वेधची पंचविसावी वारी

. . .सप्टेंबरचा शेवटचा रविवार. . . पहाटे साडेचाराची वेळ. . . मी ठाण्याहून पुण्याच्या वाटेवर. आज पुण्याचा सहावा वेध! वेध म्हणजे VEDH, म्हणजे Vocational Education Direction & Harmony. मराठीमध्ये व्यवसाय प्रबोधन परिषद. पंचवीस वर्षांपूर्वी ह्या उपक्रमाचे बीज गवसले ते एका अडचणीमुळे. . . जेमतेम वर्षभर वयाच्या आमच्या आय्.पी.एच्. (इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) ह्या ठाणे शहरातल्या संस्थेमध्ये आम्ही व्यवसाय मार्गदर्शन चाचण्या करायला सुरवात केली. १९९० साली असे काही करणे म्हणजे जरा धाडसाचेच होते. करियर, त्यातले पर्याय वगैरेंसाठी पैसे खर्च करून चाचणी करायची यावर विश्वास दाखवायचे दिवस नव्हते ते. आपल्या केंद्रावर चाचणी करायला विद्यार्थी आणि पालक यावे असे वाटत असेल तर आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. . . कसं?

डोळ्यासमोर शीर्षक अवतरलं ‘वेध’. . .  भविष्याचा आणि व्यवसायसंधीचा वेध घेणारे एक वार्षिक संमेलनच का उभारू नये. . . आणि १९९१ च्या डिसेंबरपासून ह्या उपक्रमाला सुरुवात झाली. व्यवसायाबद्दलची जाण आणि भान देण्याचे साधन म्हणजे त्या त्या क्षेत्रातले व्यावसायिक. त्यांच्या जगण्याचे पुस्तक आपण विद्यार्थी – पालकांपुढे वाचायला ठेवायचं. . . माध्यम असेल रसरशीत अकृत्रीम गप्पांचे. . . ह्या फॉर्मेटमध्ये अजूनही बदल नाही. . . मात्र आता व्यवसायच्या माहितीवरचा फोकस गेला आहे व्यवसायाच्या मूलभूत गुणांवर, व्यावसायिकाच्या मूल्यांवर आणि जगण्याच्या पद्धतीवर.

दर वर्षीच्या डिसेंबरच्या दुसऱ्या शनिवारी – रविवारी ठाण्याला भरणारी ही परिषद हळूहळू ठाण्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतलावर स्वतःचे स्थान मिळवू लागली. येणाऱ्या विद्यार्थी पालकांची संख्या शेकड्यांवरून हजारोंवर जाऊ लागली. सलग दोन दिवस पंधरा तास. . . दहा – बारा सत्रे.  . . अनेक इंटरेस्टींग माणसं. . .

ठाण्याच्या बाहेर हा उपक्रम सुरु केला अहमदनगरच्या मंडळींनी. सदाशिव अमरापूरकर, त्यांच्या पत्नी सुनंदाताई तसेच छायाताई फिरोदिया आणि ह्या सर्वांचे अनेक वर्गमित्र. . . यंदाच्या वर्षी अहमदनगरचा वेध दशकपूर्ती करतोय्. . . त्यानंतरचा क्रमांक औरंगाबाद ! टेंडर केयर हायस्कूल ह्या शाळेचे केंकरे पती-पत्नी आणि त्यांच्या शाळेतील उत्साही पालक ठाण्याच्या वेधला नेमाने यायचे. त्यांनीही हे आयोजन मनावर घेतले. येत्या जानेवारीमध्ये तिथेही दहावा वेध सादर  केला जाणार आहे.

मध्यन्तरीच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये दोन वेधचे आयोजन केले गेले. परंतु त्यानंतर हा उपक्रम बंद पडला. माझ्या असे लक्षात आले की ‘वेध’ च्या आयोजनाचा एक प्रशिक्षण-अभ्यासक्रम करायला हवा. हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. हे आहे (Edutainment) ज्ञानरंजनाचे व्यासपीठ. सात वर्षांपूर्वी पुणे, नाशिक आणि लातूर ह्या तीन शहरातील कार्यकर्त्यांचे असे आखीवरेखीव शिबीर घेतले. ह्या तिन्ही वेधचे यंदाचे सहावे वर्ष.

दरम्यान कल्याणचे देवेंद्र ताम्हाणे सर आणि त्यांचे शेकडो विद्यार्थी आणि पालक ठाण्याच्या वेधची वारी करतच होते. त्यांचेही प्रशिक्षण झाले. ठाण्याच्या परिषदेचा प्रत्यक्ष कार्यानुभव झाला आणि गेली तीन वर्षे कल्याणमध्ये ‘वेध’ सुरु झाला. त्याच सुमारास परभणीचे नायक सर त्यांच्या परिवारासह ह्या गंगेला मिळाले. आता प्रशिक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी माझ्याबरोबरच पुण्याचे दीपक पळशीकर सर, लातूरचे धंनजय कुलकर्णी, कल्याणचे ताम्हाणे सर अशी फळी तयार झाली होती. नाशिकच्या वंदना अत्रे, औरंगाबादचे मंगेश पानट आणि ह्या सर्वांबरोबरचे विविध क्षेत्रातले अनेक कार्यकर्ते आता मदतीसाठी होते.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये कोल्हापूर आणि पेणच्या मंडळींनी कंबर कसली. ह्या हंगामामध्ये ह्या दोन शहरांमध्ये वेधची मुहुर्तमेढ रोवली जाणार आहे. . . खरे तर एखादा वेध अनुभवल्यावर अनेक जण मला भेटतात आणि म्हणतात, “आमच्या शहरात घेऊ आम्ही” . . . पण हे एवढे सोपे नाही. . . त्यासाठी कमालीची चिकाटी, परिश्रम आणि संघबांधणी लागते. काही शहरांमधले गट प्रशिक्षणानंतर थंडावतात असा अनुभव आहे. . . बरं, प्रशिक्षण आणि किमान चार वेधमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव असल्याखेरीज वेधची ‘फ्रँचायझी’ मिळत नाही. . . त्यामुळे इच्छा आणि पूर्ती ह्यातील अंतर पार केल्या शिवाय हे आयोजन शक्य होत नाही.

मात्र आजवरच्या आठ शहरांचा अनुभव असा की एकदा हा उपक्रम त्या त्या शहरात सुरु झाला की तो बहरत जातो. यंदाच्या पुणे वेधच्या प्रवेशिका सहा तासात. . . हो, सहा तासात संपल्या. लातूरच्या गेल्या वर्षीच्या वेधमध्ये महत्वाचा सण असतानाही सभागृह पूर्ण भरले. हाच अनुभव सर्वांचा आहे. . . वेधच्या व्यासपीठावर आपण खऱ्याखुऱ्या Celebrities आणतो. . . अक्षरशः भारताच्या कान्याकोपऱ्यातून. . .मी इतक्या वर्षांमध्ये सर्व वेधमधून  पाचशेहुन जास्त मुलाखती घेतल्या आहेत. . . यंदा तर एका वर्षातच माझी किमान 55 मुलाखतसत्रे होतील.

आता वेध उपक्रमाची ‘चळवळ’ होत आहे हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकर्त्यांनी काही पावले उचलली. आयोजनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सर्व शहरांमधल्या समन्वयकांच्या बैठकी होऊ लागल्या. पुणे शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी एकूण पन्नासावा वेध झाला तेव्हा एक संग्राह्य पुस्तक पुण्याच्या टिमने तयार केले. आता वेळ अली होती स्वतंत्र वेबसाइट करण्याची. त्याप्रमाणे नियोजन करून आता वेध उपक्रमाची संपूर्ण माहिती देणारी www.vedhiph.com हे संकेतस्थळ सर्वांसाठी उपलब्ध आहे.

आजवरच्या वेधमधल्या मुलाखती आता यू-ट्यूब चॅनेल वर पहाता येतील. तसेच निवडक मुलाखतींचे एक पुस्तक नाशिक वेधच्या वंदना अत्रेंनी संकलीत केले असून ते यंदाच्या ठाणे वेधमध्ये प्रसिद्ध केले  जाईल. पुढच्या वर्षी किमान दोन शहरांची भर वेधच्या नकाशावर पडल्यावर महाराष्ट्राच्या प्रत्त्येक भागामध्ये नेमाने भरणारी ही अशी एकमेव बिनव्यापारी ज्ञानरंजनाची वारी ठरणार आहे.

वेधच्या भविष्यासाठी एक कॉर्पस फंड तयार करण्याचे ध्येय आता ह्या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये हाती घेतले आहे. मोरडे फूड प्रॉडक्ट्स् ह्यांनी घसघशीत हातभार लावून ह्या निधीची सुरवात केली आहे. वेधचे जुने मित्र अच्युत गोडबोले ह्यांनी स्वतःची भरीव वैयक्तीक देणगी त्यात ओतली आहे. वेधच्या आयोजनासाठीचे दोन दिवसांचे प्रशिक्षण जे मी पूर्णवेळ घेतो ते निःशुल्क असते. गेली दोन वर्षे मी सर्व वेध केंद्रांच्या स्वयंसेवकांसाठी सूत्रसंचालनाचे दोन दिवसाचे शिबीरही घेतो. तसेच कॅमेरा- साऊंड- प्रकाशयोजना ह्या सर्वांसाठी एक खास तांत्रिक शिबीरही आम्ही ह्यावर्षीपासून सरु केले. अर्थातच हे आदरातिथ्यासह निःशुल्क असते. २०१७ सालच्या फेब्रुवारीमध्ये सर्व वेध केंद्राच्या कार्यकर्त्यांचे पहिले वार्षिक संमेलन नाशिक परिसरात भरणार आहे. ह्या उपक्रमांसाठी ह्या निधीचा वापर होईल. तसेच नव्या शहरांमध्ये वेध भरवताना निदान पहिल्या वर्षीतरी काही हातभार देता येईल. शिवाय वेबसाइटची देखभाल, पुस्तकांचे प्रकाशन ह्यासाठीसुद्धा निधी लागणार. पुढच्या चार वर्षांमध्ये किमान पंचवीस लाखाचा निधी उभारण्याचा संकल्प आहे. पाहूया. . . येतीलच मदतीचे आणखी अनेक हात. . .

दरम्यान आय्.पी.एच्.. ची टीम आणि एमकेसीएल म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ह्यांच्या अथक् प्रयत्नाने एक ‘ऑन लाईन अॅप्टीट्यूड टेस्ट’ तयार झाली आहे. तिचे नाव आहे ‘फ्यूचरवेध’. संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या पाच हजारांहून अधिक एमकेसीएल पुरस्कृत केंद्रांमध्ये फक्त शंभर रुपयांमध्ये ही चांचणी देता येणार आहे. . .

. . . मी पुण्याला पोहोचलो. . .  वेळेच्या आधीच.

. . . वाहतुकीच्या अडचणींवर मात करत शेकडो ‘वेध’ करही यशवंत नाट्यगृहात पोहोचले होते. मर्चंट नेव्हीतल्या लठ्ठ पगारवाल्या नोकरीला अलविदा करून सागरी प्रजातींच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘सी शेफर्ड’ संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन सिद्धार्थ चक्रवर्ती ह्या वर्षीच्या पुणे ‘वेध’ चा हिरो ठरला. . . माझा मुलगा कबीर. यंदा चांगल्या मार्कांनी पास होऊन दहावीतून अकरावीत गेला. . . त्याला बक्षीस म्हणून नातेवाईकांकडून मिळालेले पैसे, त्याची स्वतःची बचत ह्यातून वाचवलेले चक्क सोळा हजार रुपये कबीरने सिद्धार्थच्या संस्थेला दिले. . . त्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल घेणे लांबणीवर टाकले.

असेच हलवले सगळ्यांना राजस्थानच्या मौलीक सिसोदीयाने. डॉ. राजेंद्र सिंग अर्थात् भारताच्या जलपुरुषाचा हा तरुण मुलगा. पाण्याच्या प्रश्नावर त्याला पोटतिडीकीने बोलताना ऐकणे हा विलक्षण अनुभव होता. ‘स्वयम्’ ह्या विद्यार्थी उपग्रह योजनेतले पुणे इंजिनियरींग कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक ह्यांचे सूत्र असेच रंगले. सोबत होते त्यांनी परिश्रमाने बनवलेला उत्तम फिल्म स्लाईड-शो.

चित्रकथी ही प्राचीन कलापरंपरा जपणारा चेतन गंगावणे, मृत वन्य जनावरांना, पेंढा भरून पुन्हा एकदा सजीव करणारे भारतातले एकमेव अधिकृत TAXIDERMIST डॉ. संतोष गायकवाड आणि चतुरस्त्र गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर. . . सहा प्रकारच्या सहा व्यक्तींनी मंतरलेले सहा तास. . .

सकाळी पावणेदहाला स्टेजवर चढलो आणि सायंकाळी सव्वासहाला उतरलो. . . अप्रतिम ऑडियन्स ! पुणे वेधच्या विद्यार्थीवृंदाने अगदी ठोक्यात सादर केले हे गीत.

शब्द होते. . .

मकसद्

हेतूविण प्रयास, दिशेविण प्रवास

(O2) ओटूविना तोकूडा, प्रत्येक श्वास llधृll

कृतीविण मती, भावाविण कृती

स्नेहाविना कोरडा, प्रत्येक ध्यास ll१ll

बळाविण यत्न, धीराविण बळ

मिठाविना अधुरा प्रत्येक घास ll२ll

जळी मग्न मीन, “मी न” म्हणे मन

अवघा रंग एकरूप, कर्म होई खास ll ३ll

नामा, तुका, जनी, हुंकाराती मनी

जगण्याच्या सार्थकाची, लागली गे आंस ll ४ll

 ‘यमन’ मध्ये बांधलेली चाल आणि सुरेल आवाज. . . संपूर्ण दिवस कसा वेधमय होऊन गेला होता. . .

परतीच्या वाटेला लागलो. . .

चला वेधचे नवे आवर्तन. . . कशी गेली पंचवीस वर्षे?. . . कसा झाला त्या बीजाचा हा वृक्ष. . . सगळेच अजब !. . . चक्रावून टकणारं. . . समाधान देणारं. . . जबाबदारीची जाणीव देणारे.

वेधच्या सत्रांसाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होता माझा बाबा (अनिल अवचट). थकून झोपलो आणि सकाळी ऊठलो तर त्याची मेल होती.

आनंदा, परवा वेध ला आलो, आणि खूप छान वाटले. शून्यातून केवढा माहोल निर्माण केला आहेस. किती शांतपणे एक तप हे काम करतो आहेस. कोठे गाजावाजा नाही. आत्मगौरव नाही. वेगवेगळी माणसे आम्हाला दाखवतोस. कर्तृत्वाच्या वेगवेगळ्या तऱ्हा दाखवतोस. समर्पणाचे नमुने पुढे ठेवतोस. उत्सुक मनांवर सकस बियांची उधळण करतोस. त्यातले कितीक बियांचे वृक्ष झाले. तरी तुझ्या कंबरेची बियांची पोतडी संपत नाही, की झारीतले पाणी सरत नाही.

किती सलाम करू तुला मित्रा?

बाबा

. . . डोळ्यात पाणी आले. . . बापाची शाबासकी किती मोलाची असते पोरासाठी. . . हजार हत्तींचे बळ देणारी. . . उत्साहाने पुढे नेणारी.

अशी झाली वेधच्या पंचविसाव्या वारीची सुरवात!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s