ज्ञानरंजनाचा फंडा

मी जेव्हा मनोविकारशास्त्र ह्या विषयामध्ये एम्.डी. पदवीसाठी प्रशिक्षण घेत होतो तो काळ होता आजपासून तीस-पस्तीस वर्षापूर्वीचा. गर्द अर्थात् ब्राऊन शुगरच्या व्यसनाची साथ मुंबईमध्ये आणि इतरत्र पसरायला लागली होती. ह्या विषयावर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मी एक स्लाईड शो तयार केला होता आणि दोन वर्षांमध्ये अक्षरश: शेकडो ठिकाणी तो सादर केला. नुसत्या भाषणापेक्षा ह्यांचा प्रभाव जास्त पडतो असा आडाखा त्यामागे होता. व्हायचेही तसंच . . . अफूच्या हिरव्यागार शेतीपासून ते वॉर्डातल्या अस्थिपंजर रुग्णांपर्यंतची छायाचित्रे परिणामकारक असायची. आवश्यक ती माहिती आणि ज्ञान तर पोहोचायला हवं. पण त्यात भावनेचा ओलावाही हवा. तरच वर्तन बदलण्याची शक्यता जास्त . . .

ज्ञानरंजन अर्थात् Edutainment ही संकल्पना मला भेटली ती ही अशी. आपल्याकडे एक रुढ समजूत अशी की ज्ञानाचे आदानप्रदान व्हायचे तर वातावरण गहनगंभीर हवे आणि मनोरंजन व्हायचे तर ते अगदी थिल्लर, उथळ असायला हवे. शिक्षणापासून ते सिनेमापर्यंत आणि साहित्यापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये, ह्या दोन लोकांना एकजीव करण्याचे प्रयत्न झाले आहेत.images

कोणत्याही क्षेत्रात जर प्रबोधन, लोकशिक्षण करायचे तर योग्य माहितीचा, ज्ञानाचा प्रसार व्हायला हवा. पण त्याची शैली वेगवेगळी असली तर विविध गटातील व्यक्तींपर्यंत पोहोचता येते. ज्ञानेश्वरांच्या साहित्यामधली तीन उदाहरणे घेऊ. अमृतानुभवामध्ये वैचारीक अधिष्ठानाला महत्व तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाला काव्याच्या लावण्याची जोड. आणि भक्तीरसातल्या विविध भावना प्रकट करण्यासाठी अभंग आणि विराण्या! . . .

माझे क्षेत्र आहे मानसिक आरोग्याचे. मला समाजाला जर अज्ञान, अंधश्रद्धांकडून सकारात्मक, आरोग्यपूर्ण कृतीपर्यंत न्यायचे तर ज्ञानप्रबोधन अर्थात् लोकशिक्षण म्हणजे Education ला रंजनाची म्हणजे Entertainment ची डूब द्यायला हवी. नाथांच्या भारुडापासून ब्रेश्तच्या नाटकांपर्यंत अनेकांनी हे केलेच होते की . . . पुढे गेलेल्यांच्या मार्गाचा माग काढत तर जायचे होते . . . Edutainment अर्थात् ज्ञानरंजनाच्या रस्त्यावर.

मन, मनाचे आरोग्य, मनाचे आजार ह्या सगळ्याभोवती एक गुढतेचे वलय आहे. “तुमची सायकॉलॉजी फारच कॉम्प्लीकेटेड बुवा . . . फ्रॉईडपासून ते मेंदुच्या रसायनापर्यंत.” असे शेरे सहजपणे मारले जातात. म्हणजे श्रोता-प्रेक्षक जणूकाही आता किचकट एैकायला मिळणार अशा ‘अपेक्षेनेच’ येणार (आला तर!). थोडक्यात ह्या विषयाला आकर्षणमूल्य पैदा करणे जरुरीचे . . . एक कल्पना आली ‘मेंटल हेल्थ गेम शोज्’ . . . ‘गेम शो’ ह्या शब्दाबरोबर एक माध्यमनिर्मित मनोरंजक प्रतिमा डोळ्यासमोर येते. म्हणजे अशा टीव्ही शो ला साजेशी नेपथ्यप्रकाश योजना करायची. आणि ह्या गेम शोसाठी टीमस् तयार करायच्या. त्यात माणसे अशी निवडायची की त्यांचा विषयाचा अभ्यास तर आहे पण संवादाची हातोटी सुद्धा आहे . . . मग ह्या खेळाचे सूत्र असेल कधी ‘प्रभावी पालकत्व’, कधी ‘नातेसंबंधांची जपणूक’ तर कधी ‘जनरेशन गॅप’ . . . गंमतीदार राऊंडस् तयार करायच्या, लुटुपुटीच्या मार्कांची स्पर्धा निर्माण करायची. गेली अनेक वर्षे असे अनेक शोज आम्ही डिझाईन केले. आणि परिणाम . . . ह्या वर्षी कुठल्या विषयावर शो आहे . . . ‘धम्माल येते हो . . . आणि घरी गेल्यावर खूप बोलतो आम्ही कार्यक्रमावर’ अशा प्रतिक्रिया . . . व्याख्यानमाला माणसे पकडून आणायला लागतात आणि ह्या कार्यक्रमाला संपूर्ण कुटुंबे अक्षरश: पकडून आणायला लागतात आणि ह्या कार्यक्रमाला संपूर्ण कुटुंबे अक्षरश: शेकड्यांनी हजर . . . दृश्य स्वरुपातही आपल्याकडल्या व्याख्यान परिसंवादाची टेबल-खुर्च्या-फ्लॉवरपॉट-लोटीभांडे ही परंपरा मोडीत काढायची.

आकर्षणमूल्य निर्माण करायचे हे जसे एक आव्हान तसे कार्यक्रम अभ्यासपूर्ण दर्जाचा राखणे हे दुसरे आव्हान. सध्याचा जमाना आहे Multidisciplinary अर्थात् अनेक ज्ञानशाखांना एकत्र आणण्याचा. इतिहास आणि मानसशास्त्राला एकत्र आणले तर . . . पुण्याच्या स.प.महाविद्यालयाने मला लोकमान्य टिळकांवर बोलण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा हा विचार मनात आला आणि अभ्यासाला लागलो . . . सहा माहिन्यांच्या अभ्यासातून ते भाषण केले. 12049249_1527905384166533_1476972343843972750_nपण तो अभ्यास पुढे बारा वर्षे चालू राहिला. त्यातून सुमारे अडीज तासांची दृकश्राव्य सादरीकरणे तयार झाली. . . लोकमान्य, गांधीजी, विवेकानंद, शिवाजीमहाराज, सुभाषबाबू, विनोबा अशा अनेक महापुरुषांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणारी. त्याचे डीव्हीडी सेटस् तयार झाले . . . आग्याहून सुटका म्हणजे Crisis Management चा वस्तुपाठ. दांडीयात्रा म्हणजे Project Management च्या स्थूल (Macro) आणि सूक्ष्म (Micro) घटकांचा केसस्टडी. शिकागोतले भाषण हा विवेकानंदाच्या आयुष्यातला एक परमबिंदु. पण त्या क्षणापर्यंतचा त्यांच्या भावनांचा आलेख हे Emotional Regulation चे उदाहरण . . . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून कॉर्पोरेट अधिकार्‍यापर्यंत मी हे कार्यक्रम आता भारतभर करतो तेव्हा ते एकाच वेळी स्फुर्तीदायक आणि आचारविचारांना चालना देणारे ठरतात.

ज्ञानरंजनाच्या गणितातला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे प्रवाहीपण! अलीकडे ह्यालाच म्हणतात ‘Event Designing’, समजा मला तरूण विद्यार्थी आणि त्यांचे पालक ह्यांचेसमोर निरोगी जीवनशैली आणि प्रामाणिक व्यावसायिक मूल्ये ह्याबद्दलची जागृती करायची आहे तर . . . भाषण एकसूरी ठरेल म्हणून संवाद हवा. ती व्यक्ती‘माणूस’ म्हणून कशी ते कळायला हवे तर तो संवाद अकृत्रिम हवा . . . म्हणजेच तो अधिक अभ्यासपूर्ण, तपशीलात जाणारा हवा . . . तरीही खेळीमेळीचा व्हायला हवा. गेली पंचवीस वर्षे असा प्रयत्न वेध (VEDH) ह्या व्यवसाय प्रबोधन परिषदेतुन हा प्रयत्न होतो आहे. 12375230_836724586453309_6110098456319394420_oविविध क्षेत्रातील मान्यवर अशा पाचशेच्या वर व्यक्तींबरोबर बोलताना माझा हेतू असतो त्या व्यक्तीला Relax करून हळूहळू खुलवत, फुलवत नेण्याचा . . . आपापल्या क्षेत्रातले ज्ञान तर असतेच त्या व्यक्तीकडे पण त्या व्यक्तीचे ‘जगणे’ पोहोचायला हवे श्रोत्यांपर्यंत. लडाखमधले सोनम् वांगचुक असोत की आसामचे जादाव पायांग, राजस्थानचा मौलीक सिसोदिया असो की केरळची सेब्रीए टेनबर्केन! . . . 25years-logoभारतात पसरलेले असे कमी ज्ञात पण खरे Celebrities शोधायचे आणि त्यांच्याबरोबर अभ्यासपूर्ण दोस्ती करायची. दोस्ती महत्वाची. कारण त्यामुळेच संवादाला ज्ञानाबरोबर नात्याची ऊब मिळते. ज्ञानाचा वेलु गगनावरी न्यायचा तर भावनेचा मोगरा हवाच हवा. (आता नेटमित्राबरोबर शोधा पाहू ह्या व्यंक्तिना!) . . .

ज्ञानरंजन म्हणजे काही सर्वच्यासर्व बेतलेले नव्हे . . . उत्तम नियोजन, समरस अभ्यास असेल तर उत्स्फुर्ततेला खरा वाव मिळतो. समाजातल्या विविध घटकांबरोबर कार्यशाळा घेताना दरवेळी नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न घडतो. कधी अभिनय, कधी संगीत तर कधी एखादी फिल्म दाखवणे. भात्यामध्ये भरपूर बाण जमा केल्याशिवाय उत्स्फुर्तता साधत नाही हे मला अनुभवाने कळले आहे. आठ दिवसाची कार्यशाळा घेण्याएवढे साहित्य डोक्यात जमा होईपर्यंत दोन दिवसाची कार्यशाळा घेऊ नये असा हिशोब ठेवायला हवा.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात ज्ञानरंजनाच्या वाटेने जातजात माझ्याकडून पुस्तके लिहिली गेली, गाणी रचली गेली, नाटके तयार झाली . . . ‘व्यसनाधीनता’ ह्या विषयावर अनेक वर्षे वैयक्तीक आणि सामुहीक मानसोपचार करत आलो. ह्या विषयावर पुस्तक लिही असे सांगितले जायचे . . . मला व्यसनाधीनता ह्या विषयाच्या तपशीलात जसा रस होता तसा व्यसनी व्यक्तीच्या परिवर्तनाच्या प्रवासात . . . त्यातून मला मांडणी सापडली डॉक्टर आणि रुग्णाच्या पत्रव्यवहाराची. ‘मुक्तीपत्रे’ हे पुस्तक म्हणजे ज्ञानरंजनाच्या शैलीचे एक उदाहरण. अनेक व्यसनी मित्रांना त्यात ज्ञानाबरोबर Identification मिळाले. आकाशवाणीवर त्याच्या अभिवाचनाची सादरीकरणे झाली. आणि काही काळापूर्वी नाट्यरुपामध्ये ते रंगभूमीवर आले ‘गेट वेल सून’ ह्या नावाने. ‘जन्मरहस्य’ ह्या माझ्या संहितेमध्ये स्किझोफ्रेनिया ह्या आजाराच्या संदर्भात हा प्रयोग झाला. म्हणजे मला विचारले गेले की, तुम्ही मानसशास्त्रावर नाटक लिहिलं आहे का? . . . तर उत्तर नकारार्थी. पण तुमच्या नाटकांमध्ये मानसशास्त्र आहे का? . . . उत्तर होकारार्थी.

प्रबोधनाच्या वाटेवर समाजाची मानसिकता बदलण्याचा एक approach, एक शैली म्हणून ‘ज्ञानरंजना’ कडे पहाता येईल. त्यात प्रयोग करताकरता स्वत:मध्ये बदल घडणे महत्वाचे . . . कोणता तो बदल? . . . आपापल्या विषयांवर तळमळीने काम करणारे कार्यकर्ते, संघटक, पूर्ण वेळ प्रचारक अशा सगळ्यांना एकसूरी होण्याचा शाप लिहिलेला असतो. त्यावरचा उ:शाप म्हणजे ज्ञानरंजनाची शैली. पालक म्हणून मुलांशी, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी तर प्रेरक म्हणून सहकार्यांशी संवाद साधताना ह्या मार्गाने गेलो तर स्वत:ची आणि इतरांची मानसिकता घडवायला मदत होते हे नक्की!

मानसिक आरोग्य हे सवयीचे, श्वास घेण्याचे क्षेत्र असल्याने त्यातील उदाहरणे ओघामध्ये आलीत पण कोणत्याही क्षेत्रामध्ये, कलेमध्ये असे प्रयोग होऊ शकतात. ज्ञानरंजन हे प्रचारकीसुद्धा नसते आणि Reheotic म्हणजे साचेबद्धपणे तेचतेच सांगणारेही नसते हे महत्वाचे. त्यात मी ज्ञानी आणि तू अज्ञ असा अभिनिवेश नसतो. एकमेकांसोबत मजेत जाण्याची लय असते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s