मनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे

संस्था उभारणीच्या कामाला लागून बत्तीस वर्षांचा काळ लोटला ह्याची नव्याने जाणीव होते आहे … मनोविकार शास्त्रामध्ये एम.डी.ची पदवी मिळाल्यानंतर दोन वर्षे मुंबईच्या केईएम रुग्णालयात पूर्णवेळ लेक्चरर म्हणून काम केले. त्या काळात गर्दच्या उपचारासंदर्भात जनजागृती केली, गटउपचार घेतले, पोलिसांसोबत काम केले, शिबिरे घेतली … काम करणारा मी एकांडा होतो तरी  केईएमच्या यंत्रणेचा आणि नावाचा भक्कम पाठिंबा होता. म्हणूनच मी  केईएम सोडू नये असा माझ्या एका सरांचा सल्ला होता. पण आमच्याच क्षेत्रातले माझे दुसरे गुरू मात्र म्हणाले की ह्या कुंपणात राहू नकोस. तुझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी स्वतःच उचल.

त्यांचे ऐकून बाहेर पडलो. एव्हाना पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना अनिल- सुनंदा अवचटांच्या पुढाकाराने आणि पु. ल., सुनीताबाईंच्या मदतीने झाली होती. २९ ऑगस्ट  १९८६ च्या सकाळी, बाबा आमटेंच्या आशीर्वादाने मुक्तांगणचे उदघाटन झाले तेव्हा त्या समारंभाचे सूत्रसंचालन मीच करत होतो. म्हणजे माझ्या संस्थारूप कामाचा श्रीगणेशा झाला तो खरेतर पुण्यामध्ये.

मुक्तांगणमधून बाहेर पडणाऱ्या रूग्णांसाठी ठाण्यामध्ये डे-केअर सेंटर सुरू केले ते १९८७ मध्ये. डॉ. श्याम आणि सुनीती कणबूरांनी त्यांच्या रुग्णालयाची जागा निःशुल्क दिली म्हणून. हे केंद्र बऱ्यापैकी गजबजू लागले. ग्रीटिंग्स कार्ड्स, आकाशकंदील, ख्रिसमस ट्रीज तयार करण्याचा वर्कशॉप सुरू झाला. १९८९ साली व्यसनातून बाहेर पडणाऱ्या तरूण मित्रांना सोबत घेऊन एक जनजागरण कार्यक्रम केला ‘ड्रग फाईट – एटीनाईन’. सारी शाळा कॉलेजेस ढवळून काढली परिसरामधली …  आता कुमारवयीन मुले आणि त्यांचे पालक यायला लागले सल्ल्यासाठी. त्यातून ‘ टफ टीन क्लब’च्या बैठकी सुरू झाल्या. ‘ युथ क्लब ‘चे ट्रेक निघू लागले. आणि १९९० साली मी फाईलमधून बाहेर काढली १९८२ साली लिहिलेली एक योजना … समाज आणि मनआरोग्य ह्यातील दरी सांधणारी, ज्ञान आणि विज्ञानाचे पूल बांधणारी एक संस्थारूपी चळवळ सुरू करायची आहे. आय.पी.एच. …. इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ!

आता मदतीला मंडळी होती. ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते होत्या. उत्साही पेशंट्स होते. युथक्लबचे तरूणतरूणी होत्या. ठाण्याच्या कारखानीस हॉस्पिटलच्या डॉक्टर मॅडमनी तीन रिकाम्या खोल्या दिल्या. दोन वर्षे निःशुल्क वापरण्यासाठी. गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा प्रयोग लावला. तिकीट विक्री केली. स्मरणिका काढली. आणि आमचे पहिले आर्थिक बळ उभे झाले ते तब्बल सत्तर हजाराचे. तिकीट खपवण्यासाठी, जाहिराती मिळवण्यासाठी रिक्शा- स्कुटर – पायी अशी केलेली तंगडतोड अजूनही त्या त्या रस्त्यांवरून जाताना आठवते.

२३ मार्च १९९०ला आय.पी.एच. केंद्र सुरू झाले आणि संस्थेद्वारे मनआरोग्यातले विविध उपक्रम करण्याचा धडाका आम्ही सुरू केला. स्किझोफ्रेनिया, एपिलेप्सी ह्या आजारांवरच्या लोकपरिषदा असोत की विचारी पालकत्वावरचे नियमित व्यासपीठ ‘मंथन’. मुलांची शिबिरे तर सुरूच होती. मनोविकारावर सर्वंकष सेवा, मानसिक विसंवादावर समुपदेशन आणि मानसिक विकासासाठी प्रत्येक वयोगटासाठी उपक्रम….

मानसशास्त्रीय चाचण्या, बालकपालक मार्गदर्शन, कुमारवयीन मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन अशा त्यावेळी काळाच्या पुढे वाटणाऱ्या अनेक सेवा धारीष्ट्याने सुरू केल्या. संस्था सुरू झाल्यापासून तीन वर्षातच एका मोठ्या आर्थिक आरिष्टाला तोंड देत पुन्हा सावरलो. भाड्याच्या एका जागेतून दुसऱ्या जागेत जात राहिलो …. तक्रार न करता काम करत गेलो. त्यातून समाजाचा विश्वास मिळवत गेलो. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ठाणे शहरात स्वतःची जागा घेण्याच्या इराद्याने प्रयत्न सुरू केले. पुन्हा एकदा निधी जमवण्यासाठी धावपळ. अकरा वर्षांपूर्वी पाडव्याच्या दिवशी आमच्या ६५०० स्क्वेअर फूटाच्या, तीन मजल्याच्या जागेत आम्ही आलो.

असे वाटले की आता ही जागा प्रशस्त आहे. पुढे काही करायला नको. पण गेल्या दशकामध्ये उपक्रम आणि प्रकल्प वाढले. ‘आकलन’ हा आमचा व्यावसायिकांचे प्रशिक्षण करणारा विभाग, ‘आवाहन’ हा माध्यम विभाग, ‘इलिगन्स’ हा कॉर्पोरेट प्रशिक्षण विभाग, ‘त्रिदल’ हे स्किझोफ्रेनीयाच्या रूग्णांचे पुनर्वसन केंद्र … तऱ्हतऱ्हेचे स्वमदत गट, शिक्षक – पालकांसाठीचे उपक्रम ….एकाचवेळी १३८ verticals वर इथून काम सुरू असते. आज आम्ही ७२ मानसिक आरोग्य व्यावसायिक, ४८ पूर्णवेळ मदतनीस, १०० च्यावर प्रशिक्षित कार्यकर्ते असा सव्वा दोनशेचा परिवार झालाय हा.

२०१७ साली हा पसारा अजूनच वाढला. ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या मालकीचा पण त्या आवारापासून जरा दूर असलेला एक प्रशस्त परिसर वापरण्यासाठी  आय.पी.एच. आणि राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग ह्यांचेमध्ये समन्वयपत्र तयार झाले. स्किझोफ्रेनीयाचे रूग्ण आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्या त्रिदल कार्यशाळेसाठी प्रशस्त इमारत मिळाली. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दिनसुविधा केंद्र सुरू झाले. मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षक, स्पेशल मुलांचे पालक या ह्यांच्याबरोबरचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. हे सारे उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत. ह्या परिसराचे नाव आहे ‘ सप्तसोपान’, तिथे दिडशे लोक बसू शकतील असे खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांमधले रोलमॉडेल्स सादर करण्याचा मासिक कट्टा सुरू झाला आहे. दर महिन्याला ‘मनतरंग’ हा फिल्म क्लब सुरू झाला आहे. ह्या परिसराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आय.पी.एच.ची वीस आसनी बसही निःशुल्क सेवा देऊ लागली आहे.

दरम्यान, मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी म्हणून येऊ लागले. यंदाच्या वर्षी तर सुमारे दोनशे दिवस विविध प्रशिक्षणक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आय.पी.एच.पासून पाच मिनिटांच्या अंतरावर एका स्वयंपूर्ण बंगल्याचे नूतनीकरण करून तेथून सुरू झाले आहे ‘मैत्रघर’ हे अतिथीगृह. आठ ते नऊ व्यक्तींसाठी रहाण्याची घरगुती आणि आरामदायक सोय.

सुमारे पाच महिन्यांपूर्वी हे सारे प्रकल्प पूर्ण होताना वाटत होते की आता खूप झालं … थांबावं आता !

संध्याकाळी घरी गप्पा मारताना माझी मानसकन्या, सायकिअॅट्रीस्ट डॉ. सुखदा म्हणाली, “तुझ्या लक्षात आले का बाबा … गेल्या महिन्यात मी रांगेने अकरा दिवस पुण्यात कार्यक्रम घेत होते.” मी म्हणालो, ” खरंच की !” माझे आणि आय.पी.एच.मधल्या सर्व सहकाऱ्यांचे पुण्यामधले भाषणाचे कार्यक्रम, कार्यशाळा, शिबीरे तुडुंब भरतात … शेवटी एकच प्रश्न,” पुण्यात का नाही  आय.पी.एच. सुरू करत ?”  आय.पी.एच.च्या केंद्रामध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ ह्या वेळात सरासरी १३० कुटुंबे आरोग्यसेवा घेण्यासाठी येतात. त्यात रोज पुण्याहून येणारी कुटुंबे असतात सरासरी ८ ते १०. आज पुणे परिसरातील सुमारे १२०० कुटुंबे ठाण्याच्या फॉलोअपवर आहेत.

त्यात भर पडली ती पुणे वेधच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाची. १९९१ साली ठाण्यामध्ये सुरु केलेली वेध व्यवसाय परिषद आता ठाण्यासह एकूण अकरा शहरांमध्ये भरते. यंदा पुण्यातले तिचे आठवे वर्ष. ज्येष्ठ शिक्षक दीपक पळशीकर सर आहेत ह्या गटाचे संघटक. शिवाय मुक्तांगणचा सारा परिवार आहेच की …. का नको सुरू करूया आय.पी.एच. पुण्यामध्ये ? …

“तू पुण्याला शिफ्ट होऊन जबाबदारी घेणार तर करू आपण सुरु ” मी सुखदाला म्हणालो. तिने होकार दिला. आणि सुरुवात झाली आणखी एका बाळंतपणाची. हो… बाळंतपणच ते! विचार आणि कल्पना रूजण्यापासून ते संस्थेचा दिनक्रम सुरू होण्यापर्यंतचा काळ सारा प्रेग्नन्सीचा … विनोदाचा भाग सोडून देऊ पण पुण्यामध्ये एक कोअर ग्रुप तयार केला. त्यात विविध वयोगटातील आणि व्यवसायातील लोक एकत्र आले. डॉ. मोहन आगाशे, अनिल अवचट (माझा बाबा), डॉ. विकास नाडकर्णी (माझा दादा) ह्यांच्या अध्यक्षतेखाली सारा गट काम करू लागला. कर्वेनगर भागामधला एक बंगला भाडेतत्वावर नक्की केला. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. पुण्यातल्या हितचिंतकांची एक बैठक घेतली ३० जानेवारीला. त्याला शंभरावर मंडळी आली. लहानमोठ्या देणग्यांचा ओघ सुरू झाला. वेगवेगळ्या कंपन्यांच्या, सामाजिक बांधिलकी ​विभागांकडे योजना सादर केल्या चर्चा झाल्या. ह्या प्रयत्नांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या केंद्रामध्ये ठाण्यात मिळणाऱ्या सेवा तर मिळतीलच. त्याशिवाय इथे आरोग्य क्षेत्रातील स्वसहाय्य गटांचे एक Hub, केंद्रस्थान निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. त्याच पद्धतीने मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र, समुपदेशन  ह्या साऱ्या क्षेत्रातील पदवीपूर्व, पदव्युत्तर विदयार्थी तसेच प्रॅक्टिस करणारे मानसशास्त्रज्ञ ह्यांच्यासाठी विनामूल्य शैक्षणिक अभ्यासगट घेण्याची योजना मी तयार केली आहे. पदवीपूर्व विदयार्थ्यांच्या ह्या अभ्यासगटाचे नाव असेल ‘अवांतर’ …. मास्टर्सच्या विदयार्थ्यांसाठी ‘समांतर’…… आणि प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी ‘निरंतर’. हे मासिक अभ्यासगट यंदा जुलै महिन्यापासून सुरु होतील. ठाणे आय.पी.एच्.च्या शिक्षक गुणसंवर्धन प्रकल्पामध्ये पुण्याच्या काही शाळा आधीपासून सहभागी आहेत. त्यामध्येही आता भर पडेल. खेळाडूंचे मनोबल वाढवणाऱ्या आमच्या ‘मिशन एक्सलन्स’ ह्या विभागाचे कामही आता पुण्याहून सुरु होईल.

पुणे परिसरातील आय.बी.एम्., भारत फोर्ज, सिमेन्स अशा कंपन्यांसोबत आय.पी.एच्. कार्यरत आहे. त्यामध्ये आता बजाज फिनसर्व्ह, पर्सिस्टंट अशा कंपन्यांच्या सहभागाची भर पडणार आहे. आर अँड डी पॉलीप्रॉडक्ट्स, मोरडे फूड प्रॉडक्ट्स, प्राज इंडस्ट्रीज ह्या कंपन्यांनी ह्या निमित्ताने  आय.पी.एच्.च्या कार्याला आर्थिक पाठिंबा दिला.

मार्च महिन्याच्या चोवीस तारखेला आय.पी.एच्. पुणे कार्याला सुरुवात करेल. २३ मार्च हा ठाण्याचा स्थापना दिन. त्या दिवशी ठाण्याची टीम पुण्याच्या टीमला, ‘ शुभास्ते पंथानः सन्तु’ म्हणणार आहे. पुण्यात आपले काम सुरु करावे ही कल्पना आणि ती प्रत्यक्षात येण्याचा दिवस ह्यात पाच महिन्यांचे अंतर आहे….. तरीही ती Full Term Normal Delivery असणार…. कशातून वाटतो आहे मला हा कॉन्फीडन्स ?

बत्तीस वर्षांपूर्वी मी एक व्यक्ती होतो…. एकटी व्यक्ती होतो….. .  मानसिक आरोग्य क्षेत्राचे नवे आयाम, नव्या दिशा शोधायच्या आहेत असा ध्यास मात्र त्यावेळीही आजच्या इतकाच उत्कट होता…..त्यात मला मिळू शकणाऱ्या मान्यता, प्रसिद्धीपेक्षाही, माझ्या ज्ञानशाखेचे महत्व समाजात रुजावे हा ध्यास होता. आज आम्ही एलीट कमांडो फोर्सेसपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंपर्यंत आणि तरुण उद्योजकांपासून ते उभरत्या गायकांपर्यंतच्या अनेक गटांबरोबर काम करतोय्  ….. And our inputs are making a difference. आज माझ्या ज्ञानशाखेबद्दलची जाण समाजात अधिक विकसित झली आहे म्हणून आज असा प्रतिसाद मिळतो आहे. ह्या संस्थेच्या निमित्ताने ज्या शेकडो व्यावसायिकांनी, स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी हातभार लावला आहे आणि लावत आहेत त्या साऱ्यांमुळे आज ही व्यक्तीपलीकडे जाणारी, समाजाची चळवळ होऊ पहात आहे.

आजचा काळही संक्रमणाचा आहे. मनआरोग्यक्षेत्रासाठी नव्या आव्हानांमध्ये नव्या संधी शोधण्याचा आहे. अशावेळी  आय्.पी.एच्.सारखी संस्था तीन दशकांनंतरही नव्या दमाने, नव्या उभारीने आपले काम विस्तारात आहे ही गोष्ट महत्वाची.

आय्.पी.एच्.ला वीस वर्षे झाली तेंव्हा प्रसिद्ध झालेल्या.’शहाण्यांचा सायकिअॅट्रीस्ट’ ह्या पुस्तकामध्ये मी लिहिले होते की आय्.पी.एच्. च्या शाखा काढण्यामध्ये मला रस नाही. दहा वर्षानंतर माझे मत असे बनले आहे की आय्.पी.एच्. चा आकृतिबंध, पुनरावृत्त व्हायला हवा ….. Replicate व्हायला हवा. तरच त्याला शास्त्रीय आकृतिबंध मानता येईल. आणि त्यासाठी नव्या पिढीच्या हातामध्ये  लगाम देणेही आवश्यक आहेच की. त्यांच्यामागे आपली शक्ती उभी करणेही महत्वाचे. ठाण्याच्या आय्.पी.एच्.मध्येही पुढच्या तीन वर्षांमध्ये नवी नेतृत्वफळी तयार करण्याची ‘IPH GenNEXT’ ही योजनाही सुरु होत आहे…. थोडक्यात काय तर बत्तीस वर्षांनंतरही मी आज मस्त मजेत आणि प्रचंड बिझी आहे. वैयक्तिकपणे रूग्ण पाहण्यामधला माझा वेळ मला मर्यादित करावा लागला आहे. पण गुणी सहकारी ती गरज पूर्ण करू लागले आहेत. आणि आता माझी शक्ती सहकाऱ्यांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी वापरणे गरजेचे झाले आहे.

तर बत्तीसवर्षाच्या काळात खूप चढउतार पाहिले पण दिशा राहिली ती उन्नती आणि प्रगतीची. विनोबांचे असे उद्धृधृत आहे कि आज मनोविकारांच्या विरोधात ब्रह्मविद्येबरोबरच विज्ञानही उभे राहणार आहे… वीस वर्षांपूर्वी वाचले, तेंव्हापासून विनोबांचा आशीर्वाद म्हणून हे विधान मनात धारण केले आहे… आय्.पी.एच्. संस्था सुरु झाली तेंव्हा अचानकपणे संस्थेचे बोधवाक्य सुचले होते….Mental Health for All…. सुदृढ मन सर्वांसाठी ! आजही हे वाक्य तितकेच अनुरूप आहे…… ऊर्जा मात्र अनेकांच्या सहभागामुळे अधिक तेजाळलेली आहे.