स्केचिंग : रेखाटने कागदावरची आणि मनातली….

स्थळ होते ऑस्ट्रेलियातले प्रमुख शहर सीडनी. वेळ टळटळीत दुपारचे बारा. टळटळीत अशासाठी की त्या दिवशी सीडनी शहरातले तापमान भयानक उंचावलेले. आमचा पर्यटकांचा ग्रुप एका रम्य जागी भटकत होता. ऑपेरा थिएटर आणि हार्बर ब्रीज हे शहराचे दोनही मानबिंदु एकाच ठिकाणाहून पहाता येतील अशी ती जागा. आम्ही सारे आलो होतो MICTA च्या पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये हे वार्षिक पुरस्कार मानाचे मानले जातात. सोहळ्याच्या दिवसाव्यतिरिक्त आमच्यासाठी स्थळदर्शनाच्या टूर्स आयोजित केल्या होत्या वीणा वर्ल्डच्या हसतमुख आणि कार्यक्षम चमूने.

आता ज्या ठिकाणी पोहोचलो होतो तिथे येण्याआधी आम्ही सीडनीचे ऑपेरा थिएटर बघून भारावून गेलो होतो. कागदावरच्या स्केचेसपासून प्रत्यक्षातल्या इमारतीपर्यंतचा प्रवास अनुभवायला देणारी ती टूर विलक्षण होती. दोन्ही प्रमुख थिएटर्समध्ये आत जाऊन पहाण्याची संधी आम्हाला मिळाली. एका ठिकाणी बॅलेच्या सेटची आणि प्रकाशयोजनेची मांडामांड सुरू होती. तर भव्य ऑपेरा थिएटरमध्ये पियानोला ट्यून अप् करण्याचे काम सुरू होते. आम्हा सर्व नाट्य-रंगकर्मी मंडळींना अगदी पंढरीच्या वारीला आल्यासारखे वाटत होते. त्या धुंदीतच आम्ही रात्रीच्या नाट्यप्रयोगाची तिकीटे काढण्याचा निर्णय घेतला . . . आम्ही पाच म्हणजे अमृता सुभाष, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, अविनाश अरूण आणि मी . . .

आता ह्या फोटोस्पॉटवरून सगळ्यांबरोबर पुढे जायला मन होईना. जवळच एक मोठी आर्टगॅलरी होती आम्ही तिथे जायचा निर्णय घेतला. आमची टूरची बस सोडून दिली . . . जवळच वाटणारी आर्ट गॅलरी दुपारच्या उन्हात लांब भासू लागली होती. अमृता आणि मधु माझ्या गतीने चालत होत्या. परेश आणि अविनाश झपाझप चालत पुढे गेले. त्या उन्हामध्ये सुद्धा रस्त्यावर जॉगिंग करणारी मंडळी भेटत होती. दंडावर नाडी आणि ब्लडप्रेशरची ‘Live’ अवस्था सांगणारी उपकरणे बांधून धावणे सुरू होते . . . त्याकडे पाहूनच मला धाप लागत होती. न्यू साऊथ वेल्स आर्ट गॅलरीची इमारत अत्यंत भव्य आहे. प्रवेश केल्यावर लक्ष वेधून घेते ते एक गणेशाकृतीचे शिल्प. ह्या आर्टगॅलरीत अनेक दालने आहेत. रेम्ब्रा, रुबेन, मॉने, पिकासो अशा अनेकांच्या मूळ कृती आहेत. शिवाय ऑस्ट्रेलियन चित्र व शिल्पपरंपरेचा दिडशे वर्षांचा इतिहास नियोजनपूर्वक मांडलेला आहे.

हाताशी वेळ असताना, मन:पूर्वक न्याहाळण्याचा आनंद काही वेगळाच. आम्ही पाचही जण आपापल्या गतीने चित्रे पहातपहात सरकत होतो. कधी एकत्र भेटायचो. चित्रांच्या अनुरोधाने बोलायचो. पुन्हा आपापल्या तंद्रीत जायचो . . . दिड-दोन तास असे मस्त आनंदात गेले. आम्ही त्या गॅलरीच्या कँटीनमध्ये बसलो. आम्ही ‘TTMM’ योजना स्विकारली होती. ‘तुझे तू माझे मी’ असे प्रत्येकाने स्वखर्चाने आपापले खाणे घेऊन एकत्र बसायचे. भरपूर गप्पा झाल्या. त्यानंतर उरलेली दोन दालने पाहून आम्हीम्युझीयम बाहेर पडलो तर समोरच्या ‘बोटॅनिकल गार्डन’ चा हिरवागार परिसर आम्हाला खुणवत होता.

डेरेदार झाडे आणि छान-दाट हिरवळ असा हा परिसर आहे. आम्ही मस्त झोपलो-बसलो-विसावलो त्या हिरवळीवर … बॅगा-पर्सेसच्या उशा झाल्या. अखंड बडबड . . . कलेतल्या विषयांपासून ते वैयक्तीक विषयांपर्यंत. आज आमच्यातले कुणीही वेळेचे गुलाम नव्हते . . . कुणाला कसलीही घाई नव्हती. आज आम्ही घड्याळाला वेसण घातली होती.

तासाभरानंतर बोटॅनिकल गार्डनची भटकंती करण्याचा निर्णय झाला. तेव्हा मी ग्रुपमधून बाहेर पडलो. संध्याकाळी नाटकाच्या आधी भेटायचे असे ठरले . . . मी परतलो सीडनी ऑपेराच्या परिसरामध्ये. तिथल्या एका कॉफीहाऊसच्या बाहेर टाकलेल्या टेबलखुर्च्यांवर बसलो. तोवर दुपारचे साडेचार वाजले होते. समोरचा हार्बर ब्रीज झळाळत्या उन्हाला अंगावर घेत उभा होता. मी स्केचबुक काढले. रेषा काढायला सुरुवात केली तशी त्या पूलाची रचना मला नव्याने समजायला लागली. माझ्या नजरेच्या टप्प्यातला अर्धा पूल मी काढायला घेतला . . .पलीकडचा अर्धा भाग पहाणार्‍याने, मनाने पूर्ण करायचा . . . वेळ जात होता . . . सकाळपासूनची ‘निवांत धमाल’ आता रेषांमधून उतरत होती. चित्र पूर्ण केले.1.jpg आणि बंदराच्या लगत चालतचालत ऑपेराची इमारत दिसेल असा कोन शोधायला लागलो. उन्हाचा तडाखा बसत होता पण अँगल छान मिळत होता . . . पुन्हा एका कॉफी हाऊसच्या बाहेर बसलो. . . ऑपेराच्या इमारतीचे छत बाहेरुन केले आहे ते ‘टाईल्स’च्या फरशांनी. त्यांचा रंग आहे ‘ऑफ व्हाईट’ . . . आता माझी बोटे फटाफट कामाला लागली होती. ऑपेराची इमारत कागदावर उतरत होती. मध्ये एकदा मी जागा बदलली . . . डिटेल्स् भरायला जरा अधिक मोक्याची! . . . माझ्यासाठी आता घड्याळ थांबलेले होते. सकाळपासूनचे, सगळे क्षण रेषांच्या स्वरुपात कागदावर उतरत होते . . . एक सुरेख ध्यानावस्था . . . Meditation . . . आसमंतातला सारा कोलाहल लुप्त . . . समोरचे निळे आकाश! त्यावरची ऑपेराची पंखदार इमारत . . . जमिनीतून अवकाशात झेपावणारी . . . कागद . . . पेन . . . नजर . . . बोटे . . . मन . . . कागद . . . पेन . . . नजर . . .

घड्याळात पाहिले. सात वाजून गेले होते. चित्रही पूर्ण झाले होते. 2.jpgम्हणजे चित्र पूर्ण झाल्यावरच घड्याळात पहाण्याचे भान आले होते. पुन्हा एकदा ऑपेराच्या भव्य इमारतीकडे जाऊ लागलो. “आनंदकाका . . . ” अशी अमृताची हाक आली. आम्ही सगळे नाट्यगृहाकडे वळलो. शेक्सपीयरच्या ‘रोमिओ अ‍ॅन्ड ज्युलिएट’ चा प्रयोग बघून आम्ही पुन्हा एकदा भटकंती सुरू केली. आता सिडनीचे नाईट-लाईफ रंगात आले होते. सगळे फूटपाथ माणसांनी भरलेले. सगळे पबस् ओसंडून वहाणारे . . . आम्ही रहात होतो त्या हॉटेलच्या जवळ एका पबमध्ये जाऊन बसलो. गप्पांचे अजून एक आवर्तन . . . रात्री खोलीवर पोहोचलो तेव्हा मध्यरात्रीचे बारा वाजत आले होते.

. . . झोप काही येत नव्हती.

पुन्हा एकदा स्केचबुक काढले . . . पब् आणि कॉफीहाऊसेसच्या प्रतिमा कागदावर उतरायला लागल्या . . . स्मरणातल्या रेषा, आकार कागदावर उतरत होते . . पुन्हा तीच अवस्था . . . घड्याळपलीकडची. चित्र कधी संपले, झोप केव्हा उलगडली, काही कळलेच नाही.3.jpg

पुढचा दिवस मात्र मस्त फ्रेश होऊन आला . . तो फ्रेशपणा टिकून आहे . . . सिडनीहून घरी परत आल्यावरही!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s