संघर्षाचा सन्मान : दोन दशकांची यात्रा

फेब्रुवारी महिन्याची अकरा तारीख… साल १९९७… वेळ सकाळची. मी आणि मुक्ता (पुणतांबेकर- अवचट) मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वाटेवर. दोघेही नि:शब्द स्वत:च्या मनातल्या पोकळीला हाताळण्याचा प्रयत्न करणारे. मुक्ताची आई आणि माझी आई मैत्रीण. सुनंदा (म्हणजेच डॉ. सुनंदा उर्फ अनिता अवचट) आदल्या रात्री आमच्यातून कायमची दूर गेलेली. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातले तिचे स्वप्न साकार करण्याच्या तिच्या प्रयत्नामध्ये कॅन्सर सारखा आजारही येऊ शकला नव्हता. जवळजवळ सात वर्षे ह्या आजाराबरोबर मैत्री करुन ती अर्थपूर्ण जगली होती… शेवटच्या दिवशीही पेशंटस् बरोबर संवाद साधून घरी परतली होती.

1‘एक दिवस ती जाणार’ हे तिलाही कळले होते आणि आम्हालाही. पण अशी बौद्धीक समज त्यावेळचा भावनिक आघात घालवू शकत नाही. त्यामुळे सुन्नपणा आलाच होता. अशा वेळी, सुनंदानेच रस्ता दाखवला… आज सुनंदा असती तर कशी वागली असती… हा विचार आला आणि…मुक्ता आणि मी बसलो होतो आमच्या सार्‍या कार्यकर्त्यांच्या टीमच्या समोर. सारेच हादरलेले. त्या दिवशी सर्वांनीच एक नि:शब्द शपथ घेतली. सुनंदाच्या पश्चात् ही चळवळ, हा संघर्ष पुढे सुरु ठेवण्याची.

कट् टू… आज. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा स्वतंत्र परिसर. कोणत्याही वेळी जवळजवळ पावणेदोनशे मित्र इथे निवासी उपचार घेत असतात. निशीगंध हा स्त्रियांसाठीचा स्वतंत्र उपचार विभाग, व्यसनमुक्तीच्या वाटेवर असलेल्या मित्रांच्या पत्नींसाठीचा सहचरी विभाग, संपूर्ण पश्चिम भारतातील व्यसनमुक्ती केंद्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणारे प्रशिक्षण केंद्र असा कितीतरी व्याप… संपूर्ण राज्यामध्ये एकूण बावीस नियमित पाठपुरवठा केंद्रे… सुनंदाच्या संघर्षयात्रेला आलेले सकारात्मक स्वरुप.

ह्या सार्‍या कामाबरोबरच सुनंदाच्या स्मृती जागवण्यासाठी आम्ही योजतो एक वार्षिक उपक्रम, ‘संघर्ष सन्मान पुरस्कार.’ सुनंदाच्या संघर्षाचे दोन पैलु… एक सामाजिक तर दुसरा वैयक्तीक आरोग्याचा. म्हणून अशा दोन व्यक्तींचा आम्ही सन्मान करतो ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात किती ‘यश-प्रसिद्धी-मान-मान्यता’ मिळवली आहे ह्याला महत्व नाही तर त्यांच्या संघर्षाच्या प्रवासाला सलाम करायचा आहे. १९९८ पासून फेब्रुवारी महिन्याच्या सुनंदाच्या स्मृती दिनाच्या निकटच्या रविवारी हा कार्यक्रम पुण्यामध्ये साजरा होतो.

गेली अठरा वर्षे मी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो आणि विजेत्यांबरोबर जाहीर संवाद साधतो. माझ्यासाठी ह्या कार्यक्रमाचे निरुपण हा एक विशेष अनुभव असतो. तो दिवस असतो सुनंदाबरोबरच्या गाढ पुनर्भेटीचा… ३० ऑगस्ट १९८६ ला मुक्तांगणचे उद्घाटन झाले तेव्हाही मीच सूत्रसंचालन केले होते. तेव्हा सुनंदा समोर होती. आम्हा सर्वांच्या नजरेत भविष्याबद्दलच्या अपेक्षा होत्या. येत्या ऑगस्टमध्ये तीस वर्षे होतील ह्या प्रवासाला आणि त्यानंतर सहा-सात महिन्यांमध्ये सुनंदाला जाऊनही वीस वर्षे होतील.

संस्थेच्या एका आधाराच्या पश्चात् संस्था सुरु रहाणे इतकेच नव्हे तर तिचे कार्य बहराला येणे ह्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण प्रणाम काय असेल त्या व्यक्तीच्या स्मृतींना संघर्ष-सन्मान पुरस्कारांच्या रुपाने आम्ही सारेच १९९७ च्या फेब्रुवारीतली ती निःशब्द शपथ पुन्हापुन्हा जागृत ठेवत असतो. त्यातच ह्या वर्षीचा कार्यक्रम एका अर्थाने फारच वेगळा असणार आहे.

सामाजिक संघर्षाचा पुरस्कार दिला जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पारोमिता गोस्वामी ह्यांना. ह्या जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गेली अनेक वर्षे त्या सर्वांगीण विकासासाठीचा संघर्ष करत आहेत. त्यातील एक पैलु आहे व्यसनमुक्तीचा. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी जाहीर झाली त्यमागे पारोमिताचे आणि तिच्या महिला कार्यकर्त्यांचे अवीरत प्रयत्न आहेत. हजारो ग्रामीण महिलांचा पायी ‘लॉंग मार्च’ घेऊन पारोमिता नागपूरच्या विधानसभा अधिवेशनापर्यंत पोहोचली. तिथे एका वृद्ध स्त्रीने मुख्यमंत्रांसमोर आपली मारहाणीच्या वळांनी भरलेली पाठ दाखवत म्हटले, “पहिले बाप मारायचा दारू पिवून… मग नवरा… आन् आता पोरगा… पाठ तीच आन् चट्टे तेच…”…..

अशा अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात मग्न असते पारोमिता. नाव-आडनावाने बंगाली असली तरी अस्खलीत मराठी बोलते. आता चंद्रपूरमध्ये दारुबंदी तर आली पण प्रश्न सुटलेले नाहीत. व्यसनी माणसांच्या उपचारासाठी सोयी तयार करणे इथपासून दारूची बेकायदा वहातुक थांबवणे यासारखी संघर्षाची आव्हाने पारोमिताला खुणावत आहेत.

यावर्षीच्या पुरस्काराचा दुसरा मानकरी आहे आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचाच एक Graduate! त्याचे नाव आहे प्रमोद उदार.

कट् टू . . . साल १९८८. मी ‘गोदरेज अ‍ॅन्ड बॉईस’ कंपनीच्या कर्मचार्‍या करता नुकत्याच सुरू केलेल्या, मानसिक आरोग्य केंद्रामध्ये बसलो होतो. माझ्यासमोर आला होता कंपनीमधला एक कर्मचारी, प्रमोद! व्यसनाचा परिणाम त्याच्या कामावर व्हायला लागला होता. कुटुंबातले संबंध विस्कटत चालले होते. त्यासुमारास कंपनीमध्ये एक अभिनव उपक्रम चालायचा. त्याचे नाव होते ‘सहकारी मित्र’ अर्थात Worker Counselor. ह्या मित्रकार्यकर्त्यांचे प्रशिक्षण मी घेत असे. समस्याग्रस्त कामगारापर्यंत पोहोचायचे, त्याला योग्य मदत द्यायची आणि त्याचा पाठपुरवठा करायचा हे काम आमचे हे स्वयंसेवक नेकीने करायचे. शिवाजीराव चव्हाण नावाचे एक कार्यकर्ते व्यसनमुक्तीच्या कामाला वाहिलेले होते. प्रमोदला मुक्तांगणपर्यंत नेण्यात त्यांचा वाटा होता. मुक्तांगणमधून बाहेर पडल्यावर आज चक्क अठ्ठावीस वर्षांमध्ये प्रमोदने ना मुक्तांगणचा एकही कार्यक्रम चुकवला ना कधी मुंबई-ठाण्यातली फॉलोअप सभा. कंपनीतही निवृत्ती पर्यंत आणि नंतरही तो व्यसनमुक्तीचा गट चालवायचा. आजपर्यंत त्याने शांतपणे मदत करुन व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणलेल्यांची संख्या आश्चर्य वाटेल पण काही शेकड्यांच्या घरात आहे. पुन्हा हे करताना नोकरी आणि कुटुंबाची घडी बसवली त्याचे श्रेय आहेच. महत्वाचे म्हणजे त्याचे ते मंद ज्योतिसारखे अस्तित्व . . . आल्हाददायक, शांत, निगर्वी . . . पण तरीही प्रकाशमय!

ह्या दोन्ही व्यक्तीमत्वांमध्ये आज सुनंदाच्या संघर्षाची उर्जा उतरलेली आहे. आणि ह्या उर्जेचा सन्मान आपण करणार आहोत रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पुण्याच्या एस्एम् जोशी सभागृहामध्ये. सुनंदा आणि अनिल ह्यांची अगदी जवळची मैत्रीण डॉ.शैला नरेन्द्र दाभोलकर असतील कार्यक्रमाच्या अध्यक्षा. विधायक संघर्षाचा सन्मान करणार्‍या ह्या खास कार्यक्रमाला जरुर या. इथे मिळणारी उर्जा किमान वर्षभर टिकतेच . . . मुक्तांगण परिवारातल्या आम्हा सर्वांसाठी ती दोन दशके टिकली आहे . . . आणि वाढतच आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s