श्रेय आणि श्रेयस

सामाजिक जीवनामध्ये काही माणसे नम्रपणे का वागतात हे समजून घ्यायच्या प्रयत्नांत मी आहे . रूढार्थाने ज्यांना achiever म्हणता येईल अशी खरं तर ही माणसे असतात . . . ह्या विचारांना चालना मिळण्याचे कारण असं की चारच दिवसांपूर्वी मी चक्क सचिन तेंडुलकर आणि पुलेला गोपीचंद अशा दोघांनाही भेटलो. दोघांना तास-दोन तास जवळून पहाता आले. . .  सचिन आला तसा त्या समारंभातल्या ‘व्हिआयपी’ रूम मध्ये असलेल्या अनेकांची त्याच्या बरोबर फोटो काढण्याची स्पर्धा लागली. रुमालापासून ते डायरीपर्यंत अशी अनेक माध्यमे,   सहीसाठी सामोरी आली . . . तो सर्वांना अगदी संयमाने, हसतमुखाने तटवीत होता . . . no gap between bat and pads. त्याच्यासाठी हा झमेला पाचवीला पुजलेला असणार. विलक्षण सहजतेने त्या प्रसंगाचा सामना करत होता तो! . . . आमची ओळख आणि संभाषण झाले असेल पाच मिनीटे. . . . परंतु समारंभातून रजा घेताना माझ्यासमोरून जाताना त्याने माझा चक्क निरोप घेतला . . . त्यामुळे बाजूची चार डोकी चक्रावली.

. . . गोपीचंदचीही तीच तऱ्हा.  त्याचा दिवस पहाटे तीनला सुरु होतो असे कुणीतरी सांगितल्यावर तो म्हणाला, “तीन नव्हे सव्वाचार.” माणूस अगदी शांत . . . पण बोलणे ठाशीव . . . मधूनमधून एखादे हिंदी वाक्य. कॉफी पिता-पिता तो त्याच्या ऍकेडमी बद्दल बोलत होता. मी ऐकत होतो. त्याला प्रश्न विचारणारी असामी होती पी.साईनाथ! लेखक-पत्रकार आणि म्यॅगासेसे पुरस्कार विजेते विद्वान . . . तेही असे सहजपणे प्रश्न विचारत होते . . . दोन्ही बाजूने अभिनिवेश नाही . . . मी तर थक्कच झालो.

आता तुम्ही विचाराल, ही पर्वणी मला लाभली कशी? तर माझा मित्र ऍड. सुहास तुळजापूरकर ह्याच्या Legasis नावाच्या कंपनीच्या वार्षिक समारंभासाठी ही मंडळी एकत्र आली होती . . . स्वतः सुहास हा यशस्वी उद्योजक . . . औद्योगिक क्षेत्रामधल्या compliances  म्हणजेच ‘शिस्तबद्ध आणि बिनचूक प्रणाली’ राबवण्याचे तंत्रज्ञान आणि ज्ञान देणे हा त्याच्या कंपनीचा उद्देश. कोणत्याही कंपनीमध्ये अशी प्रणाली जर आत्मसात झाली तर गुणवत्ता होणार जागतिक दर्जाची. त्या समारंभाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रांमध्ये बोलण्यासाठी सुहासने ह्या साऱ्यांना बोलवले होते . . . आणि सुहासही अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखा पळापळ करत राबत होता.

सुहासचा भाऊ आणि माझा सख्खा मित्र देवीदास तुळजापूरकर माझ्याबरोबरच होता. त्याने माझी ओळख करून दिली अलाहाबाद बँकेच्या माजी चेयरवुमन शुभलक्ष्मी पानसे ह्यांच्याबरोबर . . . एखाद्या माध्यमिक शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका वाटल्या मला त्या वेळी . . .  पण व्यासपीठावर चढल्यानंतर बँकांविषयक परिसंवादात अस्खलीत इंग्रजीत ठामपणे बोलताना बाईनी टाळ्या घेतल्या. व्यासपीठावरून उतरल्यावर पुन्हा त्या डायरेक्ट प्रेमळ शुभाताई झाल्या. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एक अधिकारी म्हणून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर कुठच्याकुठे पोहोचल्या होत्या मॅडम ! . . . पण चेहरा हसतमुख, बोलणे नेमकं, अगदी नम्र!

ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर भेटले. १९६५ च्या भारत – पाक युद्धामध्ये त्यांचे विमान पाकिस्तानी प्रदेशात मारून पाडले गेले. योग्य वेळी निसटल्याने ते पॅरेशूटमुळे सुखरूप उतरले . . . पण शत्रुप्रदेशात ! “युद्धामध्ये पकडलेल्या प्रत्येक सैनिकाचे कर्तव्य असते, पळून जाण्याचा प्रयत्न करणे” . . . अगदी साधेपणाने ते म्हणाले. . . . त्यांच्या वाक्याचा अर्थ मनात उतरला तसा माझा ‘आ वासला’ गेला . . . पण स्टोरी तर पुढेच होती . . . ह्या गृहस्थांनी युद्धकैदी छावणीतून अफगाणिस्थान मार्गे यशस्वी पलायन केले. त्यातल्या काही चित्तरकथा त्यांच्या तोंडून ऐकताना काय वाटले असेल विचार करा . . .. त्यांच्या ‘वीरभरारी’ ह्या आठवणींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे औचित्य सुहासने दाखवले. त्याचबरोबर निवृत्त सैनिकांना नोकऱ्या देण्याचा एक संपूर्ण प्रकल्प ‘इज्जत’ ह्या नावाने सुरु केला. कॅप्टन परुळेकरांबरोबर ब्रिगेडियर अजित आपटे भेटले . . . सैन्यात रुजू झालेली त्यांची तिसरी पिढी. ते म्हणाले, “एका अर्थाने दिलीप नशीबवान . . . एअरफोर्समधला माझा भाऊ सुद्धा ह्या युद्धात सापडला . . . पण शत्रूच्या हाती वाचला नाही.” हे बोलताना ब्रिगेडियरचा करारी शांतपणाही मला हलवून गेला … देशासाठी सर्वकाही दिलेली ही माणसे मी अनुभवत होतो.

समारंभ संपला आणि जेवणाच्या आणि पेयपानाच्या गर्दीमध्ये हळूच कानोसा घेत भटकलो. त्या पंचतारांकित वातावरणात जोरदार नटलेल्या स्त्रीपुरुषांची कमी नव्हती . . . मध्येमध्ये दिसणारी ‘पेज थ्री’ टाईप संभाषणेही नजरेतून सुटत नव्हती . . . मला मोठी गंमत वाटली. एकीकडे ही चमकदमक आणि दुसरीकडे कर्तृत्ववान पण नम्र माणसे . . . दोन्ही एकाच वास्तवाचा भाग . . .

भारतरत्न सचिन तेंडुलकरला भेटण्याची संधी जशी चालून आली त्या दिवशी; तशाच भाग्यवान क्षणी मी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, रतन टाटा अशा व्यक्तींनाही ‘वन-टू-वन’ भेटलेलो आहे . . .  त्यांच्यातला साधेपणा मला स्पर्शून गेलाय . . . माझे  महदभाग्य की अनेक क्षेत्रातली कर्तृत्ववान पण नम्र माणसे माझ्या घरातल्यासारखी माझ्या असण्यात विरघरळून गेली आहेत. त्यात अभयदादा (अभय बंग) आणि बाबा (अनिल अवचट) सारखे अनेक आहेत. तसेच ज्यांच्या आता स्मृतीच सोबतीला असे हेमंत करकरे, सदाशिव अमरापूरकर, माझ्या डॉ. शरदिनी डहाणूकर मॅडम, डॉ. सुनंदा अवचट असेही अनेक आहेत . . .

परवाच्या समारंभाच्या निमित्ताने ह्या साऱ्यांमधला एक समान धागा पुढे आला . . . उपनिषदामध्ये ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ अशा कल्पना सांगितल्या आहेत . . . पैसा, प्रसिद्धी, सत्ता, वलय ह्या साऱ्या गोष्टी ‘प्रेयस’ मध्ये येतात . . .  तुम्ही जे करता, बोलता, जगता, त्यामध्ये तुमच्या असण्याचा हेतु मिसळला गेला की ‘श्रेयस’ कडे जाण्याचा प्रवास सुरु होतो. हळू जगणे अर्थपूर्ण होणे, स्वतःच्या जगण्यातला अर्थ सापडणे, आणि त्या प्रवासामध्ये घडणाऱ्या सर्व कृती-प्रक्रिया अगदी एकजीव आणि अभिन्न होऊन जातात . . . असे झाले की श्रेय मिळायला हवे, कुणीतरी आपल्याला आपण काही केल्याचे ‘श्रेय’ द्यायला हवे हा भाग लोपून जातो . . .  कारण ज्याला आपण बोलीभाषेत ‘श्रेय’ म्हणतो ते  खऱ्या अर्थाने ‘प्रेयस’ असते . . .

त्यामुळे अशी माणसे समरसून जगतात. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्यापेक्षा कर्तृत्वालाच बोलू देतात . . . ‘मी-मी’ चा पाढा वाचणारी कर्तृत्ववान माणसेही मी पहिली आहेत. प्रचंड यशस्वी पण ‘मी’पणातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही न करणारी . . . कसा करणार प्रयत्न? . . . कारण ‘मी’ मध्ये रमणेच किती रमणीय असते. अशा माणसांबरोबर बोलताना (म्हणजे त्यांचे ऐकताना) मी हळूहळू मंदस्मित द्यायला लागतो. समोरच्या तशा व्यक्तीला वाटते की मी त्यांना दाद देत आहे . . . म्हणून ते अजून जोरदार टोलेबाजी करतात . . .

. . . माझ्या त्या (बुद्धासारख्या) मंदस्मिताचा अर्थ असतो . . . अजून नाही मिळालेला ‘श्रेयस’चा रस्ता . . . सध्या ऐकतोय . . . पण प्रेयसकडून श्रेयसकडे जाल तेव्हा संवादाला जास्त मजा येईल.

  • आनंद नाडकर्णी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s