आकाशभाषितें : पुन्हा नवी सुरुवात

1माझा मेडीकलला जाण्याचा निर्णय झाला त्यामागे फारसा गंभीर विचार नव्हता ह्यावर आज फारसे कुणी विश्वास ठेवणार नाही. ‘सामाजिक भान’ किंवा ‘रुग्णसेवा’ अशा गोष्टी तर अजिबातच नव्हत्या. इंटर सायन्सच्या वर्गात ‘बी’ ग्रुप घेतला की गणित हा विषय सुटायचा, म्हणून तो निर्णय घेतला. मोठा भाऊ इंजिनीयर झाला तर धाकट्याने (तितपत हुशारी असल्यास) डॉक्टर बनायचे अशा सरधोपट सल्यांचा काळ होता तो. तर जी.एस्. मेडीकलच्या त्या सनातन इमारतीत आल्यावर भव्यतेमुळेच दबून गेलो. तेव्हा वाटलेही नव्हते की पुढच्या काही वर्षातच आपण पडद्याआडून ‘सेठ गोर्धनदास (गोवर्धन नव्हे) सुंदरदार वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे सातवे एडवर्ड स्मारक रुग्णालय सादर करत आहे . . .’ अशी उद्घोषणा करत एकांकिका आणि नाटकांचा खच पाडणार आहोत . . .

लेक्चर साठीचे वर्ग म्हणजे मजल्यामजल्याच्या उंचीची ‘थिएटर्स’ होती. उंचउंच होत जाणार्‍या खुर्च्यांच्या रांगा. त्यांचे ते भक्कम, चमकदार, गुळगुळीत लाकूड . . . ह्यातले मेन लेक्चर थिएटर म्हणजे M.L.T. तर दोन मजल्यांच्या भव्यतेचे . . . सर्व सांस्कृतिक कार्यक्रम इथेच व्हायचे. पुढे मराठी वाङमय मंडळाच्या सर्व कार्यक्रमांची हाताने बनवलेली पोस्टर्स परिसरभर चिकटवताना आम्ही एकदा ‘म.ल.ट.’ असे भाषांतर केले. आणि तो चक्क एक पर्यायी शब्दच बनला पुढच्या पाच वर्षात् … तर ह्या ‘म.ल.ट.’ कडे जाण्याच्या तळमजल्यावरच्या दाराजवळ, मराठी वाङमय मंडळाचा नोटीस बोर्ड होता. त्यावर दर महिन्याला नेमाने एक सुबक भित्ती-नियतकालीक लिहिलं जायचे. नवीन अंक प्रकाशित झाला की येणारे जाणारे तिथे थांबायचे. लक्षपूर्वक वाचायचे. त्यावर प्रतिक्रिया द्यायचे. ह्या हस्तलिखीताचे लिखाण आणि सजावट अर्थातच विद्यार्थी करायचे.

मी कॉलेजात अ‍ॅडमीशन घेतली तेव्हा म.वा.मंडळाचे सेक्रेटरी होते शिशिर मोडक (सध्या पुण्यामध्ये बालरोगतज्ज्ञ) आणि अविनाश सुपे (सध्या जीएस्-केईएम्चे डीन). ज्युनीयर बॅचमधल्या लिहित्या मंडळींना हाताशी धरणे हे त्यांना ठाऊक होतेच. त्यातच शिशिर मला शाळेपासून ओळखत होता. त्यामुळे ह्या हस्तालिखीताला नियमित साहित्यपुरवठा करण्यामध्ये मी आनंदाने गोवला गेलो.

त्यानंतरच्या वर्षी भरत केळकर (नाशिक इथे अस्थिरोगतज्ज्ञ) आणि शशिकांत गायकवाड (सोलापूरमध्ये बालरोगतज्ज्ञ) असे दोघे चिटणीस झाले. जे मंडळाचे चिटणीस तेच भित्तीपत्रकाचे संपादक असायचे. त्याच्या पुढच्या वर्षी ही माळ मी आणि माझा खोली बंधु वसंत जोशी (रत्नागिरी येथे अस्थिरोगतज्ज्ञ) ह्यांच्यावर पडली. पहिल्या दोन वर्षांमध्ये आमची भीड चेपली गेली होती. परिसर आणि माणसे ओळखीची झाली होती. आम्ही आमच्या ह्या मासिक भित्तीपत्रकाचे स्वरुप पाक्षिक केले. नव्या अंकाच्या, चतकोर कागदावरच्या छोट्या जाहीराती मोक्याच्या जागी लावायला लागलो. आमच्या कॉलेजच्या इमारतीत ओ.डी.ओ. नावाची जागा होती. तिथली प्रत्येक जाहिरात वाचली जायची. ‘ओ.डी.ओ.’ म्हणजे ‘अपोझीट डिन्स ऑफीस’. तुम्हाला वाटेल की इथे महत्वाचे स्थान असेल . . .अर्थातच् . . . इथे एक प्रशस्त स्वच्छतागहृ होते.

वाचकांनी आपले हस्तलिखीत वाचावे म्हणून आम्ही जोरदार विशेषांक काढायला सुरुवात केली. कॉलेजातल्या प्रणयी जोड्यांवरच्या खास अंकाला (खरी नावे लपवूनही किंवा म्हणूनच) जोरदार प्रतिसाद मिळाला. कॅम्पस मधल्या ‘स्मोकर्स’ वर (आजी आणि माजी) आम्ही एक अंक काढला. डॉक्टर नवरा आणि नर्सिंग व्यवसायातली पत्नी अशा चक्क चार जोड्यांच्या मुलाखतींवर एक अंक होता . . .

ह्याचा परिणाम असा झाला की अमराठी मंडळी देखील त्या नोटीस बोर्डाच्या समोर उभे राहून शब्दाला शब्द जोडत मराठी वाचू लागले. अर्थात् ह्या अशा विषयांसोबर आम्ही, ‘माझ्या डॉक्टरीतली सगळ्यात कसोटीची इमर्जन्सी केस’ अशी मालिका किंवा कॉलेज-हॉस्पीटलच्या विविध विभागांचा इतिहास सांगणारी एक मालिका केली. त्यामध्ये फक्त केईएम् च नव्हे तर वाडिया हॉस्पीटल्स, टाटा कॅन्सर हॉस्पीटल्स, हाफकिन्स् इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन अशा शेजारच्या संस्थावरही लेख लिहिले. ह्या सर्व ठिकाणची मंडळी आमच्या मेस-कॅन्टीनमध्ये येतच असत. ती आता वाट वाकडी (किंवा सरळ) करुन चक्क म.वा.मंडळाच्या बोर्डसमोर थांबू लागली. माझे हस्ताक्षर बेताचे पण वसंतचे ठसठशीत आणि स्वच्छ. तो अंक लिहायचा. माझे स्केचींग बर्यापैकी असल्याने रेखाचित्रे मी काढायचो. एकूण सोळा ते अठरा फूलस्केप कागदांचा अंक असे. त्यात कव्हरचे चित्र, रेखाचित्रे असे सगळे आले. म्हणजे मजकूर बारा पानांचा लागे. साडेतीनशे शब्दांचे एक पान . . . करा हिशोब. मुद्देसूद लिखाणाची सवय लागण्यामागे हा सारा रियाज आहे. अंकाचा अर्धा मजकूर आम्हीच लिहायचो. सामाजिक, राजकीय विषयांवर ‘वाद-संवाद’ नावाचे सदरही होते. कवितांची उबळ येणारे प्रत्येक हॉस्टेलवर असतातच. त्यांच्या कविता वळेवर कामाला (आणि कामी) यायच्या.

या गदारोळात ललीतलेखन करणारे एक सदर हवे असे ठरले. अर्थात् पंधरवड्याला नियमितपणे लेख पाडू शकणारी लेखणी तेव्हा अस्मादिकांचीच होती . . . काय लिहायचं हा प्रॉब्लेम नव्हता (आत्ताही नसतो). पण ह्या सदराचे नाव काय असेल ह्यावर बराच खल झाला . . . “वेगऽऽळ हवं” एवढ्या एकच मुद्यावर एकमत झालं. मग मीच एकतर्फी डिक्लेयर केलं, “आकाशभाषिते.” …..“म्हणजे काय? ” . . . सगळ्यांनी विचारले.

“आकाशातून स्फुरतात ती किंवा आकाशाला उद्देशून केलेली” . . . मी म्हणालो. “आकाश अनंत अन् निराकार . . . झेप घेतसे शब्दाचा आकार” आमचा एक कवी तात्काळ प्रसवला. . . . “अर्थ भाव होई साकार . . .” असे म्हणून तो अडकला. “झाली सगळीच मेहनत बेकार” असे म्हणून एकाने त्याच्या प्रतिभेचा गळा घोटला. पण हास्याच्या कल्लोळात हे नाव मात्र पक्के झाले. पुढचे दिड वर्षे मी ‘आकाशभाषिते’ हे सदर नियमितपणे लिहिले. माझ्या लिखाणाचा एकही शब्द कुठे छापून आला नव्हता त्यवेळी. दिड वर्षानंतर मात्र माझे लेख-कथा मनोहर साप्ताहिकापासून ते महाराष्ट्र टाईम्स् रविवार आवृत्तीपर्यंत सर्वत्र छापून यायला लागले. हा निव्वळ योगायोग नव्हता. विषय निवडीपासून ते मुद्देसूद लिखाणापर्यंतच्या अनेक गोष्टींचा सराव मला ह्या हस्तलिखीताने दिला होता. वाचकांचा प्रतिसाद कसा असतो ह्याचा अंदाज दिला होता. माझा पहिला छापील कॉलम होता मटा मधला ‘हवा कॉलेजची.’ त्यानंतर मी अनेक नियतकालीकांसाठी नियमित स्तंभलेखन केले. त्याची पुस्तकेही निघाली. स्वभावविभाव, गद्धेपंचविशी, कर्मधर्मसंयोग,
किंचित् ही माझी पुस्तके ह्या सदरलिखाणातूनच तयार झाली.

पण ह्या सगळ्याला सुरुवात झाली ‘आकाशभाषितां’ पासून. आमचा अंक लिहून तयार झाला की रात्री दहा-साडेदहाला आम्ही नोटीसबोर्डावर तो लावायचो. ती भव्य इमारत शांत असायची. टप्पोरी पिना लावून अंक डकवून झाला की काचेचा दरवाजा लावून घेऊन त्याला असलेले छोटे कुलूप लावायचे. ट्यूबलाईटच्या प्रकाशात तो अंक नवलाईने पहायचा . . . अभिमानाने आणि उत्कंठेने . . . आता उद्या वाचल्यावर काय म्हणणार वाचक? . . .

आज अडतीस वर्षांनी तीच भावना आहे . . . इंटरनेट आणि सोशल-मिडियासाठी स्वत:चा ‘ब्लॉग‘ चालू करतोय् . . .

भित्तीपत्रकाच्या त्या माध्यमामध्येही छापील शब्द नव्हता . . . आपण लिहायचं, वाचकाने वाचायचं . . .इथेसुद्धा तसेच आहे . . . माहितीच्या महाजालामध्ये आपली अक्षरे रचायची आणि दुनीयेच्या नोटीसबोर्डवर तिथे हजर असलेल्या कुणीही ती वाचायची.

पुन्हा एकदा नव्याने . . . ‘आकाशभाषितें’. . .

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s