जुळून आलेला मस्कतयोग…..

काहीकाही योगायोग मोठे मजेचे असतात. माझी स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारी मीना (सौ.मीना ठाकूर) भेटीला म्हणून तिच्या आत्याकडे मस्कतला आली होती. तिच्या ह्या आत्याचे पती श्री.सुरेश गांधी गेली वीस वर्षे तिथल्या अल् हशर फार्मसी ह्या कंपनीचे जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. विविध कंपन्यांसाठी आय्.पी.एच्. संस्थेतर्फे आम्ही जे प्रशिक्षण कार्यक्रम घेतो त्याची माहिती मीनाने सुरेशभाईना दिली. त्यानंतर सुरेशभाई ठाण्याला भेटीला आले. इ-मेलवर पत्रव्यवहार सुरू झाला.

20160220024137अल् हशर फार्मसी ही कंपनी गेल्या शतकामध्ये, सत्तरच्या दशकात सुरू झाली. तेव्हा त्यात तीन कर्मचारी होते. आता साधारण पावणेदोनशेची टीम असून ही कंपनी दोन-तीन विभागांमध्ये चालवली जाते. कंपनीची अनेक रिटेल आऊटलेटस् म्हणजे औषध दुकाने आहेत. शिवाय अनेक नामवंत कंपन्यांचे मार्केटिंग करून ओमानभरच्या डॉक्टरांना नेमाने भेटणारा एक संच आहे. विविध वैद्यकीय उपकरणे विकण्यासाठी एक स्वतंत्र टीम आहे. ह्या कर्मचार्‍याच्या ट्रेनींगसाठी एकूण चार दिवसाचा कार्यक्रम ठरला. दोन दिवस होते मार्केटिंगच्या टीमसाठी तर दोन दिवस सर्व विभागांच्या मॅनेजर्ससाठी. कार्यक्रमाचे सूत्र होते, ‘मी ते आम्ही’ अर्थात ‘Me To We’.

20160220024138

मी आणि माझी सहकारी डॉ.सुखदा ओमान-एयरच्या विमानात बसलो आणि एका शुक्रवारी सकाळी ओमानमध्ये उतरलो. एयरपोर्टवरून शहराकडे येण्याचा रस्ता दुबईची आठवण करून देणारा होता. रुंदच्या रुंद, स्वच्छ आलीशान रस्ते. त्यावर वेगाने घरंगळणार्‍या गाड्या. रेताड वातावरणात मध्येच पामची झाडे, निगुतीने लावलेली हिरवळ आणि त्यावर २ फुललेले फुलांचे ताटवे. शुक्रवार हा सुटीचा वार . . . आम्हाला शहरदर्शन घडवून आणण्याची जबाबदारी अल् हशरमध्ये तेहेत्तीस वर्षे काम करणार्‍या सुनील कुलकर्णीनी उत्साहाने उचलली. रात्रीचे जेवण गांधी पतीपत्नींच्या घरी झाले.

20160220024137 (1)दुसर्‍या दिवशीचे प्रशिक्षण सुरू झाले. समुद्राच्या काठावरचे एक हॉटेल . . . समोर बसलेले जवळजवळ चाळीस मार्केटिंग एक्झेक्यूटीव्हज्. सगळेच भारतातून आलेले . . . आंतरभारतीचे अधिवेशन होते ते. हिमाचल प्रदेशापासून केरळपर्यंत अनेक राज्यांचे लोक. सारे जण कमीतकमी बी.फार्म शिकलेले! मॅनेजर्सच्या बॅचमध्येही तसेच . . . त्यात दोन जण ओमानी होते. बाकीचे भारतीय . . . केरळवासीयांची संख्या जास्त होती. महाराष्ट्रातलेही पाच-सहा होते.

साधारणपणे अर्ध्या दिवसामध्येच आमच्या आणि त्यांच्या तारा जुळल्या. आणि नंतरचे चारही दिवस रोजचे साडेआठ तास असे कापरासारखे भुर्रर्र उडून गेले . . . भरपूर अ‍ॅक्टाक्रिटीज्, चर्चा, रोल-प्ले, छोटे चित्रपट दाखवून त्यावर चर्चा . . . सगळेजण भरभरून सहभाग देत होते. तिशीपासून ते साठीपर्यंतचे सगळे वयोगट . . . पहिल्या बॅचमध्ये तीन मुली होत्या तर दुसर्‍या बॅचमध्ये सहा जणी.

आमच्या प्रशिक्षणामध्ये ‘मानसिक-आरोग्य’ आणि ‘स्वयंविकास’ ह्याची सांगड घालून संघशक्ती कशी निर्माण करायची ह्यावर भर दिला जातो. हे प्रशिक्षण Intense आणि Energy Intensive असते पण त्यात भरपूर धमाल, हास्य विनोदही असतात. दोनही बॅचेसमधल्या विद्यार्थ्यांनी कोर्सच्या शेवटी आम्हाला उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली. . . त्यांच्यासाठी हा अनुभव कसा Unique होता ते भरभरून सांगितले.

शेवटच्या दिवशी सकाळी आमचा विषय होता, Emotional Literacy म्हणजे भावसाक्षरता! . . . त्यावर आधारीत खेळ आणि ग्रुपवर्क होते . . . भावनांच्या छटा देऊन त्यावरची गाणी शोधायची अशी एक अ‍ॅक्टीव्हिटी असते. त्या निमित्ताने संगीत, संगीताचा आस्वाद, संगीत आणि भावना ह्यांचे नाते अशा अनेक विषयांवर संवाद घडतो. सूर, ताल, शब्द ह्यांच्या संयोगाचे पदर उलगडले जातात.

तर एका गटाला भावना दिली होती ‘देशप्रेम’ . . . त्यांनी गाणे निवडले, ‘काबुलीवाला’ चित्रपटातले, ‘ए मेरे प्यारे वतन, मेरे बिछुडे चमन . . . तुझपें दिल कुर्बान . . .’ गाण्याच्या अनुरोधाने आमचा संवाद सुरू होता . . . उघड भावना जरी देशप्रेमाची असली तरी त्यासोबत येणार्‍या भावना कोणत्या? . . . एक आहे विरहाची . . . व्याकुळतेची . . .एक अनावर ओढ . . . तेरे दामनसे जो आए उन हवाओको सलाम . . . संवाद सुरू असतानाच मी सुर लावला. त्यात अनेक सूर मिसळले! आठवणींचा लोट कसा असतो? . . . एक सुखद लाट येते आणि लगेच जाणवते ती ताटातूटीची भावना . . मी पुढे गात राहिलो. . . . माँका दिल बनकर कभी सीनेसे लग जाता है तू . . . माझा आवाज त्या हॉलभर फिरत होता. सोबतीला बाहेरच्या समुद्राची गाज . . . . . . तुझपें दिल कुर्बान . . . गाणे पूर्ण करून थांबलो. विलक्षण शांतता. समोरच्या सगळ्यांचे डोळे भरून आलेले . . . मस्कतच्या किनार्‍यावर देशप्रेमाची भावना इतक्या तीव्रतेने भेटेल अशी कल्पनाच कधी केली नव्हती मी . . . मला जाणवले की माझ्याही डोळ्यात पाणी होते . . . भावनांची जाण आणि भान आणणारा तो क्षण आमच्या सर्वांचा झाला . . . आमचे नाते खूप तरल झाले . . . त्यापुढचे सारे प्रशिक्षण ‘ह्या ह्रदयीचे ते ह्रदयी घातले’ अशा सुरेल वाटेने सुफळसंपूर्ण झाले . . .परतीच्या प्रवासासाठी एअरपोर्टच्या वाटेला लागलो. तर पावसाने मस्तपैकी फेर धरला होता . . . मस्कतमध्ये पाऊस येणे ही एक महत्वाची घटना असते. . . “तुम्हाला वाळवंटातला पाऊसही पहायला मिळाला . . . ” गाडी चालवणारे सुनील कुलकर्णी म्हणाले . . .मी मान डोलावली.

रस्त्यावर मध्येमध्ये अल् हशर फार्मसीची दुकाने दिसत होती. माझ्या लक्षात आले की आता माझी नजर ह्या दुकानांना शोधायला लागली होती . . . अरे, हे तर आपल्या कंपनीचे दुकान . . .आपल्या? . . . अरे चारच दिवस झाले तुला इथे येऊन! . . . मग काय झालं? . . . ‘मी ते आम्ही’ हा विचार काय फक्त शिकवण्यासाठी असतो? . . . सर्वांगाने अनुभवायची ती एक चीज असते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s