आहे… Bumb हे त्यांचेच spelling आहे… पुढच्या कंसामध्ये traditional water heater based on a coal generated energy असे लिहिले आहे. मात्र ह्यांचा ‘बंब’ दिसायला ‘बंबा’ सारखा असला तरी विजेवर चालतो… चार दिवसांसाठीचा फराळाचा मेनू ह्या साईटवर आहे… तो सकाळी घरपोच करायची सोय आहे. आमची माणसे येऊन तेल-उटण्याने तुम्हाला अभ्यंगस्नान घालतील ही सुविधा (ह्या वर्षी तरी) त्यांनी सादर केलेली नाही. http://www.traditionwali-Diwali.com हे आहे ह्या साईटचे नाव. Celebrations at your doorsteps असे त्यांचे घोषवाक्य आहे. लक्ष्मीपूजनासाठीचे एक Readymade Kit आमच्या घरी आलेच आहे. त्यात सुंदरपणे Pack केलेली हळद, कुंकु, कापूर, खडीसाखर, वात, तूपाची पाऊच, लक्ष्मीची तसबीर, रंगीत धागे असे सगळेआहे…पूजा कशी करावी तेसांगायचे Manual फक्त नाही.

गरज असल्याशिवाय सेवा-सुविधा निर्माण होत नाहीत. आपल्याकाही ‘गरजा’ ह्याआपण सांगत नाही… आपण सारे जगण्याच्या धकाधकीत इतके फरफटून,ठेचकाळून, धक्के खाऊन जातोय् की सण म्हणजे आराम!… सगळे काही हातात द्या बघू… इथेही ‘करायला’ लावू नका!… हा आपल्या मनाचा एक आवाज असतो. घरोघरी virtual भाऊबीज व्हायला लागली आहेच की Skype च्या सौजन्याने… ती आपला देश आणि परदेश व्हायची तेव्हा व्यावहारीक होती. आता ती दादर आणि डोंबिवली दरम्यान व्हायला लागली आहे… कारण येण्याजाण्याच्या प्रवासाचे दमवणारे चार तास झेलण्याचा उत्साह आपल्यामध्ये राहिलेला नाही. सणाबरोबर येणा-या परंपरागत कृती (Rituals) ठेवायची पण त्यातल्या Essence म्हणजे सत्वाचे काय हा प्रश्न आपण खरे तर आपल्याच मनाला आणि कुटुंबाला विचारायला हवाय… सण हे माणसांना ‘जोडण्याचे’ साधन असेल तर आपण या चार दिवसांमध्ये किती जणांना ‘जोडले’ गेलो हा प्रश्न आपण विचारावा… आपण शुभेच्छा देतो, भेटीगाठी घेतो, एकत्रपणे भटकतो,खातो-पितो ते ‘जोडण्या’च्या आनंदासाठी. सा-या गोष्टी ‘तय्यार’ हातात मिळाल्यानंतर आपण ह्या भावनिक उद्दिष्टाला किती प्राधान्य देतो?… की आपले-आपले बेटच उजेडाने उजळून टाकतो? सणांमध्ये जे ‘द्यायचे’ असते त्यामध्ये आपल्या सुह्रदांबरोबर समाजातल्या इतरांचाही विचार ‘जोडण्या’साठी करायचा असतो. मग ते सीमेवरचे सैनिक असतील तसे वर्षभर आपल्याला सेवा-सुविधा देणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्मकार असतील… ज्यांना आपण झाडूवाला,मोलकरीण अशी judgemental नावे दिली आहेत. … कदाचित् सामाजिक, आर्थिक,भावनिक दुर्बलतेचा सामना करणारे काही लोक असतील. ज्यांच्यापर्यंत आपण आपल्या परीने सद्भावनेचा प्रकाश नेऊ… त्यामध्ये मूक जनावरेही असतील… आणि आपण ज्या सृष्टीला गृहीत धरतो तिलाही जोडून घेण्यासाठी हा सण नसतो का…

लहानपणी मी नरकासुराची कारीटे भोवतालच्या झाडा-झुडपातुन आणायचो. भोवताली आंब्याची झाडे होती. अंगणात झेंडूचे ताटवे होते… घरच्या घरी तोरणे बनायची… पण त्यात सृष्टीबरोबरचे जोडणे होते. ते आता नाही शक्य… तर मग निदान फटाके न ‘वाजवणे’, कमीतकमी कचरा करणे,खाद्यपदार्थ वाया न घालवणे इतक्या साध्या गोष्टी आपण सृष्टीच्या सणासाठी नाही का करू शकणार. परंपरा म्हणजे काही कर्मकांडांची उतरंड नव्हे… त्यामागे असतो कृतीची, सामुहीक कृतीची आनंददायी लय… गुणगुणणारी लय!…  प्रत्येक सणाचे एक मूळ असते सद्भावनेमध्ये आणि दुसरे असते एकत्र येऊन अनुभवलेल्या छोट्या कृतींच्या प्रवाहामधे… म्हणून फटाक्यांचा उज्जेड पाडण्यापेक्षा पणतीचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न करूया की…

पहा ना असे शब्द आहेत… उज्जेड पाडला… पडला आणि प्रकाश पसरला… दिला… घेतला… दिला! ज्ञानेश्वर लिहितात की एका ज्योतीने दुसरी ज्योत उजळते त्यानंतर ही आधीची ,ही नंतरची असा भेद रहातो का? त्या दोघींचे एकत्र तेवणे महत्वाचे…
दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा!

ता.क. “ट्रॅडीशनवाली दिवाली” हे संकेतस्थळ ह्या क्षणाला तरी माझ्या कल्पनेतच आहे!

डॉ. आनंद नाडकर्णी

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s