एकविसाव्या शतकातील ‘समाजउपयोगी संरचना’

तुमच्या लक्षात आले असेल की मी ‘सामाजिक’ आणि ‘संघटना’ ह्या दोन्ही शब्दांना काळानुरूप असे नवे कपडे शिवले आहेत. कारण असे की ह्या संज्ञांच्या उच्चाराबरोबर आपल्या डोळ्यासमोर घीसेपीटे शब्द आणि प्रतिमा येतात . . . सामाजिक संघटना म्हटली की तिची बांधिलकी कुणाशी असा प्रश्न येतो!

त्याचे उत्तर असे मिळते की अशा बहुतांशी संघटना आजवर धर्म, राजकीय तत्वज्ञान, राजकीय पक्ष तसेच खास भारतीय म्हणाव्या अशा अनंत जाती-जमातींबरोबर जोडलेल्या आहेत. ह्या सगळ्यांमध्ये गैर आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही . . . परंतु स्वयंसेवी भावना आज पुढे न्यायची असेल तर ह्या सर्वांना सामावून घेणारा परंतु गट-सांप्रदयिकतेच्या पलीकडे नेणारा गाभा हवा. तो कोणता? . . . स्वत: सकट इतर सर्वांचा ज्यात विकास आणि उत्कर्ष आहे अशा कोणत्याही उद्दिष्टासाठी, व्यक्तीगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, सत्तेसाठी नव्हे तर समरसतेचा आनंद मिळवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कृती . . . म्हणजे समाजउपयोगी संरचना.

माझी खात्री आहे, हे वाक्य तुम्ही परतपरत वाचाल किंवा हे लिखाण वाचणेच थांबवाल . . . बारकाईने वाचलेत तर त्यातले काही मुद्दे ध्यानात येतील. स्वत:सकट सर्वांचा विकास ही सुरुवात घ्या. परंपरागत सामाजिक कामामध्ये स्वत:ला बाजूला ठेवून काम करणे म्हणजे(च) निष्ठा अशी एकसूरी व्याख्या आहे. पदर मोडून लष्करच्या भाकर्‍या भाजणे वगैरे वर्णने आहेत . . . पण स्वत:चा विकास आणि उत्कर्ष इतका दुय्यम का मानायचा? . . . इतका निरलसपणा ही जर मागणी असेल तर व्यक्तीवादाच्या काळामध्ये तिची ‘संरचना’ होऊ शकेल का? आज त्याग आणि बलीदानाच्या व्याख्या नव्याने बनवायला नकोत का?

imagesसामाजिक कामाच्या मागे स्वयंविकास असायलाच हवा. फक्त ह्या विकासाची व्याख्या आर्थिक आणि भौतिक विकासाच्या पलीकडची म्हणजे बौद्धीक, भावनिक, नैतिक विकासाची हवी. असे असताना उपफल म्हणून आर्थिक आणि भौतिक विकास झाला तरी चालेल. कारण विकासाची मानसिक बाजू भक्कम असेल तर ती भौतिक विकासाला आंधळी करणार नाही. पुन्हा स्वत:बरोबर अनेकांचा असा विकास घडवून आणणारी रचना ही वेगळी संघटना असायला कशाला हवी . . .  माणसे जिथेजिथे एकत्र येतात, काम करतात, रहातात अशा प्रत्येक ठिकाणी ही संरचना प्रत्यक्षात आणता येईल की. संघटना म्हटले की पदभार, पदाधिकारी, नियमावली हे सगळे आले. हे अपरिहार्य आहे का? . . . आजच्या Virtual जगामध्ये आपण हे सारे Flexible पद्धतीने नाही का वापरू शकणार? . . . माझी ओळख नुकतीच एका बाईकर्सच्या ग्रुपबरोबर झाली. मोटरसायकल म्हटली की घुसाघुस करत, बेलगाम वेगात जाणारे तरूण स्वार आपल्या नजरेसमोर येतात. पण ह्या क्लबमध्ये बाईकची आवड, समानधर्मी लोकांशी मैत्री आणि शिस्तबद्ध प्रवास ह्या तिघांचा मिलाफ केला आहे . . . तब्बल पाच वर्षे हे मुसाफिर मोटरसायकलच्या गतीला अनेक योजनापूर्ण परिमाणे देत आहेत . . . आणि तरीही ही संघटना आजही व्हॉटस्अ‍ॅपवरुनच आपला कारभार चालवते आहे. मला हे फार महत्वाचे वाटते.

सामाजिकचा अर्थ ‘समाजउपयोगी’ करायला हवा. गतीशी दोस्ती करत अत्यंत सुरक्षित प्रवास करताकरता बाईकबरोबरचे नाते गडद करताकरता मैत्रीचे बंधही घट्ट करणे हे समाजोपयोगी काम नाही का? . . . म्हणूनच मला ‘सामाजिक’ ऐवजी समाजउपयोगी हा शब्द कक्षा विस्तारणारा वाटतो. आमच्या आय्.पी.एच्. मानसिक आरोग्य संस्थेचे अनेक उपक्रम आहेत ज्यात समाजाच्या विविध गटातील स्वयंसेवक काम करतात. त्यांची मानसशास्त्रीय पहाणी करण्यात आली. वर्षानुवर्षे ही मंडळी आर्थिक लाभाविना काम कशी करू शकतात हे आजमावून पहाण्यासाठी . . . आमची ‘मैत्र’ ही दूरध्वनी सुसंवाद सेवा असो की ‘मनोविकास’ हा प्रबोधन कार्यक्रम; ‘जिज्ञासा’ हा कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठीचा कार्यक्रम असो की त्रिदल हा स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तींसाठीचा वर्कशॉप . . . सार्‍याचे उत्तर एकचं! इथे काम करताना आम्ही व्यक्ती म्हणून अधिक समंजस, विचारी आणि आस्थापूर्ण झाले. हा विकास आला की भौतिक-आर्थिक बाजू अगदी नगण्य नाही झाली तरी मागे तर पडते.

पुण्यामध्ये एक असाच ग्रुप आहे, ‘धावणे’ ह्या छंदाचा प्रसार करणारा. ही संघटनाही संवाद-नियोजन-नियमावली ह्या दृष्टीने ‘अदृश्य’ आहे. पण पळण्याच्या वेळी सगळे एकत्र येतात. असे सायकलींगचे ग्रुप आहेत, ओरेगामीचे आहेत, ग्रामोफोन रेकॉर्डस् ऐकण्याचे आहेत . . . ह्या सार्‍या संरचना आहेत एकविसाव्या शतकातल्या समाजोपयोगी कामांच्या. त्या जीवनस्पर्शी आहेत, त्यांच्यामध्ये तात्विक अभिनिवेश नाही . . . अशीच एक संरचना आहे विविध विषयांवरच्या स्वमदत गटांची. एपीलेप्सीपासून ते कोडासारख्या अवस्थांपर्यंतच्या अनेक रचनांबरोबर मी संबंधित आहे. मल्टीपल स्क्लेरॉसीसपासून ते पार्किसन्स् पर्यंतच्या आजाराचे रुग्ण आणि नातेवाईक एकत्र येताहेत. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इंटरनेटवरून आपली संरचना अतिशय घोटीव आणि शिस्तबद्ध बनवत आहेत. संघटनेला structure लागते. संरचनेला purpose पुरतो.

व्यक्तीगत स्वार्थाच्या पलीकडे नेणारा कोणताही सकारात्मक हेतू हा समाजउपयोगी म्हणायला हवा. आपापले जीवन संभाळून दुर्गम भागातील, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण पालकत्व देणार्‍या व्यक्तींचा एक मोठा गट मी जवळून पहातो आहे. विद्याज्ञानाला सहाय्य करणार्‍या ह्या गटामध्ये सर्व वयोगटातील मंडळी कार्यरत आहेत. सगळ्यांनीच काही सामाजिक कार्यात झोकून द्यायची गरज नसते. जास्तीत जास्त लोकांचा मर्यादित सहभाग हे तर गांधीजींनी सांगितलेले तत्व आहे. खरे तर आंधळ्या व्यक्तिवादाला आळा घालायला अशाच अनौपचारीक गटांची गरज आहे. अशा संरचनेमध्ये Hierchial Leadership नसते. Functional Leadership म्हणजे प्रत्येक कामासाठी, विभागासाठी वेगवेगळे नेते असतील. इतर कामांमध्ये ते अनुयायी होतील. समाजउपयोगी संरचनेमध्ये ‘सत्ता’ आली की तिची झालीच ‘चौकटीतली संघटना.’ म्हणूनच ह्या संरचनेला नेतृत्व हवे आहे ज्ञान, अनुभव ह्याबरोबर शहाणपणावर आधारीत . . . सत्ता की समरसता हा कलहाचा मुद्दा अनेक वेळा अशी कामे करताना येतो आणि येत रहाणार आहे. सत्ता आली की ‘आम्ही’चे पेड अलग व्हायला लागतात आणि ‘मी-मी’ पणाचा उदोउदो सुरू होतो. अनेक Stereotyped सामाजिक संघटना व्यक्तीकेंद्रित आहेत किंवा होऊ घातल्या आहेत. म्हणजे समाजउपयोगी काम हा आपल्या व्यवसायाचा भाग करू नये असे नाही. प्रत्येक व्यवसायामध्येच समाजउपयोगी भाग असायला हवा. तो वारंवार अधोरेखित व्हायलाही हवा.

परंतु जिथेजिथे व्यवसायामध्येच समाजउपयोगी अंग मोठे आहे, जसे की वैद्यकीय व्यवसाय; त्यावेळी सत्ता-समरसता हे समीकरण वारंवार तपासून पहायला हवे हे मात्र खरे. समरसतेला प्रधान मानले की समाजउपयोगी कार्याचे परिणाम म्हणजे Results लवकरात लवकर दिसायला हवेत हा हेकाही कमी होत जाईल. आपण जे समाजउपयोगी कार्य करायला घेतले त्याचे परिणाम नेमके कसे आणि काय होतील ह्याचा अभ्यास आणि अंदाज हवा . . . पण नेमके कधी होतील ह्याचा हेका नसावा. असा हेका आला की समरसता कमी होते. Results achieve करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी होते.

ठाणे-बेलापूर पट्ट्यामधल्या एका वस्तीमध्ये सातत्याने एक छोटी शाळा चालवणारी एक संस्था आहे. आपल्या कामाचा scope वाढवण्याच्या फंदात न पडता पण सातत्याने काम करत ह्या संस्थेने स्थानिकांबरोबर ‘We need you’ असे दुपदरी नाते तयार केले आहे. गाजावाजा न करणार्‍या छोट्या प्रयत्नांमध्ये समरसता जास्त असते असा माझा अनुभव आहे.

आतापर्यंत समाजउपयोगी संरचनेमध्ये मी गट किंवा समूह ह्यावर लिहिले. पण ह्या संरचनेत एकेकट्याने काम करणार्‍या व्यक्तींनाही खूप महत्व आहे. ह्या व्यक्ती कधी एकट्या तर कधी समूहाने कार्यरत होतील. व्यसनामध्ये अडकलेल्या व्यक्तींना वर्षानुवर्षे समरसतेने मदत करणारे अनेक जण मला ठाऊक आहेत . . . घरी कामाला येणार्‍याबाईंच्या मुलांना समरसतेने शिकवणारे आहेत . . . अडचणीत असलेल्या अनेकांना मूकपणे मदत करणारे कितीतरी आहेत . . . सद्भाव जागवणार्‍या ह्या व्यक्ती भले कोणत्या संघटनेचा भाग नसतील पण संरचनेचा भाग नक्की असतात.

हॅम रेडिओ ऑपरेटरर्सची जगभरची संरचना ह्याच पद्धतीने वर्षानुवर्षे कार्यरत आहे. अनेक वेळा संरचनेचे मोकळेपण आणि लवचिकता संघटनेच्या ओतीवघोटीवपणापेक्षा दिर्घायुषी ठरते ह्याचा विचारही आपण करायला हवा. म्हणजे माणुसकी जागवणारी प्रत्येक कृती समाजउपयोगी संरचनेचा भाग आहे असे मानले तर ह्या संरचनेचा स्पर्श प्रत्येक माणसाच्या जीवनाला होऊ शकतो आणि सार्‍या मानवजातीला कवेत घेणारी ही ‘संघटना’ तर ultimate म्हणायला हवी.

तेथ प्रियाची परमसीमा। तो माऊली भेटे आत्मा।। (ज्ञानेश्वरी १६:४४३)

असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. माऊली म्हणजे वात्सल्य . . . समरस झालेले प्रेम . . . अपेक्षा गळून पडणे ही प्रेमाची परमसीमा . . . विनोबा म्हणतात की आत्मा-माऊली हा ज्ञानेश्वरांचा अद्वितीय शब्दप्रयोग आहे. समाजउपयोगी संरचना म्हणजे ‘आत्मामाऊली’च्या भेटीचे प्रस्थानच नव्हे का?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s