‘स्वयम्’चा वयम प्रवास!

दहा वर्षे होऊन गेली. माझा ज्येष्ठ मित्र, डेंटीस्ट डॉ.अजित ओकने मला फोन केला. ज्यांच्या एकुलत्या एक छोट्या मुलीला सीपी म्हणजे सेरेब्रल पाल्सी आहे अशा आईबाबांना तुला भेटायचे आहे . . .अशा प्रकारे देवळालकर कुटुंबाशी माझी ओळख झाली.

सीपी अर्थात् सेरेब्रल पाल्सी हा काही आजार नाही पण बहुविकलांगता आणणारी ती एक अवस्था आहे. आयुष्यभर खुर्चीगाडीला खिळलेले आयुष्य असते ते. अनेकवेळा ह्या मुलांची बुद्धीमत्ता अगदी उत्तम असते पण त्यांना वाणीचे वरदान मिळालेले नसते. त्यांच्या ‘भाषे’ तला संवाद कळण्यासाठी आपल्याला तपश्चर्या करावी लागते. देवळालकरांच्या श्रेयाबरोबर माझी नव्याने ओळख झाली तेव्हा मला वाटायचे की तिचे आईबाबा श्रेयाला काय वाटते आहे आणि श्रेयाला काय म्हणायचे आहे हे स्वत:च्याच मनाने सांगतात. आता दहा वर्षानंतर मी तिच्याशी ‘डायरेक्ट’ बोलायला लागलो आहे. माझ्याशी ती ‘चक्क’ बोलते. . . आणि ते मला कळतं सुद्धा . . .

आमच्या ह्या दोस्तीच्या कहाणीमध्येच स्वयंम् बरोबरचा माझा प्रवास लपलेला आहे. swayam 4श्रेयाचे आईबाबा अशा परिस्थितीमधल्या इतर पालकांपेक्षा थोडेसे वेगळे होते. श्रेयाच्या परिस्थितीमध्ये फार फरक पडणार नाही आणि तिला परावलंबी जीवन जगावे लागणार हे सत्य पचवताना त्यांनाही प्रचंड कष्ट पडले असणार. पण त्यांना अशा पालकांना एकत्र करायचे होते. पालक एकत्र आले तर ह्या मलांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी करता येईल असा त्यांचा विश्वास होता.

त्याप्रमाणे आम्ही एक प्राथमिक बैठक घेतली. इतर पालकांचे ठाऊक नाही पण श्रेयाच्या आईने म्हणजे नीताने आता हा वसा गांभीर्याने घेतला होता. ह्या मुलांसाठी एका छत्राखाली सुविधा देणारे केंद्र सुरू करायचे ह्या विचाराने ‘स्वयंम्‘ ह्या संस्थेची स्थापना झाली. मी, डॉ.ओक, नीताचे बाबा, बहीण, श्रेयाचे बाबा असे मिळून आम्ही विश्वस्त झालो. पण खरा भार उचलणारी नीताच. अगदी त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या प्रत्येक मिटींगमध्ये श्रेयाचा सहभाग असतो. ती खरे तर स्वयंम् ची संस्थापक आहे.

दहा वर्षापूर्वी छोटेसे केंद्र सुरू झाले. ऑक्युपेशनल थेरपी, रेमेडीयल एज्युकेशन, स्पीच थेरपी अशा सेवा एकत्र मिळू लागल्या. श्रेयासाठी हे केंद्र आता ‘डे केयर सेंटर’ बनले. आता तर संस्था अशा अनेक मुलांसाठी ही सुविधा चालवते. महानगरपालिकेच्या छोट्याशा भाड्याच्या जागेत आता मुलापालकांचा राबता चालू झाला. वेगवेगळ्या विषयांवर पालकसभा सुरू झाल्या. ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होताना मला साक्षात्कार झाला तो ह्या पालकांच्या निरपेक्ष आणि प्रामाणिक प्रेमाचा. swayam 5एका दिवाळी पार्टीच्या हॉलमध्ये मी पाहिले की वास्तवाचा स्वीकार करून तिथे वात्सल्याचे दिवे उजळले होते . . . आपल्या सर्व दृष्टींनी ‘नॉर्मल’ असलेल्या मुलावर प्रेम करताना त्यावर अपेक्षांचे आवरण देणारे इतके पालक मी पहातो. हा असा ‘निष्काम कर्मयोग’ जगणारे पालक मी पहात होतो.

दरम्यान नीताने मोठ्या हिंमतीने आणि घरच्यांच्या सहकार्याने टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून पुनर्वसनशास्त्रामध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. मायाळू आई, जिद्दी कार्यकर्ती तर होतीच ती. आता ज्ञान मिळाल्याने तिच्या कामाला शास्त्रीय बैठक मिळाली. स्वत:च्या चिकाटीच्या बळावर ती संस्थेचे अनेक उपक्रम चालवायला शिकली. देणगीगार मिळवणे, करमणुकीच्या कार्यक्रमांमधून निधी गोळा करणे, दैनंदिन उपचारांवर लक्ष ठेवणे, केंद्रावर येणारे पालक आणि व्यावसायिक स्टाफ ह्यांची सांगड घालणे . . . किती जबाबदार्‍या!

वर्षे सरकत होती. आता ‘स्वयं‘ ला स्वप्ने पडू लागली मोठ्या जागेची. पुन्हा एकदा नीता पदर खोचून धावपळ करायला लागली. अनेकांकडून मदत मिळाली आणि टप्प्याटप्प्याने प्रशस्त जागेमध्ये केंद्र आणि आता ह्यामुलांसाठी शाळाही सुरू झाली. swayam 2सीपी असलेली मुले जशी वयाने मोठी होतात तसे त्यांना एका जागेवरून दुसरीकडे नेणे खूपच कठीण होत जाते. सामान्य आर्थिक स्थितीमधल्या पालकांना मुलांना शाळेत किंवा उपचारकेंद्रामध्ये आणण्याचा दैनंदिन वहातुकखर्चसुद्धा परवडत नाही. अशा मुलांसाठी सार्‍या पुनर्वसनउपचारपद्धतींची सुसज्ज व्हॅन घराजवळच न्यायची अशी एक कल्पना आता नीताच्या डोक्यात आहे. काही पालकांसाठी खास बसची सोय करायची आहे ज्यामध्ये एका वेळी अनेक व्हीलचेयर्स बसू शकतील.

अशा सार्‍या कल्पना प्रत्यक्षात आणायला श्रेयाच्या प्रेरणेने स्वयंची टीम आता स्वत:ला तयार करते आहे. आजवरच्या प्रवासामध्ये माझी स्वत:ची भूमिका, “गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” ह्यापुढे गेलेली नाही. प्रत्यक्षामध्ये सार्‍या अडचणींच्या झळा नीता, श्रेयाचे बाबा, श्रेया आणि स्वयम् च्या टीमनेच सोसल्या आहेत. ह्या प्रवासात कधी दमछाक होते आणि नीता मला फोन करते. तिच्या भावना भडाभडा व्यक्त करते. मी नीटपणे एैकून घेतो. तिला धीर देतो. ती सावरते आणि पुन्हा एकदा कामाला लागते.

Swayam 3.jpgगेल्या वर्षी आमच्या प्रिय श्रेयाच्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये चढउतार झाले. एका बाजूला संस्थेचे काम तर दुसरीकडे श्रेयाची काळजी घेणे ह्यात नीताची ओढाताण होत होती.तरीही संस्थेसाठी अनुदान मिळवण्यासाठीची धडपड तिने सोडली नाही. एखादे ध्येय माणसाचे जीवन कसे उजळून टाकते पहा . . . स्वत:च्या पोटच्या मुलीची अवस्था पाहून आलेल्या असहाय्यतेतून नीताने निर्माण केली आहे अनेकांना आधार देणारी व्यवस्था. हेच स्वयंचे वेगळेपण आहे. एखादा व्यावसायिक असतो. तो त्याच्या क्षेत्रातले स्वप्न पहातो. प्रत्यक्षात आणतो. श्रेयाच्या आईबाबांसमोरचे क्षेत्र कोणते होते? . . . फक्त वात्सल्य आणि ममतेचे. तो काही नीताचा व्यवसाय नव्हता. आजही नाही. मात्र नीताने स्वत:साठी आणि श्रेयासाठी एक जीवनहेतू साकार करण्याचा प्रयत्न केला . . . श्रेयाच्या निमित्ताने नीताला आणि संपूर्ण टीमला जगण्यातले श्रेयस् गवसले. त्याचेच नाव स्वयम्!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s